निसर्ग आणि आपले नाते म्हणजे मनाला चैतन्य देणारे. त्यातही गाव असणं म्हणजे पूर्वजांनी आपल्यासाठी फार कष्टाने जतन केलेला अमर वारसा.
जिथे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, नात्यातील ओलावा, रूढी व परंपरा, सणातील गोडवा, मंदिरातील अभंगांचे सुर, आणि आशिर्वादाचे हात. तिथेच हिरवागार गालिचा पांघरलेली धरती माय व त्यांवर उमललेली रंगीबेरंगी फुले,नदी नाल्यांचे भरभरून वाहणारे पाणी, मातीचा सुगंध, शेतात डोलणारी पिके,डोंगराच्या लांब रांगा, त्यावर गर्द झाडी, त्यात नाचणारे मोर,आकाशात पक्षांचे थवे, गोठ्यात गाय अन् प्रत्येक घरात माय ,शेतकर्याच्या कष्टाची साक्ष देणारे गाव.
स्त्रीच्या जन्माला आले म्हणून दोन-दोन हक्काची गावे, त्यामुळे मनाच्या आत ही गाव. आजकाल गावाला विकासाची जोड मिळाली आहे पण गावचे सौंदर्य टिकून आहे.
गावाला गेले की रानावनांत भटकायचे, पिके न्याहाळत फिरायचे, मग उंच टेकडीवर जाऊन बसायचे, समोर हजारो एकर जमीन. त्यात लांब कोठेतरी डोंगराने आपल्या नजरेला घालून दिलेला बांध! त्या शांततेत मनाला मोहुन टाकणारी ही दृश्यं आणि त्यांच्या साथीला मी…
— मनिषा गिरमकर
Leave a Reply