मी आणि ती खूप जुने मित्र आहोत.
खूप काही बोलतो, मी भडकतो कधी कधी
पण ते तितकेच असते.
आज कधी नव्हे तो वर्षा दीड वर्षाने
बीअर पीत हॉटेलमध्ये बसलो होतो..
बोलता बोलता ती म्हणाली…
मी काल संध्याकाळी एकटीच घरी होते ,
कपाट उघडले आणि त्यामध्ये ठेवलेल्या
दोन गोष्टी काढल्या
एक होते मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या
त्या मी घालून बघीतल्या आणि आरशासमोर गेले.
त्या मी अजून जपून ठेवल्या आहेत…
हे आता तुझ्याशिवाय कुणालाच माहीत नाही .
माझ्याही डोळ्यात पाणी आले परंतु मी आवरले.
तिला तसे भासवले नाही , फक्त तिच्या गालावरून हात फिरवला,
ती खरे तर रडणारच होती.
आवरले तिने…
३२- ३३ वर्षाची ती.
एकटीच झुंज देत आहे.
इतरांना वाटते ती मुलगी मॉड आहे.
हाफ चड्डी काय घालते , बिन्धास रहाते.
एकदम फॉरवर्ड गेलॆली.
परंतु मला तसे कधीच वाटले नाही…
दिसायला सुंदर वगैरे आहे…
म्हणजे कुणी बाईक वरून जात असला , कारमधून जात असला
तर तो हटकुन मागे बघणारच.
त्या बांगड्या आणि मंगळसूत्राच्या प्रसंगाने
एक जाणवले तिला खरे तर संसार करावयाचा आहे.
परंतु एकदा बसलेला फटका मात्र तिला ते करू देत नाही.
कधी म्हणते लग्न करावयाचे
तर कधी म्हणते तसेच राहीन.
ती कन्फयुज्ड आहे…
मी तिला काहीच सांगत आंही
कारण ते तिचे आयुष्य आहे.
आमची मैत्री आहे परंतु ढवळाढवळ नाही.
आज मात्र ती भावुक झालेली पाहून खूप वाईट वाटले.
परंतु परत ती नॉर्मलला आली
आमच्या गप्प्पा सुरु झाल्या…
तिच्या आयुष्यात काय घडेल ते माहीत नाही
पण जे घडेल ते चागंलेच घडेल असे मला नेहमी वाटते..
कारण मित्र म्हटले की आपण त्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारतो…
तसेच आमचे आहे…
परंतु नवरा -बायको म्हटले की स्पेस चा प्रश्न हल्ली पडतो.
इगो जोडीला असतो.
ह्या अशा वादळात अनेकजण सापडतात,
तर कधी भरकटत रहातात…
एकच वाटते तिने भरकटू नये…
एकत्र स्थिर रहावे…
एकाच बंदरावर रहावे….
जे खलाशी वृत्तीचे असतात..
ते एका बंदरावर टिकत नाहीत.
तसेच तिचे काहीसे आहे…
बंदरात रहाणे….
की बंदर सोडून दुसरीकडे…
किंवा तिसरीकडे…
किंवा आणखी कुठे ..
हा संपूर्ण तिचा प्रश्न आहे…
मी फक्त बंदर दाखवेन…
तर कधी ….
जाऊदे….
सतीश चाफेकर
Leave a Reply