नवीन लेखन...

मेहदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही’ या सुप्रसिद्ध गझलबद्दल

कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।’, किंवा ‘अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें । जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें ।’, किंवा ‘शोला था जल बुझा हूँ हवाएँ मुझे न दो । मैं कब का जा चुका हूँ सदाएँ मुझे न दो । ’, अथवा ‘मुहब्बत करनेवाले कम न होंगे । तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे ।’, अशा अनेक गझला.  कुठलीही गझल घ्या, उत्कृष्ट शब्द असलेल्या काव्याची निवड, उत्तम चाल, मधाळ स्वर, पेश करण्याची दिलखेचक पद्धत, या सगळ्यांनी श्रोता मंत्रमुग्ध न झाला तरच नवल. मेहदी हसन म्हणत, ‘सुर ईश्वर है’, तर लता मंगेशकर यांनी म्हटलेलें आहे की, ‘मेहदी हसन म्हणजे ईश्वराचा सुर आहे’.

मेहदी हसन यांनी गायलेल्या श्रेष्ठ गझलांपैकी एक आहे, ‘रंजिश ही सही’. मेहदी हसन त्यांच्या मैफलीत सांगतात की, ही गझल आधी सिनेमासाठी (अर्थात्, पाकिस्तानी) कंपोझ केली गेलेली आहे, व आणि ती इतकी लोकप्रिय झाली की नंतरच्या काळात ती त्यांच्या मैफलींमधे तिणे महत्वपूर्ण स्थान मिळवलें. या गझलची चाल ‘यमन कल्याण’ रागामधे बांधलेली आहे, व ती जीव ओतून, अतिशय भावपूर्ण गायलेली आहे. आपण या गझलेच्या अंतरंगात डोकावून पाहू या, म्हणजे तिचे नुसते सौंदर्यच नव्हे, तर तिचे वेगळेपणही आपला आनंद दुणावेल.

थोडीशी पार्श्वभूमी :

साधारणपणें १९४० ते १९७०० या काळात भारतीय सिनेसृष्टीत प्रसिद्ध उर्दू शायर व हिंदी कवी गीतें लिहीत होते, व ती जाण असलेले गायक ती गीते गात होते. त्या काळातील संगीत दिग्दर्शकांनाही उत्तम साहित्यिक जाण असल्यामुळे, त्या काळात अनेक इतर सुप्रसिद्ध शायरांच्या शायरीचाही (उदा. ग़ालिब) सिनेमात सुयोग्य वापर केला गेला. जे भारतीय सिनेमात झाले, तसेच पाकिस्तानी सिनेमातही झाले. स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानातील ट्रेंड पाकिस्तानातही चालू राहिला. त्यामुळे तेथेंही त्या कालखंडात आपल्याला प्रसिद्ध शायरांची शायरी सिनेमात दिसते. मेहदी हसन यांनी अनेक उत्तमोत्तम गीते सिनेमात गायलेली आहेत.

‘रंजिश ही सही’ ही गझल लिहिली आहे प्रसिद्ध शायर अहमद फराज यांनी. मेहदी हसन आणि अहमद फराज, दोघेही पाकिस्तानचे, पण ही गझल आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडून केव्हाच, फक्त गझलप्रेमींच्याच नव्हे तर व एकूणच सर्व साहित्यप्रेमींच्या, हृदयात स्थान पटकावून बसली आहे. असे काय खास आहे तिच्यात ? पण ते समजून घेण्याआधी आपण ज़रा गझल या काव्यप्रकाराची विशेषता जाणून घेऊ या, मग या गझलची खासियत आपल्या मनाला भिडेल.

गझल या काव्यप्रकाराची काही वैशिष्ट्ये

गझल (मूळ उच्चार : ग़ज़ल) हे गाण्यासाठीचे काव्य आहे. त्यामुळे तिच्यात शब्द व संगीत यांचा मिलाफ झालेला असतो. गझलच्या व्याकरणासंबंधी माधव ज्यूलियन, सुरेश भट व अन्य इतरांनी बरेच लिहिलेले आहे. तेव्हा त्याची उजळणी करण्याची आवश्यकता नाही. पण एकदोन मुख्य गोष्टी लक्षात घेणे मात्र जरूरीचे आहे.

रदीफ-काफिया या द्वि-यमकांमुळे गझलच्या शेरांना एक आगळे सौंदर्य येतेच, पण मुख्य गोष्ट आहे ‘गझलियत’ म्हणजेच गझलची वृत्ती. गझलची खासियत आहे तिची उत्कटता. गझल तशी मितभाषी असते. गझलचा प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो. केवळ दोन ओळीत मोठा अर्थ सामावणे, आणि त्याचबरोबर उच्चकोटीची आर्तता, उत्कटता भरणे, हे फक्त गझलच करू शकते. प्रत्येक शेरच्या पहिल्या ओळीत काहीतरी सांगितलेले असते, व दुसर्‍या ओळीत त्याची आगळी पूर्तता असते, त्याला अधिक जोमाने, एंफेसाइझ करून, पेश केलेले असते, किंवा त्याला एक वेगळी कलाटणी दिलेली असते. शेरची ही दुसरी ओळ गझलला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. या ओळीमुळेच शेरला रसिकांकडून आपोआपच ‘आह’

(दु:ख-क्लेशाच्या अनुभूतिचा हृदयाला स्पर्श होऊन, त्यामुळे उठलेला ‘आ:’ असा उछ्वास किंवा आर्त उद्गार), अथवा  ‘वाह’ (वाहवा) मिळते.

एक उदाहरण पाहू. हसरत मोहानी यांच्या ‘चुपके चुपके रात दिन..’ या गझलमधील हा शेर पहा –

दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये

वो तेरा कोठे पे नंगे-पाँव आना याद है ।

पहिली ओळ म्हणते आहे, ‘दुपारच्या उन्हात मला बोलवायला’. दुसरी ओळ पुढील वर्णन करते आहे –

‘ते तुझं गच्चीवर (कोठे पे) पायात चप्पल-जोडे काहीही न घालता (नंगे-पाँव) येणं मला आठवतं’.

जरा त्या दृश्याची कल्पना करा. ‘ते उत्तर-भारतातलं भाजणारं कडक ऊन, त्यातून टळटळीत दुपार, मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर तळपतो आहे. गच्ची किती तापली असेल ! अन् अशात तू मला बोलवायला आलीस, तेही पायात काहीही न घालता ! तुझ्या नाजुक पायांना किती चटके बसले असतील !  तळपायांना फोडही आले असतील !! तें सारं सारं मला अजूनही आठवतं आहे’.  दोस्तहो पहा, मोजकेच शब्द वापरून हा शेर आपल्या डोळ्यांपुढे ते सगळं चित्रच उभं करतो, त्या कोमल मखमली तळपायांना बसलेले चटके आपल्या हृदयालाच भिडतात, आणि मुखातून आपोआपच ‘आह’ उमटते. हीच गझलची खासियत.

आणखी एक उदाहरण पाहू या. मिर्झा गालिब यांच्या ‘आह को चाहिये..’ या गझलमधील एक शेर बघा :

हमने माना के तग़ाफुल न करोगे लेकिन

ख़ाक हो जाएँगे तुमको ख़बर होने तक ।

पहिल्या ओळीत वाक्य आहे, ‘मला मान्य आहे की, तू माझी उपेक्षा करणार नाहीस, (पण)’ . दुसरी

ओळ वेगळी कलाटणी देत म्हणते , ‘पण, तुला (माझी घायाळ परिस्थिती) माहीत होईपर्यंत तर मी धूळ

बनून गेलेलो असेन. म्हणजेच, मी मरून, दफन होऊन, इतका वेळ उलटून गेलेला असेल की जमिनीखाली माझ्या कलेवराची धूळ (माती) होऊन गेली असेल.  हा अर्थ हृदयाला भिडल्यावर माणूस अगदी मूकच होऊन जातो ; इतका की, आर्त ‘आह’ किंवा कौतुकाचे ‘वाहवा’ उमटूही शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, गझल प्रतीकांचा खूप वापर करते. त्यामुळे शब्दांमधे एकापेक्षा अधिक अर्थ ध्वनित होऊ शकतात, एक वाच्यार्थ ; तर दुसरा आत लपलेला, ध्वनित होणारा अर्थ. उदाहरणार्थ, चमन किंवा गुलशन. याचा अर्थ आहे, बाग. पण प्रतीकात्मकरीत्या वापरलेला असला तर त्याचा अर्थ होऊ शकतो मन/हृदय, जीवन, देश इत्यादि. अशा प्रतीकांमुळे, गझलला ‘गागर में सागर’ भरता येतो. एक उदाहरण म्हणून, फैज अहमद फैज यांची वर उल्लेखलेली ‘गुलों में रंग भरे’ ही गझल पहा. हा तिचा मत्ला

(पहिला शेर) बघा :

गुलों में रंग भरे  बादे नौबहार चले

चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।

पहिली ओळ वाचल्यावर आपल्या मनात प्रश्न उठतोच की, कोण आहे जे फुलांमधे रंग भरत आहे, कुणामुळे नव-वसंताची (नौबहार) आनंदी हवा वहायला लागते ?  दुसरी ओळ शेवटी एक कलाटणी देते. शायर कुणाला तरी बोलावतो आहे ते कां, तर उद्यानाचा कारभार चालावा म्हणून. म्हणजेच, ज्या कुणाला शायर बोलावतो आहे, तिच्याविणा उद्यानाचे कार्यच चालू शकणार नाही. हा शेर वाचून लगेच आपल्याला प्रश्न पडतो की, शायर इथे कुणाला बोलावतो आहे ? सरळ अर्थ घेतला तर, असंच वाटेल की, शायर हे सगळं प्रियेला उद्देशून म्हणतो आहे. पण, गुलशनचा अर्थ ‘देश’ असा घेतला तर ? मग, फुले म्हणजे जन, म्हणजेच लोकांचे हृदय, असा अर्थ होईल. तर मग, शायर, हा शेर, देशात (म्हणजे, पाकिस्तान या देशात कारण, फैज पाकिस्तानचे नागरिक होते) नव-वसंताची झुळुक आणू शकणार्‍या लोकशाहीला उद्देशून तर हे म्हणत नाही ना ? हो, नक्कीच ! दोन ओळींच्या शेरमधे, ‘इन-बिट्वीन-दि-लाइन्स’ बघा किती अर्थ भरलेला आहे, दडलेला आहे !

आपण आणखी एक उदाहरण पाहू, म्हणजे प्रतीकांचा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. गुलाम अली यांनी गायलेल्या एका प्रसिद्ध गझलमधील हा एक शेर पहा –

सो गए लोग इस हवेली के

एक खिडकी मगर खुली है अभी ।

आपण सरळसरळ वाचायला गेलो, तर असे वाटत राहील की अगदी साधारणसा शेर आहे हा, त्यात काहींच खासियत नाहीं. कदाचित, याला फालतू समजून आपण शायरावर नाराजही होऊ. पण विचार करून आत दडलेला अर्थ समजून घेतला, तर ? पाहू या :  हवेली म्हणजे मोठ्ठी इमारत, हा सरळ वरवरचा अर्थ झाला. पण, ‘हवेली’चा ध्वनित अर्थ ‘देश’ असा घेतला तर ? तर मग पहिल्या ओळीचा असा अर्थ होईल : ‘या देशातले सगळे लोक झोपलेले आहेत, (व आत सगळीकडे अंधार आहे). हा देश म्हणजे पाकिस्तान, हें वेगळें सांगायला नकोच. या देशात लोकशाही नाहीं, हुकुमशाही आहे, पण सगळी जनता जणूं निद्रिस्त आहे, कोणी ब्रऽ सुद्धा काढत नाहीये’. आणि, त्याला संल्लग्न दुसर्‍या ओळीचा असा अर्थ होईल : ‘परंतु

आत्ताच एक खिडकी मात्र (थोडीशी) उघडली आहे , थोडासा  उजेड आत यायला लागला आहे. म्हणजे,

आत्ता अशी थोडीशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, बाहेरच्या जगातील लोकशाही विचारांचा प्रकाश आत येऊ लागला आहे; लोकशाहीच्या आगमनाची ज़राशी आशा वाटू लागली आहे, ज़राशी शक्यता दिसूं लागली आहे.’ हा लपलेला अर्थ ध्यानात आला की आपल्या मुखातून ‘अरेच्चा !’ असा उद्गार न आला तरच नवल !

तिसरी गोष्ट म्हणजे, गझलचा प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, स्वत:त परिपूर्ण असतो. त्यामुळे होते काय, की गझल ‘मुसलसल’ असो (ओव्हरऑल एकाच विषयावरील सर्व शेर असलेली गझल) किंवा

‘ग़ैर-मुसलसल’ (प्रत्येक शेरचा विषय वेगळा असलेली) असो ; शायरला संपूर्ण स्वातंत्र्य असते की प्रत्येक शेरमधे काय व कसे मांडायचे. नज्म म्हणजे कवितेत, कवी एकाच विषयाने बांधलेला असतो, त्याला शेवटपर्यंत सलगता (कंटीन्युइटी) कायम ठेवावी लागते. गझलमधे प्रत्येक शेर स्वतंत्र असल्यामुळे, शायराच्या अभिव्यक्तीला अफाट वाव मिळतो. विषयाच्या व सलगतेच्या बंधनात, चौकटीत, न अडकता, शायर मुक्त संचार करायला, प्रत्येक शेरमधे वेगवेगळ्या उपमा, प्रतिमा, प्रतीके वापरायला, मोकळा असतो, व प्रत्येक शेरमधे तो आगळी उंची गाठतो. गझल अशाप्रकारच्या घट्ट-विणीच्या (काँपॅक्ट) उत्कट कवितांची माळच असते.

गझल हा शब्द स्त्रीलिंगी आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. कल्पना करा. एक अतीव सुंदर रमणी आहे. पहिल्या नजरेत आपल्याला तिचा रेखीव चेहरा, गुलाबी गाल, लालचुटुक ओठ, सरळ नासिका, घनदाट केसांची महिरप, माथ्यावरची बिंदी, हे सगळं दिसतं. दुसर्‍या दृष्टिक्षेपात हिर्‍याची कर्णभूषणं, तिसर्‍यात सोनेरी बाजूबंद, नंतर क्रमाक्रमाने प्रत्येक दृष्टिक्षेपात, जडावाचा उठावदार कंबरपट्टा, किणकिणणारी रत्नजडित कंकणं, पायातले छुमछुमणारे नाजुक पैंजण, असं दिसत जातं ; आणि प्रत्येकदा आपल्या मुखातून नकळत ‘वाहवा’ प्रगटते. गझल ही अशीच सुंदर कामिनी आहे. तिची मोहिनी तशीच जबरदस्त आहे, आणि ती प्रत्येक शेरगणिक वाढतच जाते. प्रत्येक शेरचं सौंदर्य आगळंवेगळं. त्यामुळे, प्रत्येक अलंकार जसा सुंदर रमणीचं सौंदर्य जास्त-जास्त खुलवत जातो, त्याला ‘चार चाँद’ लावतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शेर गझलचं सौंदर्य अधिकाधिक वाढवत नेतो, आणि आपण ‘वाह् , क्या बात है !’ असं प्रत्येक शेरगणिक उत्फूर्तपणे म्हणत रहातो. त्यामुळे, एकदा गझलचं गारूड आपल्या मनावर आरूढ झालं की, तिचा नशा काही केल्या उतरतच नाही !

‘रंजिश ही सही’ या गझलचा रसास्वाद घेतांना आपण गझल या काव्यप्रकाराची ही वैशिष्ट्ये ध्यानात ठेवू या. पण या गझलकडे वळण्यापूर्वी, तिचे ख्यातकीर्त शायर अहमद फराज यांच्याबद्दलही जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण या गझलमधे त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब पडलेले आहे.

अहमद फराज :

अहमद फराज हे पाकिस्तानचे फार मोठे शायर होते. मेहदी हसन जितके मोठे गझलगायक होते, तेवढेच मोठे शायर अहमद फराज हे होते, असे नक्कीच म्हणता येईल. मेहदी हसन यांचा जन्म १९२७ चा, तर अहमद फराज यांचा १९३१ चा. फराज यांचा मुत्यु २००८ ला झाला, तर मेहदी हसन यांचा २०१२ मधे.

मेहदी हसन व अहमद फराज हे दोघेही समकालीनच. फराज यांच्या गझला गुलाम अली व अन्य गायकांनीही गायलेल्या आहेत. फराज यांनी गझलांव्यतिरिक्त अन्य काव्यरचनाही विपुल केलेली आहे.

अहमद फराज यांचे मूळ नाव होते सय्यद अहमद शाह. फराज हा त्यांचा ‘तख़ल्लुस’

(pen-name, टोपण नाव) आहे. ‘फराज’ म्हणजे महानता, प्रतिष्ठा. फराज हे खरोखरच नावाप्रमाणेच,

महान शायर होते. ज्या जुन्या महान शायरांचा फराज यांच्यावर प्रभाव होता, त्यांच्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानातील विख्यात शायर फैज अहमद फैज. फैज यांच्याप्रमाणेच फराज यांनाही पाकिस्तानातील हुकुमशाही नापसंत होती, व तिच्याविरुद्ध त्यांनीही आवाज उठवला. फैज यांना तुरुंगवास भोगावे लागले, तर फराज यांना बराच काळ देशाबाहेर रहावे लागले. त्यांना सरकारने दिलेला ‘हिलाल-ए-इम्तयाज़’ हा सन्मान त्यांनी नाकारला व परत केला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘आपल्या सभोवती जे चालले आहे, ते मी मूक प्रेक्षक म्हणून पहात राहिलो तर माझी सदसद्विवेकबुद्धी मला माफ करणार नाही. मी कमीत कमी एवढे तरी करू शकतो की, जनतेचे मूलभूत हक्क हिरावून घेणार्‍या हुकुमशाहीचे स्थान जनतेच्या नजरेत काय आहे, हे मी त्या हुकुमशाहीला दाखवू शकतो. हे कृत्य मी, ‘हिलाल-ए-इम्तयाज़’ हा सन्मान परत करून, अमलात आणत आहे. या राजवटीशी कसल्याही प्रकारे संबंध ठेवणे मला मान्य नाही.’

अहमद फ़राज़ यांच्या काव्यसंग्रहाचे संपादक कन्हैयालाल नंदन म्हणतात, ‘उनकी ग़ज़लें उस तमाम पीड़ा की प्रतीक हैं जिससे एक सोचनेवाले (इन्सान को) और एक शायर को जूझना पड़ता है’. प्रसिद्ध कवि महेंद्रसिंह बेदी म्हणतात की, ‘फ़राज़ के यहाँ महबूब ओर ज़माने के ग़म एकसाथ उभरते हैं, बल्कि वो अपने निजी ग़म को सार्वजनिक बना देते हैं’.

‘रंजिश ही सही’ :

आपल्या मैफलीत मेहदी हसन सांगत की, ‘रंजिश ही सही’ ही गझल आधी सिनेमातील गझल म्हणून पुढे आली, आणि नंतर ती स्टेजवरील गझल म्हणून प्रसिद्धी पावली’. पण, आपण हें ध्यानात घेतले पाहिजे, की मुळात ही गझल सिनेमासाठी लिहिली गेलेली नाही. ती फराज यांनी लोकशाहीला उद्देशून लिहिलेली आहे, आणि हे खुद्द फराज यांनीच उघड केलेले आहे. कन्हैयालाल नंदन सांगतात, ‘कुछ लोग इस ग़ज़ल को इश्क के रूमानी पहलू से जोड़कर देखते हैं। लेकिन बक़ौल फ़राज़ यह ग़ज़ल पाकिस्तान से बार-बार रूठकर जानेवाली जम्हूरियत को मुख़ातिब मानकर  (पुन्हा पुन्हा रुसून निघून जाणार्‍या लोकशाहीला संबोधित करून) कही गई है ।’

या पार्श्वभूमीवर, आता आपण या गझलचा अर्थ पाहू या. पुढे, मूळ-गझलचे शेर सुरुवातीला दिलेले

आहेत.  गायनात नंतर जोडले गेलेल्या शेरांचा (जसें, महेंद्रसिंह बेदी यांचा शेर) उल्लेख मी नंतर वेगळा केलेला आहे. या गझलमधील सरळसरळ, उघड अर्थ, प्रेयसीला उद्देशून दिसतो; आणि सिनेमातही तसेंच असणार, हें नक्कीच. त्या काळातील जवजळजवळ सार्‍याच सिनेमांच्या कथा प्रेमाशी संबंधित असत. आपण त्या सरळ अर्थाच्या पलिकडे जाऊन, तिच्यात दडलेल्या, लोकशाहीसंबंधीच्या अर्थाकडे पहाणार आहोत.

मत्ला :

आधी आपण गझलच्या मत्ल्याची (पहिल्या शेरची) खासियत पाहू या. नंतर त्यातील लोकशाहीशी संबंधित अर्थ शोधून काढू. हा मत्ला असा आहे :

रंजिश ही सही  दिलही दुखाने के लिये आ

आ फिरसे मुझे छोड़ के जाने के लिये आ ।

पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे : ‘तू ये गं, मला उदास करण्याकरता तरी, दु:ख देण्यासाठी तरी, हृदयाला क्लेश देण्यासाठी तरी, पण तू ये’.’ आपण ‘तू ये’ ही आळवणी समजू शकतो, परंतु, ‘क्लेश देण्यासाठी कां होईना, पण तू ये’ असे शब्द वाचल्या-ऐकल्यावर भावनेची आर्तता लगेच आपल्या ध्यानात येते, व आपणही विकल होऊन जातो. दोस्तहो, पहिली ओळ लाजवाबच आहे. पण, पहा दुसर्‍या ओळीने काय उंची गाठली आहे ते ! ही ओळ या भावनेला अत्यधिक गहिरी करते. तिच्यात म्हटलें आहे की, ‘अगं, तू मला एकदा सोडून गेली आहेस, आणि तरीही मी, पुन्हा येण्याकरतां तुला विनवतो आहे ; मात्र मला ठाऊक आहे की, पुन्हा आलीस तरी, तू मला पुन्हा-एकदा सोडून जाशीलच. हें माहीत असूनही, मी तुझी विनवणी करतो आहे की, मला पुन्हा-एकवार सोडून दूर निघून जाण्याकरतां कां होईना , पण तू ये गऽ’ ! पहिल्या ओळीतील आर्त भावना पाहून आपण विकल होतो, तर दुसर्‍या ओळीतील तीव्रता बघून आपण थक्क होतो, स्तब्ध होतो !

आता या मत्ल्याचा दडलेला, लोकशाहीला उद्देशून असलेला, अर्थ पाहू या. ‘अगं लोकशाही, तुझ्यामुळे मला दु:ख मिळेल, उदासीनता (रंजिश) येईल, ते मला मान्य आहे ; माझ्या हृदयाला क्लेश द्यायला तरी तू ये. येऊन नंतर मला पुन्हा सोडून जायला तरी ये. मला माहीत आहे की, तू आलीस तरी पुन्हा मला सोडून जाशीलच. ते मला चालेल, पण तू ये’. लोकशाहीसाठी तळमळत असलेल्या शायरचे हे शब्द आपल्या बेचैन करतात. स्वतंत्र भारतानें पहिल्यापासूनच लोकशाहीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे, अनेक जण लोकशाही ‘टेकन फॉर ग्रँटेड’ घेतात, पण जुन्या, पारतंत्र्याचा काळ पाहिलेल्या, लोकांना लोकशाहीचें महत्व चांगलेंच ठाऊक आहे. आपणही त्या काळाबबद्दल ऐकलेले-वाचलेले असते. हुकुमशाही असलेल्या देशातील लोकशाहीची आस असलेल्या माणसाची काय तगमग होत असेल याची, या शेरमुळे आपल्याला कल्पना येऊ शकते.

पुढील शेर :

हा पुढला शेर पहा :

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो

रस्मो-रहे-दुनिया ही निभाने के लिये आ ।

आधीपासून आपला संपर्क (मरासिम) नव्हता, ओळख नव्हती, हे खरे आहे. तरीही तू , जगाचे रीतीरिवाज

(रस्मो-रहे-दुनिया) पाळण्यासाठी तरी, कधीतरी ये. या देशात लोकशाहीच होतीच कुठे, की आपला संपर्क व्हावा,  आपली ओळख व्हावी. पण, आज, लोकशाही ही जगाची रीत आहे ; ती रीत पाळायला तरी तू

या देशात ये.

किस-किस को बताएँगे जुदाई का सबब हम

तू मुझसे खफ़ा है तो ज़माने के लिये आ ।

आपल्या वियोगाचे कारण आपण कुणाकुणाला सांगणार ? तू माझ्यावर नाराज आहेस खरी, म्हणूनच आजवर आली नाहीस ; पण माझ्यासाठी नाही, तर जगासाठी तरी ये. मला लोकशाही हवी आहे म्हणून तू भलेही येऊ नकोस, पण कमीतकमी, जगाला दाखवण्यासाठी तरी तू या देशात ये.

इक उम्र से हूँ लज़्ज़ते-गिर्या से भी महरूम

ऐ राहते-जाँ मुझको रुलाने के लिये आ ।

कितीतरी काळापासून मी रडण्याच्या आनंदापासून (लज़्ज़ते-गिर्या) सुद्धा वंचित (महरूम) आहे.

(कितीही निराश झालो, कितीही हतबल वाटलें, तरी ही हुकुमशाही आम्हाला रडूही देत नाही , इथें रडण्याचीही मनाई आहे !) . तू माझ्या मनाला सुख देणारी (राहते जाँ) अशी आहेस ; आतां मला रडवायला तरी तू ये. (तू आल्यावर आम्हाला एवढी मोकळीक मिळेल की आम्ही मुक्तपणे रडू शकू, अश्रू वाहू देऊ शकू. तुझ्या येण्याच्या हर्षामुळे डोळ्यात आनंदाश्रू तर येणारच ! अनेक वर्षांचा बांध फुटल्यामुळे आम्ही स्फुंदूसुद्धा. ते अश्रू मोकळेपणे वाहू शकतील अशी परिस्थिती, तू आल्यामुळेच येईल ).

कुछ तो मेरे पिंदारे मुहब्बत का भरम रख

तू भी तो कभी मुझको मुझको मनाने के लिये आ ।

मला माझ्या, तुझ्यावरील प्रेमाचा अभिमान (पिंदारे मुहब्बत) आहे. त्याचा तुला काहीतरी धाक राहू दे, त्याची काहीतरी कदर तू कर. अगं लोकशाही, मी तर तुझी नेहमीच विनवणी करतो की.  तू येत नाहींस म्हणून मी तुझ्यावर नाराज झालो आहे, रुसलो आहे ; आतां तूही एकदा तरी मला खुश करायला, माझी समजूत काढायला, ये.

अबतक दिले ख़ुशफ़हम को हैं तुझसे उमीदें

ये आख़री शमएँ भी बुझाने के लिये आ ।

चांगलं होईल, शुभ होईल, अशी आशा करणार्‍या माझ्या मनाला (दिले ख़ुशफ़हम) आत्तापर्यंत तरी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. हे आशेचे अंतिम दीपक विझवायला तरी तू ये. हे लोकशाही, तू आल्यावर कदाचित माझी निराशा होईलही, माझे आशा-दीप विझतीलही. (कारण, पाकिस्तानातली परिस्थिती पहाता, लोकशाही जरी आलीच तरी, ती कितपत खरी, कितपत सुदृढ असेल, ती ईप्सित साध्य करण्यात कितपत

सफल होऊ शकेल ; आणि त्याहूनहि महत्वाचे म्हणजे, ती टिकेल की नाही ; या सर्वाची शंकाच आहे. तसे काहींही झाल्यास, आमची निराशाच होणार !) . पण माझी अंतिम आशा-ज्योत विझवायलाही तू यायला हवीच आहेस. त्यासाठी तरी तू ये.

अधिकचे शेर :

आपण वर पाहिलेले शेर म्हणजे आहे फराज यांनी लिहिलेली गझल. मेहदी हसन आपल्या मैफिलीत ही गझल गातांना आणखी दोन शेर गात. ते शेर फराज यांनी लिहिलेले नाहीत ; आणि तसे मेहदी हसन मैफलीत सांगतही. पण रसिकांना ते शेरही आवडतात.  ते शेर लिहिणार्‍या शायरने ( महेंद्रसिंह बेदी इ. ) , लोकशाहीचा विचार करून हे शेर लिहिले की केवळ प्रेयसीचाच विचार करून लिहिले, याची कल्पना नाही. मात्र, विचारान्ती, तेही लोकशाहीला लागू होऊ शकतील. पाहू या, कसे ते :

माना कि मुहब्बत का छुपाना है मुहब्बत

चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ ।

(अगं लोकशाही), कबूल आहे की, प्रेमामधे, प्रेमही लपवलं जातं ; प्रेम लपवलं जाणं हेच तर प्रेम.

(घरातल्या थोरामोठ्यांना भिऊन आपण आपलं प्रेम लपवून ठेवतो. त्याचप्रमाणे, लपूनछपून तुझ्यावर

प्रेम करणे, हेंच माझे तुझ्यावरच्या, म्हणजे लोकशाहीवरच्या, प्रेमाचे रूप. कारण, लोकशाहीवरील प्रेम हुकुमशाहीत व्यक्त करण्याची हिंमत माझ्यात नाही.) पण तू, तुझे माझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला एक दिवस ये. (मलाही मग माझे तुझ्यावरचे प्रेम उघड करून दाखवता येईल). पण येतांना हळूच ये. (आम्हाला गाजावाजा होऊन, रक्तरंजित क्रांती होऊन, धमाक्याने लोकशाही यायला नको आहे. ती शांतपणे, वैध मार्गाने यावी, असे मी तिला आवाहन करतो).

जैसे तुझे आते हैं  न आने के बहाने

ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ ।

न येण्यासाठी तुला खूप कारणे, खूप बहाणे, सापडतात. जसे हे तुला येते, तसेच तू, एक दिवस, परत

न जाण्यासाठी (काहीही कारणे न देता, काहीँही बहाणे न सांगता), ये.  (आल्यावर, पुन्हा काहीतरी कारणाने निघून जाणारी लोकशाही आम्हाला नको आहे ; आम्हाला कायम टिकणारी लोकशाही मिळू दे).

हुकुमशाहीच्या विरुद्ध आपल्या साहित्यातून आवाज उठवल्यामुळे, अहमद फराज यांच्यावर सरकार नाराज होते. त्यांनी बराच काळ देशाबाहेरच रहाणे पसंत केले. पण, ‘रंजिश ही सही’ ही गझल मात्र सिनेमातही आली आणि गाजली, अन् मेहदी हसन व अन्य गायक-गायिका ती उघडपणे गात राहू शकले, कारण गझलमधे कुठेही लोकशाहीसंबंधी एकही शब्द उघडपणे आलेला नाही. तो अर्थ अध्याहृत आहे, समजणार्‍याने तो समजून घ्यायचा आहे. ही या गझलची खासियत आहे.

समारोप :

‘रंजिश ही सही’ या गझलनें प्रेयसीला आळवले व लोकशाहीचीही विनवणी केली. या गझलने सिनेमा बघणार्‍या प्रेक्षकांना वेड लावले, रेडिओ व रेकॉर्डेड-संगीत ऐकणार्‍यांना धुंद केले, मैफिलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, विचारवंतांना अंतर्मुख केले ; गेली कित्येक वर्षे या गझलने जाणकार रसिक,

विचारवंत बुद्धिजीवी व सर्वसाधारण जनता या सार्‍यांकडून वाहवाही मिळवली, सार्‍यांच्या टाळ्या घेतल्या.

अशी ही लोकप्रिय, झपाटून टाकणारी, विचारप्रवर्तक, आगळीवेगळी गझल लिहिणारे शायर अहमद फराज काही वर्षांपूर्वीच, २००८ मधे, हे जग सोडून गेले ; ही गझल गाणारे गायक मेहदी हसनही, २०१२ मधे, अल्विदा म्हणून गेले. आम्हा रसिकांना ते दोघेही परत यायला, पुन्हा भेटायला हवे आहेत; त्यांच्या उन्मेषाचा, त्यांच्या कलाकारीचा, तसाच, त्याच उंचीचा मिलाफ आम्हाला पुन्हा पहायचा आहे. म्हणून आम्ही त्यांना आग्रहाचे निमंत्रण देतो, आम्ही त्यांना विनवतो, की, ‘आ, फिरसे मुझे छोड़ के जाने के लिये आ’. आम्हाला माहीत आहे की जगात येणार्‍या प्रत्येकाला कधीतरी निघून जावेच लागते. तुम्ही पुन्हा अवतरलात तर, तुम्ही त्या दुसर्‍या-वेळीही, पुन्हा आम्हाला मागे सोडून निघून जालच . तेही आम्ही मान्य करू, ते क्लेश, ती वेदना, आम्ही सहन करूं. पुन्हा आम्हाला सोडून निघून जाण्यासाठी का होईना, पण हे मेहदी हसन, हे अहमद फराज, पुन्हा एकदा आम्हाला भेटायला या हो.

— सुभाष स. नाईक

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..