नवीन लेखन...

मी व्यायाम करतो

ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो. आय़ुष्याची चाळीस वर्षे वळणाची वाट पाहण्यात गेले आणि आता साध कंबरेपासून वळण सुद्धा जमत नाही. एक दिवस पहाटे पहाटे माझी झोप उडाली. सूर्य पूर्वेला उगवतो हे पुस्तकात वाचले होते आज त्याची प्रचिती आली होती. माझ मन मला सांगत होत आता आय़ुष्यात वळण येणार, माझ आयुष्य बदलनार, माझ्या जीवनाला वेगळी दिशा मिळनार, आयुष्यात ती क्रांतीची ज्योत पेटनार. मी माझ्या मनाची अवस्था बायकोला सांगितली तर तिने सरळ उडवून लावले.

म्हातारा झाला तू आता, म्हणून झोप येत नाही. वळण येणार आहे म्हणे”

तिने ती क्रांतीची ज्योत पेटायच्या आधीच विझवायचा प्रयत्न केला. मी ती ज्योत अशी विझू देनार नव्हतो. एक दिवस सकाळी अशीच जाग आली. बायको घोरत होती. सकाळी सकाळी काही उद्याोग म्हणून वृत्तपत्रांच्या जुन्या पुरवण्यांचे वाचन केले. मी झाडून साऱ्या पुरवण्या वाचून काढल्या. अगदी आरोग्यविषयक पुरवणी सुद्धा वाचली. मला साक्षात्कार झाला, डोक्यात लख्ख प्रकाश पडला, माझी ट्युब पेटली. मला आयुष्याचे गुज सापडले, जीवनाचा बोध झाला. संसार, नोकरी पैसा अशा समाजाच्या दृष्टीने तुच्छ असनाऱ्या (भलेही सारा समाज त्याच्याच मागे धावत असतो) गोष्टीमागे धावण्यात मी माझ्या आरोग्याच्या खजिन्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. हे काय शरीर आहे अमीबासारखे दाहीदिशांना सुटलय नुसत. ते पोट, आत पृथ्वीचा गोल ठेवल्यासारखे वाटते. कधी शाळेचे मार्क वाढले नाही, पगार वाढला नाही पण दरवर्षी पोटाचा घेर मात्र वाढतच गेला. बाह्य शरीराची ही अवस्था होती तर शरीराच्या आत काय परिस्थिती असेल? नुसत्या कल्पनेने घाम फुटला. त्या दौलताबादच्या भुलभुलैयामधे जसे वटवाघूळ झालेत तसेच माझ्या नसानसात कॉलस्ट्रॉलचे राज्य पसरले असेल. शरीरात इतकी साखर झाली असेल की त्याला शरीराच्या आतसुद्धा मुंग्या लागल्या असतील. मी म्हणतो माझ्या पायाला मुंग्या आल्या. मुंग्या आत आहेत. जगातले सारे आजार नरसिंहाच्या रुपाने माझ्यासारख्या आळशी, पापी हिरण्यकश्यपूचे पोट फाडायला आलेत असे एक भयंकर चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले.

हे चित्र आता बदलायलाच हवेमी ठरविले, नुसते ठरविले नाही तर पक्का निश्चय केला. तसा मी निश्चयसम्राट माणूस आहे. दरवर्षी टोपल्याने निश्चय करीत असतो. आता महीन्याभरात तो निश्चय विसरतो हा भाग निराळा. विसरतो म्हणून मी निश्चय करायचे सोडत नाही. आता फक्त निश्चय करुन भागनार नव्हत मला गुरु सुद्धा करावा लागनार होता. खर साांगायच तर मी एकलव्य प्रकारात मोडनारा माणूस आहे. मला कुण्या गुरु शुक्राची फारशी गरज नाही. पण समजा, मी उद्या मॅरॉथॉन जिंकलो किंवा हिमालयात जाउन झेंडे गाडले तर मग आभार मानायचे झाले, फेसबुकवर आभारप्रदर्शनाची लांबलचक पोस्ट लिहायची झाली तर कुणाच्या नावाने लिहायची. दुसरी समस्या अशी होती की कोणता व्यायाम करायचा? मी खूप टॅलेंटेड आहे, कसरत, योगा, चालने, धावने, पोहणे काहीही करु शकतो. पण आज काय ट्रेंडींग आहे ते समजणे महत्वाचे होते. तेंव्हा गुरु हवा. माझा एक जुना वाइट अनुभव सुद्धा होता. मी कॉलेजला असताना दोन दिवसात टेनिस शिकून टाकू या जोषात टेनिस खेळायला गेलो होतोतिथल्या माझ्या पार्टनरने मला सांगितले एका जागी उभे राहायचे, अजिबात हलायचे नाही. फक्त तुझ्याकडे बॉल आला तर लगेच बाजूला व्हायचे म्हणजे मला बॉल मारता येइल.या असल्या कूपमंडूक प्रवृत्तीच्या लोकांमुळेच या देशात खेळाडू तयार होत नाही, नाहीतर आज आज सानिया मिर्झाच्या बाजूने पेपरात माझा फोटो आला असता. आपली दौड मोठीच. टेनिस कोर्टावरील पुतळा बनण्यापेक्षा मी बेंचावरील ठोकळा बनणे पसंत केले

एका सकाळी मी गॅलेरीतून खाली बघितले आणि बघतो तर काय सकाळी उठनारा मी एकटाच नव्हतो. आजवर मी हेच समजत होतो की देवाने सकाळी उठण्याचा हक्क फक्त दूधवाला आणि पेपरवाला यांनांच दिलेला आहे. इतरांनी सकाळी उठणे म्हणजे त्यांच्या हक्कांची पायमल्ली केल्यासारखे आहे. आज मला नवीन सत्य उमगले होते की दूधवाला आणि पेपरवाला यांच्या बरोबरीने देवाने बेढब शरीर असनाऱ्यांना सुद्धा सकाळी उठण्याचा हक्क दिलेला आहे. कुणी चालत होते, कुणी धावत होते, कुणी जोरजोरात पायडल मारीत सायकल चालवित होते. बंद गळ्याच्या टी शर्टच्या आत चाळीस इंची पोटाचा घेर लपवत होते. या अशा बेढब शरीराच्या मेळाव्यात पोट उडवत धावनार एक ओळखीच बेढब शरीर दिसल. आमच्या ऑफिसमधला सेल्सवाला होता. मी त्याला आवाज दिला पण पठ्ठ्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले. मनात म्हटले भेट लेका ऑफिसमधे तुला दाखवतो माझा इंगा. त्याच्या दुर्दैवाने तो भेटलाच.

अरे काय तू पक्का सेल्सवाला निघाला, गरज असली तर दहावेळा फोन करतो आणि सकाळी आवाज दिला तर बघत सुद्धा नाही.”

अरे बस क्या. माझे दिवसाला पंधरा हजार स्टेप्स करायचे टारगेट आहे तेंव्हा घाइत होतो.”

स्टेप्सचे टारगेट, ही काय भानगड आहे. तुम्हा सेल्सवाल्यांना जिथे तिथे टारगेटच दिसतात का रे?” एखाद्या सोनाराला कुणी हे कॅरेट काय प्रकरण आहे असे विचारल्यावर तो ज्या नजरेने बघेल त्या नजेरेने त्याने माझ्याकडे बघितले. दोन बोटांनी चालण्याची खूण केली.

स्टेप्स, दिवसाला किती. आठवड्याला किती ते.”

या स्टेप्स मोजनार कोण आणि कशा?” असे विचारताच मोठ्या उत्साहात त्याने हाताचे घड्याळ दाखविले.

हे घड्याळ, हे मोजते स्टेप्स. गेल्या महीन्यात हाँगकाँगला गेलो होतो तिथे घेतले.”

या सेल्सवाल्यांना एक घाणेरडी सवय असते ते कुठे कुठे फिरले, तिथे जाउन काय काय खाल्ले आणि काय काय खरेदी केले हे ऑफिसमधल्या प्रत्येकाला थांबवून सांगत असतात. ते इतक्यावरच थांबत नाहीत तर फेसबुकवर फोटो टाकतात आणि तुम्हाला चक्क टॅग करतात. त्याने मग मला Health Dept of America, WHO यासारख्या संस्था स्टेप्स विषयी काय सांगतात याची आकड्यांसहीत माहीती दिली. अरे आपण सहज चालतो त्याला जगात इतक महत्व असत हे आधीच माहिती असत तर मी स्टेप्स विषयातच पिचडी केली असती कशाला इंजिनियरींग घोकली असती. या व्यक्तीची व्यायाम या विषयातील एकंदरीत प्रगती बघता याला व्यायामातला गुरु मानायला हरकत नाही असे मी ठरविले

त्या सेल्सवाल्याला गुरु मानून मी तंत्रज्ञानाच्या मदतीने मोजून मापून व्यायाम कसा करतात याचा आंतरजालावर शोध घेतला. व्यायाम, Exercise, कसरत, वर्दीश असे सारे शब्द टाकून गुगलमहाराजांना गुदगु्ल्या केल्या आणि व्यायामाच्या लिंका धडाधडा टपकल्या. माझे तत्वच आहे काहीही करायचे ते सारे समजून उमजून शास्त्रोक्त पद्धतीनेच करायला हवे. पोहणे शिकायचे म्हणून मी सहा महीणे पोहण्याचा अभ्यास केला होता, पुस्तक वाचून. केवळ एका शंकेचे समाधान झाले नाही म्हणून मी आजपर्यंत पाण्यात उडी घेतली नाही. ती शंका होती पोहताना जर का शिंक आली तर नाकावर डावा हात ठेवायचा कि उजवा. याला म्हणतात attention to details. आताही मी व्यायामाचा तसाच अभ्यास करीत होतो. व्यायामाचे प्रकार, प्रत्येक प्रकाराचे फायदे आणि तोटे लिहून काढले. धावणे, पोहणे आणि खेळ खेळणे अशी व्यायामप्रकारांची वर्गवारी केली. टेनिस कोर्टावरील पुतळ्याचा कटू अनुभव गाठीशी असल्याने खेळणे लगेच बाद झाले. पोहण्याच्या बाबतीत शिंकेच्या शंकेचे समाधान अजून झाले नव्हते तेंव्हा तेही बाद झाले. शेवटी धावण्याचा धाकटा भाउ चालणे पासून सुरवात करावी असा निश्चय मी केला.

मी चालण्यासाठी लागनाऱ्या साहीत्याची यादी करायला सुरवात केली म्हणजे टी शर्ट, शॉर्ट, शूज, नी गार्ड इत्यादी. मग चालण्याच्या विविध पद्धतींची माहीती मिळविली. या इंग्रजी लोकांनी चालण्याच्या सुद्धा पद्धती शोधून काढल्या, एरोबिक्स वॉक, ब्रिस्क वॉक. आता शास्त्र म्हटले की दहा लोकांची दहा मत हे आलेच. चालताना गुडघ्यापाशी एकशे त्रेहात्तर अंशाचा कोन असावा की एकशे पंचाहत्तर यावर सुद्धा दोन मतप्रवाह आहे. मी दोन्ही मतप्रवाहाचा सखोल अभ्यास केला आणि एकशे त्रेहात्तर अंशाचाच कोन असावा असे ठरविले. फक्त चालत असताना तो कोन माोजायचा कसे हे काही कळले नाही. तुमच्या एक लक्षात आले का माझी प्रवृत्ती प्रचंड अभ्यासू आहे. मी जर झुरळ मारायचा म्हणजे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय केला तर झुरळांच्या दहा पिढ्यांचा अभ्यास करुन हे सिद्ध करीन की समस्या बिल्डींगच्या आर्किटेक्चरमधे आहे. व्यायामाच्या बाबतीतही तेच चालले होते. सहा महीणे डुबकी मारुन, मारुन, खोलात शिरुन अभ्यास केला. मग कुठे व्यायाम कधी सरु करायचा याची डेडलाइन ठरविली. सॉफ्टवेअरवाला आहे मी, डेडलाइन शिवाय घास गिळत नाही. तीन महीने पुढची, मुख्य म्हणजे थंडी संपल्यानंतरची डेडलाइन ठरविली.

आता डेडलाइन म्हटले की ती मिस होणे हे आलेच. डेडलाइन ही त्यासाठीच असते. आधी थंडी अजून कमी झाली नाही म्हणून डेडलाइन चुकली. आता ऋतुचक्रानेच डेडलाइन चुकविली तर मी तरी काय करनार. नंतर हवी तशी (सांगू नये पण हव्या त्या किंमतीतली) शॉर्ट मिळाली नाही म्हणून डेडलाइन चुकली. माझ आधीच ठरल होत जे करायचे ते शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायच नाहीतर करायचच नाही. तेंव्हा व्यवस्थित शूज, शॉर्ट वगैरे घेतल्याशिवाय सकाळी घराबाहेर श्वास सुद्धा घ्यायचा नाही. उगाच उद्या माझी शॉर्ट चांगली नाही म्हणून मी चालणे बंद केले असल तकलादू कारण नको. खूप पुढचा विचार करतो न मी. काही गोष्टी उपजतच असाव्या लागतात.

मला अजूनही आठवते तो दिवस सोमवार होता, तसेही मी कोणतेही नवीन काम सोमवारीच सुरु करतो. सकाळी उठलो, नवीन शॉर्ट घातली, शूज पायात घट्ट होत होते पण शूज पायात घट्ट बसल्याशिवाय चालताना ग्रीप येनार नाही असा दूरगामी विचार मी केला. देवाला नमस्कार केला. उगाचाच मंगलवाद्यांचा गजर चाललाय अशी शंका आली. नंतर लक्षात आले बायको घोरत होती. तेंव्हा स्वतःच स्वतःच्या हाताने योद्ध्याच्या थाटात कपाळावर टिका लावला. योद्ध्याच्या दिमाखात मी चालायला सुरवात केली. आज आपण आयुष्यात एक वेगळेच पाउल टाकले याचा प्रचंड अभिमान वाटत होता. पहिल्याच दिवशी तब्बल चार किलोमीटर चाललो. लहान सहान काम करतच नाही मी. त्यादिवशी ऑफिसमधे सर्वांना सकाळी उठून चालन्याचे फायदे या विषयावर लेक्चर दिले. सर्वांवर इम्प्रेशन मारत होतो. घरी आल्यावर मुलांनासुद्धा सकाळी उठण्याचे फायदे यावर भाषण दिले. आमच्या कार्ट्यांनी मात्र मोबाइलवर गेम खेळण्याच्या नादात माझ्याकडे ढुंकुणही बघितले नाही. मग मी बायकोकडे मोर्चा वळविला. सकाळी उठून अर्धा तास चालण्याचे फायदे मी तिला तब्बल तीन तास समजावून सांगितले. आणि ती कुत्सितपणे हसली. या घरात साल कुणाला व्यायामाचे महत्वच नाही. मग गांधीजी आठवले ‘First they ignore you, they ridicule you and then they listen to you’ वगैरे. मग काय चिंता नाही. सोमवार, मंगळवार आणि बुधवार मस्त गेले. सकाळी उठल्यामुळे ऑफिसमधे खूप झोप येत होती, चालण्याची फार सवय नसल्याने पाय खूप दुखत होते. असे असले तरी सकाळी चालल्यामुळे मी कसा फ्रेश आहे हेच मी साऱ्यांना सांगत होतो. गुरुवार उजाडला तोच शारीरीक संपाची नांदी घेउन, पाय दुखत होते, अंग ठणकत होते, नाक आणि घशाने असहकार पुकारला होता. सकाळी चालण्याने सर्दीतापाचा त्रास होउ शकतो असे कोणीच सांगितले नव्हते. गुरु करुन काय उपयोग. माझा काहीही दोष नसताना मला शांतपणे झोपण्याशिवाय पर्याय नव्हता.

काय आज सकाळ उठून चालायला नाही गेला.” बायकोने खोचक प्रश्न विचारला. मी काही बोलायच्या आधीच तिने परत सुरु केले.

नाही सकाळी उठून चालण्याचे बरेच फायदे असतात असे तूच सांगत होता म्हणून विचारले.”

असा टोमणा मारुन ती परत तशीच कुत्सितपणे हसली. आज, हो आज मला समजले होते सोमवारी ती कुत्सितपणे का हसली होती. आपण विचार करतो त्यापेक्षा बायको आपल्याला जरा जास्तच ओळखत असते. या तीन दिवसात एक शिकलो व्यायाम हे वाटते तेवढे सोपे प्रकरण नाही. गुरुंना भेटलो त्यांनी सबुरीचा सल्ला दिला.

सुरवातीला हे असच होत असत सवय लागली की होइल बरोबर.”

आता साक्षात गुरवर्यांनीच असे सांगितल्यावर मला चांगलाच धीर आला. म्हणजे सकाळी उठल्यामुळे सर्दी होणारा जगात एकटा मीच नव्हतो. ती साऱ्यांना होत असते पण कोणी त्यावर माझा व्यायाम, माझी सर्दी अस वृत्तपत्रात सदर लिहीत नाही. ह्रदयविकारातून सुटका झाली तर लोक पुस्तक लिहितात पण सर्दीतून सुटका झाली तर साधा ब्लॉग सुद्धा लिहित नाही. सर्दीला फारच तुच्छ वागणूक दिली जाते. सर्दीवर यशस्वी मात केल्यानंतर मी परत चालायला सुरवात केली. रोज सकाळी साडेपाचऐवजी साडेसहाला चालायला लागलो. चार किलोमीटरएवजी दोन किलोमीटर चालत होते, पण रोज चालत होतो. आता बायको कुत्सितपणे हसत नव्हती. कदाचित माझी चालण्यावरची निष्ठा तिला पटली असावी. आपण समजतो त्यापेक्षा बायको आपल्याला जास्त ओळखत असते. मी चालून आल्यावर रोज पोटाचा घेर मोजत होतो पण एक तसूभर फरक पडत नव्हता. मला वाटल होत महीन्याभरात दोनचार इंचानी पोट कमी होइल पण पोटाने युद्ध मांडले होते ते सुइच्या अग्रावर मोजण्याइतके सुद्धा मागे हटायला तयार नव्हते. पोटाचे साम्राज्य अबाधित होते. महीना गेला दोन महीने गेले पण या महायुद्धात माझी सरशी होण्याची तिळमात्र शक्यता दिसत नव्हती. धीर खचायला लागला होता. गुरवर्यांची आठवण झाली पण ते नेमके युरोप टूरला गेले होते. ही गुरुवर्य मंडळी ना, गरज असली नेमकी तेंव्हाच गायब असतात. आता माझे मीच काहीतरी ठरवायचे ठरविले. कधी नव्हे ते स्वतः स्वतःचा निर्णय घेतला. आता मी रोज धावनार. बायकोने लग्नानंतर सुरवातीला कितीवेळा सुनावले होते काही तरी स्वतःच्या मताने ठरवित जा. नंतर तिने असे म्हणने सोडून दिले आणि माझ्या संबंधित सारे निर्णय़ तीच घ्यायला लागली.

परत एकदा श्री गुगलमहाराज यांना गुदगुल्या केल्या. त्यांनी मला एक अॅप सुचविले. त्यात दोन मिनिट चालायचे आणि दोन मिनिट धावायचे असे गणित होते. दोन मिनिट धावायला काय लागते असा विचार करुन धावायला सुरवात केली. मला असे जाणवायला लागले की अॅपमधे काहीतरी गडबड आहे शंभर मीटर जरी चाललो तरी चालण्याचे दोन मिनिट संपून जात होते परंतु धावायचे दोन मिनिट मात्र जोरजोरात धाप लागली तरी संपत नव्हते. तुम्हाला माहीती आहे मी चुकतच नाही तेंव्हा त्या अॅपमधेच गडबड असली पाहीजे. माझ्या घऱच्यांना तर माझ्या समस्यांची काही पर्वा नव्हती. आमचे कुटुंब सांगत होते अॅपमधे गडबड नाही, धावण्याचा वेग जास्त असतो म्हणून जास्त अंतर धावावे लागते. काहीही काय, नवरा आपला धावधाव धावतोय त्याचे कौतुक नाही त्या अॅपचे कौतुक. दोन दिवसताच गुडघ्यांनी राम म्हटले. धावने तर सोडा पण चालने सुद्धा मुष्किल होउन बसले. अवघड जागी दुखण असल्यासारखा चालत होतो. ऑफिसमधे आठवडाभराची सुटी टाकावी लागली. गुरुवर्यांना फोन केला तर त्यांनी मलाच दमदाटी केली.

तुझ्या खानदानीत कधी कोणी धावले होते का?” येवढ्या साठी खानदानावर घसरायची काय गरज होती.

चालून चालून एक सेमी पण पोट कमी होत नाही आहे यार. काय करु?”

Dream big, do something you are passionate about.”

हल्ली ना साऱ्या समस्यांवर जो तो एकच उपाय सांगतो Dream big, स्वप्न बघा. पोट साफ होत नाही स्वप्न बघा, पोरग पास होत नाही स्वप्न बघा. कधी कधी असे वाटते की नारायण मूर्तीपासून बिलगेटस पर्यंत साऱ्यांनी स्वप्न बघायसाठी म्हणून ऑफिसमधे झोपाच काढल्या की काय. गुरुंनी सांगितले तेंव्हा तसे करणे भाग होते. सल्ला मानायचा नसेल तर गुरु करुन उपयोग काय. स्वप्न बघायचे आणि मनाला आवडेल ते करायचे. माझ्यासाठी दोन्हीचे उत्तर एकच होते झोप. तेंव्हा झोप काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मान्य आहे अमेरीका किंवा युरोपमधल्या कुठल्याही संशोधनातून झोपेमुळे पोटाचा घेर कमी होतो हे सिद्ध झाल नाही. त्याची पर्वा नाही गुरुंनी सांगितल ना तेंव्हा आज ना उद्या ते सिद्ध होणारच. हल्ली मी मस्त झोपा काढतो. झोपेत स्वप्न बघतो. माझ्या घरासमोर मला भेटणाऱ्यांची रांग लागली आहे. सारे माझी झोपेतून उठायची वाट बघत आहेत. साऱ्यांना छान झोप कशी घ्यावी यासाठी माझा सल्ला हवा आहे. मी फक्त पाच मिनिटासाठी झोपेतून उठतो, लोकांना सल्ला देतो आणि परत झोपतो.

पण स्वप्नातून जाग झाल्यावर पोटाचा घेर दिसला की जाणवते ते वळण मात्र अजूनही आलेले नाही.

— मित्रहो

www.mitraho.wordpress.com

Avatar
About मित्रहो 7 Articles
“मित्रहो” (mitraho.wordpress.com)
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..