१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला .. अभ्यासात फार गती नसली तरी मैदानावर मात्र “गतिसी तुळणा नसे”!!
धावणं केंद्रस्थानी असलं तरीही अॅथ्लेटिक्समधला कुठलाच प्रकार वर्ज्य नाही.. शाळेला खूप मेडल्स मिळवून दिली… शाळेनंतर सुद्धा त्याच वाटेवर “पळत” राहिले .. कपाट मेडल्सनी भरून गेलं पार .. त्यांना खूप वाटायचं आपण भारतातर्फे खेळावं .. खरं तर तेव्हढी क्षमता नक्कीच होती पण तितकं पुढे जाऊ शकले नाहीत .. घरची परिस्थिती, छोटसं गाव, खेळातलं राजकारण, कौटुंबिक कारणं वगैरे .. अशा अनेक मर्यादांमुळे जिल्हा, राज्यस्तरीय यातच गुरफटून राहिले .. पण नसांनसांत भिनलेलं होतं ते फक्त आणि फक्त अॅथ्लेटिक्सच .. ते वेड काही त्याना स्वस्थ बसू देत नव्हतं .. शेवटी या वेडालाच त्यानी आपल्या चरितार्थाचं साधन बनवलं .. शाळेत पी.टी. शिक्षक म्हणून शिकवतानाच क्रीडास्पर्धांसाठी प्रशिक्षक .. तरुणाईला अॅथ्लेटिक्समध्ये यशस्वी करण्यासाठी झोकून दिलं स्वतःला .. एक खेळाडू म्हणून फार यशस्वी झाले नसले तरी आता उत्तम दर्जाचे कोच होते .. प्रत्येक क्रीडापटुवर खूप मेहनत घ्यायचे ..
कितीही आव्हानं आली तरी अव्वल कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्याना सज्ज करायचे .. त्यांच्या हाताखालून गेलेले खेळाडू कुठल्याही स्पर्धेत चमकूनच यायचे .. त्यानी प्रशिक्षण दिलेल्या मुलामुलींनी वेगवेगळ्या स्पर्धांत अनेक मेडल्स मिळविली.. इतकी ss की शिष्यांनी आणि पालकांनी त्यांना “मेडल सर” हेच नाव ठेवलं.. तेच नाव प्रचलित झालं , प्रसिद्धी सुद्धा मिळाली..
पण पैसा-प्रसिद्धीपेक्षा सुद्धा अथ्लेटिक्स हाच त्यांचा श्वास होता .. वनवीन मुलांनी यात उतरावं आणि जिंकावं हेच अंतिम ध्येय्य होतं.. “मेडल सरांनी” अनेक पिढ्या घडवल्या .. खूप मोठे मोठे खेळाडू समाजाला दिले .. ऑलिंपिक मध्ये भारतानी भरीव कामगिरी करावी असं त्यांना खूप वाटायचं .. अॅथ्लेटिक्समध्ये आपल्या देशाला मेडल मिळावं हे त्यांचं अनेक वर्षांपासून स्वप्न .. प्रशिक्षक म्हणून त्यासाठी काहीही मदत करायची त्यांची तयारी असायची ..
एकीकडे स्पर्धेगणिक मेडलची संख्या तर दुसरीकडे संसार आणि वय दोन्ही वाढत होतं.. “मेडल सर” आता आपल्या मुलासोबत राहू लागले .. नातवंडात रमले. पण वार्धक्य काही चुकलं नाही .. काही आजारांमुळे व्हीलचेअर नशिबी आली .. फारच बिकट अवस्था झाली होती सरांची .. तरीही अॅथ्लेटिक्सचा कायम ध्यास होताच .. त्यांना प्रत्येक स्पर्धेची आणि स्पर्धकांची माहिती असायची.. त्यासंबंधीत सगळ्या बातम्यांची पेपरमधली कात्रणं कापून ठेवायचे .. पुढे स्मार्ट फोन सुद्धा वापरायला शिकले या वयात .. आता तर इंटरनेट मुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या अॅथ्लेटिक्सची खबरबात .. क्रीडा जगतात काय नवीन बदल झालेत याचाही अभ्यास होता .. कुठल्याही स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व होत असेल तर हे सतत टीव्हीसमोर .. त्यात “ऑलिंपिक” सुरू असेल तर अंगात वेगळीच ऊर्जा संचारायची ..
नेहमीप्रमाणेच टोकयोतल्या ऑलिंपिकच्या स्पर्धेवर लक्ष ठेवून होते .. त्यातल्या काही खेळांत पदकं मिळाल्याचा आनंद होताच .. पण तरीही अॅथ्लेटिक्स प्रकारात यंदा तरी भारताला पदक मिळेल या आशेवर होते .. यावर्षी भालाफेकीच्या स्पर्धेत पदक मिळण्याची संधी दिसत होती .. म्हणून घरातले सगळेच जण मोठ्या उत्सुकतेने हॉलमध्ये टीव्ही बघत होते .. आणि अखेर तो “सुवर्ण”क्षण आला .. भारताच्या “नीरज”ने आपल्या मेहनतीने “सुवर्णकमळ” फुलवलं ..
अॅथ्लेटिक्समधलं पहिलं वहिलं पदक.. ते सुद्धा थेट “गोल्ड मेडल” ..
त्यांच्या घरात एकंच जल्लोष सुरू झाला .. जोरजोरात टाळ्या वाजवत मेडल सर आनंदाने अक्षरशः ओरडू लागले .. आपलं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं होतं …. काही सुचेचना .. अचानक दहा हत्तींचं बळ आलं आणि त्याच जोशात व्हीलचेअरवरून उठले .. आपल्या पत्नी मुला सोबत जल्लोषात सामील झाले .. पण हे काय ?? कुणाचं आपल्याकडे लक्षच नाहीये .. आपण स्वतः उठून उभे राहिलोय हे कुणाला समजलंच नाहीये .. असं काय करतायत सगळे ??
काही न उमगून “मेडल सर” हताशपणे आपल्या खोलीत जाऊन बसले .. खिन्न मनाने विचार करू लागले ..
इतक्यात हॉलमधला विजयोत्सवाचा आवाज काहीसा शांत झाला … माय-लेकाचा संवाद कानावर आला.. “आई .. हे घे .. ही फुलं ठेव बाबांच्या खुर्चीवर !! आणि ही वाटीभर साखर ठेव त्यांच्या फोटोपूढे !!”
“हो रे !! ठेवते तर !! .. आज हे असते तर आनंदाने उड्याच मारल्या असत्या !!” “ काय करू आणि काय नको असं झालं असतं बघ त्यांना !!”.. “सगळी मुलं सुद्धा आली असती भेटायला , मेडल सssर मेडल सssर करत!!”….. “ सगळं आयुष्य वेचलं रे त्यानी या अॅथ्लेटिक्ससाठी !!” असं म्हणत पत्नी त्यांच्या खोलीत आली ..
आठवणी दाटून त्या खुर्चीवरून अलगद हात फिरवला .. भरल्या डोळ्यांनी फुलं वाहिली .. आपण दोन वर्षांपूर्वीच आपलं शरीर सोडलंय हे एव्हाना मेडल सरांना कळून चुकलं.. आपला जीव अडकला होता तो त्या ऑलिंपिक अॅथ्लेटिक्स मेडलमध्ये, ही जाणीव झाली.. तेवढ्यात बाहेर टीव्हीवर पदक देण्याचा सोहळा सुरू झाला .. भारताच्या राष्ट्रगीताचे मंगल सूर कानात घुमू लागले .. खूपच अभिमानास्पद आणि अंगावर शहारा येणारा प्रसंग .. राष्ट्रगीत होईपर्यंत मेडल सरांची पत्नी त्यांच्या फोटोकडे बघत उभी राहिली .. एकदम स्थिर नजर आणि प्रसन्न चेहरा … राष्ट्रगीत संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी फोटोसमोर साखरेची वाटी ठेवली .. “अहो ss.. बघितलंत का ? अथ्लेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं बरं आज !!” “ हे घ्या , तोंड गोड करा !! तुमचं खूप वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं !!”.. “तुम्ही आज खऱ्या अर्थाने “मुक्त” झालात हो “मेडल सर”!
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply