भारतीय सिनेमाच्या ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.
मीनाकुमारी यांचे मूळ नाव महजबी बानो होते. मीनाकुमारी हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली.
मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. मीना कुमारी यांना कलेचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी तिचे जवळचे नातेसंबंध होते.
मीना कुमारी यांना परिवारात ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून तिला लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकल्या.
नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा त्यांचा पहिला चित्रपट. बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारी यांचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मा.मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली.
काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या ‘शोक’नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी यांनी दर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिक मानले गेले.
त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा ट्रॅजिक होते. १९५३ साली वयाने पंधरा वर्षे मोठे असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोहीशी त्या विवाहबद्ध झाल्या. सुरवातीची काही मोजकी वर्षे जरा बरी गेली पण नंतर दोघांमधील वैचारिक अंतर वाढू लागले. त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली.
‘साहिब, बीवी और गुलाम’ या सिनेमामध्ये मीना कुमारी यांनी धाकट्या सूनेची भूमिका साकारली होती. केवळ या पात्रामुळेच त्या दारूच्या आधीन गेल्या होत्या असे म्हणतात. करिअरच्या यशोशिखरावर पोहोचल्यानंतर आपले दु:ख लपवण्यासाठी मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. प्रेमात वारंवार धोका खाल्ल्याने त्यांचे मन खचून गेले होते. त्या सतत ख-या प्रेमाच्या शोधात असायच्या. परंतु या झगमग जगात त्यांनी केवळ धोका आणि विश्वासघातच मिळतच गेला. त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला. याला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य मद्यपानात बुडवून टाकले.
फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी ह्या पहिल्या अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सर्वत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने मीनाकुमारी यांनाच मिळालेली होती.
मीनाकुमारी ह्या अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. अभिनेत्री मधुबाला मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते.
१९८१ मध्ये आलेल्या ‘मीनाकुमारी की अमर कहानी’ नावाच्या चित्रपटात मीना कुमारी यांची दर्दभरी अजीब दास्तां मांडण्यात आली होती.
मीनाकुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मीनाकुमारी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=Nq0TKmbp7No
Leave a Reply