नवीन लेखन...

माझी माणसं – तात्या सोमण

माझ्या खांद्यावर बसून एक कावळा टोच्या मारतोय असे मला वाटले म्हणून मी मागे वळून पहिले . तो मागे तात्या सोमण ! पाठमोऱ्या माणसाला हाक मारण्या ऐवजी, तात्या त्याचा खांद्यावरआपल्या  मधल्या बोटाने टकटक करतो ,  हि त्याची सवय पुढे अंगवळणी पडली . मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्या कडे पहिले .
” या इथे एक बोकूड दाढीचा रिक्षेवाला उभा असतो . आज तुम्ही त्याला पाहिलंत का ?”
“नाय ! काही काम होत का त्याचा कडे ?”
“नसत्या चौकश्या कशाला  करताय ? पाहिलंत का नाही ,येव्हडच सांगा !”
हे पाणी काही आपल्या नगरच नाही याची मी मनात नोंद घेतली . तेवढ्यात नरसू रिक्षेवाला आलाच .
“बर झालं . तुमचीच चौकशी करत होतो . पण हा बाबा काय सांगत नव्हता !” माझ्या कडे हात करून तो म्हणाला .
“अहो, ते कुळकर्णी सायेब हैत . ”
“कोण का असेनात . काल  तुमच्या कडे एक रुपया राहिला होता , सुटे नव्हते ना . तुम्ही उद्या देतो म्हणाला होतात . आता द्या !”
मी आणि नरसू दोघेहि चक्रावलो . एका रुपया साठी हा गृहस्थ घरापासून रिक्षा स्टॅन्ड पर्यंत आला होता !
“आज पण माझ्या कडे सुटे नाहीत !” नरसूने डिक्लीयर केले . तसा तो भडकला .
“असे कसे नाहीत ? माझे मला पैसे देऊन टाका ! सुट्याच तुमचे तुम्ही बघा ! ”
शेवटी मलाच बघवले नाही . मी खिशातला रुपया नरसूला देऊन तो वाद मिटवला .

मग तात्या नेहमी दिसू लागला . जात येता  ओळखीचे हसू लागला . एक दोनदा आम्ही सोबत चहा पण घेतला . माझा मुळे  शाम्याची पण ओळख झाली आणि बघता बघता तो आमच्या  ग्रुपचा  झाला . मुडक्याच्या टपरीला एक गिऱ्हाईक वाढलं . त्याच्या बोलण्यातून तो कोकणातल्या एका आडवळणाच्या खेड्यातून आला होता आणि त्याचे नाव तात्या सोमण आहे इतकेच कळेल . तो स्वतः बद्दल फारसा बोलायचा नाही . बरेचदा तो ते बोलणे टाळायचा . घरदार ,बायका पोर , भाऊ बहीण काहीच बोलला नाही. बाकी इतर बाबतीत मोकळा होता . थट्टा मस्करीशी वावडे नव्हते ,पण स्वतः करायचा नाही . थोडासा एक्कलकोंडा वाटला . म्हटलं रुळेल हळूहळू. पण आजवर त्याच्यात फारसा फरक पडलेला नाही . तात्याने कोकणातून माडाची उंची आणि हापूस आंब्याचा रंग आणला होता . त्याचा चेहऱ्यात आणि हापूस आंब्यात कमालीचे साम्य होते . त्याची हनुवटी डिट्टो आंब्याच्या कोई सारखी होती !

००००

मी मुडक्याच्या टपरीवर चहा घेत होतो . तेव्हड्यात शाम्या आला .
“चाहा ?”
” प्रश्नच नाही ,अन सोबत खारी पण ”
” मग ठीक , मी फक्त चहा घेतलाय ,तुझ्या बीला सोबत त्याचे पण पैसे देऊन टाक !”
” म्हणजे ?”
“म्हणजे , नन्तर येणाऱ्याने  सगळे बिल द्यायचे !”
शाम्या गरम चहात खारी बुडून खाण्यात मग्न होता . समोरून तात्या आला .
” चाहा घेणार का सोमण्या ?” मी विचारले
” नको .”
” अरे वा , बरे झाले आमचे एका चहाचे पैसे वाचले .! ” शाम्या बरळला
” मग मी पण चहा घेणार !” तात्याने पैंतरा बदलला .
“असे असेल तर आमचे चार चाहा अन पाच रुप्याच्या खारीचा पैसे वाचले . !”
” कस काय ?”तात्या बुचकळ्यात पडला .
” त्याच काय सोमण्या , मी न एक चहा अन पाच रुपयाची खारी खाल्लीय . मी अजून एक चहा घेणार आहे . मायला ,पहिला चहा खारीच पिऊन गेली ! मी आलो तेव्हा सुरश्या ने चहा घेतला होता . तो म्हणाला शेवटी येणाऱ्याने सगळ्याचे बिल द्यायचे . आता पर्यंत मी शेवटी येणार होतो , आता तू आलास तर तूच सगळ्यांचे बिल देणार ना ? आणि समाज आता वश्या आला तर तो देईल . पण वश्या  कसा येणार तो गेलाय मुंबईला ! तेव्हा …. घ्या  घ्या चहा घ्या ! ”
” मेल्यानु ,नेहमी तुम्ही मलाच खर्च्यात घालता ! रावळनाथ तुम्हास बघून घेईल ! ” तात्याने नाराजीचा सूर लावला .
“सोमण्या कसला चिडतोयस रे ? इतका अतिरेकी चिक्कू पणा का करतोस रे ? कधी तरी पैसे खर्च करत जा .”मी म्हणालो .
” तुला नाही कळायचं !,” तात्या तुटक पणे बोलला . मीच बिल दिले .
०००००

मी गनीच्या पान पट्टीवर सिगरेट घेत होतो . तेव्हड्यात तात्याने त्याच्या स्टाईल मध्ये खांद्यावर टकटक केली .
“सोमण्या ,सिगरेट घेणार का ?”
“तसा मी बिडी -काडी घेत नाही .तू आग्रह करणार अशील तर, अन तू पाजणार अशील तर घेईन बापुडा!
पण चाहा नंतर !” म्हणजे तात्याला सिगरेट सोबत चहा पण हवा होता !
आम्ही सिगरेट घेऊन मुडक्याच्या टपरी कडे वळलो . टपरीच्या मागच्या बाजूला एक डुगडुगत बाकडं अन काळ्या भोर कडप्याचा टॉप असलेलं पोलिओग्रस्त टेबल आमच्यासाठी कायम ‘रिझर्व्ह ‘ असायचं . तेथ बसल्यावर, तात्याने मघाशी सुतार पेन्सिलचा तुकडा कानावर ठेवतात, तशी ठेवलेली सिगरेट अलगद काढून हलक्या हाताने समोर टेबलवर ,मौल्यवान काचेची वस्तू ठेवावी तशी ठेवली . एखाद  भुकेलं कुत्र हडकाच्या तुकड्याकडे जितक्या नजरेनं पहात तितक्या विविध नजरेने — मायेन ,अधाशीपणान , खाऊ का गिळू नजरेनं , लबाडीन, हावरट पण –तात्या ती सिगरेट न्याहाळत होतो . तेव्हड्यात चहा आला . सिग्रेटवरची नजर न हटवता तात्याने चहा संपवला . ती सिगरेट आडवी धरून या टोकापासून ते त्या टोकापर्यंत तिचा वास घेतला आणि मग  एकदाची ती पेटवून ओठात धरली ! ती पूर्ण म्हणजे फिल्टर पर्यंत ओढली ! ती ओढतातना हि  प्रथम तर्जनी व मध्यमा बोटात धरून सुरवात केली , नन्तर तर्जनी आणि अंगठ्यात धरून बिडी सारखी ,आणि शेवटी अनामिक व करंगळीच्या बेचक्यात घरून चिलमी सारखी ओढून संपवली  ! तात्याच सिगरेट पिणं  एक सोहळाच असतो . !
“सुरश्या , तू रोज किती सिग्रेटी फुंकतोस ?”
” मी मोजत नाही ! वाटलं कि पितो ! ”
“तरी ?”
“असतील सात -आठ ”
” बापरे ! , दोन रुपयाला एक धरली , तरी पंधरा -सोळा रुपयाची राख करतोस ?”
” मी तसा विचार नाही करत . ! ”
” रोज पंधरा रुपये म्हणजे महिना साडे चारशे ! वर्षाचे साडे पाच हजार !”
” साडे  पाच नाही तर पाच हजार चारशे !” मी हिशोबातली चूक दाखवण्याचा गाढवपणा केला .
” गधड्या, शंभर रुपये मी व्याज गृहीत धरलाय !  म्हणजे दहा वर्षात व्याजा सह सुमारे साठ हजार ! वर तब्यतीचं नुकसान , दवाखाना ,औषध यांचे वेगळेच पैसे !”
” सोमण्या , हे मात्र अति होतंय ! सदा पैसे पैसे नाही करत तुझ्या सारखं ! पैश्या पेक्ष्या इतरही गोष्टी आहेत ! ‘ ठेवायची ‘ म्हटल्यावर चोळी -बांगडीचा विचार करायचा नसतो !”सोमण्या ना कधी कधी डोक्यात जातो .
” सुरश्या  तुला कळत कस नाही ? आज फुल पगारात हे ‘ ठेवणं ‘ कदाचित तुला परवडत हि असेल , पण उद्या म्हातारा झाल्यावर ! झेपेल ? कदाचित तेव्हा तुला सांगायला मी नसेल ! अन माझ्या शिवाय कोण तुला असं खडसाहुन सांगणार? मित्र म्हणून ते माझेच काम आहे  ना ?”

बराच वेळ आम्ही दोघेही गपच होतो .  मधेच तो ‘ येतो ‘ म्हणून निघून गेला .

०००००

एक दिवस अचानक शाम्या आजारी पडला . चार दिवस झाले ताप काही उतरेना . डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे हॉस्पिटलला ऍडमिट केले . शाम्याला जवळचे कोणीच नाही . मीच त्याच्या सोबत दवाखान्यात होतो . तेव्हड्यात तात्या आला .
” काय झालाय रे शाम्याला ?”
” माहित नाही , साल चार दिवसापासून ताप  काही उतरत नाही . ग्लानीने डोळा पण उघडेना , मी घाबरलो ,तुला फोन लागेना . डॉक्टरन ऍडमिट करायला सांगितलं ! आलो घेऊन !”
” काय झालं असेल रे त्याला ? किती दिवस दवाखान्यात ठेवावं लागेल   ?”
” माहित नाही , पण डॉक्टरला किडनी इन्फेक्शनची शंका आहे . ”
“बापरे , …… म्हणजे किडनी बदलावी …… ”
” अजून काही कन्फर्म नाही . ”
” एक विचारू सुरश्या ? समज तशी वेळ आलीच , रावळनाथाच्या कृपेने तशी वेळ येऊच नये , पण आलीच तर माझी किडनी दिली तर चालेल कारे ? तू — तू  डॉक्टरांना विचारून ठेव ! मला ना डॉक्टरशी इंग्रजी बोलता येणार नाही अन मला भीती पण वाटते रे …  मघाशी शाम्याला काचेतून पाहिलं !. माकड, मलूल हुन पडलंय रे ! मला भडभडून आलं …. ! तात्या चा आवाज इतका कातर होता कि एकवेना ! माझा हि बांध फुटतो कि काय असे वाटत होते ! कसा बसा  स्वतःस मी सावरत होतो ! खरे तर सोमण्याच हे रूप विरळच होत . तो शाम्या सारखा भावुक नाही . पक्का बुद्धीने वागणारा आणि विचार करणारा आहे.
” सुरश्या  हे घे ” त्याने एक नोटांचं पुडकं दिल . पाच हजार तरी असतील ! पै -पै जमा करून ठेवलेले ! चिक्कू , मख्खीचुस , म्हणून टोमणे ( त्यात काही माझे हि आहेत !) सहन करून जमवलेले पैसे !
” पण सोमण्या …….. ”
” असू दे रे , दवाखाना म्हणलं कि पैसा लागतोच रे , आणि तू अन शाम्या शिवाय मला तरी कोण आहे ?, शाम्या यातून बाहेर पडलाच पाहिजे रे ! …… माझा दादा , मोठा भाऊ , शाम्याचाच वयाचा !, डोळ्या समोर गेला रे !गरिबी , पैसा  नव्हता ! उपचारा अभावी गेला ! त्या चटक्याने चिकटपणा अंगी चिटकला ! असा सगळ्याची बोलणी खाऊन पैसा  जमवतो आणि … आणि  वृध्दाश्रमातल्या एखाद्या ‘दादा’ला देऊन टाकतो !  तेव्हडाच थोडं समाधान मिळत !….. ” तोंड फिरऊन आपले अश्रू लपवत तात्या सावकाश निघून गेला . मी त्याच्या पाठमोऱ्या ‘ श्रीमंत ‘ आकृती कडे पहात राहिलो !  कारण न जाणता  मी “चिक्कू ‘ पणाच लेबल लावून मोकळा झालो होतो ! माझी मलाच लाज वाटत होती !

आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?

— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..