MENU
नवीन लेखन...

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

महेश झगडे, I.A.S

अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये महेश झगडे, I.A.S. यांनी लिहिलेला हा लेख 

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.


सर्वसाधारणपणे ८० च्या दशकाच्या सुरुवातीस महाविद्यालयात किंवा विद्यापीठात कॅम्पस मुलाखती ही बाब तशी दुर्मिळ होती. मी ज्या विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षण घेत होतो तेथे अशीच एक बहुराष्ट्रीय कंपनीची टीम कॅम्पस मुलाखतीसाठी येणार आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्याकरिता अमुक तारखेला उपस्थित राहवे असे विभागप्रमुखांच्या कार्यालयातून फतवा निघाला आणि तो नोटीसबोर्डवर लागला. आम्ही एकूण १०-१२ जण त्या विषयाशी संबंधित होतो. हा कॅम्पस मुलाखतीचा प्रकार आम्ही एकत्रितपणे एका प्राध्यापकांकडून समजावून घेतला. सदर बहुराष्ट्रीय कंपनीला त्यांच्या भारतातील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट शाखेकरिता एका वनस्पती शास्त्रातील अनुभवी पदव्यूत्तर किंवा डॉक्टरेट असलेल्या संशोधकाची आवश्यकता होती आणि त्याकरिता ते नावाजलेल्या विद्यापीठातून कॅम्पस मुलाखती घेत होते. पदव्यूत्तर विभागाचे मी नुकतेच पहिले वर्ष संपविलेले होते आणि विद्यापीठात अनेक पदव्यूत्तर किंवा डॉक्टरेट पूर्ण झालेले विद्यार्थी असल्याने माझ्यासाठी ही मुलाखत केवळ एक औपचारिक आणि अनुभवासाठी मुलाख अशा स्वरूपाची होती.

मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मी ते विसरून गेलो. अर्थात मधूनमधून वरिष्ठ विद्यार्थ्यांबरोबर असताना ज्यावेळेस हा विषय चर्चिला जायचा त्यावेळेस सदर कंपनी कशी त्या क्षेत्रात जगात एक क्रमांकावर आहे, किती जुनी आहे, खाजगी कंपनी असूनही पेन्शनचीदेखील सोय आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पगार आणि इतर पर्कस् किती चांगले आहेत. माझ्या दृष्टीने मी त्या पदाकरिता इतरांच्या मानाने शैक्षणिक आणि अनुभवाच्या दृष्टीने कोठेही जवळपासनसल्याने या चर्चेला अर्थ नव्हता. अर्थात, पदव्यूत्तर शिक्षण घेऊन नंतर पी.एचडी. करायची आणि संशोधन क्षेत्रात पुढे जायचे हा माझा मार्ग ठरलेला होता.

एक दिवस अकल्पितपणे मी आणि माझ्या एका सहअध्यायास या बहुराष्ट्रीय कंपनीने ठाणे-बेलापूर स्थित त्यांच्या संशोधन संस्थेमध्ये पुढील मुलाखतीकरिता यावे अशी पत्रे मिळाली. आम्ही गांगरून गेलो कारण शिक्षणाने आणि अनुभवाने कितीतरी पटीने उजव्या असणाऱ्या उमेदवारांऐवजी आम्हा दोघांनाच निमंत्रित करण्यात आले होते. कंपनी जाण्या-येण्याचा आणि त्याबरोबर इतर अनुषंगिक खर्च देणार असल्याने एक औपचारिकता म्हणून आम्ही दोघांनी या द्वितीय मुलाखतीकरिता मुलाखत कशी द्यावी याचा अनुभव मिळण्यासाठी जावे असे आमचे विभागप्रमुख आणि इतर प्राध्यापकांनी निर्देश दिले.

मुलाखतीसाठी थोडे उशिराच पोहोचलो. वातावरण खरोखरच बहुराष्ट्रीय कंपनीचे होते. त्यात कंपनीचे प्रमुख हे वयाने मोठे असे ब्रिटिश व्यक्तिमत्त्व होते असे तेथे गेल्यानंतर समजले. मुलाखत कक्षाच्या वेटींगरूममध्ये आम्हा दोघांव्यतिरिक्त जे ८-१० उमेदवार होते, ते सर्व आपापसात चर्चा करत होते. बहुतांश डॉक्टरेट केलेले, एक पोस्ट डॉक्टरेट, एक महिला उमेदवार कंपनीतील एका मॅनेजरची पत्नी अशा बाबी समोर आल्या. आपली निवड होणार नाही ही खात्री पक्की असल्याने आम्ही दोघे एकदम बिनधास्त होतो. मुलाखतीनंतर परतीच्या प्रवासापूर्वी कोठे आणि कशी भटकंती करावयाची या चर्चेत आम्ही मग्न होतो.

आम्हा दोघांच्याही मुलाखती झाल्या. माझी मुलाखत ही त्यामानाने फारच लांबली. मी विनाकारणच माझे विचार शास्त्रीय आधारावर जास्तच विस्तृतपणे देणे किंवा मुलाखतकारांचे काही प्रश्न कसे कालबाह्य झालेले आहेत हे त्यांना पटवून देणे यामध्ये जास्त वेळ गेला असावा.आपली निवड होणार नाही हे अगोदरच स्पष्ट असल्याने माझा नेहमीचा बिनधास्तपणा अधिक वाढलेला होता.

मुलाखत संपल्यावर आम्ही परत जाण्यास निघालो असता प्रवास खर्च इत्यादी ज्या टेबलवरून मिळतो तेथे गेलो असता असे समजले की मुलाखती संपल्या तरी सर्वांना थांबण्यास सांगितले होते. थांबणे भाग होते कारण तोपर्यंत रक्कम मिळणार नव्हती. सर्व मुलाखती संपल्यावर एक अनाकलनीय बाब झाली. मला एकट्यालाच व्यवस्थापकिय संचालकांच्या (होय तीच ती ब्रिटिश व्यक्ती) केबीनमध्ये बोलाविण्यात आले असल्याचा निरोप मिळाला. हे आणखी काय त्याचा विचार करीत तेथे गेलो असता, मुलाखत घेणाऱ्यांपैकी काही अधिकारीदेखील तेथे अगोदरच होते. त्यांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. माझी त्यांनी निवड केली असल्याचे सांगून जो पगार त्यांनी कळविला होता तो तुम्हाला मान्य आहे का? शिवाय मी लगेचच रुजू होणार का? हे दोन प्रश्न त्यांनी टाकले. मी मात्र हे प्रश्न अनपेक्षित असल्याने भांबावून गेलो. काय बोलावे ते सुचेना कारण निवड होईल हा विचार नसल्याने पुढील काहीही ठरविण्याचा प्रश्नच नव्हता. तथापि, वेळ मारून नेण्याच्या भावनेतून मी त्यांना स्पष्ट सांगितले की माझे हे पदव्यूत्तर शिक्षणाचे शेवटचे वर्ष असून कोर्सेस आणि संशोधन प्रबंध पूर्ण करण्याकरिता वेळ लागेल. यावर त्यांनी आपसात चर्चा करून मी माझे विद्यापीठात पुढील सहा महिने कोर्स पूर्ण करावा आणि तद्नंतर विद्यापिठाची परवानगी घेऊन संशोधन प्रबंध कंपनीत रुजू होऊन काम करता करता पूर्ण करावा असे सुचविले. तेथून तात्पुरती सोडवणूक म्हणून हा प्रस्ताव मी मान्य केला. अर्थात, इतर अधिक लायक उमेदवाराऐवजी माझी निवड का करण्यात आली आणि माझ्याकरिता सहा महिने सदर पद रिक्त ठेवण्याचा देखील निर्णय त्यांनी का घेतला ही बाब माझ्यासहित इतर उमेदवार आणि माझे विद्यापिठातील प्राध्यापकांना देखील अनाकलनीय होती.

विद्यापिठात पोहोचल्यानंतर माझी बहुराष्ट्रीय कंपनीने निवड केलेली आहे याचा बराच
गाजावाजा झाला. मी तातडीने रुजू व्हावे असाही सल्ला मिळाला. अर्थात अभ्यास आणि
संशोधनामध्ये या निवडीचे अप्रूप लवकरच संपले आणि मी पुन्हा व्यस्त झालो. पाच महिन्यांनी कंपनीने पत्र पाठविले की मी पुढील महिन्यात ठरल्याप्रमाणे रुजू व्हावे. मी त्यास उत्तर न देणेच मान्य आहे असे ठरवून त्याकडे दुर्लक्ष केले. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये देशात आणि परदेशात पी.एचडी. प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते.

कंपनीने पुन्हा दुसरे पत्र पाठवून मला चर्चेसाठी कंपनीत पाचारण केले. अर्थात जाण्या-येण्याचा खर्च मिळणार असल्याने आणि त्यांना एकदाच काय ते नाही म्हणून सांगावे म्हणून पुन्हा कंपनीत गेलो.

या वेळेस तेथील वातावरण बरेच अनौपचारिक झाले होते. मी रुजू न होण्यामध्ये काय अडचण आहे आणि त्याला काय तोडग निघू शकतो इथपासून ते मी रुजू होणारच नाही का यावर विस्तृत चर्चा झाली. मी त्यांना वस्तुस्थिती अगदी स्पष्टपणे सांगून टाकली की मला संशोधनामध्ये करिअर करावयाचे असल्याने पदव्यूत्तर शिक्षणानंतर पी.एचडी. करण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यावर खूप वेळ चर्चा होऊन मला कंपनीतील अनुभवी संशोधकांनी सल्ला दिला की मी कंपनीत तातडीने रुजू व्हावे, प्रबंध पूर्ण करण्यास सहकाऱ्यांची मदत राहील. शिवाय पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर पी.एचडी. करण्यासाठी त्यांच्याच प्रयोगशाळेत काम करून एखाद्या भारतीय विद्यापिठात नोंदणी करावी. इतर अनेक लोक कंपनीत त्याचप्रमाणे पी.एचडी. करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्यापैकी एकास बोलावून मला ती सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. अर्थात एक गोष्ट स्पष्ट झाली की मी त्या कंपनीत नोकरी करीत असताना त्यांच्याच प्रयोगशाळेत संशोधन करून पी.एचडी. करू शकत होतो. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या जगभर सात ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत आणि त्याचाही मला फायदा होऊ शकतो. त्यांच्या या प्रस्तावावर मी गंभीरपणे विचार करीत असताना त्यातील जनरल मॅनेजर (एच. आर.) यांनी सांगितले की मी त्वरित रुजू झालो तर मला ते त्या श्रेणीतील इतर संशोधकांच्या सुरुवातीच्या पगारापेक्षा जास्त म्हणजे सुरुवातीपासूनच दोन वार्षिक वेतनवाढी देण्याची त्यांची तयारी आहे.

मी या सर्व गोष्टींचा आणि विशेषतः संशोधनासाठी पोषक वातावरण आणि तेही कमवित असताना पी.एचडी. करणे ही बाब विचारात घेता रुजू होणे आणि गरज पडली तर ही नोकरी सोडून पी.एचडी. करण्याची मला मोकळिक असल्याने मी त्यास होकार दिला.

विद्यापिठामध्ये परतल्यावर विद्यापिठामधील माझे वैयक्तिक मार्गदर्शक प्राध्यापक आणि विभागप्रमुखांशी चर्चा करून आणि त्यांची परवानगी घेऊन मी काही कालावधीने कंपनीत रुजू झालो.

कंपनी ख्यातनाम बहुराष्ट्रीय संस्था असल्याने त्यांची प्रयोगशाळा केवळ भव्य आणि
अत्याधुनिकच नव्हती तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधन नावाजलेल्या संशोधकांच्या देखरेखीखाली चालू होते. शिवाय या संशोधनास इतर वेगवेगळ्या देशातील सहा अन्य संशोधन केंद्रांची कनेक्टिव्हिटी असल्याने त्या संशोधनाचा एक वेगळा स्तर होता.

महाविद्यालयात शिक्षण चालू असतानाच काम ` करण्याची संधी होती. शिवाय सुदैवाने सर्व वरिष्ठ सहकारी आणि सहाय्य करणारे कर्मचारी यांची अशी काही कार्यसंस्कृती होती की त्यामध्ये कोणताही तणाव निर्माण होण्यास वाव नव्हता. मला वाटते संशोधनाच्या ठिकाणी अशी कार्यसंस्कृती यशाच्या दृष्टीने महत्त्वाची असावी.

कंपनीच्या संशोधनाबरोबरच पदव्यूत्तर पदवीचे संशोधन आणि प्रबंध लेखन योग्य. पद्धतीने पुढे जाऊन मी प्रबंध विद्यापीठास सादर केला आणि पदव्यूत्तर पदवी प्राप्त झाली.

दरम्यानच्या काळात कंपनीच्या संशोधनामध्ये माझ्याकडे भारतीय वनस्पतीमधील जे नैसर्गिक रासायनिक घटक आहेत त्यापैकी जे घटक वनस्पतीवर प्रभावी अंमल करून त्याचा कृषी क्षेत्र, पीकांमध्ये कमर्शियल स्वरूपात पेटंट घेऊन कसा वापर करून घेता येईल ही जबाबदारी देण्यात आली. देशातील विविध भागातून दुर्मिळ वनस्पती गोळा करणे, त्याची ओळख पटविणे यासाठी एक अत्यंत नावाजलेले वनस्पतीशास्त्रज्ञ कार्यरत होते. वनस्पतीचा इतका गाढा अभ्यास असणारे दुसरे व्यक्तिमत्त्व मी आजपर्यंत पाहिले नाही. त्याचबरोबर ही व्यक्ती साधेपणाच्या बाबतीत इतकी टोकाची होती की प्रयोगशाळेतील कामगाराबरोबर देखील तितक्याच मनमिळावूपणे आणि आपुलकीचे वर्तन असायचे. माझी आणि त्यांची केवळ संशोधनाच्या विषयाच्या साधर्म्यामुळे नाहीतर स्वभावामुळे गाढी मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत म्हणजे त्यांचे तीन-चार वर्षापूर्वी निधन झाले तोपर्यंत टिकली.

प्रयोगशाळेतील आणि एकंदरीतच त्या कंपनीचे वातावरण टिपिकल ब्रिटिश असले तरी ते अत्यंत सौहाद्रपूर्ण होते. त्याबाबत एक स्वतंत्र असा लेख होऊ शकतो. तथापि, एक बाब नमूद करणे आवश्यक वाटते. त्यांनी माझी निवड का केली हे त्या कार्यसंस्कृतीचा भाग होता. मला यथावकाश माझी निवड का झाली ते समजले. ती प्रामुख्याने तीन गोष्टींसाठी झाली होती. एकतर संशोधनासाठी आवश्यक असलेले चाकोरीबाह्य विचार करण्याची क्षमता. मुलाखतीदरम्यान माझा त्यांच्याशी वादही झाला आणि तो अशा चाकोरीबाह्य विचार करण्याच्या वृत्तीमुळे. सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती चाकोरीबद्धजीवन जगत असेल तर ती इतरांच्या विचारांना छेदून आपला विचार जो कितीही भिन्न असला तरी तो मांडीत नाही. असे व्यक्तिमत्त्व सर्वांना साहजिकच आवडते. पण चाकोरीबाहेर विचार करणारे हे शक्यतो नकोसे असतात. मला त्याची पर्वा नसल्याने मुलाखतीदरम्यान माझे उत्तर संशोधनाच्या बाबतीत अशीच चाकोरीबाह्य दिल्यामुळे मी शिक्षणाने आणि अनुभवाने दुय्यम असतानाही त्यांनी माझ्यामध्ये रस दाखविला आणि सहा महिन्यानंतर रुजू होण्यास परवानगी दिली हे समजले.

दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे ज्ञान. त्यांना ते का कुणास ठाऊक पण इतरांपेक्षा प्रगल्भ भासले आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली बाजू निर्भीडपणे मांडण्याची कुवत. ही तिन्ही वैशिष्ठ्ये माझ्या स्वभावात आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली आणि अर्थात तिसऱ्या वैशिष्ठ्यामुळेच मला माझ्या संशोधन या क्षेत्रापासून दूर जावे लागले.

संशोधनात मूळातच रस असल्याने मी स्वत:स त्यामध्ये झोकून दिले होते. जो संशोधन प्रकल्प मी अगोदर विशद केला आहे त्यासाठी कंपनीच्या जगभर ठरलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे कमीत कमी १३५ मि.ग्रॅम रसायनाची आवश्यकता होती. हे १३५ मि.ग्रॅम रसायन मिळविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वनस्पतींची आवश्यकता असायची. अर्थात दुर्मिळ वनस्पती मोठ्या प्रमाणात जंगलातून गोळा करणे, त्यांची देशभरातून वाहतूक करणे आणि विशेषतः रासायनिक प्रक्रिया करून त्यातील आवश्यक तो रसायनाचा १३५ मि.ग्रॅम अर्क मिळविणे ही बाब अत्यंत वेळखाऊ, खर्चिक आणि मनस्ताप करणारी होती. हे सर्व करण्यासाठी जरी स्वतंत्र टीम असली तरी संशोधनावर मर्यादा येत होत्या. दोन-तीन महिने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर मी त्याबाबतीत अस्वस्थ होतो. त्यामुळे रसायनाचे जे स्क्रिनिंग (Screen-ing) होत होते त्याची संख्या अल्प होती आणि परिणामतः यशाची शक्यता ही त्या प्रमाणात अल्प होती. त्यामुळे या पद्धतीत बदल करून कमीत कमी प्रमाण (वजन) वापरून आणि अल्प वेळेत या रसायनाची चाचणी झाल्यास वर नमूद केलेल्या अडचणीवर मात करता येणे शक्य होते. अर्थात हे एक आव्हानात्मक काम होते. तथापि त्यावर सतत दोन महिने काम करून एक चाचणी प्रोटोकॉल तयार करण्यात मी यशस्वी झालो. अर्थात तो अंतिम करण्यात आणखी एक महिना गेला. तो अत्यंत यशस्वी प्रयोग होता यामध्ये तीन गोष्टी साध्य करू शकलो. एक तर प्रयोगाकरिता जे रसायन १३५ मि.ग्रॅम लागायचे ते त्यामानाने खूपच म्हणजे कमालीचे खूप अत्यल्प लागू लागले. ते केवळ पी.पी.एम. म्हणजे पार्टस पर मिलीयन म्हणजेच दहा लाख कणांकामध्ये २५ ते ३० कणांपासून ५० ते ६० कण देखील पुरेसे होते. परिणामत: रसायने मिळविण्याकरिता प्रयोगशाळेसाठी वनस्पतीचा अत्यंत अल्प गरज भासू लागली. जंगलात ते कितीही कमी प्रमाणात उपलब्ध असले तरी त्याचा वापर करता येणे शक्य झाले. शिवाय दूरदूरवरून वाहतूक करण्यामध्ये येणाऱ्या अडचणीही संपुष्टात आल्या पूर्वी रेल्वेने अथवा रोडने त्यासाठी वाहतूक करावी लागत असे ती आता पोस्ट पार्सलनेही करता येणे शक्य झाले. या सर्व गोष्टींमुळे खर्चात प्रचंड प्रमाणात बचत झाली.

अर्थात त्या नवीन प्रोटोकॉलचा खरा फायदा वेगळाच होता. पूर्वी रसायनाची चाचणी वेगवेगळ्या रोपांवर केली जायची आणि त्यास कमीत कमी सहा आठवडे लागायचे. त्याकरिता ग्रीन हाऊसमध्ये नियंत्रितपणे प्रकाश, आर्द्रता इत्यादी ठेवून ते करावे लागत असे आणि त्यास जागेची आवश्यकताही जास्त होती. मी नवीन शोधलेल्या पद्धतीमध्ये रसायनांची चाचणीकरिता केवळ काही तासांचा अवधी पुरेसा होता. शिवाय तो चाचणी पेट्रीडिश सारख्या अगदी लहान काचेच्या बशीमध्ये होत असल्याने जागाही अत्यल्प लागल्याने मोठ्या संख्येने चाचण्या एकाच वेळी होऊ लागल्या. महिन्याला २ ते ३ रसायनाची तेथे चाचणी व्हायची तेथे आता १० ते १५ रसायनांची चाचणी एकाच वेळी करता येणे शक्य झाले. माझ्या आयुष्यातील हे पहिले यश होते. प्रचंड मानसिक समाधान मिळाले. माझा पदव्यूत्तर संशोधन प्रबंधापेक्षा ही एक अतिशय मोठी गोष्ट मी साध्य करू शकलो.

संशोधन क्षेत्रात जे अपेक्षित असते त्यानुसार मी यावर संशोधन लेख तयार करून आंतरराष्ट्रीय शास्त्रीय मासिकाकडे प्रकाशनासाठी पाठविण्याची तयारी केली. ही बाब माझ्या सहकाऱ्यांना ज्ञात होती. त्यांनी सल्ला दिला की हा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी मला कंपनीच्या परवानगीची आवश्यकता आहे. ती मिळणे केवळ औपचारिकता असेल म्हणून तसा प्रस्ताव मी कंपनीस दिला. वरिष्ठांनी मला त्यासाठी चर्चेला बोलावून माझी समजूत काढली की ही कंपनीची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक मालमत्ता अधिकार आहे आणि ते प्रकाशित करता येणार नाही. माझ्यासाठी हा प्रचंड मानसिक आघात होता. आपण केलेले संशोधन प्रकाशित न होता तसेच राहणे ही बाब घुसमट आणणारी होती. परिणामी माझे संशोधनासाठी खूप कौतुक केले पण प्रकाशनास ठाम नकार दिला. आयुष्यात बौद्धिक आघात काय असतो त्याची प्रचिती मला प्रथम या घटनेमधून आली. अहोरात्र मेहनत करून त्याचे जे फळ मिळाले ते अप्रकाशित राहणे हे काही माझ्या मनास पटणारे नव्हते. माझी अस्वस्थता माझ्या बोलण्यात आणि व्यवहारावरून वरिष्ठांना जाणवली असल्याने मला सातत्याने ‘कौन्सिलिंग’ करण्यात येत होते. माझ्या अस्वस्थतेची तीव्रता कमी व्हावी किंवा अन्य काही कारण असावे, कंपनीने मला इन्सेन्टिव्ह अॅवॉर्ड किंवा प्रोत्साहन बक्षीस दिले आणि बरोबर घसघशीत ॲवॉर्ड म्हणून रोख रक्कम दिली. सदर अॅवॉर्ड किंवा रोख रकमेने मी समाधानी होऊ शकलो नाही. त्यावेळेस मला पहिल्यांदा जाणवले की माझा ओढा हा पैशाकडे अनाठायी असू शकत नाही. हे माझ्या स्वभाव वैशिष्ठ्यापैकी एक महत्त्वाचे वैशिष्ठ्य असल्याची प्रथम प्रचिती मला या घटनेमुळे आली आणि हे वैशिष्ठ्य पुढे प्रशासनात तसेच कायम राहिले.

मी जरी या घटनेमुळे समाधानी नसलो तरी पुढे त्याच जोमाने आणि मी शोधून काढलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे काम सुरू ठेवले. परिणामत: काही चांगली रसायने आम्हाला प्राप्त होऊ लागली आणि त्यावर पुढील संशोधन देखील वेगाने प्रगती करू लागले.

हे सर्व सुरू असतानाच पी.एचडी करिता प्रवेश घेण्याचे कामही सुरू होते. एक बाब समाधानाची होती की संशोधन क्षेत्रात काम करण्याची क्षमता असल्याबाबत जो माझा समज होता तो प्रत्यक्षात येण्याची सुरुवात होती.

रसायनांच्या चाचण्या जोमाने चालू असताना ८-१० रसायने अशी मिळाली की ज्याचा वापर पुढे पीक उत्पादनांमध्ये वाढ करण्यास मदत होऊ शकेल. त्यापैकी एक रसायन हे मिळाले की ज्यामुळे पिकांच्या झाडांची उंची कमी ठेवण्यात मदत होऊ शकते. पिकांची ऊंची कमी ठेवण्याकरिता रसायन शोधण्याचा प्रकल्प यासाठी होता की त्यामुळे भातासारखे पीक ऊंच असले तर वाऱ्यामुळे ते कोलमडून पडून उत्पादन कमी होते. शिवाय पिकांची ऊंची कमी राहिली तर त्यास फर्टिलायझर कमी लागून उत्पादन खर्चात मोठी बचत होवू शकते. शिवाय कमी उंचीची पिके हे कापणीस कमी कालावधीत येऊन वेळेची बचत झाल्याने जास्तीत जास्त पिके घेणे याची शक्यता निर्माण होते.

या रसायनाच्या शोधामुळे आमच्या ग्रूपमध्ये वातावरण एकदम बदलून गेले. कंपनी संशोधनावर जो खर्च करते त्याची केवळ भरपाईच नाही तर नवीन प्रॉडक्ट बाजारात आणून व्यवसाय आणि आयवृद्धी होण्यासाठीच ही संशोधन संस्था असल्याने मिळालेली यशस्विता ही मोठे समाधान देणारी होती. अर्थात सदर रसायन हे जंगलातील एका भारतीय वनस्पतीपासूनच प्राप्त केलेले होते व त्यामुळे अशा नवीन रसायनांचा शोध येथेच लागला असल्याने ती बाब देखील महत्त्वाची होती.

रसायन शोधणे ही बाब प्राथमिक असते. नंतर त्याचे पेटंट (सर्वाधिकार) घेणे, त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वातावरणात काही वर्षे फिल्ड ट्रायल (क्षेत्रीय चाचणी) घेणे आणि अंतिमतः ते शासनाच्या मंजूरीने बाजारात आणणे या गोष्टी आवश्यक असतात. माझी जबाबदारी ही फक्त ते प्राथमिक स्वरूपात शोधून काढणे इतकीच होती.

मी आता पेटंट होण्याची प्रतिक्षा करीत होतो. संशोधनामधून मिळालेल्या यशामधून पहिले पेटंट होणार असल्याने मी त्याबाबत अत्यंत उत्साहित होतो. त्यामुळे प्रोसेस प्रोटोकॉल मला प्रकाशित करू न दिल्यामुळे मनात आलेली कटुता नाहीशी होत गेली.

पेटंटकरिता, हे रसायन वनस्पतीवर प्रक्रिया करून आणखी जास्त प्रमाणात तयार करण्यात आले. पेटंटची प्रक्रिया काय असते हे औत्स्युक्य म्हणून मी विचारणा केली असता आयुष्यातील ‘मोठा धक्का’ बसणे काय ते प्रथम जाणवले. जे समजले ते कंपनीकरिता योग्यही असेल पण माझ्यासाठी ते भयंकर होते. मला समजले की या रसायनांच्या कुपी इंग्लंडला जा-ये करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर तिकडे पाठविले जाईल आणि त्याचे पेटंट इंग्लंडमध्ये होईल. भारतीय वनस्पतीपासून, भारतीय प्रयोगशाळेत मिळविलेल्या कमर्शिअली महत्त्वाच्या रसायनांचे पेटंट अन्य देशात होणे ही बाब मला नुसतीच खटकली नाही तर मी त्यावर चिडून उठलो. मी माझ्या वरिष्ठांना स्पष्ट सांगितले की पेटंट हे कंपनीच्या नावानेच होणार असल्याने ते भारतीय वनस्पतीपासून मिळविलेले असल्याने त्याचे पेटंट भारतातच होणे आवश्यक आहे. ही भारताची संपत्ती आहे. त्यावर मला सांगण्यात आले की मी असा त्रागा करण्यात अर्थ नाही. कारण या प्रयोगशाळेत जे संशोधन होते त्याचे पेटंट हे इंग्लंडमध्येच केले जाते, भारतात नाही. ही बाब मला सहन होणे अशक्यप्राय होते. त्यावर माझे मत मी स्पष्टपणे मांडले. मी हे जे होत आहे ते एक प्रकारचे स्मगलिंग आहे आणि तसे करणे बेकायदेशीर आहे हे मी बोलून गेलो पण कोणत्या कायद्याचा भंग होता याबाबत मी अनभिज्ञ होतो. माझ्याया भूमिकेमुळे माझ्यामध्ये आणि वरिष्ठांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. माझे पुन्हा कौन्सिलिंग सुरू झाले की संशोधनावर कंपनी मोठ्या प्रमाणात खर्च करते आणि तो व्यवसायवृद्धीसाठी असल्याने त्यांनी पेटंट कोठे घ्यावे ही बाब पूर्णत: त्यांच्या मर्जीवर असणे स्वाभाविक आहे. तथापि हे स्मगलिंग आहे यावरून मी अडून बसलो.

मला सहकाऱ्यांनी सल्ला दिला की ही बाब मी अजिबात ताणू नये अन्यथा ही खाजगी नोकरी आहे आणि नोकरीतून काहीही आणि कोणतेही कारण न देता काढून टाकण्याचा त्यांना अधिकार आहे.

मी सर्व प्रकरणामुळे मी आयुष्यात कधी नव्हे ते प्रथमच प्रचंड अस्वस्थ झालो. माझी अस्वस्थता मी जनरल मॅनेजर एच. आर. यांच्याकडे बोलून दाखविली. ते गृहस्थ महाराष्ट्रीयन होते शिवाय शासकीय नोकरी सोडून कंपनीत आलेले होते. अत्यंत परिपक्व विचार करणारी व्यक्ती म्हणून मला त्यांचा आदर होता. त्यांनी मला समजावले की माझा स्वभाव हा खाजगी क्षेत्रात ज्या गोष्टींना मुरड घालावी लागते त्यामध्ये न बसणारा आहे आणि म्हणून मी शैक्षणिक किंवा प्रशासकीय क्षेत्रात जावे. खूप विचार करून मी प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी प्रशासनात आलो. खाजगी संशोधन क्षेत्र सोडून प्रशासनात येण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य होता त्याचे विश्लेषण करणे किंवा निर्णयाचे शल्य मनात राहणे यापलीकडे मी गेलो आहे. एक गोष्ट निश्चित आहे की माझा स्वभाव मी बदलू शकत नाही या वर्गीकरणात मी बसतो. स्वभाव बदलण्याचा विचारही मनात येणे शक्य नाही.

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

–महेश झगडे
I.A.S.
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..