नवीन लेखन...

मेरा वो सामान “लौटा “दो !

माणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात.

बरेचदा नाती वाटेतच संपतात,खंडीत होतात, आपले हात सोडून कोठेतरी निघून जातात, काही आसपास असतात पण दिसतातच असे नाही, काही विरळ होतात आणि क्वचित विस्मृतीत जातात.

मग पुन्हा “आपण “कडून “मी” कडे प्रवास होतो. कारण तोपर्यंत जाणवलेलं असतं –

अकेले ही तय करने
होते हैं कुछ सफर,
जिंदगी के सफरमें
हमसफर नहीं होते !

असा प्रवास सुरु झाला की ओठी येतं – मेरा वो सामान “लौटा “दो !

मी बजाज ऑटोला नोकरीला लागलो आणि तेथे एका विभागप्रमुखाशी घनिष्ठ मैत्री झाली. तसे आम्ही समवयस्क पण शेवटी मी प्रशिक्षणार्थी आणि तो विभागप्रमुख. तरीही आजतागायत ” ये दोस्ती —” टाईप आम्ही आहोत. एकदा बोलता बोलता मी त्याला सांगून गेलो – ” माझ्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणांची(विशेषतः पारितोषिक विजेत्या) हस्तलिखितं माझ्याकडे एका फाईलमध्ये सुखरूप आहेत.” त्याने ती फाईल आवर्जून वाचायला मागितली. आजवर चाळीस वर्षे झाली,त्या मित्राने ती फाईल काही परत केली नाही. दोन-तीनदा मी दुबळेपणे मागणी केली,त्यानेही नम्र होकार भरले पण आजतागायत ती फाईल माझ्याकडे आलेली नाही. मित्रा,आता तरी- मेरा वो सामान “लौटा “दो!

बजाज सोडून बारामतीच्या (माळेगांव) तंत्रनिकेतनामध्ये मी रुजू झालो.

लहानपणापासून संगीताची आवड असल्याने आजही माझ्याकडे २०० हून अधिक ऑडिओ कॅसेटचा संग्रह आहे.त्यातील अर्ध्याहून अधिक आमच्या आवडीच्या हिंदी-मराठी गाण्यांनी भरलेल्या आहेत. पुण्यात बुधवार पेठेत जोगेश्वरी मंदिराजवळ “म्युझिका ” नामक खजिना एकदा अचानक गवसला. मालक श्री जोशी १९२८ पासूनच्या दुर्मिळ संगीताचे धनी ! त्यामुळे स्टॉकमध्ये “उपलब्ध “नाही हा शब्द त्यांच्या स्टॉकमध्ये नव्हता. त्यांच्या चोपड्यांमधून तास न तास बसून चोखंदळ निवड करणारे आम्ही आणि कॅसेट मध्ये थोडी जागा उरलीच तर आम्हाला न विचारता अप्रतिम गाणी टाकणारे जोशी !

माळेगांवला गेल्यावर हा खजिना डोळ्यांत भरलेल्या दोन-तीन प्राध्यापक सहकाऱ्यांनी काही कॅसेटवर डल्ला मारला. परत मागितल्यावर एकाने ” कॅसेट हरवली ” तर दुसऱ्याने “एकाला ऐकाला दिली ” (१९८४ साली असे सर्रास घडायचे) वगैरे उडवाउडवीची उत्तरे दिली. आजतागायत माझा जीव असलेल्या त्या कॅसेट घरी परतल्या नाहीत.

अनेकदा आवडत्या पुस्तकांच्या बाबतीत हेच घडलंय. ती परतून आलेलीच नाहीत.

जीवापाड जपलेलं कलेक्शन असं वाऱ्यावर उडून जाताना अनुभवणं वेळोवेळी जीवघेणं झालंय.

अनेकांबरोबर केलेले प्रवास, जगलेल्या सहली, एकत्र बघितलेले चित्रपट/नाटके, वाचलेली पुस्तके, जागवलेल्या रात्री, ऐकलेल्या मैफिली, मित्र-मैत्रिणींसमवेत झालेले स्नेहमेळावे या साऱ्यांच्या आठवणी जपता -जपता आजकाल पुरेवाट होते.

मावत नाहीए आणि टाकवतही नाहीए अशी सध्या अवस्था झालीए.

तरीही माझं स्वतःचं असं जे काही इतरांकडे साठलेलं /साचलेलं आहे ते कृपया “लौटा “दो, हे विनवण्याचा टप्पा आता आलाय.

भीती इतकीच -इतरांनीही माझ्याकडे अशी मागणी केली तर?
उदा.- लता दीदींनी माझे सुगंधित केलेले सगळे क्षण परत मागितले तर?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..