नवीन लेखन...

मी का लिहितो?

खरंतर मला कधीच कथा लिहायची नव्हती. कविताही मी लिहीन मला कधीच वाटलं नव्हतं. भांडुपसारख्या वस्तीत जिथे रोजच्या जगण्याचा लढा सकाळी चाळीतल्या एकमेव नळाला येणाऱ्या पाण्याच्या रांगेत सुरू व्हायचा आणि रात्री रस्त्यावर तलवारी घेऊन धावणाऱ्या तरुणांना पाहत संपायचा, तिथे कविता कशी उगवली ते मला आजही कळले नाही. त्यात मी कबड्डीसारखा रांगडा खेळ बऱ्यापैकी खेळायचो. नाक्यावर रात्री उशिरापर्यंत उभा राहायचो. त्यामुळे साहित्याशी अगदी दुरान्वयेही संबंध यायचा नाही. नाही म्हणायला, आमच्या चाळीत ‘बब्या’ नावाचा तरुण होता. तो गोदरेज कंपनीत चांगल्या पगारावर होता पण थ्रील म्हणून कांजूरमार्गच्या हुमा टॉकीजवर तिकिट ब्लॅक करायचा. मारामाऱ्या करायचा. तो भाई होता.. मी त्याच्यासोबत असायचो. बब्याला वाचनाची आवड होती. त्याचा ‘उसुल’ होता. ‘एरियात लफडी नाय करायची’ त्यामुळे तो बाहेर लफडी करायचा आणि घरी परतल्यावर दारात खुर्ची टाकून सुहास शिरवळकर, बाबा कदम वाचत बसायचा. त्याच्यासोबत पुस्तक बदलण्यासाठी लायब्ररीत जाण्यापुरताच माझा काय तो संबंध यायचा. मग बब्याच्या डोक्यात कुदळ घालून त्याचा मर्डर झाला आणि तो संबंधही संपला. पण रात्रंदिवस नाक्यावर उभे राहणे चालूच होते. रात्री उशिरापर्यंत आणि श्याम बेनेगलच्या आर्ट फिल्मपासून ओशोच्या प्रवचनांपर्यंत आणि थापांभायपासून दाऊदपर्यंत चर्चा करायचो. शेखर सावंत एका हातात जळती सिगरेट आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन यायचा आणि पुस्तकातलं काही सांगत राहायचा. डीवायएफआयची मुले यायची आणि कम्युनिझम सांगत राहायची. या सगळ्यांच्या संगतीत कदाचित घुसळण होत राहिली असावी आणि नेमाडे म्हणतात तसे ‘दिवसभराच्या जगण्याचं उर्ध्वपतन होऊन एक ओळ यावी’, तशी एक ओळ आली.. ‘आम्ही चिल्लर, सुटे पैसे’ आणि मी कविता लिहू लागलो. मग मंटो वाचला आणि नाटक आलं. मग कधीतरी कथा.

मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. ‘मी का लिहितो’ हा प्रश्न मी स्वतःला अनेक वेळा विचारून झाला आहे आणि त्या प्रत्येक वेळेस मला एकचं उत्तर मिळालंय, ‘त्यांना लिहिता येत नाही म्हणून.’ मंटो म्हणतो, ‘अफसाना मेरे जेबमें पड़ा रहता है,’ मला वाटतं, ‘कथा आणि त्यातील पात्र माझ्या अवतीभवती कायम रेंगाळत असतात. माझं लक्ष जावं म्हणून माझा अनुनय करत असतात, माझ्या आत आणि बाहेर सतत गलका करत असतात. कधी माझा अनुनय करतात तर कधी शिवीगाळ करतात. त्यांचे आवाज, बोलणं, रडणं, भेकणं, खिदळणं, विक्षिप्त वागणं मी पाहत असतो. कधी माझ्याही नकळत मी त्यांच्यासारखं वागून पाहत असतो. यामुळेच असेल कदाचित त्या त्या पात्रांची भाषा, वागणं, बोलणं, कथात्म परिसराचे बारीकसारीक तपशील माझ्या कथांतून अधिक येत त्या कथा दीर्घ होत असाव्यात. आजही ‘मी का लिहितो’ असा विचार करतो तेव्हा मला अनेक घटना आठवतात, त्यातील दोन घटना..

रात्री खूप उशिरा मी लगेज डब्यातून प्रवास करतो, या वेळेस डब्यात माथाडी कामगार असतात, समोसे विकून परतणारे असतात, केक-बिस्किटे विकणारे असतात, बारमधल्या मुलींना सोडायला निघालेले तरुण असतात, पोटातला इवलासा पण कितीही भरला तरीही रोज रिकामा होणारा जादुई खड्डा भरून काढण्यासाठी ‘शरीरातला घाम आणि मनातला राम’ विकून परतणारी ही माणसं त्यावेळेस संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा एकमेकांना सांगत असतात. हा लेखा-जोखा म्हणजे त्यांचा लढा असतो, त्या दिवसाचा, दुःखाशी, नियतीशी. तो लढा मला जगणं शिकवतो. तो ऐकण्यासाठी मी नेहमी रात्री उशीर झाल्यावर लगेजमधून प्रवास करतो. एक दिवस असाच उशिरा घरी परतत होतो. दारावर दोन तरुण हलक्या नशेत लटकत होते. एक दुसऱ्याला म्हणाला, ‘सच बोल रहा हूँ भाईजान, मेरकू तो लगा सायराच है तुम्हारी.. पर सोचा ऐसे जगह सायरा कैसे?’ आणि माझे कान तातडीने धावत जाऊन त्या दोन तरुणांशेजारी उभे राहिले. पहिला दलाल होता. त्याच्याकडे एक मुलगी आली होती जी दुसऱ्याच्या वाग्दत्त वधूसारखीच दिसत होती. तो म्हणाला, ‘बोत रो रही थी. घर जाना करके.’ दुसरा क्षणभर गप्प राहिला मग ठाम आवाजात म्हणाला, ‘कल मय आता उधर.’ पहिला म्हणाला, ‘पागल है क्या? आजतक ऐसी जगह नय जानेका बोलता रहा और अब निकाह तय हो गया तो उदर आता? क्यो? ‘ दुसरा म्हणाला, ‘उसकू छुडाने..’ पहिला म्हणाला, ‘अरे पर आजतक कभी नय किये तुम किसीको छुडानेकी बात; ईसीको क्यो? ‘ दुसरा म्हणाला, ‘क्यो की वो सायरा जैसी दिखती है. आणि मी हादरलो. कुणीतरी फक्त आपल्या माणसासारखं दिसतंय म्हणून त्याचं दुःखही आपलं मानणारा तो दारूच्या नशेत असलेला तरुण मला इतर न प्यायलेल्या लोकांपेक्षा भानावर असलेला वाटला. आणि त्या रात्री मी पहिली कथा लिहिली. मला वाटतं, मी ती लिहिली कारण ‘त्या तरुणाला लिहिता येत नव्हतं.

दुसरा प्रसंग: माझी एक खूप सुंदर मैत्रीण होती. काळासावळा वर्ण, दुसरा तकतकीत त्वचा, लांबसडक केस, सुडौल शरीर आणि वागण्याबोलण्यात तडफदार, घरच्यांच्या मनाविरुद्ध तिने पळून लग्न केलं. मग एक-दोन वर्षांनंतर मी घरात पुस्तकांचा पसारा मांडून काही करत असताना दारात एक बाई आली. कळकटलेली साडी, केसांचा वेडावाकडा बॉबकट, पिवळेशार दात, जाड भिंगाचा चष्मा, म्हणाली, ‘किरण, कसा आहेस?’ मी आश्चर्यचकीत.

म्हटलं, ‘कोण आपण? ‘ तर म्हणाली, ‘अरे ओळखलं नाहीस मला? मी भारती..’ आणि मी हादरलो. नंतरचे दोन तास ती एकच विनंती करत होती, ‘मला आयकार्ड बनवून दे. सगळं नेलं रे त्यानं. माझ्याकडे आता काहीच नाही माझं. उद्या कुणी विचारलं कशावरून तू भारती, तर काय सांगू? काहीतरी पुरावा हवा न जवळ.’ या घटनेनंतरच्या अस्वस्थतेतून काही कविता लिहिल्या, त्यातली एक..

बाई नखं वाढवते
आणि आयुष्यभर
रंगवत राहते

ती मी लिहिली कारण ‘तिला लिहिता येत नव्हतं.’ मी एक सांगेन की मी त्यांच्यासाठी जरी लिहीत असलो तरी स्वतःसाठी लिहितो, पण स्वतःसाठी लिहीत असलो तरी स्वतःसाठी लिहीत नाही. ‘लिहिणं’ ही माझी गरज आहे. नाही लिहिलं तर माझ्या आतली पात्रं मला नीट जगू देणार नाहीत. ती सतत मला काही सांगत, दाखवत असतात, ते बघ, तिकडे बघ, काय चालल आहे.. हे बघ इकडे बघ.. तो काय करतोय.. तो तो बघ भिकारी कसा बसलाय, ती वेश्या बघ रस्त्यावर कशी उभी आहे. तुला उभं राहता येईल का तिच्यासारखं? विचार करता येईल का ती होऊन? झोपता येईल का तिच्यासारखं?’ मी नाही लिहिलं तर ही पात्रं मला माणसातून उठवतील. अनेक वेळा बायको मला झोपेतून उठवत विचारते, ‘काय बोलताय? झोपेत बहुतेक माझ्या आतली पात्रे बोलत असावीत. झोपेत ती पात्रे किंवा त्यांच्यातला मी शोधत असेन आसपासच्या एखाद्या कृतीचे वा घटनेचे आंतरीक संदर्भ, त्या घटनेतले गुंते. मला जगायचं असतं अनेक पात्रांचं जगणं, अनुभवायच्या असतात, त्या त्या पात्रांच्या वेदना. ते लिहिताना मी ते जगतो, रडतो, गळाठल्यासारखा पडून राहतो दिवस दिवसभर काही न करता हरल्यासारखा, मला माहीत आहे, हे आजारपण आहे माझं. तसंही कवी, लेखक असणं कधीही भूषणावह वाटलं नाही मला. तो शापच वाटला सरस्वतीचा, की ‘जा.. आजपासून तुझ्या कातडीतला निबरपणा निघून जाईल. तुला जास्त जाणवत राहील कोणतीही गोष्ट. तुला दिसेल दिसतंय त्या मागचं, जाणवेल लपवलंय तेच नेमकं, त्रास होत राहील बारीक-बारीक गोष्टींचा.. तू कायम अस्वस्थ राहशील, कारणाशिवाय…’

एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘ए लिटिल रीडिंग इज ऑल द थेरपी ए पर्सन नीड्स समटाइम.’ मला वाटतं माझ्यासाठी ‘लिहिणं’ ही थेरपी आहे. मी लिहितो, कारण तोच एक पर्याय आहे माझ्याकडे स्वतःला बरं करण्याचा.

ई.एल. डोटोरोव नावाचा लेखक म्हणतो, ‘Writing is socially accepted form of scrizophrenia.’ या वेडेपणातून काही सुलट दिसणाऱ्या गोष्टी लेखकांना उलट दिसू लागतात. त्याचे अन्वयार्थ तो लावू लागतो. असाच जनावर नसणं आणि माणूस असणं म्हणजे नेमकं काय, हा अर्थ लागलेली एक गोष्ट..

‘Survival of the Fittest’ हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे, असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांत बलवान नर, म्हाताच्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्या जन्मलेल्या पिलांना मध्यभागी ठेवत, म्हाताऱ्या आणि आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा की एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण येथेच आहे.

थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो, तो ‘माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे.

आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी, पिचलेल्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या सगळ्या कथा, अशा संपलेल्या लोकांच्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांचे बळ पाठुंगळीस घेऊन मी हा प्रवास करतो आहे. या प्रवासात असेच पाठीशी रहा, ही याचना.

– किरण येले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..