नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं नानार्थसिद्धिप्रदां
नानापुष्पविराजितांघ्रियुगलां नारायणेनार्चिताम् ।
नादब्रह्ममयीं परात्परतरां नानार्थतत्वात्मिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ५॥
आई श्रीमीनाक्षीच्या मूलचैतन्यस्वरूपी आदिशक्ती स्वरूपाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं – कर्म,भक्ती तथा ज्ञानाच्याद्वारे भगवंताशी जुळतात त्यांना योगी असे म्हणतात. जे भगवंताच्या दिव्य स्वरुपाचे मनन करतात त्यांना मुनी असे म्हणतात. अशा असंख्य योगी आणि मुनी श्रेष्ठांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या,
नानार्थसिद्धिप्रदां- आपल्या उपासकांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्रदान करणाऱ्या,
नानापुष्पविराजितांघ्रियुगलां- नानाविध पुष्पांचा द्वारी चरणकमले सुशोभित केलेली आहेत अशी.
पुष्पां साठी सुंदरतम शब्द आहे सुमन. भक्तांची, सज्जनांची सु-मने हीच आई जगदंबेच्या चरणाची सेवा करणारी खरी पुष्पे. त्या सु-मनांनी चरणकमले सुशोभित असणाऱ्या,
नारायणेनार्चिताम् – भगवान श्री नारायणांच्याद्वारे अर्चना केली जात असणाऱ्या,
नादब्रह्ममयीं- नादब्रह्म हे स्वरूप असणाऱ्या,
शास्त्रात ओंकार नाद असा शब्द आहे. जगात जे ऐकु येते त्याला ध्वनी असे म्हणतात. ध्वनीचे संयोगज आणि वियोगज असे दोन प्रकार आहेत. दोन गोष्टींच्या एकत्र येण्यातून वा दूर जाण्यातून ते प्रगटतात. कोणत्याही शब्दासाठी देखील हेच प्रयत्न करावे लागतात.
मात्र ओंकाराच्या उच्चारात कशाचाच संयोग किंवा वियोग होत नाही. त्यामुळे त्याला अनाहत नाद असे म्हणतात. ते जिचे स्वरूप आहे अशी.
परात्परतरां- सर्व अधिक श्रेष्ठ असणाऱ्या नानार्थतत्वात्मिकां- विविध प्रकारच्या तत्त्वांनी अर्थात शास्त्र सिद्धांतांनी युक्त्य असणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् – कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई मीनाक्षीचे मी सतत वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply