दचकलात का ? रस्ता हा निर्जीव असतो मग तो बोलू कसा शकेल ? असा विज्ञानवादी प्रश्न आपणांस पडला असेल, पण पल्स पेक्षा इंपल्स वर जगणं शिकलं कि मग रस्तेच काय, जगातील कोणतीही चल-अचल, सचेतन-अचेतन, सजीव-निर्जीव वस्तू तुमच्याशी संवाद करू शकते. म्हणूनच इम्पल्स वर जगणाऱ्याना माझे बोलणे निश्चितच ऐकू येईल.
सुमारे २१ किलोमीटरहुन अधिक लांबीचा डांबर, सिमेंट, खडी यांनी बनलेला मी सिंहगड रस्ता,
सरकारी दरबारात, ‘नरवीर तानाजी मालुसरे मार्ग‘ असे माझ्या लांबीला शोभणारे लांबलचक नांव असणारा एक पुणेरी रस्ता. माझे निश्चित वय मलाही आताशा आठवत नाही, खरे तर कोणत्याही रस्त्याचा जन्म हा त्याच्यावर जेंव्हा पहिला पथिक चालतो तेंव्हाच होतो. माझाही जन्म तसाच झालेला असावा. अर्थात तो पहिला पथिक कोण हे मलाही स्मरत नाही कारण आता तो इतिहास झाला आहे.
इतिहासाचे पहिले पान प्रत्येकवेळी सापडतेच असे नाही त्यामुळे जे पान उपलब्ध आहे तिथूनच कथा सुरु होते.
शिवप्रभूंच्या आवडत्या ” किल्ले सिंहगडाकडे” जाणारा रस्ता म्हणून माझे नांव आदराने घेतले जाते (असे मला वाटते). मी शिवपूर्व काळातही अस्तित्वात होतो आणि आजही अस्तित्वात आहे, फक्त माझे रूप, आकारमान मात्र वेळोवेळी बदलत गेले आहे. माझ्याच अंगाखांद्यावरून शिवप्रभू, तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक मर्द मावळे सिंहगडाकडे गेलेले मला अजूनही आठवतंय. त्यावेळेसच्या वाटा वेगळ्या असतील; परंतु माझी तेंव्हाही ओळख ‘सिंहगडाकडे जाणारा रस्ता’ किंवा ‘सिंहगडाची वाट’ अशीच होती. आधुनिक काळामध्ये टिळक, सावरकर हेही माझ्याच वाटे सिंहगडावर जात येत होते.
पण पुढे जाऊन काळ बदलला, माझी सरकारी दफ्तरी अधिकृत नोंद झाली, लांबी ठरली सुरुवात आणि शेवट कोठे मानायचा हे हि ठरले त्यामुळेच मी आत्ताचा सिंहगड रस्ता तुम्हांस दिसतो आहे.
आत्ताच्या रूपाबद्दल सांगायचे तर माझी सुरुवात एका बाजूला सारसबागेतला सिद्धिविनायक तर दुसऱ्याबाजूला स्मारकातला क्रांतीविनायक (सावरकर) अश्या द्वि-विनायकी स्थानापासून होते आणि अगदी सिंहगडाच्या पायथ्याशी जाऊन संपते. सावरकर पुतळा (स्मारक), कांचीश्वर मठ, स्वामी समर्थ मठ, खंडोबा देवस्थान, साने गुरुजी स्मारक, बुद्धविहार, रामकृष्ण मठ, वीर बाजी पासलकर स्मारक, सारदा मठ, प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी, अनेक मंदिरे, मशिदी अश्या भिन्न धर्माच्या, विचारांच्या विभूतींची स्थाने माझ्या डाव्या-उजव्या बाजूला आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांशी संघटना, राजकीय पक्ष यांचे नेते, कार्यकर्ते, समर्थक हे हि माझ्याच अंगा-खांद्यावर खेळत असतात.
मला अजूनही आठवतंय ८०-९० दशकात पुण्यातल्या पेठांमध्ये पाणी शिरल्यानंतर बरेच जण माझ्या आसऱ्याला आले, चला निर्जीव असूनही कोणाच्यातरी कामी आलो हे समाधानच आहे मला, खरं सांगू सुदृढ, सक्षम, सुशिक्षित असूनही माणसांच्या उपयोगी न येणारी माणसुकीविना जिवंत प्रेते झालेल्या सजीव माणसांपेक्षा मी निर्जीव अधिक चांगला याचा अभिमान वाटतो.
याच सुमारास पुण्यातली तरुणाई, कधी सायकलवर तर कधी मोटारसायकलवर, खडकवासला, सिंहगड, पानशेत अश्याठिकाणी भटकायला माझ्याच मार्गे जायची. आजकालही जातात पण तेंव्हा ती मंडळी पूर्णकपड्यात आणि घरचा भाकरी-भाजीचा डबा घेऊन यायची.
तेंव्हाची माझ्या आजूबाजूला असणारी दाट वृक्षराई, वाऱ्यासंगे डोलणारी शेतातली पिके, शेतातल्या विहिरींमध्ये मनसोक्त डुंबणारी पोट्टी, सायकल चालवून थकल्याने विहिरींचे थंड पाणी पिऊन, झाडाखाली आराम करून हुश्शार होणारे जवानमर्द गडी ……. अजूनही आठवलं की मनाला प्रसन्नता वाटते (रस्ता असलो म्हणून काय झाले मलाही मन आहे).
पण आताशा मात्र माझा श्वास कोंडला जातोय असंच वाटतंय, वहानांचे धूर, वाहतुकीची कोंडी, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणारे उग्र दर्प, यामुळे मी पार गुदमरून जातोय. माझ्या अंगावरच्या जखमा, ज्याला तुम्ही माणसे खड्डे म्हणता त्यामुळे काही ठिकाणी अक्षरक्ष: चाळण झालीये हो, नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या अंगावर शत्रूंनी केल्या नसतील तेवढ्या जखमा तुम्ही स्वकीयांनी माझ्या अंगावर केल्यात………
तुम्हा माणसांना कसली घाई असते तुम्हांसच ठाऊक, घाई-गडबडीत खड्डे चुकवायला जाता आणि अपघातग्रस्त होऊन बसता. खरे तर मला स्वतःला अंगभर अश्या जखमा करून घ्यायची हौस नाहीये, पण खड्ड्यात गाडी गेल्यावर माझ्यावरच शिव्यांची लाखोली वाहता ? मी काय करणार ? काही महाभाग तर माझ्या आई-वडिलांचाही उद्धार करत शिव्या देतात; पण बाबांनो खड्डे पडायला आणि खड्ड्यात पडायला तुम्ही माणसेच जबाबदार आहात, आम्ही रस्ते नाही.
काही-काही ठिकाणी माझा आकार असा काही करून ठेवलाय की; जरा पाऊस पडला की पाणी साचते. प्रत्येक पावसात पाणी साचते हे माहीत असताना का नाही उपाय योजना करत तुम्ही माणसं ? शेततळी नेमकी किती तयार झाली माहीत नाही; पण माझ्या अंगावर साकारलेली ‘ रस्ता तळी ‘ मात्र मी दरवर्षी पाहतो. कधी कधी मी खचून जातो, माझ्या खालची जर जमीन व्यवस्थित राखून, आवश्यक तो आधार दिलात तर मीही अगदी तुमच्या सारख्या ताठ कण्याने राहीन कि; न खचता. माझ्या बाजूला असणाऱ्या पादचारी मार्गावर (फूटपाथ) काहींनी दुकाने थाटली, चालणार्यांनी चालायचे कुठे ? परवा तर गम्मत झाली असेच दोन मित्र बोलत होते, एकजण म्हणाला,
” रास्ता रोको आंदोलन करूयात “, दुसरा म्हणाला त्यासाठी वेगळे काही करयाची गरज नाही,
” सिंहगड रस्ता रुकलेलाच असतो, इथला चक्काच नाही तर चप्पा-चप्पा जामच असतो ” दोघेही मोठ्याने हसले …..
वाटलं फाटून जावं आणि दोघांना आपल्या पोटात गिळून टाकावं. तुम्ही माणसे भूखंड गिळता पण म्हणून आम्हा रस्त्यांना माणसे नाही ना गिळता येत.
असेच एकदा आणखी दोन मित्रांचा संवाद ऐकला, एकजणाने विचारले सिंहगड रस्त्यावर आपण नेमक्या कोणत्या भागात आलो आहोत हे कसे ओळखायचे ?
दुसरा अनुभवी मित्र मिश्किलपणे म्हणाला, “अरे सोप्पंय रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला अत्यंत बेशिस्तपणे उभा केलेली वाहने दिसली की ओळखायचे आपण दांडेकर पूल पार केला, आणखी पुढे आल्यावर पाण्याच्या टँकरच्या रांगा आणि रस्ता स्वच्छ करत; प्रसंगी मागच्या वाहन चालकाला स्नान घालत, डुलत डुलत जाणारे टँकर दिसले कि ओळखायचे आपण जलशुद्धीकरण केंद्रापाशी आलो आहोत, डाव्या हाताला फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर्सचे महासंमेलन दिसले कि ओळखायचे आला राजाराम पूल, रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर थाटलेली भाजी मंडई दिसली कि ओळखायचे आपण संतोष हॉल जवळ पोहोचत आहोत, कचऱ्याच्या घाण वासाने जेंव्हा नाकाला रुमाल लावावा वाटेल; तेंव्हा ते धायरी किंवा किरकिटवाडी असेल, लाखोंच्या गाडीतून उतरून फाटके, तोडके कपडे घातलेली माणसे तोंडे वेडी-वाकडी करत सेल्फी काढताना दिसली कि ओळखायचे आपण खडकवासल्यापाशी आलो.” अश्या इतरही खाणाखुणा सांगत होता तो. मी काय बोलणार ??? नेहमी प्रमाणे ऐकून घेतले.
सगळं करता तुम्ही माणसे आणि बदनामी मात्र सिंहगड रस्त्याची, सिंहगड रस्ता खराब !, सिंहगड रस्ता अपघाताला निमंत्रण…!!! वगैरे वगैरे बडबडत असतात तुमच्यातली काही माणसे. आम्ही गरीबाना आधार देतो, पण तुम्ही आमच्या आधारावर जगता आणि वरून आम्हांलाच शिव्या देता ? मी तर असं ऐकलंय की जनतेला सिंहगड रस्ता सुरक्षित करायचं वचन देऊन, काही लोकांनी त्यांची राजकीय पदे सुरक्षित केली आहेत. असो तुम्हा माणसांचा काय भरवसा काहीही घडते तुमच्या राज्यात.
पण खरं सांगू मी शिवपूर्व काळ पाहिलाय, शिवप्रभूंना पाहिलंय, तानाजी मालुसरे , बाजी पासलकर या शिलेदारांना पाहिलंय, टिळक सावरकर या क्रान्तिकारकांना पाहिलंय, तेंव्हा स्वतःच्या असण्याचा यथार्थ अभिमान बाळगलाय पण आता मात्र तुम्ही लोकं माझी करत असलेली दुर्दशा पाहून स्वतःचीच लाज वाटतीये…….
मी अगदी घुसमटून, गुदमरून जातोय, लक्षात ठेवा
“ देशाचे भविष्य घडवायचे असेल तर रस्ते वाहते आणि सुरक्षित असले पाहिजेत.”
बाकी वाट पाहतोय तुमच्या प्रतिक्रियेची जमलं तर सकारात्मक प्रति-क्रिया करा अन्यथा माझी दशक्रिया तरी करा……..
मानलात तर तुमचाच :
सिंहगड रस्ता …..
— श्रीपाद श्रीकांत रामदासी
खूप सुंदर पण तेवढीच परखड आणि वास्तविक शब्द मांडणी
छान लिहिलंय, पण पाषाणहृदयी माणसाला या मातीच्या वेदना कळतील तेव्हा सुदिनच म्हणायचा