चक्रस्थेऽचपले चराचरजगन्नाथे जगत्पूजिते
आर्तालीवरदे नताभयकरे वक्षोजभारान्विते ।
विद्ये वेदकलापमौलिविदिते विद्युल्लताविग्रहे
मातः पूर्णसुधारसार्द्रहृदये मां पाहि मीनाम्बिके ॥ २ ॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
चक्रस्थे- आई जगदंबेचे यंत्र स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्रा मध्ये निवास करणाऱ्या,
अचपले- अतीव स्थिर. शांत. चंचलता अर्थात कृतीचा संबंध आहे काहीतरी प्राप्त करण्याशी. आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जी आपल्या जवळ नसते. वेगळ्या शब्दात प्राप्तीचा प्रयत्न हे अपूर्णतेचे लक्षण आहे. आई जगदंबा परिपूर्ण असल्याने, तिला काहीच मिळवायचे नाही. त्यामुळे तिच्या ठिकाणी चंचलता नाही. ती स्थिर आहे.
चराचरजगन्नाथे- चर आणि अचर संपूर्ण जगाची सम्राज्ञी. जगत्पूजिते- संपूर्ण विश्व जिच्या चरणकमलांचे पूजन करते अशी,
आर्तालीवरदे- आर्त अर्थात दुःखाने ग्रस्त झाल्याने शरणागता आलेल्या, अली म्हणजे भक्तांच्या रांगांना, समूहाला त्यांच्या मनोवांछित वरदानाने आनंदित करणाऱ्या,
नताभयकरे- विनम्र भावाने नमन करणाऱ्यांना अभय प्रदान करणाऱ्या, वक्षोजभारान्विते – विश्वतृप्तीकारक स्तनांच्या भाराने संयुक्त.
विद्ये- सकळविद्या अर्थात ज्ञानाचे मूलभूत अधिष्ठान शक्ती असणाऱ्या. वेदकलापमौलिविदिते- वेदकलाप अर्थात वेदांचा समुदाय. प्रत्येक वेदात संहिता, ब्राह्मण,आरण्यक आणि उपनिषद अशा चार प्रकारचे ग्रंथ असतात. हे सगळे एकत्रित वेदकलाप. यातील सगळ्यात वर, मौली असणारे ग्रंथ उपनिषद. त्यामुळे त्यांना वेदकलापमौली असे म्हणतात. त्या उपनिषदातील तत्त्वज्ञानाच्या द्वारे जिला जाणता येते अशी.
विद्युल्लताविग्रहे- विद्युल्लता अर्थात विजेप्रमाणे अत्यंत तेजस्वी असणाऱ्या.
मातः- हे आई जगदंबे ! पूर्णसुधारसार्द्रहृदये- सुधारस अर्थात अमृतमय करुणा रसाने जिचे हृदय पूर्ण आर्द्र आहे अशा
मां पाहि मीनाम्बिके- हे आई मीनाक्षी माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply