मेंडोलिन वादक उप्पलपू श्रीनिवास उर्फ यू श्रीनिवास यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९६९रोजी झाला.
मेंडोलिन आणि यू. श्रीनिवास ही काही वेगळी नावं नव्हती एवढं त्यांच्यात जीवैक्य होतं. मैफलीत यू. श्रीनिवास आपल्या बोटांच्या नाजुक करामतीतून मेंडोलिनमधून अशी काही जादुई सुरावट निर्माण करायचे की, रसिकांसमोर सुरांचं एक अनोखं मायाजाल विणलं जायचं. त्या मायाजालातून बाहेर पडणं मग रसिकांना मुश्किल व्हायचं. त्यामुळेच रसिकांनी त्यांना ‘मेंडोलिन श्रीनिवास’ असं म्हणायला सुरुवात केली होती. श्रीनिवास यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडील सत्यनारायण यांचं मेंडोलिन पहिल्यांदा हातात घेतलं आणि ते आपसूकच अतिशय सुरात वाजवायला सुरुवात केली. छोट्या श्रीनिवासचं हे जन्मजात कौशल्य लक्षात घेऊन सत्यनारायण यांनी त्याला लगेच स्वतःच मेंडोलिनवादनाची तालीम द्यायला सुरुवात केली. छोट्या श्रीनिवासची मेंडोलिनवादनातली प्रगती एवढी स्तिमित करणारी होती की, थोड्याच अवधीत सत्यनारायण यांचे गुरू रुद्रराजू सुब्बराजू यांनीच त्याला तालीम द्यायला सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे रुद्रराजू सुब्बराजू यांना स्वतःला मेंडोलिन वाजवता यायचं नाही. ते गाऊन दाखवायचे आणि त्यांच्या गाण्यातले सूर श्रीनिवास जसेच्या तसे मेंडोलिनमधून काढायचा. ही तालीम एवढी पक्की होती की, अल्पावधीतच मेंडोलिनवादक म्हणून श्रीनिवासचं नाव सर्वतोमुखी झालं. श्रीनिवास यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्यांनी कर्नाटकसंगीतात मेंडोलिनला मिळवून दिलेली मान्यता. एरव्ही कर्नाटक संगीत म्हणजे खरंतर जोरकस गायकीची संगीतपरंपरा. या परंपरेत श्रीनिवास यांनी मेंडोलिनसारखं नाजूक तंतुवाद्य अगदी बेमालूम मिसळलं. त्यामुळेच नंतरच्या काळात कर्नाटक संगीत असो किंवा इलया राजा, ए. आर. रेहमान यांचं सिनेमासंगीत असो, त्यात यू. श्रीनिवास यांचं मेंडोलिन मस्ट झालं. मेंडोलिनवादनातील ही कीर्ती जगभर पसरली. त्यातूनच मायकल निमन, मायकल ब्रुक, जॉन मॅक्लिन अशा मान्यवर पाश्चात्य कलाकरांबरोबर आपली कला पेश करण्याची संधी त्यांना लाभली. या कलाकरांबरोबरच जागतिक ख्याती मिळवणारे उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरही श्रीनिवास यांचे वाद्यवादनाचे कार्यक्रम रंगले. सप्टेंबर २००३ मध्ये त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. श्रीनिवास यांनी मेंडोलिनला मिळवून दिलेली ही मान्यता लक्षात घेऊनच भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला होता. तसंच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला होता. यू. श्रीनिवास यांचे १९ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे यू. श्रीनिवास यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply