नवीन लेखन...

माझी माय मराठी !

छायाचित्र - इंटरनेटवरुन साभार

काल परवा कुणीतरी मराठी भाषा मरणाच्या उंबरठ्यावर…… मराठी मराठी करणारांच्या नाकाला मिरच्या झोम्बाव्यात असे वादग्रस्त विधान करून खरं तर मराठीविषयी परखड  मत मांडले. आपल्याला मराठी सही करण्याची देखील लाज वाटणारांनी मराठी भाषा अस्तित्वात राखण्याऐवजी व्यवहारशून्य भाषा अशी अवहेलना करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे.

महाराष्ट्र शासन व्यवस्था इंग्रजीच्या आहारी गेलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीची यादी इंग्रजीतून प्रसिध्द केलेली आहे. पोट भरण्याची मारामार, गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील ज्यांना साधं मराठीचं ज्ञान अवगत नाही.त्यांना इंग्रजीचा  आधार घेऊनच सुविधा प्राप्त होणार असतील तर आपले सत्ताधारी मराठीच्या नावाने २७ फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यक, नाटककार, व कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने  मराठी भाषा दिन साजरा करतील .’जय हो’ चा उद्घोष करीत मराठीचा गुलाल या दिवसापुरता सर्वत्र उधळेल.

आम्ही मराठी माणसे इंग्रजीच्या इतके आहारी गेलेलो आहोत की, मराठी भाषा लिहिणे ,वाचणे, बोलणे वा तिच्या अभ्यासासाठी आणि जीवन व्यवहारासाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आपल्याला अभिमान किंवा गौरवास्पद वाटण्यापेक्षा कमीपणा वाटत आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ती अमृतालाही जिंकणारी भाषा आहे “ हे  मराठीला दिलेले सुवर्ण रत्नजडित प्रशस्ती पत्र.

एखाद्या  “शिंपी कामाचे दुकान’ या ऐवजी ज्ञानेश्वर अथवा तुकारामासारख्या संताचे नाव देऊन टेलरिंग फर्म अस्तित्वात येते. इंग्रजी भाषा हि जगातील एक समर्थ, सुंदर, संपन्न,महत्वाची रसाळ भाषा आहे. या बद्दल दुमत नाही. त्या भाषेचा मत्सर करण्याचे कारणही नाही. इग्रजीशिवाय जगात ज्ञान मिळत नाही. इंग्रजी ज्ञानभाषा आहे.हे आपण बहुतेक जन सांगताना आढळतात, इतर सर्व भाषा अज्ञानभाषा आहेत का….?   पण अवास्तव महत्व देण्याचे कारण काय….?

कुटुंबातील आईची जागा हि आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे अलिखित सूत्र आहे त्या प्रमाणे भाषेबाबतही असले पाहिजे. मुंबई शहरात मराठींच्या शाळा ओस पडताहेत. इंग्रजी शाळा अव्वाच्या सव्वा देणगी, फी आकारून गब्बर होत आहे. श्रमजीवी, कष्टकरी समाजाला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत तरी देखील पोटाला चिमटा काढून पालक पाल्य इंग्रजीत शिकला पाहिजे हा अट्टाहास का करताहेत…? हि स्पर्धा महाराष्ट्रातील शेतमजुराला,कामगारांना परवडणारी नाही. इंग्रजी शिडीचा आधार घेऊन गरीबांचा फायदा तर नक्की नाही. मुंबई शहरात मराठी शाळा आहेत. त्यामध्ये इंग्रजीचे अध्ययन होत आहे. या शाळांमध्ये गरीब वा अशिक्षित पालकांच्या मुलांना थारा नाही. पाल्याच्या प्रवेशापूर्वी पालकांची मुलाखत घेऊन त्यातून प्रवेश ठरविला जातो. जे पालक मुळात अशिक्षित आहेत त्यानी कधी शाळा कॉलेज पाहिले नसेल त्यांना, त्यांच्या मुलांना उच्चभ्रू  वस्तीतील शाळा प्रवेश नाकारून नेमके काय साध्या करतात……? मराठी बरोबर इंग्रजीचा उत्तम अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. पण इंग्रजी माध्यमात मराठीला दुजाभाव देऊन नाही.

कवी सुरेश भट यांच्या खालिल रचनेतून आपणास बरेच काही उमजले असेलच.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी !

आपुल्या घरात हाल सोसते मराठी !!

मराठीची महती आपण गातो, प्रसार करतो. मराठीचा ठसा सर्वत्र उमटविण्याचा प्रयत्न करतो. पण शासन याबाबत किती उदासीन आहे. महापालिका , नगरपालिका मराठी संदर्भात किती बेफिकीरीने वागतात. मंत्री,आमदार, खासदार, नगरसेवक अन्य लोकप्रतिनिधी चे इंटरनेटवर ईमेल आहेत. किती तरी लोक त्यावर त्यांच्याशी सर्व सामान्य विषयावर मराठीतून हितगुज करू पाहतात. समस्यांचा उहापोह करू इच्छितात . समस्या निवारणाचा हेतू असतो. पण कोणता प्रतिनिधी त्याची दखल घेतो ? आता पर्यंत त्यांनी कुणाला उत्तरे दिली आहेत. आम्ही आपल्या प्रश्नावर कार्यवाही करू ….!  कुणी तरी कळवीत आहे का….? संगणक प्रणाली वरून जर लोकप्रतिनिधीना लोकांशी सुसंवाद साधण्याचे साधन उपलब्ध झाले असेल तर काय हरकत आहे. मराठी पत्रे आली तर त्या संगणकांवर त्या प्रकारचा font असावयास हवा. आपण इतके गांभीर्याने का घेत नाही . मंत्रालयातील मुख्यमंत्री असो वा मंत्री साधी पोहच पावती देणे देखील जीवावर येते.

मी मराठी आणि माझा महाराष्ट्र मराठ्यांचा …छे इतके मराठी संदर्भात गंभीरतेने घेतले असते तर मात्र आपण मराठी भाषेच्या  प्रगतीत मागासलेले नसतो. “पिकते तेथे विकत नाही” असे म्हणतात . तसेच महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचे महत्व जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्व जाणवते का…? आपण तिच्या पासून दूर जातो तेव्हा तिचे महत्व कळते. माणसाच्या जीवनात मातेचे स्थान जेवढे परमोच्च असते तेवढेच मातृभाषेचे असावयास हवे. पण आज आपल्या मातृभाषेसंदर्भात जे चित्र दिसत आहे ते दुर्दैवाने फार वेगळे आहे.

आपल्याच  प्रांतात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तर इतर आपल्याशी नमून वागतील. हेच जर तुम्ही दक्षिणेत तुमच्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषेत विचारले तर ते त्यांचा खाक्या काय असतो ते दाखवितात की नाही. अहो…! सध्या जन्मलेल्या मुलांना आई ऐवजी मम्मीचे ढोस पाजणारे संस्कृतीदर्शन मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त नाही. मराठी भाषा हे संवाद आणि सांस्कृतिक देवान घेवाणीचे माध्यम. आपल्या मुलांवर आपल्या भाषेचे संस्कार जितके अधिक विकसित करू तितक्या सहजतेने मुले ज्ञान ग्रहण करतील.   आपल्या भाषेविषयी आपण मराठी बांधवांचे हित, खऱ्या अर्थाने येथील संस्कृती, भाषा यांचा वारसा जपण्यासाठी, स्वाभिमान दर्शविण्यासाठी माझ्या माय मराठीला सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

जगाच्या कानाकोपरयात मराठीला घेऊन जाणे मुश्किलीचे नाही आणि नसणारही. फक्त इच्छा  हवी ती आपल्या राज्यकर्त्याकडे नाही. काही झाले तरी सर्व स्तरावर मराठीचा अभ्यास व्हायला पाहिजे. इंग्रजी प्रमाणे मराठी  भाषेची अत्यंत निकड आहे. जेव्हा मातृभाषेवर प्रभुत्व असेल तेव्हाच परकीय भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. मातृभाषा, राजभाषा हेच खरे राष्ट्राचे मानदंड . लोकभाषा लोकशाहीचा कणा. भाषिक विद्वानांना परिचित आहे.  पण शासन प्रणालीला हे कोणी  सांगायचे…!

— श्री अशोक भेके,
घोडपदेव

 

Avatar
About अशोक मारुती भेके 13 Articles
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

3 Comments on माझी माय मराठी !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..