वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते ।
श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके
पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
वीणानादनिमीलितार्धनयने – वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली.
शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा आपण सुखसंवेदना प्राप्त करतो त्यावेळी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आपले डोळे आपोआप मिटले जातात.
कानावर येणारे अप्रतिम संगीत असो जिभेवर ठेवलेला रसपूर्ण पदार्थ. अत्तराचा गंध असो की गालावर फिरणाऱ्या मोरपिसाचा स्पर्श. कोणताही आनंद घेताना डोळे आपोआप मिटले जातात. पूर्ण आनंद घेण्याची ती स्वाभाविक प्रक्रिया असते. आई जगदंबा वीणा वादनाचा असा परिपूर्ण आनंद घेत आहे.
विस्रस्तचूलीभरे- केश समूह विखुरलेली. वीणा वादनाच्या तल्लीनतेत मानेला सतत झटके दिल्याने तिची वेणी विस्कटली आहे. केस विखुरलेले आहेत.
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते- तांबूल भक्षण केल्याने आई जगदंबेचे ओष्ठ पल्लव लालबुंद झाले आहेत. कानाच्या आनंदासाठी वीणा तर रसनेच्या आनंदासाठी आई तांबूल भक्षण करते. ताटङ्कहारान्विते- ताटंक म्हणजे बाजूबंद. हार म्हणजे मोत्याच्या माळा. यांना धारण करून सुंदर दिसणारी.
श्यामे- सावळ्या वर्णाची. शरीरशास्त्राच्या दृष्टीने अति गोरेपण आयोग्य आहे. त्यात सूर्यकिरणांनी प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक रंग कणांचा अभाव असल्याने, भारतीय संस्कृतीत सावळा वर्ण खऱ्या सौंदर्याचे प्रतीक मानलेला आहे. चन्द्रकलावतंसकलिते- मस्तकावर आभूषण रूपात चंद्रकोर धारण करणारी.
कस्तूरिकाफालिके- भांगे मध्ये कस्तुरी भरणारी.
पूर्णे- स्वतःचाच ठाई परिपूर्ण असणारी. पूर्णकलाभिरामवदने- पौर्णिमेचा पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकमल असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply