नादे नारदतुम्बुराद्यविनुते नादान्तनादात्मिके
नित्ये नीललतात्मिके निरुपमे नीवारशूकोपमे ।
कान्ते कामकले कदम्बनिलये कामेश्वराङ्कस्थिते
मद्विद्ये मदभीष्टकल्पलतिके मां पाहि मीनाम्बिके ॥ ६ ॥
आई जगदंबेच्या वैभवाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नादे- नाद अर्थात ओंकार स्वरूप असलेली. नारदतुम्बुराद्यविनुते- नारद, तुबरू इ. देवर्षी, गंधर्व इत्यादींच्याद्वारे वंदन केल्या गेलेली.
नादान्तनादात्मिके- शास्त्रांमध्ये ओंकाराला नाद असे म्हणतात. त्यामध्ये अ,ऊ आणि म अशा तीन मात्र आहेत. त्यातही शेवटी म् चा जो नाद घुमत राहतो त्या अर्ध्या मात्रेला नादान्तनाद असे म्हणतात. ती त्रिगुणातीत निर्गुण स्वरूप असणारी अर्धमात्रा हे जिचे स्वरूप आहे अशी.
नित्ये – भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात अविचल असणाऱ्या तत्वाला शास्त्रात नित्य असे म्हणतात. अशी नित्य स्वरूप असणारी.
नीललतात्मिके- नीलकमलाच्या लते प्रमाणे नाजुक असणारी.
निरुपमे- जिला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही अशी. अनुपमेय. एकमेवाद्वितीय.
नीवारशूकोपमे – निवार म्हणजे भगरीच्या दांड्या प्रमाणे असणारी.
वर आचार्य म्हणतात आई जगदंबा निरुपम आहे. तर ताबडतोब एक उपमा देतात. हे अजब नाही का ?तर नाही. त्या उपमेतून देखील आई जगदंबेचे स्वयंसिद्धत्वच मांडलेले आहे.
भगर हे कोणत्याही प्रयत्नाशिवाय येणारे धान्य. अर्थात जिला कोणी निर्माण करत नाही अशी.
साधू संत महंत अधिकाधिक काळ भगरच भक्षण करतात. अर्थात अशा सगळ्यांच्या उदरभरणाची काळजी घेणारी.
कान्ते- अतीव प्रिय.
कामकले- सर्व इच्छांचा स्वरूपाची. कदम्बनिलये- कदंब वनात निवास करणारी. कामेश्वराङ्कस्थिते- कामेश्वर भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली.
मद्विद्ये- माझ्या ज्ञानस्वरूप असणारी. मदभीष्टकल्पलतिके- माझ्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कल्पनेप्रमाणे असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके – ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
– प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply