महंमद मुंब्र्यात राहत होता त्याचे मूळ गांव रत्नागिरी जिल्ह्यात होते. आमच्या जहाजावर इंजिनरूम मध्ये वायपर म्हणून काम करत असे. ट्रेनी सी मन म्हणून पहिल्या जहाजावर साडे आठ महिने आणि दुसऱ्या जहाजावर दहा महिने केल्यावर त्याला तिसऱ्या जहाजावर वायपर म्हणून प्रमोशन मिळाले होते. ट्रेनी सी मन असताना त्याला तीनशे डॉलर्स मिळायचे पण वायपर झाल्यावर अकराशे डॉलर्स मिळायला लागले होते. मुस्लिम असला तरी रत्नागिरीचा असल्याने त्याची भाषा मराठीच होती. माझ्याशी तो मराठीतच बोलायचा, तो मुंब्र्यात आणि मी कल्याणजवळ राहत असल्याने आपण दोघे पण गाववाले आहोत असा त्याचा समज होता. कधी कधी मला बोलायचा तीन साब तुम्ही मला म्हमद्या बोला कारण घरात सगळे मला म्हमद्याच बोलतात. बावीस वर्षाचा महंमद सव्वा सहा फूट उंच होता, रंगाने सावळा आणि धिप्पाड होता, डोळ्यात नेहमी काजळ भरलेला. काजळ भरलेले त्याचे डोळे पहिल्यांदा बघून प्रत्येकाला त्याचे हसू यायचे पण महंमदला त्याबद्द्दल कोणाचा राग यायचा नाही की वाईट वाटायचे नाही. जेमतेम बावीस वर्षे वय असले तरी त्याच्या डोक्यावर केस बिलकुल नव्हते जेव्हडे होते ते पण असून नसल्यासारखे असल्याने तो त्याच्या डोक्यावरील असलेले सगळे केस काढून टक्कलच ठेवायचा. डोक्यावर केसच नसल्याने त्याचे टक्कल गुळगुळीत दिसायचे, केस नसूनसुद्धा तो त्याच्या टकलावर कसलेतरी तेल लावून ठेवायचा ज्याच्यामुळे त्याचे टक्कल नेहमी चमकताना दिसायचं. कामाच्या बाबतीत तो एवढा इमानदार आणि विश्वासू होता की त्याला हे कर ते कर सांगायची कोणाला वेळच येत नसे. हे माझे काम नाही, माझी वेळ संपली, मीच एकटा का करू, हा माझा एरिया नाही मोटरमनचा आहे अशी कारणे तो कधीच देत नसे.
इंजिन रूम मध्ये काम करताना बॉयलर सूट वर पण तो कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्यूम मारून येत असे. तो इंजिन रूम मध्ये आसपास काम करत असला की इंधन किंवा ऑइल च्या उग्र वासात पण त्याच्या कस्तुरीचा सुगंध दरवळत असायचा. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर तर जेवणाच्या वेळेला तो रोज चक्क इस्त्री केलेले शर्ट पॅन्ट घालून व्यवस्थित इन करून, बेल्ट, शूज घातल्याशिवाय मेस रूम आणि स्मोक रूम मध्ये दिसायचा नाही. कोणी दिसला की त्याला गुडमॉर्निंग, गूड इव्हिनिंग विष करत राहणार एखाद्या सकाळी एकच व्यक्ती चार पाच वेळा त्याच्या समोर आला तरी त्याला हा प्रत्येक वेळेला हसून गुडमॉर्निंग बोलणारच.
इंजिनरूम मध्ये सकाळी अकरा वाजता इंजिन ऑइलच्या टाकीतून पन्नास एक लिटर ऑइल एका ड्रम मध्ये काढून खाली एका मशीन मध्ये टाकायला नेत असताना ड्रम लवंडला, संपूर्ण जिन्यावर आणि खाली सगळं ऑइल पसरले होते. मोटरमन आणि महंमद मिळून ते साफ करत होते. जिन्यावर सांडलेले ऑइल साफ करत असताना महंमदचा पाय ऑइल मुळे निसरड्या झालेल्या पायरीवरून सरकला आणि त्याचे सव्वा सहा फुटी धिप्पाड शरीर जिन्यावरून सहा सात पायऱ्या धाड धाड करीत खाली दाणकन आदळले. त्याला कुठेही फ्रॅक्चर झाले नाही की जखम झाली नाही पण त्याच्या कमरेला एवढा मार लागला की त्याला उठून उभं राहता येईना. इंजिनरूमच्या तिसऱ्या फ्लोअर वरून नव्वद किलोच्या महंमदला सगळ्यांनी कसेबसे उचलून त्याच्या केबिन मध्ये नेले. जहाज गल्फ मध्ये फुजैराह पोर्ट मध्ये नांगर टाकून उभे होते. महंमदचे सहा महिने पूर्ण झाले होते पण कमरेला एवढा मार लागला होता की त्याला पंधरा वीस दिवस तरी बेड रेस्ट घ्यावी लागणार होती. कॅप्टन आणि चीफ इंजिनियरनी महंमदशी चर्चा केली आणि त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पाठवायचा निर्णय घेऊन ऑफिसला कळवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता महंमदला न्यायला बोट आली. खाली अप्पर डेकवर महंमदला पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून उचलून आणले. परंतु जाहजाच्या गँगवेवर एका वेळी एकच व्यक्ती जहाजावरुन खाली किंवा वर येऊ शकत असल्याने. महंमदला जहाजावरून क्रू बोट मध्ये कसे उतरवायचे असा प्रश्न कॅप्टनला पडला. शेवटी जहाजाच्या क्रेनने क्रू ट्रान्सफर बास्केट मध्ये बसवून महंमद ला खाली बोट मध्ये पाठवायचे ठरले. बिचाऱ्या महंमद ला बास्केट मध्ये बसवले पण पुढे काय घडेल याची महंमद काय कोणालाच कल्पना नव्हती. क्रेन ने बास्केट वर उचलले आणि जहाजाच्या बाहेर नेऊन बास्केट खाली उतरवणार तोच क्रेन बंद पडली. चीफ इंजिनियर, कॅप्टन, इलेक्ट्रिक ऑफिसर सह सगळेच जण महंमदला निरोप द्यायला आले होते. क्रेन बंद पडली म्हणून इलेक्ट्रिक ऑफिसर क्रेनच्या स्टार्टर पॅनल बघून आला पण क्रेनची मोटर व्यवस्थित सुरु असल्याचे त्याने सांगितले. मग मोटर बंद करून चीफ इंजिनियर आणि सेकंड इंजिनियरने क्रेनची मोटर आणि हायड्रॉलीक पम्प असलेल्या भागाचे कव्हर उघडायला सांगितले. कव्हर उघडेपर्यंत अर्धा तास झाला, महंमद धड जहाजावर नव्हता की खाली बोटीत नव्हता. मधेच अधांतरी लटकला होता.
जहाजावर असलेली क्रेन हायड्रॉलीक होती ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर हायड्रॉलीक पम्प ला चालवत असते, हायड्रॉलीक पम्प चालवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर ही पम्प सोबत एका रबर च्या कपलिंग ने जोडलेली असते. क्रेन बंद पडण्याचे कारण हीच कपलिंग होती, रबर ची कपलिंग अति वापरामुळे तुटली होती. चीफ इंजिनियर ने सगळ्या इंजिनियरना स्पेयर पार्टस असलेल्या स्टोअर मध्ये तुटलेल्या कपलिंग ला पर्यायी स्पेयर कपलिंग आहे का ते शोधायला सांगितले. अर्धा तासाने सगळे हात हलवत परत आले. जहाजावर क्रेनची कपलिंग उपलब्ध नव्हती.
दुपारचे बारा वाजायला आले होते, महंमद बास्केट मध्ये बसून तीन तास अधांतरी लटकला होता, खाली आलेली बोटमधील खलाशी वर जहाजावर कुतूहलाने बघत होते, तीन मिनिटात बास्केट मध्ये बसलेला माणूस त्यांच्या बोटीत येणे अपेक्षित होते पण तीन तास झाले तरी वर एकाच जागेवर अडकून बसला होता. गल्फ मध्ये असल्याने सूर्य आग ओकत होता. बारा वाजून गेले होते महंमदचे चमकणाऱ्या टाकलावरून सूर्याची किरणे परावर्तित होतं होती. चीफ इंजिनियर पण स्पेअर पार्ट नसल्याने हताश झाला होता. हळू हळू वाऱ्याचा जोर वाढू लागला आणि शांत समुद्रात लाटा उसळू लागल्या. लाटा उसळू लागल्यावर जहाज हेलकावयाला लागले. जसं जहाज हेलकावे खाऊ लागले तसे, क्रेनला लावलेले बास्केट आणि त्यामध्ये बसलेला महंमद घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलू लागले. महंमदची केविलवाणी अवस्था झाली होती. आणखीन अर्ध्या तासात तो खाली बोट मध्ये पोचला नाही तर त्याची फ्लाईट चुकणार होती त्यामुळे कॅप्टन पण विचारात पडला होता.
सेकंड इंजिनियरने क्रेन चे मॅन्युअल पाहिले असता त्याला एक मार्ग सुचला, क्रेन हायड्रॉलीक असल्याने काही बिघाड झाला आणि क्रेन बंद पडली तर वर उचलेले सामान खाली पडू नये म्हणून त्यामध्ये एक ब्रेक असतो, इमारतीत असणाऱ्या लिफ्ट प्रमाणेच. लिफ्ट जशी वरच्या मजल्यावर असताना जोपर्यंत बटण दाबत नाही तोपर्यंत ती खाली येत नाही, क्रेन मध्ये सुद्धा लिफ्ट प्रमाणे अशीच ब्रेक यंत्रणा असते जी हायड्रॉलीक ऑइल चे प्रेशर मुळे ब्रेक रिलीज करून सामान खाली येऊ देते. सेकंड इंजिनियरने क्रेन चा ब्रेक रिलीज करता येण्यासाठी दिलेली सोय मॅन्युअल मध्ये शोधून काढली. पण त्यासाठी कोणाला तरी सेफ्टी हार्नेस किंवा खाली पडू नये असा पट्टा लावून क्रेनच्या उंचावरील भागात जावे लागणार होते. पंपमन जहाज हेलकावत असताना सुद्धा वर चढू लागला एकदोन वेळा त्याचा तोल जाऊनसुद्धा तो कसा बसा ब्रेक पर्यंत पोचला. जोर लावून त्याने ब्रेक रिलीज केला आणि हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला. त्याची बोट जहाजापासून लांब लांब जाऊ लागली पण त्याचे टक्कल बराच वेळ तेवढ्या प्रचंड गर्मीत बोटीत आत जाऊन बसण्यापेक्षा सूर्याला आव्हान देत तळपताना दिसत होते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply