प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना “संचारी भाव” असे म्हटले जाते. या संचारी भावात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण ११ प्रकार नोंदवले आहेत. यामधील एक आहे हास्य रस. हे सर्वप्रकार भारतीय नृत्य शैलीत अत्यंत महत्वाचे समजले जातात. हास्य हे आमच्या आनंदी जीवनाचे मूख्य सूत्र आहे जे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. आम्ही दिवसभरातुन किती वेळी हसतो? हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय आद्य लोककलेतील सोंगाड्या वा विदुषक हा हास्याचा पूर्वज म्हणायला हरकत नाही. नंतरच्या काळात नाट्य आणि चित्रपट या आधुनिक कलाप्रकारांनी हास्य टिकवून ठेवले हे त्यांचे उपकारच म्हणायले हवे. भारतीय चित्रपट हा नायक/नायिका, खलनायक, संगीत आणि विनोद या चार खांबावर आजही टिकून आहे. किंबहुना हे चार अंग चित्रपट बघायला भाग पाडतात.
१९४०-५० च्या दशकात चित्रपटसृष्टी जसजशी सर्वांगाने बहरू लागली तसतसे चित्रपटांचे विषयही बदलू लागले. या काळात विनोदी अभिनेत्यानां चित्रपटातुन महत्वाचे स्थानही मिळू लागले. मा. भगवान, गोप, आगा, जॉनी वॉकर, किशोर कुमार,राजेंद्रनाथ, मुक्री, आय. एस. जोहर, धूमाळ, असित सेन, मारूती, सुंदर, टूणटूण, मनोरमा, केष्टो मुखर्जी, जगदीप, देवेन वर्मा, मोहनचोटी अशी एक लांबलचक फळी तयार झाली. मूख्य नायकाचा मित्र वा हितचिंतक असे हे पात्र असे. हसविण्या बरोबरच चित्रपट कथेला पूढे नेण्याचे काम हे विनोद वीर करत असत. या सर्व नावात भगवानदादा, जॉनी वॉकर आणि किशोर कुमार यांची पडद्यावरची एंट्री धूम करीत असे. या नामावलीत आणखी एका नावाची भर पडणार होती. १९४३ मध्ये भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सूपरडूपर चित्रपट “किस्मत” रिलीज झाला. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक होते मुमताज अली. त्याकाळातले सर्वात प्रसिद्ध रंगभूमी अभिनेता व नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. त्यांना एकूण आठ मुलं होती. किस्मतचे नृत्य दिग्दर्शन करतानां त्यांच्या दुसाऱ्या क्रमांकाच्या ११ वर्षाच्या मुलांने या चित्रपटात बाल कलावंत म्हणून भूमिका केली. या चित्रपटाने अशोक कूमार या अभिनेत्याला सुपरस्टार केले. भारतीय चित्रपटात नायकाचा सर्वप्रथम डबल रोल याच चित्रपटाने दिला. यातील या छोट्या बाल कलावंताने पूढे अशोककुमार बरोबर अनेक चित्रपट केले. “मेहमूद अली” हे त्याचे नाव. पूढे चित्रपट सृष्टीतला सुप्रसिद्ध विनोद वीर “मेहमूद” झाला. भगवान दादा, गोप व जॉनी वॉकर या विनोद वीरा नंतर नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती मेहमूदला. एक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतला असा होता की मेहमूद हा चित्रपटात असायलाय हवा असे निर्माते व वितरक आवर्जुन सांगत. फक्त मेहमूदसाठी चित्रपट बघणारा एक खूप मोठा वर्ग त्याकाळी तयार झाला होता. मात्र मेहमूदला यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
मेहमूदचा जन्म मुंबईचा. तरूण मेहमूदने अभिनेता होण्यापूर्वी सर्व प्रकारची पडेल ती कामे केली. लोकलमध्ये ट्रॉफी विकणे, सिने इंडस्ट्रीत ड्रायव्हरची गरज असते म्हणून ड्रायव्हर झाले. किस्मतचे दिग्दर्शक ग्यान मुखर्जी, गीतकार भरत व्यास,राजा मेंहदी अली खान, निर्माते पी.एल. संतोषी (दामिनी फेम दिग्दर्शक राजकुमार संतोषीचे वडील) यांचे ड्रायव्हर म्हणूनही काम केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनीस शिकविण्याची नोकरी मेहमूदला मिळाली. याच काळात मीना कुमारीची बहिण मधू च्या प्रेमात तो पडला व नंतर त्यांनी लग्न केले. मुलही झाली. संसार जरा मोठा झाल्यामुळे अधिक पैसे कमाविण्यासाठी आपण अभिनय करायला हवा असे त्याचे मत झाले आणि त्याने गंभीरपणे हे मनावर घेतले. एकदा “नादान” नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. मधूबाला या चित्रपटाची नायिका होती. तिच्या समोर एक ज्युनिअर कलाकार रिटेक वर रिटेक देत होता पण सीन ओके होत नव्हता. शेवटी दिग्दर्शकाने मेहमूदला संवाद म्हणायला लावले आणि टेक ओके झाला. मेहमूदला याचे ३०० रूपये मिळाले. त्यावेळी ड्रायव्हर म्हणून त्याला केवळ महिना ७५ रूपये मिळत असत. मग त्याने ड्रायव्हरचे काम सोडले व ज्युनिअर आर्टिस्ट असोशिएशनच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली. या नंतर मग त्याने बिमल रॉयचा ‘दो बिघा जमीन’, त्रिलोक जेटलीचा ‘गोदान’, गुरूदत्तचा ‘प्यासा’, जागृती, सीआयडी वगेरे चित्रपटात लहान सहान कामे केली. पण आणखीही लक्ष वेधून घेणारी भूमिका त्याला मिळाली नव्हती.
एव्हीएम ही दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट संस्था. १९५६ मध्ये या संस्थेचा “मिस मेरी” नावाच्या चित्रपटाची निर्मिती होत होती. मीना कुमारी व जेमिनी गणेशन मूख्य भूमिकेत होते. मेहमूद स्क्रीन टेस्टसाठी तेथे गेला पण तो या टेस्टमध्ये नापास झाला. टेस्ट घेणाऱ्यांनी त्याला स्पष्ट सांगितले की – ‘तू आयुष्यात कधीही अभिनेता होऊ शकणार नाहीस तेव्हा हा विचार डोक्यातुन काढून टाक.’ आणि काय गंमत बघा याच एव्हीएम बॅनरने १५ वर्षा नंतर १९७१ मध्ये एक चित्रपट बनवला “मै सुंदर हुँ” आणि मुख्य भूमिकेत होता मेहमूद. असाच वाईट अनुभव व कडवे बोल त्याला आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने सुनावले होते. कमाल अमरोही हे मेहमूदचे दूरचे नातेवाईक. एकदा तो त्याच्याकडे काम मागायला गेला. तेव्हा कमाल अमरोही म्हणाले- “तू मूमताज अलीचा मुलगा आहेस याचा अर्थ तू अभिनेता होऊ शकलाच पाहिजे असे काही नाही. हवे तर मी तूला थोडी आर्थिक मदत करतो, एखादा छोटा मोठा धंदा कर”.या वेळी मात्र या कडव्या बोलानां मेहमूदने आव्हान म्हणूनच स्विकारले. याच वेळी त्याला बी.आर.चोप्राच्या कॅम्प मधून बोलावणे आले. बी.आर. फिल्मस् ही नामवंत संस्था. एक ही रास्ता या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला बोलावण्यात आले. पण तिथून आपल्याला कसे काय बोलावणे आले हे त्याला समजेना. नंतर माहिती घेतल्यावर त्याला कळले की त्याच्या बायकोने मीना कुमारीला मेहमूदसाठी शिफारस करायला लावले होते. मेहमूदने निर्मात्याला नम्रपणे नकार दिला व सांगितले- मला कोणाच्या शिफारशीवरून काम नको आहे. माझ्यातील क्षमताच मला एक दिवस काम मिळवून देईल. आणि खरोखरच तसेच घडले.
मेहमूदचा संघर्ष चालूच होता. १९५८ मध्ये “परवरीश” नावाच्या चित्रपटात त्याला मोठी भूमिका मिळाली. चित्रपटाचा नायक राज कपूरच्या भावाची ही भूमिका होती. या भूमिकेने त्याला हास्य कलावंत म्हणून पहिली प्रसिद्धी मिळवून दिली. या नंतर १९५९ मध्ये दक्षिणेतल्या प्रसाद फिल्म या बॅनरच्या “छोटी बहन” मध्ये भूमिका मिळाली. हा चित्रपट त्याच्या आयुष्याचा टर्नींग पाँईट ठरला. मेहमूद आणि शुभा खोटे ही जोडगोळी या चित्रपटाने दिली आणि पूढे अनेक वर्षे ही जोडी हिट झाली. या चित्रपटाचे मानधन म्हणून मेहमूदला ६००० रूपये मिळाले जी त्याची आज पर्यंतची सर्वात मोठी कमाई होती. नंतर लगेच एका वर्षाने याच बॅनरच्या “ससूराल” मध्येही त्याला भूमिका मिळाली. राजेंद्र कुमार आणि बी. सरोजादेवी प्रमूख भूमिकेत होते.मग मात्र मेहमूदची गाडी सूसाट निघाली. पूढची १५ वर्षे त्याने धूमाकुळ घातला. अनेकदा तो नायकाला पण भारी पडला. त्याला कधी अंगविक्षेप करण्याची गरज पडली नाही.संवाद फेकीचे त्याचे स्वत:चे असे एक स्वतंत्र तंत्र होतं. नायकाचा सर्वात चांगला मित्र म्हणून तो अनेक चित्रपटात झळकला. चित्रपटात जवळपास नायकाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये तो दिसायचा. खलनायकाची ऐशीतैशी नायकापेक्षा तोच अधिक करत असे. आता तो पूर्णपणे रूळला होता. मंझील, दिल तेरा दिवाना, छोटे नवाब, घर बसा के देखो, शबनम, चित्रलेखा, आरजू, पती पत्नी, मेहरबान, पत्थर के सनम, गुनाहो का देवता, प्यार किए जा, लव्ह इन टोकियो, आंखे, नील कमल, जवाब, जिगरी दोस्त इत्यादी चित्रपटात त्यांनी ध्माल केली. याच काळात तो आणि आय.एस.जोहर या जोडगोळीने धम्माल उडवून दिली. पण तो एवढ्यावरच समाधानी नव्हता त्याला अनेक प्रयोगही करायचे होते.
१९६५ मध्ये राजा नवाथे यांचा “गुमनाम” चित्रपट आला. यात मेहमूदने पक्का हैद्राबादी आचारी हैद्राबादी बोली सकट आणला. लुंगी चट्ट्यापट्ट्याचे शर्ट, चॅपलिन टाईप मिशा असलेल्या या बटलरने ‘हम काले है तो क्या हुवा…’म्हणत हेलेन बरोबर अक्षरश: धूडगूस घातला. महानायक अमिताभला पण या गाण्याचा इतका मोह झाला की “देशप्रेमी” या चित्रपटात ‘खातुन की खिदमत मे…..’हे गाणे याच गाण्याची थेट कॉपी होते. तर ज्यु.मेहमूदलाही याच गाण्याच्या नकलेने चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. शैलेंद्रने ‘हम काले है तो’ हे गाणे खास हैद्राबादी भाषेत लिहले होते. या चित्रपटात मेहमूद सगळ्याच कलाकारावर भारी पडला आहे. मेहमूदने आपल्या स्वभावाने अख्खी चित्रपटसृष्टी जवळ केली होती. स्वत: केलेले कष्ट तो आयुष्यभर विसरला नाही. सुरूवातीच्या काळात एकदा ‘मला कॉमेडी करण्याच्या टिप्स हव्या’ म्हणून तो किशोर कुमारकडे गेला होता. किशोर कुमारला त्याची क्षमता माहित होती. किशोर कुमार म्हणाला- “मी स्वत: कॉमेडियन असताना तुला का टिप्स देऊ?” यावर मेहमूद म्हणाला होता- “एक दिवस मी माझ्या सिनेमात तुला नक्की घेईन”. आणि मेहमूदने आपले वचन पाळले. १९६८ मध्ये मेहमूदने एन.सी.सिप्पी यांच्या सहकार्याने “पडोसन”ची निर्मित् केली. १९५२ मध्ये आलेल्या “पशेर बारी” या चित्रपटाचा रिमेक होता. सुनील दत्तने पहिल्यांदाच या चित्रपटात विनोदी भूमिका केली. यातील किशोर कुमार आणि मेहमूदच्या डान्स मास्टर अण्णाने धम्माल केलीयं. यातील “एक चतूर नार….”या गाण्याला आजही प्रचंड प्रतिसाद मिळतो. पचंमदाने काय अफलातुन गाणे रेकॉर्ड केले आहे.
मेहमूदची शुभा खोटे नंतर ७० च्या दशकात अरूणा ईराणी बरोबरही मस्त जोडी जमली. दोघांची केमेस्ट्री छान जुळली होती. हमजोली या चित्रपटात मेहमूदने तिहेरी भूमिका करून धमाल केलीय. पृथ्वीराज,राज आणि रणजित कपूर अशी तिन अभिनेत्यांची धमाल पॅरोडी होती. “प्यार किए जा” मधील सिनेमा शौकिन बिलंदर पोरगं मेहमूद आणि त्याचा कवडीचुबंक बाप ओम प्रकाश यांनी जाम बहार उडवून दिलीयं. मराठीतला महेश कोठारेचा “धूम धडाका” याच चित्रपटावर बेतला आहे. अरूणा इराणी आणि अमिताभ यांना “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटात नायक नायिकाच्या भूमिकाही मेहमूदनेच दिल्या. मेहमूद खूप मोठ्या मनाचा आणि नवीन टॅलेंट ओळखण्यात पारंगत होता. पचंमदा, राजेश रोशन, बासू मनोहारी याना त्यानेच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनची संधी दिली. मेहमूदने स्वत: अनेक चित्रपटाची निर्मिती केली. तृतीय पंथीय लोकानां चक्क स्वत:च्या चित्रपटात संधी दिली. “सज रही गली मेरी माँ…”.हे “कुवाँरा बाप” मधील गाणे आठवा. पोलिओग्रस्त मुलाची ही कथा होती. काय सुंदर आणि प्रगल्भ अभिनय केलाय यात मेहमूदने. मस्ताना, लाखो मे एक, मै सुंदर हूं, कुवाँरा बाप हे माझे खूप अवडते चित्रपट. यात सर्वच चित्रपटातुन मेहमूदने अक्षरश: प्रेक्षकानां रडवले आहे. यातली रिक्शांच्या शर्यतीत किती तरी खरे रिक्शावाले सामिल झाले होते. त्याच्या “साधू और शैतान” आणि “कुवाँरा बाप” मध्ये दिलीप कुमार, मुमताज, किशोरदा, अमिताभ, धमेंद्र, विनोदखन्ना,हेमा मालिनी, दारासिंग,असित सेन यांनी कुठलाही मोबदला न घेता काम केले. रिक्शावाला हा चित्रपटाचा नायक होऊ शकतो याची ग्वाही त्याने दिली. स्वत:चा वेगळा अंदाज, हावभाव बोलण्याचा ढंग याद्वारे मेहमूदने जवळपास ५ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि “किंग ऑफ कॉमेडी” ही पदवी प्रापत केली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने जवळपास ३०० चित्रपट केले व तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कारही प्राप्त केला. १९९६ मध्ये शहारूख खानला घेऊन त्याने दुश्मन दुनिया नावाचा चित्रपट तयार केला पण तो साफ कोसळला. यात त्याने आपला मुलगा मंजूर अली याला लाँच केले होते.
७० च्या दशकात जगदीप, असरानी, पेंटल, देवेन वर्मा, कादीर खान यांच्या प्रभावामुळे मेहमूद काहीसा मागे फेकला गेला. त्याचे मधू बरोबरचे लग्न यशस्वी झाले नाही. १९६७ मध्ये दोघे विभक्त झाले. दुसरी पत्नी ट्रेसी ही अमेरिकन. या पत्नी पासून झालेले मन्झूर अली, मन्सूर अली आणि बेबी जीनी ही मुलगी…. पैकी मन्सूर अली हा लकी अली या नावाने सर्वाना परीचित आहे. तो अभिनेता आहे आणि त्याचा गझल आणि गीतांचा अल्बम प्रसिद्ध आहे. पहिल्या पत्नी पासून मसूद अली, मक्दूम अली, मासूम अली ही मुलं. ही सर्व मुलं आणि मुलगी जिनी त्याच्या “एक बाप छ बेटे” या चित्रपटात होती. त्याचा लहान भाऊ अन्वर अलीला पण त्याने अभिनेता म्हणून समोर आणले. तर मेहमूदची सख्खी बहिण मिनू मुमताज ही पण अभिनेत्री आहे. मेहमूदचे मूळ घराणे तामीळ आहे. त्याचे आजोबा (वडीलाचे वडील) एके काळी कर्नाटकचे नवाब होते त्यामुळे दाक्षिणात्य भाषेवरील प्रेम लक्षात येते. मेहमूद घोड्याच्या रेसचा शौकिन होता.बंगलोरला त्याचा स्वत:चा घोडयांचा तबेला होता.त्याचे वडीलावर अफाट प्रेम होते. त्याच्या कुवाँरा बाप या चित्रपटात त्याच्या वडीलांनी छोटी भूमिका केली आहे जी त्यांची शेवटची भूमिका होती. वडीलाच्या कबरी शेजारी मेहमूदने आपल्या कबरीचा जागा आगोदरच तयार करून ठेवली होती. २३ जुलै २००४ मध्ये अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनिया शहरात वयाच्या ७२ व्या वर्षी मेहमूदने त्याच्या पाठीवरच्या ऑक्सिजनच्या सिलेडंर मधून झोपेतच शेवटचा श्वास घेतला.
असं म्हटलं जातं की अस्सल विनोदाच्या पायतळी वेदनांचा पाया असतो. चॅर्ली चॅप्लीनने आयुष्यात प्रचंड सहन केले होते कदाचित त्यामुळेच लोकानां तो इतकं खळखळून हसवू शकला. मेहमूदचे ही कदाचित असेच असावे. त्याच्या उतरत्या काळात हा माणूस प्रचंड एकटा पडला नव्हे एकाकी झाला. त्याची एक प्रदीर्घ मुलाखत मी युट्यूब वर बघीतली होती. या मुलाखतीत मेहमूद स्वत:चे कुटूंबीय व चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंता बद्दल भरभरून बोलला आहे. यात अमिताभ बद्दल जवळपास मिनिटांचा व्हिडीओ आहे. ज्या अमिताभला कधी काळी त्याने मदत केली होती ती सर्व हा महा नायक का विसरला असावा याचं गूढ समजत नाही. अमिताभ किशोर कुमार आणि मेहमूद यांच्या अत्यंविधीला गेले नव्हते हे एक सत्य आहे. पडद्यावरच्या ज्या मेहमूदने लाखो प्रेक्षकानां चार दशके हसवले, हसता हसता लोळवले त्या “कॉमेडी ऑफ द किंग”ला मी या मुलाखतीत ढसाढसा रडतानां बघितले. उतार वयातील त्याची वाढलेली पांढरी दाढी आणि नाकाला लावलेले ऑक्सिजनचे नळकांडे बघून – “हाच का तो मेहमूद ज्याने आपल्या हास्यातुन आम्हाला जगण्यासाठी प्राण वायू दिला होता” हा विचार मनाला बोचणी देत होता. आजही जेव्हा केंव्हा माझ्या मनावर मळभ दाटून येते तेव्हा मी- पडोसनचे एक चतूर नार…बघतो आणि नव्या उर्मीने कामाला लागतो.
-दासू भगत (२३ जुलै २०१७)
Leave a Reply