जहाजाचे रात्री दोन अडीच च्या सुमारास कधीतरी डिपार्चर झाले होते. रात्री लोडींग मुळे 8 ते 12 चा वॉच संपवून केबिन मध्ये गेल्या गेल्या लगेच झोप लागली होती. रात्री जहाजाचे जेटीवरून निघताना इंजिन मुव्हमेंटमुळे आणि टग बोट ने जहाजाला खेचतानाचे धक्के जाणवले होते पण झोप एवढी आली होती की थोड्या वेळाने इंजिन फुल्ल स्पीड मध्ये जा ताना जाणवणारे व्हायब्रेशन आणि हादरे पण कळले नाहीत. सकाळी सात वाजता अलार्मच्या आवाजाने जाग आली होती उठून पोर्ट होल बाहेर पाहिलं तर भूमध्य समुद्राचे शांत पाणी दिसत होतं. शांत पाण्याकडे शांतपणे बघता बघता फोन ची रिंग आल्यावर सव्वा सात वाजले असल्याची जाणीव झाली. जुनियर इंजिनियर असताना चार ते आठ वॉच मध्ये वेक अप कॉल नंतर पंधरा मिनिटांनी अलार्म असायचा. पण फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोशन झाल्यावर वेक अप कॉल च्या अगोदर पंधरा मिनिटं अलार्म लावायची सवय झाली होती.पहाटे चार ते आठ वॉच मधल्या मोटरमनने गुड मॉर्निंग बोलून फोन ठेवेपर्यंत सकाळी सकाळी दहा पंधरा मिनटं समुद्र, क्षितिज, पाणी आणि या सर्वांवर पडलेली सूर्यकिरणं बघता बघता आळस उडून गेला होता. शनिवार असल्याने जहाजावरील लाईफ बोट इंजिन्स ट्राय आऊट, फायर अलार्म टेस्टिंग तसेच महिना अखेर असल्याने लुब ऑइल आणि केमिकल्सची इन्व्हेंटरी घ्यायची होती. जहाजावर बॉयलर आणि इंजिन मध्ये अँटी रस्ट तसेच अँटी स्केलण्ट आणि सफाई साठी लागणारी अत्यंत धोकादायक केमिकल्स असतात त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली किंवा केमिकल स्टोर रूम असते. जवळपास अर्धा तास तरी महिनाभरात किती आणि कोणते केमिकल संपले याचा हिशोब करण्यासाठी केमिकल रूम मधील उग्र वासामध्ये थांबावं लागणार होतं. सकाळी केमिकल स्टोर चा दरवाजा उघडून व्हेंटिलेशन फॅन चालू करायला जुनियर इंजिनियरला सांगितले होते. सगळी केमिकल वीस वीस लिटर च्या ड्रम मध्ये असल्याने हिशोब करायला फारसा त्रास होत नाही. काही मोटरमन एखाद लिटर केमिकल पाण्याच्या बॉटल मध्ये भरून ठेवतात सारखं सारखं केमिकल स्टोर मध्ये जाऊन वीस लिटर च्या कॅन मधून थोडं थोडं काढायला लागतं म्हणून. रात्री एका मोटरमन ने असंच पाण्याच्या बाटलीत एक जहाल केमिकल भरले तो ते केमिकल नेहमी जिथे तिथे ठेवायला चालला होता पण तेवढ्यात इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोनची रिंग वाजली त्यामुळे त्या बाटली सह तो कंट्रोल रूम मध्ये गेला. केमिकल असलेली ती बाटली त्याच्याकडून कंट्रोल रूम मध्ये राहिली. इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेली ती बाटली पाण्याची आहे असे समजून पहाटे चार वाजता आलेल्या जुनियर इंजिनियर ने पाणी गरम करण्याच्या इलेक्ट्रिक केटल मध्ये बाटली उपडी करून केटल ऑन केली व तो कंट्रोल रूमच्या बाहेर गेला. सेकंड इंजिनियर कॉम्प्युटर मध्ये त्याचे मंथ एन्ड पेपर रेडी करत होता.
कंट्रोल रूम मध्ये केमिकलचा वास यायला लागल्यावर सेकंड चक्रावला की अचानक एवढा वास कुठून येतोय, बघतो तर केमिकलच्या वाफाआणि केमिकल इलेक्ट्रिक केटल बाहेर पडून सर्किट मध्ये गेल्याने शॉर्ट सर्किट होऊन केटल निकामी झाली होती. जुनियर इंजिनियरला बाटली ओतत असताना केमिकलचा वास कसा आला नाही विचारले तर तो म्हणाला मी केमिकल स्टोर उघडून आलो होतो म्हणून माझ्या नाकात तोच वास भिनला होता म्हणून कळलं नाही. जहाजावर स्पेअर इलेक्ट्रिक केटल नव्हती त्यामुळे पुढील पोर्ट येईपर्यंत सगळे जण टी ब्रेक कोल्ड कॉफी किंवा कोल्ड टी पिताना जुनियर इंजिनियर आणि मोटरमनला हसायचे. एका जहाजावर तर एका मोटरमन ने पाणी समजून केमिकलचा घोट घेतला होता, ते केमिकल खरं तर ऍसिडच होत पण जास्त कॉन्सट्रेटेड नसल्याने तोंडाला गंभीर इजा नाही झाली. केमिकल वीस लिटर च्या ड्रम मधून काढताना अंगावर उडणे किंवा डोळ्यात जाण्याचे प्रकार होऊन कोणा कोणाला तर डोळे गमावण्याची पण वेळ आलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे केमिकल वापरले जाते अशा ठिकाणी गॉगल व रबर ग्लोव्ह ठेवलेले असतात. तरीसुद्धा केमिकल मुळे होणारे अपघात काही कमी होत नाही कारण एकच दोन तीन लिटर तर काढायचय वापरायला म्हणून कोणी पर्सनल सेफ्टीचा आळस करून शॉर्ट कट मध्ये कामं करायला जातात. दीड दिवसानंतर जहाज इटलीच्या नेपल्स या बंदराकडे जाण्यासाठी इटलीच्या सिसिली बेटाला वळसा घालून जाण्याऐवजी अंतर कमी करण्यासाठी सिसिली बेट आणि इटली यांच्या मधील सामुद्रधुनीतून जाणार होतं. संध्याकाळी आठ वाजता वॉच मध्ये जावे लागेल म्हणून दुपारी बारा वाजता सुट्टी मिळाली होती. संध्याकाळी चार च्या सुमारास पोर्ट होल बाहेर बघितलं तर क्षितिजावर निळ्या आकाशाच्या आणि निळ्या पाण्याच्या मध्ये लहान मोठ्या टेकड्या दिसायला लागल्या होत्या. जसजस जहाज पुढे सरकत होतं तसतशा टेकड्या मोठ मोठ्या दिसायला लागल्या होत्या. तासाभरात दोन्ही बाजूनी टेकड्या आणि मधून मोठ्या नदीसारखा समुद्राचा प्रवाह. जहाज एखाद्या खिंडीत प्रवेश करत आहे असे वाटायला लागलं होतं. केबिन बाहेर येऊन डेकवर उभं राहून मसिना स्ट्रेट चे सौंदर्य डोळ्यांनी अधाशीपणे बघायला लागलो. भूमध्य समुद्रातील इटलीचा भूभाग आणि इटालियन बेट असलेल्या सिसिली प्रांत यांच्या मध्ये असणाऱ्या सामुद्रधुनीतुन पहिल्यांदा जात होतो. दोन्ही बाजूला टेकड्या कुठे लहान तर कुठे मोठ्या. त्यावर फारशी हिरवळ किंवा झाडी दिसत नव्हती. पण एखाद्या विशाल नदी जशी उंच डोंगर रांगांमधून वाहताना दिसत असेल तसा समुद्र या टेकड्यांमध्ये असल्याचा भास होत होता. इस्तंबूलमध्ये किनाऱ्याचा बाजूला रेस्टॉरंट व बंगले किंवा किल्ले आहेत पण इथे तसं काही दिसत नव्हते. दोन्ही बाजूने टेकड्या आणि टेकड्यांच्या कात्रीत सापडलेला निमुळता व चिंचोळा झालेला समुद्र, आणि त्यालाच कापत आमचं जहाज वेगाने पुढे पुढे जात होत. एक दोन ठिकाणी नागमोडी वळणं घेत घेत जहाजाने मसिना स्ट्रेट ओलांडली. सूर्याची सोनेरी किरणं लाटांवर तरंगायला लागली होती. संध्याकाळ झाली असल्याने समोर क्षितिजावर तांबूस आभाळ सोनेरी पाण्याला भिडलेले दिसत होतं. मसिना स्ट्रेटच्या टेकड्या मागे पडत चालल्याने लहान लहान दिसू लागल्या होत्या.
जहाजावर हाय स्पीड डिझेल आणि मरीन गॅस ऑइल हे डिझेलचेच दोन प्रकार लोड केलेले होते. पेट्रोल, डिझेल, नाफ्ता किंवा रॉकेल अशा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स ना व्हाईट ऑइल बोलले जाते. जवळपास चाळीस हजार टन ऑइल कार्गो जहाजाच्या 95% क्षमतेपेक्षा किंचित थोडे जास्त लोड केले गेले होते. फुल्ल लोड आणि फुल्ल स्पीडने जहाज निघाले होते. केबिन मध्ये फोनची रिंग वाजली सेकंड इंजिनियर बोलला आठ च्या वॉच ला येऊ नकोस इंजिन रूम अन मॅन्ड करतोय तू फक्त रात्री दहा ते अकरा राऊंड घेऊन पुन्हा अन मॅन्ड कर.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply