

मी जेव्हा सतत तुमच्या सेवेत कार्यरत असायची तेव्हा मला मोजून ४ ते ५ तास विश्रांती मिळायची. दररोज साधारणतः ७५ लाख लोकांशी माझा संपर्क यायचा. माझा वावर हा ६० ते ७० किलोमीटरच्या परिसरातच असला तरीही तुम्हा मुंबईकरांची सेवा करताना मी पृथ्वी ते चंद्राचे अंतर सुद्धा एका दिवसातच पार पाडायचे. माझ्या १६५ वर्षांच्या इतिहासाचा विचार केला तर कदाचित मी आत्तापर्यंत आपल्या सूर्यमालेच्या बाहेर देखील पोहोचले असेल. मग एवढा मोठा व्याप पाठीमागे असताना मिळणारी सक्तीची विश्रांती मला स्वस्थपणे कशी बसू देईल? पण कोरोनाच्या संकटामुळे माझी सेवा जर तुम्हा मुंबईकरांच्या आरोग्याला हानिकारक ठरणार असेल तर अशा वेळेस मी स्वतःहूनच समजूतदारपणा दाखवायला हवा.माझ्या सध्याच्या विश्रांतीमुळे अनेकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली असणार हे मी समजू शकते पण सध्याच्या काळात माझ्या विश्रांती पेक्षा तुमच्या सेवेत असणे हे मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. मी लवकरच पूर्ण कार्यक्षमतेने तुमच्या सेवेत नक्कीच हजर होईल पण या क्षणी आपल्याला एकमेकांशी थोडा सावध संवाद साधावा लागेल कारण वेळ थोडी नाजूक आहे. वेळ माझ्या सेवेपेक्षा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे.
मी एक धावणारे यंत्र असल्यामुळे मला झालेली दुखापत काहीही करून भरून काढता येऊ शकते पण सध्याच्या कोरोना संकट काळात माझ्या सेवेचा लाभ घेण्यासाठी माणसांची गर्दी प्रमाणाबाहेर वाढली तर माणसांना होणारी दुखापत भरून निघेलच असे नाही. त्यामुळे मी जरी पूर्वीप्रमाणे कार्यरत झाले तरी सर्वांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन माझ्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. जसं काळानुरूप आणि गरजेनुसार माझ्यामध्ये बदल होत गेले म्हणजे ६ चे ९, पुढे ९ चे १२ डब्बे झाले, मेट्रो नावाचे नवे अपत्य जन्माला आले त्याच पद्धतीने मुंबईकरांनी सुद्धा सध्याच्या संकट काळानुसार सद्सद विवेक बुद्धीने माझ्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. माझ्या अनेक वर्षाच्या “लोकल” सेवेत जसं मी कोणत्याही अपघाताला निमंत्रण न देण्याचा “ग्लोबल” रेकॉर्ड टिकवून ठेवला आहे तसं मुंबईकरांनी सध्या परिस्थितीचे भान ओळखून भाऊगर्दी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे.
मी लवकरच पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा कार्यरत होईल आणि माझ्या कार्याचे नवनवीन रेकॉर्ड बनवेल पण या वेळेस जरा धीरानेच………
— राहुल बोर्डे
Leave a Reply