मानसिक स्वास्थ्य हे आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असते. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असते. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. अशावेळी आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया अनावधानाने बदलत जातात. त्यामुळे घेतलेले निर्णय आणि त्या दरम्यान इतरांशी होणारे आपले संवाद काहीवेळा विपरीत परिणाम करणारे ठरू शकतात. यासाठीच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी बालपणापासून वृद्धार्पणापर्यंत मानसिक स्वास्थ्य महत्वाचे असते.
आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असे वाटत असले तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण त्यांतच सामावलेले असते.
आपल्या मनांत येत असलेल्या प्रत्येक विचाराचा परिणाम कमी अधिक प्रमाणांत आपल्या मानसिकतेवर होत असतो. नकारात्मक विचारांचा विपरीत परिणाम होत असतो, तर सकारात्मक विचार यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात. आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी विचार होण्याची जरुरी असते. अनेकदा अविचाराने, विचाराशिवाय कृती केल्याने पश्चातापाची वेळ येते. ती केवळ तापदायकच नव्हे तर घातकही ठरू शकते. मनांत येणारा प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहाराला कारणीभूत ठरत असतो. आपल्या आयुष्यांत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या अंतर्मनावर कोरल्या गेलेल्या विचारांशी असतो. एखाद्या व्यक्तीचे यश देखील आपल्या मनांत नकारात्मक विचार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. अलीकडच्या काळांत अल्पवयीन मुले-मुली नैराश्याचे शिकार होताना दिसत आहेत. नकारात्मक विचारांचे पर्यवसान रागात, उद्वेगात आणि कालांतराने गुन्हेगारीत होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळांत खूपच वाढल्याचे दिसून येत आहे. ही अतिशय खेदाची आणि चिंतेची बाब आहे. आपल्या व्यक्त होण्यातून सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणे जरुरीचे असतं. सकारात्मक विचारमंथन हे नेहमीच उर्जा देणारे ठरत असते. त्याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असल्याची अनुभूती येत असते. त्यासाठी आपलं व्यक्तिमत्व “अ”व्यक्त राहू नये.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply