माझ्यातला चांगुलपणा
मी पुन्हा जागवला
प्रेमभाव अंतरीचा
पुन्हा मी जोपासला
मनातली वैरभावना ती
कशी कावरी-बावरी झाली
प्रेमाच्या सानिध्यात
फार काळ नाही टिकली
खूनशी वृत्ती ती
मन पोखरत राहीली
चांगुलपणाला घाबरून
प्रेमाला शरण आली
तिरस्काराचे ते पेटते बाण
होते जरी सुटलेले
आपुलकीच्या ओलाव्याने
आपसुकच ते विझलेले
रोषानेही मग आपला
रस्ता तेंव्हा बदलला
द्वेषालाही अस्तित्वाचा
जणु उबग आला
स्वार्थाला स्वतःचीच
लाज वाटू लागली
मानवतेची ओळख मनाला
नव्याने पटू लागली
अहंकारानेही आपली
मान खाली घातली
सुंदरता माझ्या मनाची
तेव्हा मला दिसली
तुटलेले दूखावलेले
जवळ आले ते सारे
जिवन जगण्याचे सूत्र
सापडले मला ते खरे.
– डॉ. सुभाष कटकदौंड