काल – परवा चहा पित खिडकीत उभा होतो. सहजच लक्ष एका आवाजाकडे वळले. तो आवाज होता एका बाईचा आणि ती लहान मुलाला शाळेत जाण्याबद्दल समजावत होती. तिचा लहान मुलगा ‘ मी शाळेत जाणार नाही ‘ असा हट्ट करून रस्त्यावरच बसून राहिला होता. पण त्या बाईने काही हार मानली नाही. तिने तसेच त्या मुलाला कडेवर उचलून घेतले आणि ती निघाली. या घटनेमुळे मी नकळत भूतकाळात ओढलो गेलो. सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोरून पटापट पुढे सरकू लागला. मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवला.
मला अजूनही आठवतंय की मी माझ्या आईचे बोट धरून चालत होतो. पण माझ्या चालण्याचा आणि आईच्या चालण्याचा वेग मागे-पुढे होत होता. शेवटी आईने मला कडेवर उचलून शाळेत पोहोचवले. त्यावेळी माझे घर आणि शाळा यामधील अंतर जवळपास १० ते १५ मिनिटे एवढेच होते. शाळेत पोहोचल्यावर आईने मला वर्गाजवळ सोडले. मी देखील न रडता वर्गात शांतपणे बसून राहिलो.
माझे भाग्य खरोखरच थोर होते. कारण मी अश्या शाळेत शिकणार होतो की, ज्या शाळेत सुसंस्काराची कसल्याच प्रकारची वानवा नव्हती. आता एवढं वाचल्यावर सगळ्यांना प्रश्न पडेलच की अशी ही शाळा कोणती की, जिच्याबद्दल मी एवढे बोलत आहे! तर ती शाळा म्हणजे ‘ शिव समर्थ विद्यालय ‘ ही होय. लहानपणापासूनच आम्हाला राष्ट्रभक्ती, मारुतीस्तोत्र, गणितातील पाढे इत्यादी शिकवले जायचे. त्यामुळे नकळत राष्ट्रवरील प्रेम, देवावरील श्रद्धा इत्यादी गोष्टी वृद्धिंगत होत गेल्या. शाळेच्या तासाच्या सुरवातीला ‘ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत घेऊन इतर गाणी, श्लोक, स्तोत्र पठण होत असे आणि शेवटच्या तासानंतर ‘ वंदे मातरम् ‘ हे गीत म्हणून शाळा सोडली जाई.
या सवयींमुळे आजही मनात देशाबद्दल तेवढाच आदर आहे. आजही जिथे – जिथे राष्ट्रगीत ऐकू येते, तिथे – तिथे पाय कितीही घाई असली तरीही थबकतातच. अजूनही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे मी दिवाळी, गणेशोत्सव आणि नवरात्रासारखेच जोमात आणि उत्साहात साजरे करतो. समर्थ रामदास रचित ‘ मनाचे श्लोक ‘ च्या पठणामुळे आयुष्यात कसे वागावे, कसे बोलावे इत्यादीची शिकवण मिळाली. खरोखरच समर्थांच्या बोलण्याप्रमाणे जो – जो वागतो त्याला – त्याला आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली मिळाली असेच म्हणावे लागेल.
असो, “वर्षांमागून वर्षे सरत गेली आणि मी हळूहळू केव्हां मोठा झालो हे कळलंसुद्धा नाही” असे माझी आई मला नेहमी म्हणते.
असे म्हणतात की स्वतः दत्तगुरूंनीदेखील २४ गुरू केले होते. त्यांनी निसर्गातील पक्षी प्राण्यांकडून आपले ज्ञान प्राप्त करून घेतले, त्याचप्रमाणे मलादेखील शाळेत जाण्यापूर्वी आणि आयुष्यात एक गुरू लाभला तो गुरू म्हणजे माझी ” आई “. माझे असे मत आहे की जिथे – जिथे गुरू – शिष्याचे नाते बनते, तिथे – तिथे एक आगळी वेगळी शाळा बनते. असेच काही माझ्या बाबतीतही घडले. माझ्या आयुष्यात मला घडविण्याचा ९०% भाग हा माझ्या आईचाच आहे. माझ्या आईने मला जन्मभर पुरेल असे ज्ञान दिले. माझ्यामते शाळेने जर मला शैक्षणिक ज्ञान प्राप्त करून दिले असेल तर आईने मला आयुष्य कसे जगायचे ह्याचे शिक्षण/ज्ञान दिले.
खरोखरच मी लहानपणापासून तिने आपल्या परिस्थितीवर कशी काय मात केली हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मी लहान असताना आयुष्यातली पहिली ३-४ वर्षे खूप छान गेली होती. त्यावेळची आमची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. परंतु बहुदा मला कष्टाची, मेहनतीची आणि पैशाची किंमत कळावी म्हणून नियतीने आमची परिस्थिती क्षणात पलटवली. क्षणात रावाचा रंक बनविले. माझ्या वडिलांचा व्यवसाय बुडला आणि आम्ही कर्जबाजारी झालो. व्यवसायात प्रचंड फसवणूक झाली आणि दुष्काळात १३ वा महिना म्हणून आम्हाला आमचे राहते घरदेखील काही गोष्टींमुळे सोडावे लागले. आमच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. आई वडिलांवर तर दुःखाचा – संकटांचा पहाडच कोसळला होता. आता परत सगळे शून्यातून निर्माण करायचे होते. आई वडील पहिल्यापासूनच चांगल्या वातावरणात वाढलेले होते. त्यांच्यावर कधीच भाड्याच्या घरात राहण्याची नौबत आली नव्हती. ती वेळ प्रथमच त्यांच्यावर आली होती. तरीही खचून न जाता ‘ आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान ‘ ह्या तुकारामोक्तीप्रमाणे ते परिस्थितीच्या सगळ्या प्रकारच्या आघातांवर मात करण्यासाठी सज्ज झाले. फक्त मला चांगले शिकवायचे आणि माझ्या आयुष्याची गाडी रुळावर आणायची हे ध्येय त्यांनी आपल्या मनाशी घट्ट बांधले. माझ्या वडिलांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असल्याकारणाने त्याच्याकडे गाडी चालवण्याची उत्तम कला होती. त्यामुळे त्यांनी मनात कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता गाडीचालकाची नोकरी पत्करली. सुरवातीस त्यांना केवळ १८००₹ पगार होता. त्यातच सगळा खर्च चालवायचा भार आईवर आला. त्यात घरभाडे, वडिलांचा येण्या – जाण्याचा खर्च, वीजबिल, किराणा सामान, माझ्या शाळेची फी असे अनेक खर्च सामावलेले असायचे.
पण आईने किंवा वडिलांनी कधीच कोणाकडेही पैश्यांसाठी आपले हात पसरले नाहीत आणि कधीच कोणताही देणेकरी दाराशी येऊ दिला नाही. कित्येकदा पैशाअभावी आई मला शाळेत चालत न्यायची. त्यात ती स्वतः चालायची आणि मला कडेवर घ्यायची. त्यावेळेस माझे घर शाळेपासून ३ ते ३ || किलोमीटर दूर होते. म्हणजे रोज माझी आई मला घेऊन ६ ते ७ किलोमीटर प्रवास करायची. पावसाळ्यात तर बिचारीची तारेवरची कसरत व्हायची. कित्येकदा ती आपले मन हलके करण्यासाठी चालता – चालता रडायची. तिला वाटायचे की ती रडतेय हे मला पावसाच्या पाण्यामुळे कळणार नाही. पण मला मात्र बरोबर कळायचे की ते नक्की कुठले पाणी आहे ते!
कळायला लागल्यावर मी मात्र चालयचो. मजल दरमजल करत शेवटी आईनेपण नोकरी धरली तेव्हां जरा चांगले दिवस आले. इयत्ता चौथीपासून मी शाळेत एकटा जायला लागलो. मला खरच कधी – कधी प्रश्न पडायचा की कुठल्या मातीचे बनले आहेत माझे आई – बाबा ? पण आजही वयवर्षे २८ झाली, पण परिस्थितीवर मात कशी करावी, काटकसर कशी करावी याचे शिक्षण आईमुळे मिळाले. आज जर मी काही घडलो त्याचे सगळे श्रेय हे माझे नसून माझ्या आई – बाबांचे आहे. त्यांनी जर मला त्या गोष्टी शिकविल्या नसत्या तर न जाणो आज मी कसा असतो? मला जन्मभर पुरेल अशी शिदोरी आई – बाबांनी आयुष्याच्या प्रवासकरिता दिलेली आहे.
वरील कठीण प्रसंगी आई वडिलांना आणि मला जर कोणी उभारी दिली असेल तर ती म्हणजे बेळगावनिवासी प. पू आई श्री कलावती देवी ह्यांनी. त्या प्रत्येक कठीण प्रसंगात / संकटसमयी महाभारतातील भगवान श्रीकृष्णासारख्या आमच्या संसाररूपी गाडीला चालवत होत्या. आज आम्ही जे कोणी आहोत, जगत आहोत ती केवळ त्यांची कृपा म्हणूनच.
अजूनही बरेच गुरू आयुष्यात लाभले, ज्यांनी आयुष्यात पुढे कसे सरकायचे, भूतकाळाला कसे मागे सारायचे हे शिकवले. मला आयुष्यात योग्य दिशा मिळावी म्हणून सदैव झटणाऱ्या सगळ्या गुरूंना माझा साष्टांग नमस्कार.
शेवटी गुरू म्हणजेच गुणांचे आणि रूपाचे प्रतीक. तोच ब्रम्हा, विष्णू, महेश आणि तोच सकल देवता होय !
— आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply