श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् ।
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥
श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात.
शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी.
स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो तर स्त्री सामान्यत: भावनाप्रधान.
अर्धनारीनटेश्वर स्वरूपात उजवे अंग भगवान शंकरांचे तर डावे अंग आई जगदंबेचे असते. दोघांचाही पवित्र भागाचे एकत्रीकरण. परमपवित्र असे हे स्वरूप.
ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां- ह्रीं या मंत्राने प्रकाशित असणारी. त्या स्वरूपात विश्वाला मार्गदर्शन करणारी. त्याच्या आधारे साधकांना दर्शन देणारी.
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं- श्रीयंत्र याच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूवर निवास करणारी, श्रीमत्सभानायकीम् – श्री म्हणजे वैभव. त्याने युक्त असल्यामुळे भगवंताला श्रीमत्, श्रीमान असे म्हणतात. त्यांची सभा अर्थात हे संपूर्ण विश्व. या जगाची नायिका ती श्रीमत्सभानायकी.
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं- सहा मुख असल्यामुळे त्यांना षण्मुख असे म्हणतात ते कार्तिकेय, स्कंद. विनायक अर्थात भगवान शंकर पार्वती च्या घरी झालेले श्री गणेश अवतार. यांची जननी.माता.
श्रीमज्जगन्मोहिनीं- संपूर्ण जगाला आकर्षित करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् – कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या, आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply