साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे “
ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण-
माझी शबनम”,
जी माझ्या खांद्याला कायम बिलगून असते, कुठेही जाओ, तुम्हाला माझ्या सोबत दिसणार,
माझे लेखक-कवी मित्र,सर्व स्नेही-नातेवाईक, पारिवारिक मंडळी या सर्वांना मी माझ्या प्रिय शबनम साहितच दिसणार.
बँकेतील स्टाफला ,बँकेत येणाऱ्या कस्टमर्सना सुद्धा माझी आणि शबनमचे गहिरे नाते माहीत होते.
शबनमचे माझ्या सोबत नसणे’,अगदी मोजके प्रसंग असतील, पण, ज्या दिवशी ती माझ्या सोबत नसायची, त्यादिवशी माझ्यापेक्षा तिचा विरह इतरांना जाणवत असे, ते म्हणायचे का हो साहेब, तुमची शबनम कशी काय नाही सोबत..!
करमत नसेल ना तिच्याशिवाय ?
काय उत्तर देऊ ,तुम्हीच सांगा..
अहो ,बायको लग्नानंतर अर्धागिनी झाली,
ही माझी शबनम , माझी अर्धांगिनी झाली त्याला आता पन्नास वर्षे होत आहेत.
माझी शबनम कुणाच्या डोक्यात जाते, कुणाच्या नजरेला खुपते, कुणी तिचा दुस्वास करत,
पण तिच्या माझ्या नात्यात कुणी दुरावा आणूच शकत नाही. आम्ही एकमेकांशी एकनिष्ठ आहोत.
माझी शबनम माझी मेहबुबा आहे, तिच्या विना मी अधुरा आहे,
माझे मान-सन्मान मोठ्या अभिमानाने घेऊन ती मिरविते, नव्या पुस्तकांच्या प्रती तिच्या हवाली केल्या की, माझ्या इतकीच भारावून जाते, हे मला जाणवते.
नामवंत कलावंत, जेष्ठ-श्रेष्ठ लेखक-कवींच्या झालेल्या भेटी, तिला खूप आनंद देतात, माझ्या पुस्तकांच्या प्रती अशा व्यक्तींना देण्याचा आनंद तिच्यासाठी सुवर्णक्षण असतो.
मला मिळालेले शाल-श्रीफळ,सन्मानचिन्ह तिच्या पदरात पडणे, तिला तिचा बहुमान वाटत असतो,
माझ्या या आनंदाने माझी शबनम किती मोहरून जाते, हे तिच्या स्पर्शातून कळते.
माझे लिहिण्याचे कागद, माझे आवडते पेन आणि बॉलपेन, पोस्ट, कुरियरने पाठवण्याचे लिफाफे, हे तिचे पारिवारिक मित्र आहेत, मोठ्या मनाने या सगळ्या वस्तू जीवापाड जपत असते, मिनी पोस्ट ऑफिस असते माझी शबनम, तिच्या या तत्परतेमुळे सार्वजनिक ठिकाणी माझी फजिती झालीय” असे कधीच घडत नाही.
माझी शबनम एका अर्थाने गृहकृत्य -गृहिणी आहे”,
मला कशाची कमी पडू देत नाही.
आता तुम्हीच ठरवा,दोस्तांनो-
जिच्यात माझा जीव गुंतलाय ”
तिला ‘निर्जीव ” कसे म्हणू ?
— अरुण वि.देशपांडे
पुणे
9850177342
arunvdeshpande@gmail.com
Leave a Reply