गन्धर्वामरयक्षपन्नगनुते गङ्गाधरालिङ्गिते
गायत्रीगरुडासने कमलजे सुश्यामले सुस्थिते ।
खातीते खलदारुपावकशिखे खद्योतकोट्युज्ज्वले
मन्त्राराधितदैवते मुनिसुते मां पाही मीनाम्बिके ॥ ५ ॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या दिव्यतम वैभवाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
गन्धर्व- स्वर्ग लोकांमध्ये गायन,वादन कलेत निपुण असणारे दिव्य कलाकार.
अमर- स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या देवता. देवतांचे आयुर्मान अतिविशाल असल्याने आपल्या सापेक्षरीत्या ते मृत्यू पावत नसल्याने त्यांना अमर असे म्हणतात.
यक्ष- कुबेरांचे सेवक असणारे धनरक्षक देव.
पन्नग- सर्प. अर्थात पाताल निवासी.
नुते – अशा स्वर्गापासून पाताळात पर्यंत सर्वत्र निवास करणाऱ्या जीवांनी वंदन केलेली.
गङ्गाधरालिङ्गिते – ज्यांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केली आहे अशा भगवान शंकरांनी जिला आलिंगन दिले आहे अशी.
गायत्री- जिच्या स्तुतीचे गायन केल्याने जी आपल्यास उपासकांना तारून नेते अर्थात त्यांना मोक्ष प्रदान करते अशी.
गरुडासने – नारायणी स्वरूपामध्ये गरुडावर बसणारी.
कमलजे- कमळामधून प्रकट होणारी.
सुश्यामले- सावळ्या वर्णाची. शेतामध्ये असणारी पिके किंवा जंगलामध्ये असणारी हिरवीगार झाडे लांबून पाहिली तर ज्या निळसर काळसर रंगाची दिसतात, त्याला श्यामल वर्ण असे म्हणतात. तशी सस्यशामला असणारी.
सुस्थिते- शाश्वत स्वरूपात स्थिर असणारी.
खातीते- ख म्हणजे आकाश. अतीत म्हणजे पार. जी आकाशापेक्षाही परम व्यापक आहे अशी. खलदारुपावकशिखे- खल म्हणजे दुष्टमानसिकता युक्त. त्या खल रुपी दारू म्हणजे लाकडांसाठी पावकशिखा अर्थात अग्नीची ज्वाला असणारी. खद्योतकोट्युज्ज्वले- खद्योत म्हणजे काजवा. हा स्वयंप्रकाशित जीव. अशा कोट्यावधी काजव्यांप्रमाणे चमकदार असणारी. आत्मप्रकाशाने उजळणारी.
मन्त्राराधितदैवते- मंत्रांच्या माध्यमातून जिची आराधना केली जाते अशी.
मुनिसुते – विविध ऋषींच्या आश्रमात कन्या रूपात अवतार धारण केलेल्या
मां पाही मीनाम्बिके – हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply