स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. Give me Hundred Nachiketa, I will Change the World असे अभिमानाने सांगणारे स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना‘विवेकानंद’असे नाव दिले. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चमात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला.
१८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पाश्चमात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.
विष काय आहे ? असा प्रश्न एकदा स्वामी विवेकानंदाना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिले. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ते विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले होते.
स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील,असा त्यांना विश्वास होता. त्यांच्या जयंतीच्या दिवशी` आंतरराष्ट्रीय युवकदिन’ साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी देहावसान झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply