तशी अगदी लहानपणापासून म्हणजे मला समज आल्यापासून माझी ही सखी माझ्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे माझ्या तसे उशीराच लक्षात आले. घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा माझ्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती माझी अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती. ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न… चिरतरुण… टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. त्या सखीला ना वयाचे बंधन ना काळाचे. ना व्यक्त होण्याचे बंधन ना विचारांचे. प्रसंग दुःखाचा असो वा आनंदाचा ह्या सखीचे आपले माझ्यासोबत उत्साहात बागडणे चालूच असायचे. साधारण सहावी सातवीत असताना मी देखील तिच्या रंगात रंगण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याशी मैत्री????…. पात्रता आहे का तुझी? इतकी सोपी नाही आहे तिच्याशी मैत्री!!! आता अभ्यासाचे वय आहे, तिच्या नादी लागू नकोस असे बोल मला सुनावले गेले आणि त्या माझ्या प्रिय सखीबरोबर स्वच्छंदीपणे रमण्याच्या माझ्या विचारांना पूर्णविराम दिला गेला.
पण ती सखी असामान्य होती. ती अशी सहजासहजी माझी पाठ सोडणारी नव्हती. शाळेत असताना निबंधलेखन, पत्रलेखन, वाचन यामध्ये कायम माझ्या हातात हात घालून माझी सोबत करायची. या सखी मुळेच मला परीक्षेत उत्तम गुण आणि स्पर्धेत बक्षिसे मिळायची.
दहावीत देखील टक्केवारी वाढण्यात ह्या सखीचा अनमोल वाटा होता. पण दहावीनंतर मात्र मी तिची साथ सोडली. सोडली म्हणण्यापेक्षा मला सोडावी लागली. कारण तिच्या सोबत रमून अर्थार्जन होणे मुश्कीलच होते. त्यामुळे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि मी माझ्या सहृदय, संवेदनशील, बहुगुणी आणि कालातीत अशा माझ्या सखीपासून दुरावला गेले. सुरवातीला बँकेत नौकरी, सी.ए अशी मोठमोठी करिअरर्स खुणावत असल्याने सखीला गमावल्याचे मला काही विशेष वाटले नाही. पण जसेजसे महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाले तशी मला वाणिज्य शाखेच्या रुक्षतेची जाणीव झाली. मग मात्र वारंवार त्या प्रफुल्लीत, उत्साही अशा सखीची आठवण होऊ लागली. खरं तर माझ्या महाविद्यालाच्या प्राचार्यानीदेखील माझे आणि माझ्या त्या सखीचे सख्य अचूक ओळखले होते. त्यामुळे त्यांनी मला सखी सोबतच राहता येईल अशी शाखा निवडण्याचा सल्लाही दिला होता. पण व्यवहारी जगापुढे मी त्या सखीला तुच्छ लेखले आणि तिच्याशी मैत्री सहज तोडून टाकली.
नंतर हळूहळू मी वाणिज्य शाखेतील व्यावहारिक विषयांमध्ये रमले आणि प्रथम श्रेणी मिळवून पदवीधर देखील झाले.पण आपल्या प्रिय सखीला गमावल्याची सल माझ्या मनात खोलवर रुजली गेली होती. पुढे यथावकाश लग्न झाले आणि प्रापंचिक आयुष्यास सुरवात झाली. घरसंसार…मुलंबाळे ह्यात मी आपल्या आयुष्यातील “सखी” च्या कप्प्याला पक्के झाकण लावून टाकले. हळूहळू सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर थोडा निवांतपणा मिळू लागला. मग मी ग्रंथालयाचे दार ठोठावले. पुस्तकांच्या सहवासात मी परत रमु लागले. मला कुठेतरी आशा होती की पुस्तकांच्या सहवासात राहिले तर आपली ती गमावलेली सखी परत आपल्याला भेटेल. अगदी तसंच घडलं. एकदा अचानक एका लेख स्पर्धेच्या निमित्त्याने आम्हां दोघींची भेट झाली. आम्ही एकमेकींना कडकडून भेटलो. आम्हांला कुठलेच भान उरले नव्हते. आमची भेट म्हणजे एक अनोखा सोहळा होता. माझ्या चेहेऱ्यावर सुरकुत्या,डोळ्यांवर चाळीशीचा चष्मा आणि शरीराचा बेढब आकार अशा वय वाढल्याच्या खुणा शरीरावर स्पष्ट जाणवत होत्या. पण माझी त्ती सखी मात्र अजूनही अगदी उत्साही, ताजीतवानी, आनंदी आणि भरभरून गप्पा मारणारी अशीच होती. सखीशी झालेली भेट माझ्यासाठी खूप आनंददायी ठरली. त्या भेटीने माझे नाव लोकांपुढे आले आणि आमच्या मैत्री बद्दल आमच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षावही झाला. आमची भेट बघून वडिलांचे डोळे पाणावले आणि त्यांनी मला बजावले की आता ह्या अनमोल अशा सखीची साथ कधीच सोडू नको. खरं तर माझ्या वडिलांची देखील अशीच एक सखी होती. पण परिस्थतीमुळे त्यांची मैत्री काही फुलू शकली नाही.
आता माझ्या मनाच्या कोपऱ्यात घट्ट बसलेलं सखी विरहाच दुःख हलकं झालं आणि हातात हात घालून आम्ही दोघी बागडू लागलो. संसार मुलेबाळे ह्यापेक्षा वेगळे असे माझे आणि तिचे नवे विश्व आकार घेऊ लागले. मला परत पूर्वीसारखे उत्साही वाटू लागले. आपली दैनंदिन कामे भराभर उरकवून मी तिच्या सोबत वेळ घालवू लागले. दोघींची कल्पनांचे पंख लावून विविध विषयांची सफर सुरू झाली. कधी कधी आम्ही दोघी एकमेकींमध्ये इतके रममाण होऊन जायचो की आम्हाला वेळ काळाचे भानही उरत नव्हते. मग मात्र घरातल्या लोकांचे ताशेरे मला ऐकावे लागायचे. घरातले वातावरण बिघडले की काही दिवस मी तिच्या पासून दूर राहायचे. पण तिच्याशिवाय जगणे म्हणजे मला आयुष्य कंटाळवाणे वाटायचे. ती रंभा तरी कुठे मला स्वस्थ बसू देत होती. तिचे आपले सतत माझ्या मागे मागे बागडणे चालूच. नवनवीन विषय शोधायचे आणि मनोसक्त बोलत बसायचे. प्रसंग अगदी कोणताही असो हिची आपली माझ्याशी बडबड बडबड चालूच. अगदी कोणी हे जग सोडून गेले म्हणून जरी तो भेटायला गेले असले तरी ही तिथेही हजर राहणार. बरं हिला कधी गांभीर्य नावाची गोष्टच माहित नाही. तिथेही हिचे आपले मुक्तपणे बागडणे चालूच. मग कुणाचे रडणे बघणार, रडण्याच्या प्रकारांवर भाष्य करणार, कोणाला खरं दुःख झाले आहे आणि कोण नाटक करतंय ह्यावर भोचकपणे बोलणार. त्यामुळे मलाही ती कधी गंभीर होऊ द्यायची नाही. सार्वजनिक समारंभ असो वा घरगुती कार्यक्रम असो तिची सतत माझ्या आयुष्यात लुडबुड चालूच असायची. कधी कधी सर्व मला वैतागून म्हणायचे की तुझे हे सखी प्रकरण जरा अतीच होतंय हं! तिच्या सोबत तू कुठेतरी हरवल्यागत असतेस. पण माझी ती जीवलग मैत्रीण खरंचच मला एवढे अनुभवसंपन्न करत होती की मलाही तिचा सहवास कायम हवाहवासा वाटायचा.
अशाप्रकारे माझ्या सखीच्या सोबत माझे सुखासीन आयुष्य जगणं चालू होतं. तिचा सहवास हेच मला आता जगण्यासाठी कारण होते. त्यामुळे आयुष्य आता खूप आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेने ओसंडून वाहत होते. माणसाला जगण्यासाठी प्रेरणा मिळाली की आयुष्य कधीच कंटाळवाणे होत नाही. माझेही तसेच झाले होते.
तरीही ह्या सुखाला कोणाची तरी नजर लागली असे म्हणण्याची वेळ माझ्यावर आली. सखीची आणि माझी ताटातूट होऊ लागली. मला परत उदासीन वाटू लागले. माझे माझ्या त्या प्राणप्रिय सखीबरोबर मुक्तपणे वावरणे कमी होऊ लागले. आला दिवस ढकलणे एवढंच आयुष्य चालू होते. नकारार्थी विचारांनी डोक्यात थैमान घातले होते.मला खरंतर काहीही करून ती सखी माझ्या आयुष्यात परत हवी होती. आमच्यात नेमकं काय बिनसले होते हे कोणालाही समजत नव्हते. फक्त मी त्या सखीला सोडू नये असे मला माझा प्रत्येक हितचिंतक सांगत होता.
मलाही तिला सोडायची काही हौस नव्हती.
पण माझ्या त्या सखीला सांभाळायचे म्हणजे सध्या खूप अवघड होऊन बसले होते.तिचे व्यक्त होणे हल्ली फार आधुनिक झाले होते आणि मी मात्र अजूनही जुन्या रितीने तिच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या संगतीत रहायचे म्हणजे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागणार होते. त्यामुळे मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष्यच करत होते. वाटले होते जाऊन जाऊन कुठे जाणार आहे…येईल परत आपोआप. पण कितीतरी दिवस झाले तरी ती माझ्याकडे फिरकायला तयारच नव्हती. माझे कुटुंब, माझे नातेवाईक माझ्या आयुष्यात माझ्यासाठी महत्वाचे होतेच पण ती म्हणजे माझं अस्तित्व,माझा श्वास, माझं विश्व, माझं सर्वकाही होती. ती माझ्याशी बोलतच नाहीये म्हटल्यावर काय करावे तेच समजत नव्हते. ती कायमची तर सोडून गेली नसेल ना मला ….अशा विचारांनी मी खूप अस्वस्थ झाले होते.
शेवटी विरहाने व्याकूळ होत मी सखीला पत्र लिहावयास घेतले.
माझी प्रिय जीवलग सखी प्रतिभा,
तू माझ्याशी बोलणे बंद केल्यापासून मी पार उध्वस्त झाले आहे ग. माझं जगणं निरस झाले आहे. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मला माहिती आहे की मी तुला खूप गृहीत धरू लागले होते. मला वाटायचे की तू काय नुसती रिकामटेकडी, सतत आपले ह्या विषयावरून त्या विषयावर हुंदडणे चालू. लहानपणी तुला जाणले नाही आणि मोठं झाल्यावर करिअरच्या नावाखाली तुझा नाद सहज सोडून दिला. तरीही तू माझी साथ सोडली नाहीस. सतत माझ्यासोबत राहिलीस. सावलीप्रमाणे तू माझ्या पाठीशी होतीस. आयुष्याच्या मध्यावर परत आपण बहरू लागलो होतो. तुझ्याशी परत जोडले गेल्याने माझ्या बेचव आयुष्यात रंगांची उधळण सुरु झाली आणि ह्याचसाठी केला होता सारा अटटाहास असे वाटू लागले होते. खरं तर तशी तू सर्वांबरोबर असतेस.ज्याला तू गवसतेस,त्याच्या जगण्याचे सार्थक होत असते.पण फार थोड्या लोकांना ह्याची जाणीव असते. पण माझ्या वडिलांच्या कृपेमुळे म्हणा किंवा त्यांच्या सुप्त इच्छेमुळे म्हणा माझी तुझी अगदी सहजच दोस्ती झाली. वडील गेल्यानंतर मला अगदी एकटे पडल्यासारखे वाटत होते, तेंव्हाही तूच माझ्या सोबत होतीस. तूच मला समजावले होतेस की वडिलांचेही तुझ्यावर खुप प्रेम होते. तू माझी साथ कधीच सोडू नकोस म्हणजे वडिलांबरोबर असल्याचे समाधान तुला कायम मिळेल.
पण तरीही आज आपण बोलत नाही आहोत. पण तुला खरं सांगू का? तुझे हे आधुनिक रूप काही मला फारसे रुचले नाही. तुझ्याशी संबंध टिकवायचे म्हणजे मराठी टायपिंग शिका,फेसबुक, ब्लॉग, ई-मेल, ई-पुस्तके ह्या सर्वांशी मैत्री करा हे माझ्यासाठी खूप अवघड होते. आधी आपल्या मैत्रीला कागद पेन पुरायचा; पण आता तुझे व्यक्त होणे खूप आधुनिक झाले आहे. त्यामुळेच आपल्या मैत्रीत खूप तफावत आली.
पण आता जेव्हा तू अजिबातच भेटायला तयार नाहीस तेव्हा मात्र मला खऱ्या अर्थाने तुझी जाणीव झाली आणि तुझे महत्व ही समजले. त्यामुळे फक्त तुझ्यासाठी आता मी आधुनिक होणार आहे. कारण तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. नुकतेच मी माझ्या संगणकावर मराठी सॉंफ्टवेअर घेतले आहे. त्यामुळे मी आज तुला तुझ्यात झालेल्या बदलाप्रमाणे टायपिंग करून प्रतीलिपी वर सादर करत आहे.माझी तुला अगदी मनापासून कळकळीची विनंती आहे की माझ्यावर परत अशी नाराज होऊ नकोस. मी देखील तुझ्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घेतच आहे. परत आपण एकत्र येऊन धुडगूस घालू या.
तुझीच सखी.
अश्या प्रकारे मी माझ्या प्राणप्रिय सखीला… माझ्यातल्या रुसलेल्या प्रतिभा शक्तीला….सृजनशीलतेला….मनापासून साद घातली आणि तिला माझ्या आयुष्यात परत आणले. आता लवकरच आमचे हे सख्य जगजाहीर होऊन साहित्य क्षेत्रात काहीतरी चमत्कार घडवा ही अपेक्षा. अशी ही वयापलीकडची, कालातीत माझी सखी म्हणजेच माझ्यातली प्रतिभाशक्ती किंवा सृजनशीलता. ही आपल्या सर्वांकडेच नक्कीच असते, फक्त आपण तिला ओळखायला हवे. मग प्रत्येकाचे जगणे हे फक्त जगणं नसणार ….तर एक महोत्सव असेल.
— मंजुषा देशपांडे, पुणे.
खूपच सुरेख सुगम लेख
धन्यवाद
खूप छान ..