आमचा लहानपणीचा हा आवडता खेळ. हातातील रुमाल एकाच्या पाठीशी टाकायचा आणि गोल रिंगण मारत ” माझ्या मामाचं पत्र हरवलं. ” आणि पुढची ओळ असे- “ते मला सापडलं.”
आज विषण्णपणे, उद्वेगाने हे आठवलं कारण १९८४ पासून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करीत असल्याने त्या क्षेत्राची सतत घसरगुंडी होत असल्याचे अनुभवत आहे.
गेली १६ वर्षे मी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय आंतर-शालेय निबंध स्पर्धेचे संयोजन करतोय. यंदाची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी संपली आणि मनात हे सारं निरीक्षण घोळत राहिलं. दरवर्षी विविध शाळांमधून आलेले २००-३०० निबंध आमच्या नजरेखालून जातात आणि मोठ्या मुश्किलीने २-३ निबंध भावून जातात.
१) निबंध ही संकल्पनाच विद्यार्थ्यांच्या मनोभूमीतून हद्दपार होताना दिसते आहे. आणि त्यांचे “हतबल” शिक्षक याकडे फक्त बघताहेत.
२) शुद्धलेखन वगैरे आजकाल शाळांमध्ये शिकवत तरी नसावेत किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तरी केले जात असावे. मराठीतील निबंधांमध्ये शुद्धलेखनाचे जागोजागी “शहीद ” होणे बघून माझे मन हळूहळू मुर्दाडपणाकडे झुकायला लागलंय.
३) विषय बरेचदा डोक्यावरून जात असावेत असाही निष्कर्ष मी काढू शकतोय आणि तो बराचसा बरोबर असावा हे दरवर्षीच्या प्रतिसादाने सिद्ध होतंय. यंदाचा एक विषय होता- “पुस्तकांची संगत न्यारी” आणि खूपजणांनी “पुस्तकाचे आत्मवृत्त” असा (बहुधा कोठेतरी छापील लेख/निबंध असावा) त्याचा अर्थ काढून निबंध पाठविले. विषय तुम्ही काहीही द्या, आम्ही आम्हाला माहीत आहे तेच लिहू हा यामागचा बाणा असावा बहुधा !
४) शब्दमर्यादा ७५० शब्द (त्यांचा वयोगट विचारात घेऊन आखलेली) असली तरी खूपजण १५-२० पानांचे “प्रबंध” लिहितात आणि त्यांत काही म्हणजे काहीही नसते.
५) काही शाळांमधील विद्यार्थी निबंधाभोवती खूप कलाकुसर/चित्रे वगैरे काढून ते सुशोभित करतात. त्यामुळे लिखाणातील “पोकळपणा ” लपत नाही. जसे आमचे MBA चे विद्यार्थी फक्त दिखाऊ “स्मार्ट” असतात, पण मुलाखतींमधून “बडा घर पोकळ वासा” असे त्यांचे दर्शन होते.
६) एखाद्या शाळेमधील १५-२० विद्यार्थी एकाच विषयावर शब्दशः “एकच ” निबंध लिहितात- बहुधा वर्गात एखादे शिक्षक त्यांना dictation देत असावेत- सगळे एकाच छापाचे गणपती ! ही स्पर्धा आहे,आणि इथे फक्त स्वतःच्या शब्दात (शिक्षकांच्या नव्हे), जमेल तसे व्यक्त व्हायचे असते याचा सगळ्यांनाच विसर पडलेला असावा.
७) एखाद्या विषयावर वेगवेगळ्या शाळांमधील मुले एकसारखे लिहितात तेव्हा “गुगल “सरांचे मार्गदर्शन आहे की काय असा दृढ संशय बळावतो.
८) काही निबंध सर्रास “चौर्यकर्म ” असते – एखादा लेख शब्दशः कॉपी केलेला असतो- ” माझ्या सदराचा(?) शेवट मी खालील वाक्याने करतो आणि आपली रजा घेतो.” इत्यादी इत्यादी ! बरं हे असं करू नये हे न कळण्याइतपत हा वयोगट लहानही नसतो.
हीच मुले मोठी होऊन आमच्या समोर Engineering /MBA ला “जशीच्या तशी” येतात-
सगळ्या assignments – C /C /P असतात (Cut /Copy /Paste). जर्नल्स, सेमिनार,प्रोजेक्ट रिपोर्ट्स अगदी आरश्यातील प्रतिमा !
हे “हरवतं ” चाललेलं पत्र दिवसेंदिवस नजरेसमोरून दूर जातंय. आणि ते कोणाला, केव्हा सापडेल अदमास येत नाहीए.
आजचा “सकाळ” म्हणतोय- ” पुणे विद्यापीठातील प्लेसमेंट्स गेल्या सात वर्षांमध्ये खूप खालावलेल्या आहेत.” म्हणजेच आमचे शिक्षण ” कारखाने ” असं उत्पादन करीत आहेत जे समाजाला, कंपन्यांना (ग्राहकांना) मंजूर नाहीए.
आता महाविद्यालये शाळांना दोष देतील, शाळा पालकांना आणि तो ब्लेम गेम तिथे जाऊन थांबतो. गेम संपला तरी उत्तरे हाती लागत नाहीत.भरधाव वेगाने घसरण सुरु झालीय.
पण मीच तर माझ्या प्रशिक्षण वर्गांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना /शिक्षकांना/प्रशिक्षणार्थींना एक वाक्य सांगत असतो- “शिक्षकांना निराश होण्याचा अधिकार नसतो.”
कारण नवनव्या पिढ्या निर्माण करण्याचे कार्य त्यांनाच तर करावयाचे असते. तेच जर निराश झाले तर समाजाचे अधःपतन किती होईल,कल्पनाही करता येणार नाही.
हे सत्य मला थोड्या वेळापूर्वी पुन्हा अनुभवायला आले. आमच्या सोसायटीत एका कारने धडक दिल्याने एक विजेचा खांब सकाळपासून वेडावाकडा झालाय आणि त्यावर तावातावाने चर्चा सुरु आहे. पण आत्ता बघितलं- “त्या वाकड्या खांबावरचा दिवा अजूनही प्रकाशलाय आणि रस्ता उजळतोय.”
“कुठे नेऊन ठेवलीय आमची शिक्षण व्यवस्था ” असं त्राग्याने म्हणणारे माझे मन क्षणार्धात शांत झाले. दिव्याने आपला धर्म सोडला नाहीए,एवढाच रात्रीचा मला दिलासा ! खांब भलेही वाकडे होऊ देत, आमच्या शिक्षकांनी या अपघातांनी संत्रस्त होऊ नये -मी स्वतःला समजावलं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply