नवीन लेखन...

माझी माणसं – दत्ता काका

दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर  पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला !

दत्ताकाकांचे आणि आमचे शेत लागूनच होते . तो ते दोन्ही बघायचा . वर्षाचा काय माल असेल तो गाडीत घालून आणून द्यायचा . नौकरी मुळे अण्णांना शेती कडे लक्ष देता येत नसे . सारी मदार दात्ताकाका वरच  होती . शेती साठी तो आमच्याच वाड्यात गावी रहात असे .

सणावाराला विशेषतः दिवाळीच्या पाडव्याला , शेतीतली काही ‘नव्हाळी ‘घेऊन यायचा , सोबत पेरू ,आंबे- बोर असलं काहीतरी आणत असे .  दिवाळीत सक्काळी उठलंकी ‘तुझा दत्ताकाका आलाय बरका !’ आई सांगायची . कोण आनंद व्हायचा . येताना तो माझ्यासाठी कधी गावच्या सुताराकडून विटी -दांडू , कधी भवरा आणायचा . एकदा तर दगडी गोट्या घडवून आणल्या होत्या . दिवाळीत तर चार फुलबाज्या माझ्या साठी आणायचा . म्हणून तो मला खूप आवडायचा . माझ्यावर त्याचा थोडा ज्यास्त जीव होता . त्याला दोन मुलीच होत्या मुलगा नव्हता म्हणून असेल .

पण मला  जसे जसे कळू लागले तसे तसे त्याचे प्रताप पण ध्यानात येऊ लागले . तो प्रचंड आळशी होता . दोन वेळेला जेवून ढाळंजत, कोणालातरी पकडून गप्पा छाटत बसायचा . नसता गावभर उचापती करत फिरायचा  . त्याच्या उचापतींना कंटाळून अण्णांनी त्याचे लग्न करून दिले . तर ‘रंगोबानी माझ्या गळ्यात काळी  बायको बांधली !. माझा गळा कापला ! ‘म्हणून सांगू लागला . लग्नां नन्तर संसारात रमेल हि अण्णांची अशा दत्ताकाकांनी फोल ठरवली .

“अरे दत्ता, तू किसना कडून काही पैसे घेतलेस का रे ?” एकदा अण्णांनी त्याला विचारले .
“किस्न्या काही बोलला का ? फक्त पन्नास रुपये तर घेतलेत ! टाकीन देऊन या खळ्यावर . नाहीतर आत्ता तू दे ,तुला खळ्यावर देतो !, नाहीतर पाच एकरचा तुकडा तुझ्या नावावर करून घे ! हो तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर !” असलं तोडून बोलला .  तेव्हा पन्नास रुपये खूप मोठी रक्कम असायची .

अश्या अनेक उधाऱ्या तो करायचा . त्याची उधाऱ्याची एक अनोखी पद्धत होती . समजा एका कडून दहा रुपये घेतले कि गळ्याशी येजीस्तोवर लक्ष देत नसे . तो बाबा जेव्हा मागायला येई तेव्हा ‘चार सहा दिवसात देतो ‘ म्हणून तो खरंच देत असे ! कसे?  तर  दुसऱ्याकडून  वीस रुपये उधार घेऊन पाहिल्याचे दहा रुपये परत करत असे आणि दहा रुपये स्वतःह साठी खर्च करीत असे ! अश्या किरकोळ उधाऱ्या  वाढल्याकी मग तो ‘ठोक ‘ उधारी ,म्हणजे हजार पाचशेचे कर्ज काढी . आणि सर्व उधाऱ्या देऊन टाकी ! पुन्हा किरकोळ उधारीला गडी मोकळा ! . मग ठोक उधारी साठी एखादा शेतीचा तुकडा विकून टाकायचा !
” झालो बाबा एकदाचा या देण्या -घेण्याच्या तुन मोकळा !. रंगोबा , पन्नास रुपय दे बाबा , तुळजापूरला जाऊन येतो ” अण्णाला  पैसे मागायचा
” मधी -आधी तुळजापूर कशासाठी ?”
” ‘मला ऋण मुक्त कर ‘ म्हणून आई भवानीला नवस बोललो होतो !  तो फेडायचाय ! “खो –खो — करून हसत  सांगायचा !

“दत्ताकाका ,इतक्या उधाऱ्या करतोसच कशाला ?”मी एकदा त्याला विचारले .
”  अरे ,या बायकांना ,सोन्याच्या बांगड्या , पाटल्या , दागिने ,रेशमी साडया , पैठण्या खूप लागत ! अन त्यासाठी पैसा लागतो . मला कुठं तुझ्या बापा सारखा गब्बर पगार मिळतो ? मग मी उधाऱ्या  करतो ! ”
” पण काकी तर म्हणते कि तू काहीस देत नाहीस !  ‘काकीच्या अंगावर फुटका मणी सुद्धा नाहि ‘ म्हणून आई पण सांगत होती !”
“काकी ? तिचा काय सम्बन्ध ?”
” मग सोन , साड्या  कुणाला ?”
” अरे मी ‘बायकांना ‘ म्हणालो ,’ बायकोला ‘ नाही ! , ते जाऊदे ! सुऱ्या , आरे तू अजून लहान आहेस . मोठं झाल्यावर तुला कळेल !.” अन खो -खो करून हसला .

एकवेळ महादेव तरी बिन नागाचा दिसेल पण दत्ताकाका बिन छत्रीचा दिसायचा नाही . बर ती सुद्धा काठी सारखी नाहीतर बगलेत आडवी धरलेली असे .
” अरे दत्ताकाका ,छत्रीच ओझं कशाला बाळगतोस उगाचच ?”
” वाटेत कोल्हे ,कुत्री आली तर हाकलायला लागतात रे . शिवाय ऊन पाऊस आहेच कि . वर चोर -फिर आला तर काठी सारखी छत्री वापरता येते !”
“पण तू तर परवा एस .टी . सुद्धा अशीच बगलेत  आडवी छत्री धरून उभा होतास ! ”
“बरोबर आहे ! छत्री आडवी धरली म्हणजे खिसा कापला जात नाही ! चोराला जवळच येत येत नाही ना या आडव्या छत्रीने !म्हणून गर्दीच्या ठिकाणी अशीच छत्री धरतो !”असले याचे अजब डोके !

एकदा आमचे अण्णा देव पूजेला बसले . आमच्या कडे चांदीचे देव आहेत . वडिलोपार्जित .  ( अजून हि आहेत मी सध्या पूजा करतो ). तर देवातला गोपाळ कृष्ण गायब !
‘दत्ता,  काल तू पूजा करताना देवात रंगनाथ होता का रे ?”
” तर , होता कि !, त्याला गंध -अक्षदा वहायल्याच मला पक्क  आठवतंय कि !”
” आज दिसत नाहीरे !”
” रंगोबा ,अरे उंदरांनी नेला असेल ! पंचामृताचा वास असतोना त्याला ! अन तसही घरात एक ‘रंगनाथ ‘असताना देवात दुसरा काय करायचंय ?” असे म्हणत खो -खो करून हसला .!
त्याच दिवशी संध्याकाळी ढाळंजत घरचे सगळेजण नेहमी प्रमाणे  गप्पा मारीत बसले होते .
“काय दत्या , अशात उधारी वाले दिसत नाहीत . सुधारलास्की काय ?” कोणी तरी विचारले .
” अरे बाबा , या वेळेस भारी काम्ब्बक्त्ती आल्ती ! पठाणाचाच तगादा होता ! तंगड तोडतो म्हणाला होता ! “मग ?”
” या वेळेस देवच धावून आला ! देवातला बाळ कृष्ण ! सोनाराने दिले कि गर्जे पुरते ! ” खो -खो करून हसत दत्ताकाका म्हाणाला ! मग मात्र अण्णांनी त्याची गय केली नाही . घरातून हाकलून दिले !

घरात मोठ्या बहिणीच्या लग्नाचे घाटत होते . पैसा हवा होता . दत्ताकाका शेतीचे काही हाती लागू देत नव्हता . म्हणून अण्णांनी शेती विकून टाकण्याचा निर्णय घेतला . गावाकडे गेल्यावर कळले कि मागेच दत्ताकाकाने सगळी , स्वतःहाची आणि आमची शेती विकून टाकलीय ! तावातावाने अण्णा त्याला जाब विचारायला गेले .
” रंगोबा काय करू ? माझ्या अन्नपूर्णेच्या लग्नाच्या वेळेस नड होती . तवा तुझी ,माझी सगळीच शेती विकून टाकली ! नाहीतरी मला पोरग नाही , तुला भक्कम पगार आहे ,तुला काय करायचीय शेती ? तसेही त्यात काही पीकतच नव्हतं ! बिन कामाची शेती म्हणून मीच विकून टाकली ! ”
” पिकत कस नव्हतं ? आसपासच्या शेतात जोमानं पीक येतात अन आपल्याच शेताला काय झालाय ?”
“तुला खोटं वाटत असेलतर , भागनाला विचार !”
” भागनाला ? म्हणजे तू शेती बटाईने दिलीस कि काय ?”
” हो तर ! मागचं दिली कि ! कोण करणार शेती ? तुम्ही बसा गारे -गार वाळ्याच्या पडद्यात हाफिसात ! आम्हीच का उन्हा -पावसात मरमर  करायची ?!  मग दिली बटईन ! ”
“बर ते बटई च  जाऊदे .पण माझ्या नावाची शेती तुला विकताच कशी आली ?”
” त्याला काय ? मीच ‘रंगनाथ ‘ म्हणून सही केली अन टाकली फुकून ! रंगोबा , आता तुला काय करायचंय ते कर ! पोलिसात दे कि जीव घे !”
बसून जरी खाल्लं असत तरी त्याला आयुष्यभर पुरून उरलं असत इतकी शेती होती , पण त्याने विकून खाल्ली ! संख्या भावासारखा त्याने दावा साधला होता .

अण्णा या धक्क्याने खूप खचले . त्यांनी अंथरून धरले . सरकारी  दवाखान्यात ऍडमिट केले . हे कळल्या बरोबर दत्ताकाका हजर ! अण्णांचं दुखणं विकोपाला गेलं . चार महिने दत्ताकाकानी अण्णाची सेवा केली . अंथरून पांघरून , रात्रीची जागरणे , गुवा मुताची धोतर धुणी , सकाळी कोमट फडक्यांनी अंग पुसून डॉक्टर नि दिलेली पावडर लावणे , थोडा दम लागलाकी धावत डॉक्टरला घेऊन येणे . जेऊ घालणे . सगळं निमूट पणे ,न बोलता केलं . तेव्हा व्हील चेअर ची सोया नव्हती . अंथरुणावर पडून कंटाळा आला कि तो अण्णाला पाठकुळी घेऊन समोर वऱ्हांड्यात चार -दोन फेऱ्या पण मारायचा . अण्णांनी त्याच्याशी बोलणे सोडले होते ते शेवट पर्यंत . अण्णा गेले तेव्हा ‘ पोरका झालोरे ‘म्हणून त्याने हंबरडा फोडला होता . चौदावा करून गेला तो पुन्हा आलाच नाही . बरेच दिवस त्याची काही खबर नव्हती आणि आम्ही पण त्याच्या अश्या वागण्या मुळे आमच्या कडून चौकशी केली नव्हती . ‘त्याला घरा पासून दूर ठेवा ‘ हि अण्णांची इच्छा होती .

असेच एकदा दत्ताकाका औरंगाबादला घाटीत ऍडमिट असल्याचे कळले . मी त्याच्या भेटीस गेलो .
” सुऱ्या  , बर झालं बाबा तू तरी आलास ” बराच खंगलेला दिसत होता .
” का रे , असे का म्हणतोस ?”
” चारपाच दिवस झालेत , जावई इथं टाकून गेलाय ! ”
” काका, अरे काही कामात असेल !. नसेल जमले यायला ! ते जाऊ दे ! मला सांग तू कसा आहेस ?”
” मी न मस्त आहे ! गादी ,पलंग आहे , बोडख्यावर पंखा वारा घालतोय !. अप्सरे सारख्या नरसा अवती भवती फिरतायत !स्वर्गात आहे ! फक्त आपली माणसं नाहीत ! ” या चार वाक्यात त्याला दम लागला त्यात हि खो -खो करून हसला . पण हे हसणे भेसूर होते .
“सुऱ्या  , तुला एक मागू कारे? ”
” काय ?”
” मला न गरमागरम जिलबी खावीशी वाटतेय रे . देशील का आणून ?!”त्याने निरागस पणे विचारले . दगाबाज दत्ताकाका आणि हा समोरचा दात्ताकाका ,जमीन अस्मानाचा फरक होता !. गरम ‘इमरती ‘साठी मी ऑटो करून गेला . गरमागरम ‘इमारती ‘सांभाळत परतलो . पण उशीरच झाला होता ! मी परते पर्यंत त्याने डोळे मिटले होते , कायमचे !

आज या घटनेला चाळीस वर्षाहुन ज्यास्त काळ लोटला आहे . आजही एखाद्या कार्यात जिलेबी दिसली कि ‘ मला गरमागरम जिलेबी खावीशी वाटतेय रे, देशील ?’ म्हणणारा दत्ताकाकाचा आवाज ऐकू येतो , आणि माझा हात जिलेबी पासून आपसूकच दूर होतो !

— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..