जीवनमें एक बार रहना सिंगापूर !
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये सिंगापूरला मलेशियापासून स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचली व मनाने एकदम सिंगापूरमधल्या आठवणींमध्ये धाव घेतली. १८ वर्षे कशी वायुवेगाने पळाली ते कळलेच नाही पण असंख्य सुखद आठवणी मनात ठेऊन गेली. जगाच्या नकाशावर एकाद्या ठिपक्या एवढा छोटासा देश पण किती विविधतेने भरलेला आहे हे तिथे राहिल्याशिवाय समजत नाही.
१९८७ साली मी तिथे प्रवासी म्हणून गेले होते तेव्हा मला सिंगापूर फारफार वेगळे वाटले होते. कारण आम्ही तेव्हा सरंगून रोड ह्या मिनी भारतात उतरलो होतो. मुस्ताफा सेंटर मधली खरेदी, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे, कोमला विलासमध्ये इडली वडा खाणे व पोटभर भारतीय पहाणे यामुळे सिंगापूर हा दक्षिण भारताचा एक छोटासा हिस्सा असावा अशी माझी कल्पना झाली तर त्यात काही चूक नव्हते. त्यावेळी सिंगापूरला जाणा-या सर्व प्रवाशांना जवळपास असेच वाटत असावे. पण त्याच देशात सिंगापूर एअर लाईन्स मधल्या नोकरीसाठी जेव्हा १९९२ साली रहिवासी होऊन मुक्कामाला गेलो तेव्हा त्याचे एकदम वेगळेच रूप समोर आले.
यावेळी आम्ही सिंगापूरच्या मध्य भागापासून थोडे दूर ‘बेडॉक’ या उपनगरात एका एच.डी.बी.च्या ब्लॉकमध्ये जागा भाड्याने घेतली. चारी बाजूंना चाळवजा ६ मजलीब्लॉक्स व मधल्या मोकळ्या जागेत भाजीबाजार,फळबाजार व उपहारगृहे अशी त्या भागाची रचना होती. घर खूप छान, उजेडाचे,हवेशीर,फुल फर्निश्ड होते पण दैनंदिन संसारासाठी आवश्यक सामानाचे काय ?त्यामुळे दुस-याच दिवशी माणसांनी व त्याच्या बोलण्याने गजबजलेल्या बाजारात किरकोळ खरेदीच्या व नवीन ओळखी करण्याच्या उद्देशाने मी बाहेर पडले खरी, पण माझ्या पदरात ओळख तर सोडाच पण एक साधे स्मित हास्यही पडले नाही.हे नोकरीला सिंगापूरला जाणार व त्यांच्याबरोबर मलाही परदेशी वास्तव्य करायला मिळणार,मी NRI होणार, ह्यामुळॆ आकाशाला हात टेकल्याप्रमाणे अधांतरी हवेत तरंगणा-या मला त्या दिवशी पहिली सिंगापूरची झलक अनुभवायला मिळाली.अवतीभवती भरपूर माणसे वावरत होती पण सगळी चिनी किंवा मले. त्याची भाषा ‘मॅंडरीन’ व ‘मले’ ना मला कळत होती ना त्यांना माझी इंग्लिश ! त्यामुळे संवाद होणार कसा? त्या दिवशी मला परदेशात मुक्काम करून तिथे पाय रोवणे किती कठीण असते याचा अनुभव आला.सिंगापूर मध्ये पहिला झटका भाषेचा बसतो, विशेषत: ज्या नोकरी करीत नसतील त्या गृहिणींना.कारण रोजच्या व्यवहारांसाठी आजुबाजुला संपर्क तर वाढवावाच लागतो.तोही भाषेशिवाय.
कांदे, बटाटे,फ्लॉवर,काकडी, टोमॅटो, कोबी यांसारखे जगन्मित्र सोडले तर बरीच भाजीमंडळी मला अनभिद्न्य ! त्यांचा परिचय भाषॆशिवाय व्हावा तरी कसा?सफरचंद,पेरू,केळी यांसारख्या परिचित फळ मंडळींशिवाय इतरही खूप फळे बाजारात होती. त्यांच्या नावांचाच जिथे पत्ता नाही तर खायचे धाडसतरी कसे करणार?शेवटी तिथे गेलेल्या व रहाणा-या प्रत्येकाला जी हातवा-यांची स्पेशल भाषा यावी लागते त्यात मीही हळूहळू पारंगत झाले, हळूह्ळू सिंगापूर कळत गेले व बरेच प्रश्न सोपे झाले.हे त्यांच्या कामात व्यग्र व दिवसभर बाहेर.त्यामुळे त्यांना वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी होणा-या संवादाखेरीज इतर कोणाशीही न बोलता काढलेला तो पहिला महिना अजूनही पूर्ण लक्षात आहे.
सिंगापूरचे लोक तसे थोडे इतरांपासून अलिप्तच.कोणाच्याही घरात परवानगी घेतल्याशिवाय डोकावणार नाहीत, चौकशा करणार नाहीत तसेच नवीन माणसांशी ओळखी वाढवण्याच्या फंदातसुद्धा पडणार नाहीत.भाषा व शिक्षण हेच मोठे अडसर असल्यामुळे असेल कदाचित.हल्लीची पिढी सोडली तर अजूनही पूर्वीच्या पिढीतील ब-याचजणांना इंग्लिश येत नाही.पुष्कळ वेळा त्यांच्या ब-याच शब्दांचे उच्चार खूप बोबडे व कळायला अवघड वाटतात.वाक्यात कर्ता कर्म क्रियापद हे सगळे फॅक्टर असलेच पाहिजेत असे नाही तर समोरच्याला आपला विषय कळल्याशी कारण ! इतके सोपे इंग्लिश बरेच जण बोलतात.माझे इंग्लिश तिथे मस्त चालून गेले पण ह्यांच्या शुद्ध तर्खडकरी इंग्लिशला मात्र ब-याच ठिकाणी मुरड घालून घ्यावी लागली.त्यावेळी बाजूच्या इंडोनेशिया,मलेशिया,थायलंड,चायना व भारत या पलिकडे काही जग आहे याचीही ओळख तिथल्या ब-याच जणांना नव्हती. ते आपले त्यांच्या रोजच्या व्यवहारात गर्क.आणि त्यांचाच देश असल्याने अनोळखी माणसाशी ओळख करून घेण्याची त्यांना गरजही नव्हती पण माझे काय? तिथली चिनी शेजा-यांची आठवण मी कधीही विसरणार नाही.
आमच्या शेजारच्या घरात एक आजी आजोबा व त्यांचा दोन वर्षांचा नातू येताजाता दिसत. त्यातही आजोबा सतत हातात डबा व किटली घेऊन खालच्या चौकातल्या उपहारगृहातून सूप, भाजी वगैरे आणण्यासाठी येजा करीत व आजीबाई दारे खिडक्या पुसण्यात गर्क.भाषा कळत नसल्याने बोलाचाली नव्हतीच. तिथे रहायला गेलो त्या नंतर २-३ दिवसातच सकाळी सकाळी मला अचानक काहीतरी जळल्याचा वास यायला लागला.घरात तर काही जळत नव्हते म्हणून मी दार उघडून बाहेर गॅलरीत डोकावले तर शेजारचे आजोबा छोट्या लाल शेगडीत कोळसे पेटवून कसलेतरी कागद जाळत होते. मी पुढे जाऊन कठड्यापाशी उभे राहिले तरी माझी जरासुद्धा दखल न घेता त्यांचे कगद जाळण्याचे काम चालूच होते.त्या सुट्ट्या कागदांची जागा आता कागदांच्या थप्पीने घेतली.त्यावर मला जेव्हा काही चित्रे छापलेली दिसली तेंव्हा मात्र घाबरून मी घरात आले. पुढे ८ -९ दिवसांनी हाच प्रकार…आता मात्र माझ्या कुतूहलाची जागा भीतीने घेतली.तिस-यावेळी जेंव्हा हाच प्रकार झाल्यावर ह्यांनी त्यांच्या सहका-यांकडे विचारणा केली. तेव्हा समजले की हा प्रकार आम्हाला घाबरविण्यासाठी नसून स्वर्गाच्या वाटेवर असणा-या आजोबांच्या पितरांना आवश्यक त्या वस्तू पुरविण्याचा हा मार्ग होता. पितरांच्या विशिष्ट तिथीच्या दिवशी कागदावर त्या वस्तूंची चित्रे छापून ते कागद जाळले तर त्या वस्तू त्यांना पोहोचतील अशी चिनी लोकांची समजूत आहे.मला हे सगळे कळाले तेंव्हा खूप हायसे वाटले.माहिती कळाली, पण शेजा-याशी संपर्क शून्य ! त्यांची परदेशी शिकणारी मुलगी आली तेव्हाकुठे तिच्या माध्यमातून आजीआजोबांशी ‘हाय हॅलो’ चे आदान प्रदान झाले तोवर आम्हाला तिथे राहायला लागून अर्धे वर्ष होत आले होते. त्यांच्या घरात प्रवेश मिळायला १ वर्ष! माझ्याशी ओळख वाढवण्यात- हासून मान डोलावण्यात,त्यांच्या घरात प्रवेश मिळण्यास बहुधा मी घरात करीत असलेला २ वेळचा स्वयंपाक,मुलांची देखभाल कारणीभूत असावी. माझा रोज होणारा स्वयंपाक व आमचा संपूर्ण शाकाहार या बद्दल आमच्या सर्वच शेजा-यांना कुतूहलाची व बरीचशी आदराची गोष्ट वाटत असावी.त्याच्या जोडीला साडी म्हणजे ‘सच अ लॉंग क्लॉथ’वापरणारी आमच्या संपूर्ण भागात मी एकमेव स्त्री होते.त्याचेही कुतूहल मिश्रित कौतुक होतेच.
तिथले दूरदर्शन त्यावेळी फक्त तीन चिनी व २ मले चॅनल्स दाखवायचे.दिवसातून फक्त अर्धाच तास इंग्लीश सबटायटल दाखवणारी एक चीनी सीरियल यायची.तीच काय ती दिवसभरातली एकमेव करमणूक.रोज सकाळी भलामोठ्ठा पेपर येई पण त्यात जेमतेम एखादा कॉलम भारताबद्दलच्या बातम्या देणारा असायचा.त्याही कुठल्या तरी खून, दरोडे यांच्याच जास्त असायच्या. इंटरनेटही नव्हते त्यामुळे भारतातील उलाढालींशी संपर्क ठेवणे मुश्कील.कोणी येणारे जाणारे मित्र मंडळी कधीतरी मराठी पेपर आणतील, मुले सिंगापूरला यायची तेव्हा, घरून आईवडील वर्तमानपत्रांची कात्रणे पाठवीत तेव्हा,मराठी वाचनाची अगदी पर्वणी वाटे.१९९७ साली पहिल्यांदा झी टीव्ही चे चॅनल दिसायला लागले व भारत पाकिस्तानची मॅच आमच्या छोट्याश्या घरात २५-३० जणांनी एकत्र दाटीवाटीत बसून पाहिली तो आनंद काय वर्णावा ! ते झाले ५ वर्षानंतरचे ! पण सुरवातीच्या काळात साध्यासाध्य़ा गोष्टी सुद्धा परदेशात राहून किती अप्राप्य होत्या त्याची आता कल्पनाही येणार नाही. आम्ही तिथे गेलो त्याच वर्षी मले चॅनलने हिंदी भाषेतले महाभारत इंग्लिश सबटायटलसह टीव्हीवर दाखवायला सुरूवात झाली,शेजारच्या ‘मले’ बाईला ही कथा माझ्या देशात घडली असल्याची शंका आली व अशा राजेराजवाड्यांच्या देशातून आलेली मी तिथे एकदम खूपच पॉप्युलर झाले. त्यानंतर रोज सकाळी अस्मादिकांची स्वारी हातात कोरे कागद व रंगाच्या पेन्सिल घेऊन भर बाजारात चीनी म्हाता-यांच्या गराड्यात ‘महाभारत’ कथा सांगू लागली. माझ्या दिव्य चित्रकलेतून व हातवा-यांच्या भाषेतून ‘महाभारत” कितपत त्यांना कळले देव जाणे.पण त्या नंतर पुराणिकबुवांना ज्याप्रमाणे डाळतांदूळ मिळतात तसा मला रोज वेगवेगळ्या फळांचा प्रसाद चाखायला मिळायला लागला व ब-याच नवीन गोष्टींची माहिती झाली.चीनी संस्कृती,सणवार,त्यांच्यातील पोट जातीभेद सगळे तिथेच मला कळले..
इतके करूनही माझापाशी भरपूर रिकामा वेळ रहात होता.एकेदिवशी आसपासच्या भागात फिरत असताना मला एक म्हाता-या माणसांचे डे केअर सारखे ठिकाण सापडले व मी तिथे जायला सुरूवात केली.हात धरून फिरवून आण्यासाठी,डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करवून घेण्यासाठी भाषेची गरज नसते हेही मला तिथेच कळले व एक माहिती मिळवण्याचा नवाच मार्ग सापडला.फक्त हातवा-यांच्या आधारानॆ आपण किती गोष्टी जाणून घेऊ शकतो हेही मला सिंगापूरच्या वास्तव्यात कळले.याशिवाय तिथे आपल्याला आपल्या व्यक्तिगत धार्मिक गोष्टी करण्याचे,सणवार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे ही गोष्ट मला सिंगापूरच्या बाबतीत खूपच आवडली. त्यामुळे जरी भाषा आली नाही तरी आपल्याला सांस्कृतिक शॉक ब-याच कमी प्रमाणात बसतो.खाण्यापिण्याच्य़ा बाबतीत म्हणाल तर आम्हा दोघांचे कुठेच काही अडले नाही.सिंगापूर ख-या अर्थाने टूरिस्ट फ्रेंडली आहे.मोठमोठ्या २-३ चाळवजा ब्लॉक मध्ये १ दुकान डाळ तांदूळ,कांदे बटाटे, नूडल्स, साखर चहा वगैरे विकणारे असते. चिनी पदार्थ विकणारे, मले पदार्थ विकणारे व भारतीय तमीळ लोकांचे पदार्थ विकणारे १-१ दुकान तरी ९-१० ब्लॉक्सच्या क्लस्टर मध्ये असते.त्यामुळे तसे रोजच्या खाण्यापिण्यात काही अडत नाही.अगदी आपल्या भारतीय भाज्याच हव्या असतील तर मात्र सरंगून रोडशिवाय पर्याय नाही.तीच गोष्ट उपहारगृहांबाबत.प्रत्येकाला काहीना काहीतरी आपल्या चवीचे मिळतेच,कोणी उपाशी राहू नये याची घेतली गेलेली खबरदारी हा सिंगापूरच्या आतिथ्यशीलतेचा उत्तम नमुना. आम्ही शाकाहारी लोकांना चालणारा ’बो बो चाचा’ हा रताळ्याच्या खिरीसारखा पदार्थही शोधून काढला होता.त्यामुळे अगदी उपासाच्या दिवशीही उपासमार टळली.ही गोष्ट आहे २०-२२ वर्षांपूर्वीची. आता तिथे भारतात मिळत नाहीत इतके पदार्थ मिळतात.
हळूहळू आम्ही तिथे रूळत गेलो, नवीन मराठीलोक नोकरीसाठी येत गेले व पहातापहाता महाराष्ट्र मंडळ स्थापन झाले.गणपतीउत्सव अगदी भारतात व्हावा तसा दणक्यात साजरा व्हायला लागला व मराठी नाटकवेड्या मंडळींनी नाटकेही करण्याचा जोर लावला.माझी व ह्यांची कॉलेजमधली नाटके दिग्दर्शित करण्याची व नाटकात काम करण्याची हौसही त्यामुळे पूर्ण झाली.महाराष्ट्र मंडळ नवीन होते तेव्हा सरकारकडे आम्हाला प्रत्येक नाटकाचा शब्दशः अनुवाद द्यावा लागे व इमिग्रेशन कडून पासपोर्टवर “नाटकात काम करण्यास अनुमती” असा शिक्काही ! नंतर फक्त नाटकाचे नाव, कामे करणा-या लोकांची माहिती इतकेच बंधन राहिले. लेखकाची परवानगी घेण्यापासून ते नाटक पार पाडेपर्यंत २ महिने कसे कापरासारखे उडून जात.देश सोडून गेल्यावर झालेल्या फायद्यांपैकी हा एक मोठा फायदा.तसेच खूप मोठे मोठे पुढारी,नट त्यांच्या सिंगापूर व्हिजीटमध्ये जवळून पहाता आले.आणखीहीबरेच उपक्रम १८ वर्षात आमच्या खात्यावर जमा झाले.
आमची मुले काही तिथल्या शाळेत शिकली नाहीत. तरी इतर ओळखीच्या लोकांमुळे तीही माहिती मिळाली. तिथे त्यावेळी तरी लोकल स्कूल व इंटरनॅशनल(अमेरिकन, जपानी वगैरे) स्कूल असे २नच प्रकार होते. लोकल स्कूलही चांगली होती, शिक्षणाचा दर्जा चांगला होता तरी शाळा जानेवारी ते डिसेंबर अशा असल्याने भारतातून आलेल्या मुलांचे अर्धे वर्ष शाळा सुरू करताना व अर्धे शाळा सोडून परत भारतात परतल्यावर वाया जात असे. त्यामुळे पाल्य वयाने लहान असेल तरच पालक त्याचे शिक्षण तिथे लोकल स्कूल मध्ये करायचे धाडस करीत. इंटरनॅशनल स्कूलचा पर्याय होता .पण एकतर जागा कमी व फी जबरदस्त ! बरेचजण शक्य असेल तर मुले भारतातच ठेवत.आता तिथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. खरे तर आता सिंगापूर इतके बदलले आहे की, पृथ्वीवरचा स्वर्ग धरतीवर उतरावा असे वाटते.अत्यंत सुरक्षित अश्या सिंगापूरमध्ये सामान्य माणसाला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व उपलब्ध आहे.कोणीही आपल्या घरातून चालण्याच्या अंतरात सरकारी वहान –बस व रेल्वे- गाठून प्रवास करू शकेल व देशभर परवडणा-या पैशात हिंडूफिरू शकेल. इतकी सहज सोपी व सुंदर सोय मी इतर कुठेही पाहिली नाही. यातल्या ब-याचश्या सुधारणा आमच्यासमोर १८ वर्षात घडल्या.बदलत्या सिंगापूरचे कौतुक पहाताना एके दिवशी आमचा परत येण्याचा दिवस ठरला.ज्या चांगी विमानतळावर आम्ही दोघे थोड्याश्या साशंक मनाने उतरलो होतो त्याच विमानतळावर आम्हाला पोहोचवायला आलेल्या मित्रमंडळींच्या गराड्यात आम्ही साश्रू नयनांनी उभे होतो.रिकाम्या हाताने व मनाने आलेल्या आमची मने सुह्र्दांच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली होती.किती लोकांचे प्रेम आम्ही मिळवले ते त्या दिवशी कळले. आम्ही परत भारतात परतलो,जरा त्रास झाला पण यथावकाश रूळलो.पण आयुष्य़तला जो मोठा कालखंड “जीवनमें एक बार जाना सिंगापूर च्या ऎवजी रहना सिंगापूर” म्हणत सिंगापूर ह्या छोट्याश्या देशात अत्यंत आनंदात घालवला तो अविस्मरणीयच………….!
— अनामिका बोरकर
ए १८, वुडलॅंडस,
गांधी भवन मार्ग, कोथरुड, पुणे ४११ ०३८.
Leave a Reply