आमचं वाघजाईच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हजार वस्तीचं खेडेगाव. गावात हजाराच्या आतच वस्ती. गावातील मास्तर, नव्वदी पार केलेले. त्यांना तीन मुलं व एक मुलगी. थोरला मुलगा पाचवीला असताना त्याची आई आजारपणात गेली. मास्तरांनी आपल्या मुलांना सावत्र आईचा जाच नको म्हणून दुसरं लग्न केलं नाही. कळता थोरला व मास्तरांनी स्वयंपाक, घरकाम करीत मुलांना मायेनं वाढवलं. शिक्षकांची नोकरी करताना वर्गात व घरात मास्तरांनी मुलांवर चांगलेच संस्कार केले.
थोरला अभ्यासात हुशार असल्याने सातवीच्या परीक्षेत तालुक्यात पहिला आला. मुंबईला गिरणीत काम करणाऱ्या काकांकडे जाऊन त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. तो वडिलांसाठी प्रत्येक सुट्टीत गावी येत राहिला. मधला भाऊ मिल्ट्रीत भरती झाला. धाकटा व्यवसाय करु लागला. मास्तरांनी मुलीला शेजारच्याच गावातील स्थळ पाहून तिचे लग्न लावून दिलं.
थोरल्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला सरकारी नोकरी मिळाली. त्याचं वडिलांनी, मित्राची संस्कारी मुलगी पाहून लग्न करुन दिले. दोन वर्ष नवी नवरी गावी राहिली, नंतर तिला थोरला मुंबईला घेऊन गेला.
मुंबई घड्याळाच्या काट्यावर चोवीस तास पळत असते, दोघांचा संसार त्याच काट्यावर पळत राहिला. सुखी संसारात मुलाचं, ‘वंशाच्या दिव्या’चं आगमन झालं. मुलगाही वडिलांसारखाच हुशार होता. त्याचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं.
वर्षातून एकदा येणारी वाघजाईची यात्रा तिघांनीही कधी चुकवली नाही. मास्तर आता निवृत्त होऊन गावातील विकासकामे करीत होते. सगळा गाव त्यांचा आदर करीत होता.
मुलगा आता काॅलेजमध्ये जाऊ लागला. त्याला आता डाॅक्टर होण्याचे स्वप्न साकार करायचे होते. थोरल्याने पैशाची जमवाजमव करुन फी भरली. मुलाने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. आता त्याला प्रॅक्टीससाठी क्लिनीक सुरु करायचं होतं. थोरल्याने पुन्हा पैसे उभे करून मुलाला क्लिनीक सुरु करुन दिलं. शेवटी मुलाच्या प्रगतीमध्ये त्याचंही समाधान होतं.
धोरल्यानं मुलासाठी मुलगी पहायला सुरुवात केली. त्याच्याच मित्राची मेडिकलला असणारी मुलगी दोघांनीही पसंत केली. चांगला मुहूर्त पाहून मुलाचं त्या मुलीशी लग्न लावून दिले.
चौघांचं कुटुंब आनंदात नांदू लागलं. थोरल्याला निवृत्त व्हायला दोन वर्षे अवकाश होता. दरम्यान गावाहून मास्तरांचा तब्येत ठीक नसल्याचा फोन आला. थोरला लागलीच गांवी गेला. वडिलांना दवाखान्यात नेऊन उपचार केले. आठ दिवसांनी तो पुन्हा मुंबईला आला. मास्तरांचं वय झाल्यामुळे त्यांना थोरला जवळच रहावा, असं वाटू लागलं.
थोरल्याला नातू झाला. आता त्याचं बघण्यात थोरल्याच्या बायकोचा पूर्ण दिवस जाऊ लागला. मुलांची आणि सुनेची प्रॅक्टिस उत्तम चालू लागली. थोरला निवृत्त झाला. नातवाला खेळवण्यात आजोबा आजी रमून गेले.
नातू आता बालवाडीत जाऊ लागला. त्याला शाळेत घेऊन जाणे व आणणे हे थोरल्याचे आवडते काम झाले. एक दिवस मुलगा थोरल्याला म्हणाला, ‘बाबा, मी दवाखान्यासाठी एक मोठी जागा पाहिली आहे. तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर जी रक्कम मिळाली आहे, ती जर तुम्ही मला दिलीत, तर मी सर्व सोयींनी परिपूर्ण दवाखाना चालू करु शकतो.’ थोरल्याने जराही विचार न करता मुलाच्या इच्छेला होकार दिला. काही दिवसांतच मुलाने आपलं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. डाॅक्टर मुलगा व सूनबाई रात्रंदिवस रुग्णसेवा करु लागले.
थोरल्याची महिन्यातून एकदा गावी चक्कर होत होती. वडिलांना त्यामुळे हायसं वाटायचं. नातू आता पाच वर्षांचा झाला. आजोबा आजींच्या सहवासात तो आनंदी होता.
डाॅक्टरच्या दवाखान्यातील स्टाफमध्ये एक रंजना नावाची फॅशनेबल तरुण नर्स होती. तिला दवाखान्यात पाहून थोरल्याने एकदा मुलाला सावध केले होते. तिचे वागणे त्याला खटकले होते. रंजना ही नर्स, डाॅक्टर मुलाची सहाय्यक असल्यामुळे सूनबाईच्या अनुपस्थितीत ती मुलाशी लगट करु लागली. त्यामुळे मुलाचाही काही वेळा संयम सुटू लागला. हळूहळू रंजनाने मुलाला आपल्या मोहजालात गुरफटून टाकले.
सूनबाईला नवऱ्यामधला हा फरक जाणवू लागला. रंजनाबद्दल विचारल्यावर नवऱ्याने तिला दाद दिली नाही. थोरल्यानेही मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मुलाला आता आपल्या आई वडिलांची अडचण वाटू लागली. त्याने बायकोला खडसावून गप्प केले. रंजना आता दवाखान्यात मालकीणीसारखी वागू लागली.
एक दिवस मुलाने आपल्या आई व वडिलांना घराबाहेर काढले. नातवाच्या प्रेमापोटी दोघांनीही मुलाला विनंती केली, पण त्याने काहीएक ऐकले नाही. थोरल्याची सर्वात मोठी चूक झाली होती ती आपले सर्व पैसे मुलाला देण्याची. आता त्याच्याकडे काहीच शिल्लक नसल्याने गावी जाण्याशिवाय त्या दोघांकडे पर्याय नव्हता.
दोघंही संध्याकाळी गावी पोहोचले. मास्तरांना फार आनंद झाला. नव्वदीला आलेल्या वडिलांची सेवा करताना थोरल्याला समाधान वाटत होतं. मास्तरांना मोठा मुलगा जवळ असल्यामुळे आता काठीची गरजही वाटेनाशी झाली.
थोरल्याने लहानपणापासून आपल्या वडिलांसाठी, भावा-बहिणीसाठी कष्ट केले. त्यांना कधीही काही कमी पडू दिले नाही. त्यांची गाडी रुळावर आणली. मुंबईला नोकरी करतानाही गावाकडची सर्व कर्तव्ये पार पडली. नातेवाईकांच्या सुखदुःखात नवरा बायको सहभागी झाले. तरीदेखील वृद्धापकाळात त्या दोघांना दैन्यावस्था आली.
माणसानं आयुष्यभर पुण्यच केलं तरी त्याचे फळ सरतेशेवटी मिळतेच असं नाही. उलट या जगात पापी माणसं सुखात जगतात आणि ‘मीठाचा खडा’ दुधात पडल्यामुळे ‘पुण्याच्या’ पदरी नैराश्य येतं….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-१०-२०.
Leave a Reply