विचार आणि वर्तनाचे (त्यातून कृतीचे) मेंदू हे उगमस्थान असते. त्यावर आपले “होणे” अवलंबून असते. गैरवापर केला तर आपण वेगळे होतो आणि सदुपयोग केला तर वेगळे असतो. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मेंदूच्या सूचनेबरहुकूम होत असतात. याहीपलीकडे एक कार्य असते- प्रतिक्षिप्त क्रियेचे! अचानक जिवंत तारेला हात लागला तर लगेच तो फेकला जातो. पूर्वानुभवांच्या पुरचुंडीने हा निर्णय घेतला जातो आणि त्याची तामिली होते. डोळ्यांजवळ काही बाह्य पदार्थ आला की ते लगेच मिटतात. मेंदूच्या आतील सत्य काय असते आणि ते प्रयत्नपूर्वक बदलता येते का? मेंदूचे भवितव्य काय? असे प्रश्न सदैव पडत असतात. त्यापैकी काहींना भेटू या.
आपण एक शब्द कायम वापरतो- बुद्धी (इंटलेक्ट). ही धारणा प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असते आणि बुद्धिमत्तेचेही प्रकार एकापेक्षा अधिक असतात. आपणाला मिळालेली “देणगी ” आपण कोणत्या दिशेने वापरतो यावर बरंच काही अवलंबून असते.
वैद्यकीय,मज्जाशास्त्र,मानस शास्त्र , समाजशास्त्र यांच्या पैलूंचा विचार धर्म, मेंदू आणि अध्यात्म यांच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या अभ्यासांमधून केला असता दोन ठाम निष्कर्ष निघतात-
एक- धर्म आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी तशा निरुपद्रवी असतात. त्यांच्यातील किमान सहभाग सुद्धा आरोग्य आणि जीवनमान वाढविण्यास उपयुक्त ठरते.
दोन – ध्यान आणि उत्कट प्रार्थनेत रममाण झालेल्यांना आपली बुद्धी आणि मेंदूचे काही हिस्से अधिक प्रगत झाल्याचे जाणवायला लागते. अनेक मानसिक समस्या कमी होतात,सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात आणि आस्थेमध्ये वाढ होते. ध्यानाच्या शांततेत मेंदू काही काळ विसावतो, आतील घटनाक्रमांचे विस्फोट कमी झाल्याने मेंदूची झीज थांबते, भावनांवर अधिक चांगला ताबा मिळवता येतो. आपोआप त्यातून सकारात्मक आणि आशावादी “नजर ” तयार व्हायला सुरुवात होते.
आहार, सवयी आणि निद्रा या प्राथमिक बाबी मेंदूच्या विहित कामकाजासाठी अत्यावश्यक असतातच. निद्रानाशामुळे शरीरातील रासायनिक स्रावांवर सामान्यतः परिणाम होतोच होतो. मात्र त्याच्याशी जीवनशैली आणि शारीरिक ठेवण हेही जोडले जातात. अंमली पदार्थांचे तसेच झोपेच्या गोळ्यांचे झालेच तर फक्त विपरीत परिणाम होतात. निद्रेचा एक हिस्सा असतो- “जलद नेत्र निद्रा” (आर ई एम – रॅपिड आय मुव्हमेंट) म्हणजे मिटलेल्या डोळ्यांच्या हालचाली जरी सर्व दिशांना जात असल्या तरी त्याची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवली जात नाही. जलद नेत्र निद्रा निरामय मेंदूसाठी अत्यावश्यक असते. अर्थात झोपेचा कालावधी वाढविणे हा त्यावरील उपाय नसून झोपेची गुणवत्ता अधिक चांगली करणे हाच आहे.
निरामय मेंदूची जपणूक करण्यासाठी काही सोपी-सुलभ औषधे आजीबाईच्या बटव्यात कायम असतात-
१) श्रद्धा – शास्त्र, औषधे आणि काही प्रमाणात आपल्या धार्मिक भावना अनिश्चित असतात. तरीही कोठेतरी श्रद्धेला स्थान असायलाच हवे. अगदी मेंदूचे स्कॅनिंग केले तरी फारतर अंतर्रचना दृष्टीस पडेल पण विश्वाचे सम्यक दर्शन घडणार नाही. आपले निर्णय आणि संकल्पनांचे नियमन अंतःप्रेरणा आणि श्रद्धाच करू शकतात. आयुष्याच्या अनोळखी, अपरिचित मार्गांवर चालताना ही श्रद्धा मदतीला येऊ शकते. न्याय, निःपक्षपातीपणा, नीतिमत्ता अशा अमूर्त संकल्पनांना सामोरे जाताना आणि त्याबाबतीत घेतले जाणारे निर्णय बरोबर आणि योग्य आहेत याचा भरवसा श्रद्धा देऊ शकते. श्रद्धा म्हणजेच आशा, सकारात्मक भवितव्याची अपेक्षा बाळगणे असे असते. (त्याच्याबद्दल काही पुरावे नसतील तरीही). दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी छावणी मध्ये डांबलेले अनेक युद्धकैदी श्रद्धा या एकाच भावनेमुळे जिवंत राहात असत आणि छळ सोसत. ज्यू लोकांनी हलाखीच्या प्रसंगी अगदी देवावरील श्रद्धा बाजूला ठेवली पण मानवतेवरील श्रद्धा अबाधित ठेवली. बरेचदा आजारी व्यक्तीची समजूत काढण्यासाठी एखादे औषध (जे प्रत्यक्षात औषध नसते) दिले जाते, त्यानेही ३० टक्क्यांपर्यंत शारीरिक आणि भावनिक व्याधी दूर होण्यास मदत होते. कारण रुग्ण जे दिलं गेलं आहे ते “औषध” आहे आणि त्याने मला बरं होण्यास मदत होणार आहे अशा विश्वासाने ते घेत असतो.
२) तल्लख आणि दक्ष असणे -इंग्रजीत एक वाक्य आहे – ” तुम्ही एखादी गोष्ट वापरली नाही तर ती तुम्ही कायमची गमावता.” मेंदूच्या फ्रँटल लोबला जर सक्षम करायचं असेल तर समस्या निवारण,संवाद-क्षमता, विवेकनिष्ठ निर्णय हे मार्ग अवलंबावे. उतारवयाशी निगडित सगळ्या तक्रारी शेवटी फ्रँटल लोबशी येऊन थबकतात आणि कॉर्टेक्सचा हा भाग सतत कार्यरत असायला हवा. आहार, व्यायाम आणि आरोग्याच्या संबंधित समस्या त्यामुळे कमी करता येतात. पुस्तक-वाचन, बुद्धिबळ खेळणे, दैनंदिनी लिहिणे, व्याख्यान ऐकणे /देणे अशा कृती मेंदूला तरतरीत राहण्यास मदत करतात. अर्थात बुद्धीला चालना देतानाच या कृती आनंदमयी सुद्धा असायला हव्यात. मज्जासंस्था आणि मज्जापेशींमधून निघणारे धागे (डेंड्राईट्स) कार्यक्षम राहण्यासाठी या कृती मदत करतात.
३) सहेतुक (हेतुतः) विश्रांती /आराम – येथे झोप एवढाच अर्थ अभिप्रेत नसून शरीराशी संवाद साधून दुखावलेल्या प्रत्येक अवयवाची विचारपूस, स्नायूंच्या आखडण्यावर इलाज करणे, शारीरिक थकवा यांवर इलाज केला तर मेंदू सुस्थितीत राहू शकतो. सोबतीला सुमधुर संगीताची जोड दिली तर मेंदू ताजातवाना होण्यास वेगाने मदत होते. शांतावणारं संगीत निरामयतेला हातभार लावते, शरीरातील तणाव कमी होतात, मेंदूतील तणाव निर्माण करणाऱ्या रासायनिक स्रावांचा प्रभाव कमी होतो.
४) संवाद – मेंदू आणि भाषा यांची उत्पत्ती साधारण एकाच कालखंडात झाली असावी.इतर सजीव आणि सस्तन प्राण्यांपेक्षा ही एक मोलाची देणगी मानवाला लाभली आहे. संवाद खुंटले आणि सामाजिक संपर्क कमी झाले तर कदाचित मेंदूची वाटचाल आक्रमकता, वैफल्य, एकाकीपणा अशा वर्तनसमस्यांकडे होऊ शकते. संवादातून सहकार्य आणि ते नसल्यास मानवी वर्तन संघर्षाकडे वळू शकते. शांततेसाठी संवादसेतू हाच एकमेव सुसंस्कृत मार्ग असतो. विशेषतः जागतिक शांतता, सुसंवाद, मानवी ऐक्य अशा सर्वसमावेशक विषयांवर चर्चा झाली तर मेंदू खोलवर विचार करण्यास प्रवृत्त होतो. मात्र संताप, चिडचिड अशा भावनांनी युक्त चर्चांनी मेंदूची हानी होऊ शकते.
५) हास्य – जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आशावादी असावा असे ज्यांना वाटत असते, ती मंडळी हास्य नामक मोफत आणि प्रभावी उपचारपद्धतीचा सर्रास अवलंब करताना आढळतात. बौद्ध धर्माच्या विचारसरणीत हास्य ही महत्वाची देणगी मानली जाते. कोठल्याही रांगेत प्रतीक्षा करीत असताना चेहेऱ्यावर फक्त हास्य ठेवले की आसपासची मंडळी आपोआप शांत होतात. आपण चेहेऱ्यावर हास्य आणू शकलो नाही तर जगात शांतता नांदणार नाही. सगळ्याच संस्कृतींमध्ये हास्याला संसर्गजन्य मानले जाते. हास्यामुळे सामाजिक देवाण-घेवाण सुलभ होते आणि अपरिचितांनाही ते मोहवते. हसणाऱ्या व्यक्तीचे एखादे चित्रही डोळ्याला दिसले की आपोआप छान वाटते आणि सुरक्षितही वाटते. असे हास्य निर्हेतुक असले तर त्याचा दूरगामी परिणाम होतो. याउलट रडके, हास्यविहीन चेहेरे मनात राग, नैराश्य, नावड निर्माण करतात.
“सुचणे “हा सर्जनाचा पहिला हुंकार मेंदूत निर्माण होतो. कसं सुचतं, हे भलेही उलगडून सांगता येत नसलं तरी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी विचारमग्न मेंदूत काही ना काही सुरु असते. माणसाला विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांची जन्मजात देणगी असते- भलेही त्यांचे प्रमाण व्यस्त असो. आर्किटेक्ट, इंजिनिअर, चित्रकार, शिक्षक, वकील,त्रकार, वैज्ञानिक, गणितज्ञ , संगणक प्रोग्रामर, खेळाडू, नर्तक, शिल्पकार, गायक, संगीतकार, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी इतकी विशाल श्रेणी आपण त्याआधारे तयार करू शकतो. या सगळ्या व्यवसायांना आवश्यक असणारी मूळ भूमी मेंदूतून तयार होत असते. मेंदूच्या सर्जक वापरामुळे, आणि विविध बुद्धिमत्तांच्या माध्यमातून सर्जनाचे अनेक आविष्कार निर्माण होत असतात. त्यांतील अनेक नेत्रदीपक असतात आणि डोळ्यांना सुखावणारे असतात. संगीत, लेखन, चित्रकला हे सर्वसामान्यपणे सृजनाचे दृश्य रूप असते. या साऱ्या निर्मितीचे मूळ मेंदूत असते.
या साऱ्या सर्जनाचा वापर मेंदूशी आणि मनाशी संबंधित असणाऱ्या काही व्याधींवर सूचक वापर करणे आता शक्य झाले आहे. त्यांचे परिणाम तपासणे आणि त्यांची वैधता मान्य करणे हे अद्याप पूर्णतया सिद्ध झालेले नाही आणि अर्थातच ते अनेक घटकांशी संलग्न असते- रुग्णाची मानसिकता, उपचारांचा कालावधी, व्याधीची तीव्रता असे अनेक मुद्दे त्यांत येतात.
संगीत मनाला सुखकारक, प्रसन्नता देणारे असून, संगीतोपचार ही पूरक उपचार पद्धती म्हणून आता स्थिरावते आहे. अस्थिर मानसिकतेसाठी आयुर्वेद आणि संगीत यांचा समन्वय उपयुक्त ठरतो. मनाला अकरावे इंद्रिय मानतात. मनाचे रंजन करण्यासाठी संगीत वापरणे हे आता मान्य होत आहे. शास्त्रीय रागांमध्ये नऊ रस अध्याहृत आहेत. कुमार गंधर्वांसारखे दिग्गज, आजारपणात नवनवे राग तयार करण्यात सिद्धहस्त होते. संगीतामुळे मनाचा ताण कमी होतो. उदाहरणार्थ श्याम कल्याणी राग ऐकल्यावर दुःख कमी होवू शकते; अनुकंपा, आस्था वाढविण्यासाठी मिया मल्हार उपयोगी ठरतो. वीर रसातील गीतांमुळे आत्मविश्वास व उत्साह वाढतो. संगीत राग म्हणण्याच्या वेळा आणि आयुर्वेदातील तीन दोष (कफ,वात आणि पित्त) व त्यावर उपायासाठी सांगितलेल्या आठ वेळा यांचा समन्वय केला, तर अनेक आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होऊ शकते.
कलाविष्कारांमुळे स्कीझोफ्रेनिया सारख्या आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना आराम मिळू शकतो. डिस्लेक्सिया सारख्या शिक्षण समस्येशी जोडल्या गेलेल्या त्रासाचा सामना करून कसे विजयी होता येते, हे अमीर खानने “तारे जमीं पर” या चित्रपटात दाखवून दिले. इशान अवस्थीला गम्य असलेल्या चित्रकलेच्या माध्यमातून निकुंभ नावाचा शिक्षक त्याच्याजवळील सर्जनाला, नवनिर्मितीला वाट मिळवून देतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या गमावलेल्या व्यक्तिमत्वाला उभारी देतो. स्वमग्नतेच्या समस्येने ग्रासलेल्या व्यक्तींना कायम सामाजिक सुसंवादात, बोलताना, देहबोलीत नीटसे व्यक्त होता येत नाही. त्यांच्यावरही कलोपचार प्रभावी ठरतात. तुरुंगातील कैद्यांचे एकाकीपण बरेचदा सर्जक आणि कौशल्य विषयक कामांनी कमी करता येते. भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन कला मानले जाते. लहान वयातील मुलांना त्यांच्या मनातील कोणतीही खळबळ, चित्रकलेतून सहज मांडता येते. एका बालभवनातील बोलका किस्सा- शिबिरातील एक विद्यार्थी कायम काळ्या रंगात चित्र रंगविताना बघून त्याच्या शिक्षिकेला संशय आला. सहज तिने त्याच्या गल्लीतील शेजाऱ्यांकडे चौकशी केली. त्या विद्यार्थ्यांच्या घरी आई-वडीलांची सतत भांडणे होत, मारहाण होत असे आणि तेही या बालकाच्या समोर! साहजिकच घुसमट होणाऱ्या त्या बालकासमोर जीवनाचा एकमेव रंग फक्त “काळा” होता. अबोलपणे तो त्याची भावनिक मोडतोड कागदावर चिरखडत होता.
पुष्पौषधी किंवा सुवासाशी संबंधित असलेली उपचारपद्धती निराशा, भीती, चिंता अशा त्रासांशी मुकाबला करण्यासाठी मदत करते. त्याद्वारे निद्रेची गुणवत्ता सुधारू शकते. वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार केलेली तेले गुडघादुखी,मुतखडा यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. नाकाद्वारे हुंगण्यामुळे मज्जासंस्थेद्वारे हे सुवास मेंदूच्या अंतर्भागात प्रवेश करून व्याधींची तीव्रता कमी करण्यास साहाय्य करतात.
स्व-मदत पुस्तके हे तुलनेने अलीकडचे साधन आहे. संस्कार आणि व्यक्तिमत्व घडविणारी माणसे जशी हळूहळू कमी होत गेली तसतशी त्यांची जागा स्व-मदत पुस्तकांनी घेतली आहे. मार्गदर्शन करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी अशा पुस्तकांचे वाचन करण्याकडे आता कल वाढतो आहे.”रेकी” ही विश्व चैतन्याची ओळख करून घेण्यासाठीची उपचार पद्धती आहे. मानवाचा प्रवास सतत अपूर्णतेकडून पूर्णतेकडे सुरु असतो. रेकीला अध्यात्मिक बैठक आहे तसेच ते एक आधुनिक विज्ञान आहे. सोप्या भाषेत रेकीची ऊर्जा आपण दुखऱ्या अवयवाला देतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला लवकर आराम मिळतो. अर्थात प्रत्येक शास्त्राला अंगीभूत मर्यादा असतात.
संमोहनाच्या मदतीने थेट अंतर्मनाशी संवाद साधून तेथील वाईट विचार व सवयींना बाहेर घालविता येते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन चिंता, ताण, तणाव, काळजी यांनी विराट रूप धारण केले आहे. जर हे ताण तणाव, काळजी नियंत्रणात न आणता काम केल्यास त्यामुळे विविध किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार तर होतातच, पण त्याचे रूपांतर गंभीर स्वरूपाच्या आजारात होऊ शकते.
संमोहनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून मन हे आतून बाहेरून शांत होते. मग किरकोळ मानसिक आजार होत नाही. ५० ते ५५ टक्के रोग मानसिक स्वरूपाचे असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या औषधांची गरज नसते. संमोहनामुळे न्युरोसिसवर उपचार होऊ शकतो. हिस्टेरिया, भयगंड, झोपेचे विकार, मानसिक चिंतेमुळे होणारी डोकेदुखी यावर यशस्वी उपचार करता येतो. औषधोपचार चालू असताना तीव्र स्वरूपाच्या मनोविकारांवर (सायकोसिस) संमोहन लाभदायक मानले जाते.
माहितीच्या विस्फोटाने मेंदू श्रमतो, थकतो. त्याला वरील मार्गांनी विश्रांती देता येते. संगणक, यंत्रमानव अशा तंत्रज्ञानाने बेशक आपणांस आराम, सुख बहाल केले आहे पण आता वाटचाल सुरु आहे मेंदूला पर्याय देण्याची! “कृत्रिम प्रज्ञा” हे त्याचे अलीकडील उदाहरण. अर्थात तंत्रज्ञानाच्या गैरवापराने हॅकींग, सायबर गुन्हे या कुटील वळणावर येऊन मेंदू आपणांस बदनाम करू शकतो. कारस्थाने रचून चोरी, खून अशा व्यक्तिगत पातळीबरोबरच युद्ध, अणू ऊर्जेचा गैरवापर आणि त्या साधनांद्वारे जगावर हुकूमत गाजविण्याची सत्तापिपासा मेंदूतच जन्म घेत असते. हेही विनाशकारी सर्जनच!
कोणत्या दिशेला हे हत्यार वळवायचे याचे तारतम्यही मेंदूतच असते, हेही नसे थोडके!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply