श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥
श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.
भयहरां – भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.
ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.
निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.
श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् – भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.
वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.
नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् – कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply