नवीन लेखन...

मेरे यारकी शादी है

जगातल्या कोणत्याही देशात जा. देवाने ‘अनंत हस्ते’ दिलेले स्त्रीसौंदर्य तिच्या विवाहप्रसंगी ओसंडून येतं.

लग्नविधीतले दोन मुख्य भाग म्हणजे, साखरपुडा आणि लग्नविधी. सून पसंत करायची जबाबदारी आई-वडिलांची. तेच विवाहाची तारीख नक्की करतात. नातलग मंडळी आहेर-खरेदीत गर्क होतात तर दोन्ही पक्षाचे आई-बाबा विवाह-पूर्वतयारीला लागतात. खर्च वाटून घ्यायचा. पण वधूच्या आई-वडिलांनी लेकीच्या संसाराची भांडीकुंडी द्यायची हा संकेत असतो.

प्राचीन कालरूढीप्रमाणे वाग्दत्त वधूला दिवाणखान्यात आणतात. आफ्रिकन लग्नकार्यात वधू-हुंडा विरोध मंडळीना फारसा वाव नाही. कारण मुलाने मुलीला हुंडा द्यायचा. बाकीचे संकेत आपल्यासारखेच. हुंड्याची रक्कम मुलीच्या शिक्षणावर अवलंबून. शिकलेल्या सुनेला लठ्ठ हुंडा द्यावा लागतो. विवाह समारंभासाठी नटविण्याचे काम आईच्या माहेरकरांचे- म्हणजे मावशांचे. वधूच्या कपड्याचे रंग संकेताप्रमाणे ठरलेले. म्हणजे जसे आपल्याकडे मामाच्या साडीचा रंग पिवळाच पाहिजे-तसे. वेषभूषेत पोलके, चेहर्‍याचा पदर किंवा पडदा आणि मस्तकावर हॅट. मेजवानीचा चमचमीत बेत असतो-तांबड्या रंगाच्या खोबरेल तेळात तळलेले मास. डुकराचे मांस. मद्यपानासाठी आफ्रिकन व्हिस्की व माडावरच्या ताडीपासून केलेली बिअर. मद्याचे सोवळे असणाऱ्यांसाठी उसाचा रस.

वेगवेगळ्या चालिरीती असल्या तरी एक गोष्ट समाईक. ती म्हणजे वधूला सर्वांनी आदराने वागवायचे. गावकऱ्यांनी आदरयुक्त प्रेम करायचे. पूर्व आफ्रिकेतील कुटुंबांत सासरकडून तिला घराची भेट लग्नाअगोदरच मिळते. मग सर्वाचे लक्ष ती ‘वंशाचा दिवा’ घरात कधी आणते त्यावर. घर मिळाल्यावर तिला आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते. आफ्रिकन पुरूषाला चांगला पती बनण्याचे व मुलीला घरकामाचे शिक्षण शाळेत मिळते. खेड्यात वधूला सांकेतिक गुप्त लिपी शिकवतात. मग तिला सर्वाशी संभाषण साधायला स्वातंत्र्य मिळते. विवाहसोहळा बरेच दिवस चालतो. मुख्य भर असतो, जेवणखाणे, संगीत आणि झकास सामुदायिक नृत्ये. बर्‍याच वेळा ८-१० तरूण-तरूणींचे सामुदायिक विवाह होतात. विवाहानंतरच्या पहिल्या रात्रीला नवरी मुलीला खूप खूष ठेवण्याचा सर्वाचा प्रयत्न असतो. इतका की पहिल्या रात्री तिला नवख्या जागेत अवघडल्यासारखे वाटायला नको म्हणून पहिली रात्र साजरी करण्यासाठी तिच्या गावाला नेण्याची प्रथा आहे. नववधू खूप खूष असली  की तिचे बाळ गुटगुटीत जन्माला येते असा समज आहे.

पण सर्वच आफ्रिकन लग्नातील बऱ्याचशा चालिरीती थक्क करणाऱ्या आहेत.

एथिओपियाः वधूला दीर्घायुष्य मिळावे म्हणून पोटावर विविध आकृत्यांनी गोंदविण्यात येते.

एथिओपियातली ‘अम्हारे’ जमातः लग्नवाटाघाटीच्या वेळी पुरोहीत हजर असला पाहिजे. घटस्फोटानंतर बायकोला घरकामाचा मोबदला मिळतो. इस्टेटीचा हक्क नाही. त्यावर  मुलांचा हक्क.

केनियातली ‘मसाई ‘जमातः वधू-वरांचे विवाह जमातीतल्यांशी होतात. पती वयाने बराच मोठा चालतो. तसेच पूर्वपरिचय नसला तरी चालतो. सासरला जातांना नववधू आपल्या वस्तू गोळा करते, अलंकार अंगावर घालते आणि सासरला जायला निघते. लग्नसोहळा पार पडल्यानंतर आशिर्वादादाखल बाप मुलीच्या मस्तकावर व स्तनांवर थूंकतो. हा प्रसंग १३-१६ वर्षाच्या वधूसाठी खूप अवघड ठरतो. ती पतीबरोबर आपल्या सासरच्या घरी जात असतांना तिने पाठीमागे वळून अजिबात पहायचे नाही. पाहिलेच तर तिची शिळा होऊन ती दगडसारखी रस्त्यातच पडून राहील हा एक समज.

केनियातली ‘स्वाहिली ‘जमातः प्रौढ स्त्रिया वधूला चंदनाने न्हाऊ घालतात. नवर्‍याला कसे खूष ठेवायचे याचे प्रात्यक्षिक देतात. ‘कुपाम्बा’ जमातीत विवाहाच्या दुसर्‍या दिवशी एक सोहळा असतो तो खास स्त्रियांचा असतो. यावेळी स्त्रिया बुरखे सारून अलंकाराचे प्रदर्शन करतात. पण स्त्रियाच्या या खास कार्यक्रमात पुरूष मडळींना सपशेल बंदी. ‘दिदी तेरा देवर दिवाना’ करत एखादा पागल दीर स्त्री-वेषात घुसलाच तर सर्वजणी त्याला हुसकून बाहेर घालवणार !

नामिबियाः या देशात वऱ्हाडी मंडळी विवाह विधीपूर्वी नवऱ्या मुलीला चक्क पळवून नेतात व तिला चामड्याचा मुकूट घालून बंदिस्त करतात. मग योग्य वेळी तिला बोहल्यावर आणतात. मग सासूबाई किंवा तिची थोरली सखी तिला सून म्हणून कसे वागायला हवे ते नीट समजावून सांगते. हा समारंभ झाल्यावर तिची सून म्हणून कुटुंबात स्वागत झाले असे मानतात.

सामबुरूः या जमातीत नवर्‍या मुलाने नवरीला द्यायच्या भेटीं चे प्रदर्शन करायचे असते. त्यात बऱ्याच वेळा समावेश असतो – दोन बकऱ्यांच्या कातड्याच्या वस्तू, दोन तांब्याचे कानातले डूल, एक दुधासाठी भांडे आणि एक मेंढी. विवाह समारंभाच्या अखेरी सासूबाई दिवाणखान्यात बैलाला आणतात. मात्र तो त्यांना न जुमानता आत शिरल्यावर त्या बैलाचा मेजवानीसाठी उपयोग होतो.

“निगर” देशातली प्रथाः कुटुंबात दोन मावस-चुलत भावंडे असतील तर मुलीला विचारतात. “तुला कोण हवाय?” एक पसंत केल्यावर दुसरा पण तिची शय्यासोबत करायला मोकळा.

सुदानमधली प्रथाः मुलाने वधूला २०-४० गुरे भेट द्यायची. मात्र खरा विवाह समारंभ स्त्रीने दोन मुलांना जन्म दिल्यावर पूर्ण झाला, असे मानायचे. एकच मूल झाले तर नवऱ्याला घटस्फोट मिळू शकतो. पहिले मूल किंवा भेट दिलेली गुरे परत करण्याचे ठरते. नवरा अचानक मेल्यावर बायकोला नवऱ्याच्या भावाशी विवाह करता येतो. त्यांना झालेली संतती कायदेशीर मानतात.

आफ्रिकेच्या ख्रिश्चन लग्नात पण ‘करवला’ म्हणजे नवऱ्या मुलाचा ‘बेस्ट मॅन’ असतो. त्याला लग्न प्रसंगी खूप सन्मानाने व आदराने वागवायचे असते. त्याने वधूची विवाहा नंतरही पाठराखण करायची असते. तो दिवसभर खूश असतो. मात्र आता रीतीरिवाजांचे दिवस बदालायला लागले. पाश्र्चिमात्य देशातून आलेल्या  नव्या रिवाजांनामुळे हे घडते. मिश्र विवाहामुळे हा बदल होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः वर्षानुवर्षे राहत असलेली दक्षिण आफ्रिकेत काळी व गोरी प्रजा असल्याने हे मन्वंतर इतर देशांच्या मानाने अधिक वेगाने घडत आहे. यात एक बदल म्हणजे उभय समाजातले प्रकर्षाने आढळणारे एका वेळचे वितुष्ट आता शीघ्र गतीने लयाला जात आहे व विवाहानंतर दोन्ही संस्कृतमधील सद्भाव व जीवन-रहाणीतील सकारात्मकता झपाट्याने वाढत असल्याचे आढळत आहे. हे साहजिक आहे कारण विवाहानंतर पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबियांना एकमेकांना सांभाळून घेणे क्रमप्राप्त झाले आहे. यात नवपरिणीत पत्नी सामंज्यसता वृध्दीस नेण्यासाठी पुढाकार घेते. बर्‍याच वेळा नवे बाळ घरात आल्यावर त्याच्या आगमनाने मिश्र कुटुंबात नवचैतन्य येते. परिणामतः पती पत्नीच्या गावी जाऊन स्वतःचे घर खरेदी करून घेऊन स्थायिक झाल्याची उदाहरणे पूर्व आफ्रिकेमध्ये जास्त प्रमाणात आहेत. मात्र प्रत्येक देशाच्या विवाह चालिरीतीतील व पती पत्नीच्या उभय सामंज्यसातील वेगळेपण खास आहे.

एथिओपियाः लग्नाच्या दिवशी बेस्ट मॅन व त्याचे तीन चार मित्र नवरी मुलीच्या घरी वाजत गाजत जातात. माहेरकर त्यांचा प्रवेशव्दाराशीच रस्ता आडवतात. त्यांचा आग्रह असतो, नवऱ्या मुलाने व त्याच्या मित्रांनी अगदी खड्या आवाजात गाणी म्हटली पाहिजेच व शक्यतो दांडगाई करत घरात प्रवेश केला पाहिजे. करवला येतांना सुगंधाचा फवारा घेऊन येतो व माहेरकरांच्यावर घरभर सुगंधाची बरसात करतो. त्यावेळी मुलीची नातलग मंडळी हर्षाने गाणी गातात. हे साधारणतः नवरी मुलगी ख्रिश्र्चन असली तर तिच्या घरी प्रामुख्याने घडते. खिस्ती धर्माची नवरी मुलगी लग्नाच्या वेळी खऱ्या  अर्थाने ‘कुमारिका’ असली पाहिजे यावर व्याह्यांचा कटाक्ष असतो. पण नंतर मुलगी कुमारिका नसल्याचे समजले तर ती नवऱ्या मुलीच्या घराण्याला शरमेची बाब ठरते.

घानाः सर्व चालिरीतीने व थाटामाटाने विवाह समारंभ करण्याची प्रथा या देशातल्या शहरात कमी होत चालली आहे. घरच्या घरीच विवाह समारंभ उरकून टाकण्यावर हल्ली भर असतो. पण थाटात लग्न करायचे म्हटले की अगदी सर्व साग्रसंगीत झाले पाहिजे. लग्न विधीला सुरूवात होणार ती म्हणजे मुलीला मागणी घालण्यापासून. मुलाचे नातलग नवरी मुलीच्या घरी प्रथम येणार व दरवाजा ठोठावणार. दार उघडल्यावर भावी मामंजी म्हणजे नवऱ्यामुलाचे बाबा मुलीचा हात मागणार. हा समारंभ साधारणतः विवाह समारंभाच्या एक किंवा दोन आठवडे आधी होतो. मुलाचे मित्र येतांना दार उघडल्यावर ते सर्वांसाठी मद्याच्या बाटल्या घेऊन आलेले असतात. मद्य न घेणाऱ्या ‘सोवळ्या’ मंडळीसाठी कोकच्यापण बाटल्या बरोबर आणलेल्या असतात. भावी मामंजी ‘खाऊ’साठी पैसे भावी सुनेच्या हातात घालतात. मद्याचे सेवन करतांना मुलाचा मित्र किंवा एखादा नातलग एक छोटेखानी पण ऐटबाज भाषण करतो. त्याचा आशय असतो, ‘आता आम्ही सर्वजण आमच्या भावी भाभीच्या बाजूचे आहोत’. मग वधू पित्याकडे वळून तो म्हणतो, ‘सर या विवाहासाठी आम्ही आपल्या अनुमतीची विनंती करतो.’ पण हा प्रश्न तो मोठया काव्यमय पध्दतीने सादर करतो. तो म्हणतो, ‘आमच्या मित्राला उद्यानात एक सुंदर पुष्प दिसले. ते सध्या तुमच्या घरी आहे. आपल्या सर्वांची संमती असेल तर आमच्या मित्राला आवडलेले पुष्प आम्हाला हवे आहे’. मुलीच्या नातलगांनी वराची माहिती अगोदर काढून ठेवलेली असेल व सर्व ठीकठाक असेल तर मग सर्वजण मोठ्या खुशीत मद्यसेवन करतात. मद्याचा स्वीकार झाला म्हणजे काम फत्ते आणि परवानगी मिळाली ! मग लगेचच शुभमंगल तयारी जोरात चालू.  मुलाची माहिती अगोदर नसली तर मुलीचे नातलग थोडा अवधी मागून घेतात.

नायजेरियाः एकदा विवाह नक्की झाला की ही आनंदाची बातमी मोठ्या खुशीत म्हणजे गायनाने सर्वांना कळवायची असते. नवऱ्या मुला-मुलीला मग एकमेकांना खुशाल निवांतात भेटण्याची परवानगी. प्रत्यक्ष लग्नविधीत गाणी, नृत्य असते व त्यात चमचमीत मेजवानीला खास महत्त्वाचे स्थान असते. नवऱ्या मुलीसाठी खास बनविलेल्या जवळच्या झोपड्यात तिने राहायचे. त्यावेळी नवरदेवाला मात्र प्रथम प्रवेशाची परवानगी नाही. त्याने सर्व वऱ्हाडी मंडळीना कोंबडीची मेजवानी खायला घालायची व त्यानंतर तंबाखू वाटायची. मग त्याला वधूला भेटण्याची परवानगी मिळणार. मग शास्त्रोक्त पध्दतीने विवाह लागणार. दुसऱ्या दिवशी वधूच्या सुख समृध्दीसाठी बोकड कापण्याचा समारंभ असतो. बोकडाचे रक्त झोपडीच्या उंबरठ्यात शिंपण्यात येणार. मग मुलीची आई झोपडीत येऊन मुलीला विचारणार, ‘मुली, सर्व तुझ्या मनासारखे घडतेय ना?’ मग मुलगी उत्तरते, ‘होय, आई मी खूप सुखी आहे’. खरं म्हणजे हे वाक्य मुलीकडून ऐकले की जगातली कोणतीही आई किती सुखावत असेल ! होकार मिळाल्यावर मगच नवरोजीना झोपडीत प्रवेश करण्याची परवानगी मिळणार व नृत्यगायन व विवाह समारंभ संपन्न होणार. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विवाहानंतर यजमानांनी पत्नीला सर्वांसमोर नावाने नावाने हाक मारायची नसते. म्हणजे, ‘‘अग ए, माझे खिशातले पैशाचे पाकिट कुठं दिसत नाही?’’. पत्नी म्हणते, ‘‘काय हो किती गडबडून जाता तुम्ही ! उजव्या खिशात नाही. डाव्या खिशात पहा’’. हा संवाद नेहमीचाच.

झुलू विवाहः या विवाहात कुटुंबांच्या पार्श्र्वभूमीनुसार थोडे फार फरक आढळतात. मात्र विवाह समारंभात नववधू तीन वेळा पोषाख बदलते. हेतू हा की सासरकरांना कळावे, मी कुठल्याही वेषात किती सुरेख दिसते ! विवाहप्रसंगी नेहमीचा श्र्वेत पोषाखच असायला पाहिजे असा काही नियम नाही. पण हल्लीच्या मुलींचा पांढरा वधू-पेहराव असतो. विवाहाचा शपथविधी समारंभ चर्चमध्ये होतो. चर्चसमारंभानंतर मेजवानी पार्टी होते ती नवऱ्या मुलाच्या घरी. वधू पारंपारीक पोषाख घालते. मेजवानीचा खर्च मात्र वधू पक्षाने करायचा. नंतरचा पारंपारीक झुलू नृत्य समारंभ वरपक्षाने आयोजित करायचा. त्यात मात्र खूप डामडौल असायला पहिजे. कारण वरपक्षाला दिमाखाने दाखवायचे असते, ‘हम भी कुछ कम नही ‘. या समारंभात मग गाय कापतात. याचा लाक्षणिक अर्थ असतो, ‘आम्हाला भाभी आवडली आणि आम्ही तिचा स्वीकार करतो’. यावेळी नवरी मुलगी कापलेल्या गाईच्या पोटात पैसे ठेवते. याचा अर्थ असतो, ‘पहा, मी आता तुमच्या घरी आले व तुमची झाले’. आता वधू सासरच्या सर्वांना ब्लॅंकेट भेट देते. या चालिरीतीला ‘उक्वाबा’ म्हणतात. परलोकवासी झालेल्या सासरच्या नातलगांच्या नावानेही त्यावेळी भेट मिळते. सर्व सासरकर नव्या भाभीने दिलेली भेट अंगावर घालून सर्वांना दिसेल अशा मोकळ्या परिसरात मिरवत व यथेच्छ उंच स्वरात आनंदात नाचतात.

सोमालियन विवाहः या विवाहातल्या चालिरीती थोड्याफार फरकाने मुस्लीम धर्मातील आहेत. पुरूषाला तिघींशी विवाह करायला मुभा असते. आता तीन बायका झाल्यावर त्यामुळे भविष्यात होणाऱ्या सर्व तापाला सामोरे जाण्याची त्याला तयारी ठेवावी लागते. मुलाला त्याच्या भावी पत्नीचा जन्म होण्याअगोदर तिच्याशी विवाह झाल्याचे जाहीर करावे लागते. त्यासाठी होणाऱ्या उभय पक्षाच्या समारंभात मुलाने भावी सासू-सासऱ्यांना भेटवस्तू द्यायच्या असतात. साधारणतः या भेटीत मुलगा सासऱ्यांना घोडा किंवा तत्सम महागडी वस्तू भेटीदाखल देतो. सासऱ्याने भेट स्वीकारली म्हणजे हा तोंडी करार पक्का झाला असे समजायचे. दुर्दैवाने पुढे लग्न फिसकटले तर मग खटला थेट कोर्टात दाखल होणार. प्रथम एकमेकाला दिलेल्या भेटवस्तू परत करायच्या असतात. किंवा लग्नाअगोदर मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावली तरीही भेट एकमेकांना परत करायचे ठरते. याशिवाय थोडीफार रक्कमही द्यायची असते. आणखी एक सवलत म्हणजे मुलगी तयार असेल तर ती मुलाच्या अन्य नातलगाशीही विवाहबध्द होऊ शकते. प्रत्यक्ष विवाहात इस्टेट मालमत्ता एकमेकांना देण्याची प्रथा आहे. मात्र मुलीला अन्य नातलग पसंत पडला तर सर्व भेटवस्तू परत करायचे ठरते आणि मग ती त्याच्याशी विवाह करायला मोकळी.

आफ्रिकेतील चालिरीतींचे मराठी मंडळींना फार आश्र्चर्य वाटायला नको. मराठी विवाह चालिरीतींची जंत्री बघा. साखरपुडा, केळवण, हळदी, सीमान्त पूजन, गौरीहार पूजा, मंगलाष्टका, कन्यादान, सप्तपदी, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश – तोच थाट, भपका, तेच लाडक्या वहिनीचे स्वागत, तसेच मामंजी, सासूबाई, वन्सं, भावोजी हे तर आलेच पण तिच्या माहेरकरांचाही आदर सन्मान. हे सर्व त्या सुमधूर भावगीतात प्रतिबिंबीत झाले. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ ते प्रत्यक्ष लगीन लागताना ‘सांग कुणी ग अंगठीत या नाजुक दिधला खडा? वधू लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा’. कोणत्याही मराठी वहिनीला स्मृती-मंजुषेतील या आठवणींवर मग जन्मभर जगता येतं.

असं म्हणतात, ‘लग्नं स्वर्गात लागतात’. पण हे सपशेल चूक ! लग्नाच्या वेळी स्वर्गच आकाशातून उतरून पृथ्वीवरच्या प्रत्येक देशात हजर होतो.

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.

त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..