पुदिन्याच्या पानांचा उपयोग स्वयंपाका॑त करतात, पण पुदिन्याचा औषध म्हणून उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. पुदिन्यातला खरा हिरो आहे मेंथॉल.
पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषतः जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. पेपरमिंट नावाची पुदिन्याची एक जात आहे, त्यात मेंथॉलचं प्रमाण ५० ते ६५ टक्के असतं. तर जपानी पुदिन्यात त्याचं प्रमाण ७० ते ८५ टक्के असतं, मेंथॉलचे स्फटिक पांढरे, तीव्र वासाचे, जिभेला थंडावा देणारे, स्वादिष्ट असतात.
आपण पेपरमिंटच्या गोळ्या खातो ना, त्यात मेंथॉलच असतं, मेंथॉलमुळेच पेपरमिंटच्या गोळ्या गारेगार आणि चवीला छान लागतात. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी मेंथॉलचा उपयोग केला जातो. मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
पुदिन्यातील मेंथॉल वापरून काही औषधे तयार केली जातात. फार पूर्वीपासून पोटदुखीवर औषध म्हणून पुदिना वापरला जात आहे. पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; त्यामुळे पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम तर मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखलं, की तेल पेपरमिंट (पुदिन्याचं तेल) कपाळावर चोळतात. सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरमिंट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात. मेंथॉलमुळे घट्ट शेंबूड द्रवरूप होतो व बाजूला सारला जातो. चोंदलेलं नाक मोकळं होतं.
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये पेपरमिंट तेल घातलेले असते. पुदिन्याचं तेल हे नैसर्गिक कीडनाशक म्हणूनही वापरलं जातं. त्यातील प्युलगॉन (pulegone) व मेंथाल हे घटक विशेष प्रभावी आहेत.
-चारुशीला जुईकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply