फार पूर्वी पुलंनी एक प्रश्न विचारला होता ‘तुम्हाला कोण व्हायचे मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर‘. हल्लीच्या मराठी माणसाने घेतलेली गरुडझेप बघता तोच प्रश्न असा विचारावा लागेल ‘तुम्हाला कोण व्हायचे लंडनाइट, न्यूयॉर्कर की कॅलिफोर्नियन‘. भारतापुरताच विचार करायचा झाला तर ‘तुम्हाला कोण व्हायचे बंगलोरीयन, दिल्लीवाले की हैद्राबादी‘ असे विचारावे लागेल. मराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच. आता अनुभव काय फक्त पुण्यातच येतात का? ते इतर शहरात सुद्धा येत असतात. पण पुण्यातला अनुभव म्हटला की तो ऐतिहासिकच असतो. पुणे म्हटले की इतिहास आणि संस्कृती आलीच. पुण्याच्या चौकाचौकात संस्कृती उभी आहे आणि पुण्याच्या गल्लीगल्लीत इतिहास दडलेला आहे. उसळ असो की मिसळ पुण्याची म्हटली की ती सांस्कृतीक असते. पुणे आणि इतिहास याचा संबंध तर I eat english, I drink english च्या जागी फक्त इतिहास टाकावा असा आहे. I eat history, I drink Hisoty म्हणता येइल इतके हे ऐतिहासिक शहर आहे. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये म्हणतात तसेच पुण्यात राहून इतिहासात नापास होउ नये.
मुंबईपासून गोव्यापर्यंत कोणत्याच फिश मार्केट मधे कधीच कुणीच, कुणाशीही प्रेमाने बोलत नाही. तसे बोलले असते तर गोंधळ सदृष्य परिस्थितीला कोणी मासळीबाजार म्हटले नसते. पापलेटतल्या काट्यापेक्षाही काटेरी संवाद मासे विकनारी मावशी आणि गिऱ्हाइकात सुरु असतात. असा वाद फार तर एखादा किस्सा होइल पण तो ऐतिहासिक अनुभव होत नाही त्यासाठी तो अनुभव पुण्यातलाच असायला हवा. पुण्याची ख्यातीच तशी. पुणे शहरावर विनोद बंद असे म्हटले तर कितीतरी विनोदवीर फुकट मरतील. भरमसाठ व्हॉटसअॅप यायचे कमी होतील. समजा तुम्ही तुमच्या आगाढ अज्ञानातून जगातल्या कुठल्याही मंडईत संत्र्याला मोसंबी समजून. मोसंबी कितीला दिली असे विचारले तर तो दुकानदार नागपुरातला असू द्या नाहीतर पुण्यातला तो ओरडूनच सांगनार, ‘ओ साहेब ती मोसंबी नाही संत्रा आहे तो.‘ पुण्यात जर असा अनुभव आला तर तो वेगळ्या प्रकारे सांगितल्या जाणार. मी त्याला विचारले मोसंबी कितीला दिली तर त्याने लगेच पाटीकडे बोट दाखविले. “हे संत्र आहे मोसंबी नाही तेंव्हा मोसंबीचा भाव विचारुन आपल्या आज्ञानाचे जाहीर प्रदर्शन करु नये.” मग आधुनिक बखरकार म्हणजे हल्लीचे व्हॉटसइप फॉरवर्डवाले हि गोष्ट काही मिनिटात जगभर पसरवितात. अशी ही पुण्याची गंमत आहे. ते स्थानमाहात्म वगेरे काय म्हणतात ना ते हे. या स्थानमाहात्म्याचा प्रत्यय पुण्यात पाय ठेवल्याशिवाय येत नाही.
पुण्याच्या स्थानमहात्म्याविषयी मी बरेच ऐकले होते तेंव्हा आयुष्यात एकदा तरी पुण्यनगरीला भेट द्यायचीच अशी माझी तीव्र इच्छा होती. पुण्यातले टांगे, पुण्यातले दुकानदार, डोक्यावर रुमाल बाधल्याने अतिरेकी वगैरे वाटनाऱ्या पुण्यातल्या दुचाकीवरील मुली या सर्वांचे किस्से इतके वाचले होते की मी शरीराने नाही पण मनाने पुण्यातच राहतोय असे वाटत होते. पुणे शहेर बघायचेच होते. शहर बघण्याचा योग मात्र ९६ साली आला. पुण्यातल्या भाषेत सांगायचे झाले तर माझा पुण्यनगरीशी दोन हात करण्याचा पहीला प्रसंग इसवी सन ९६ साली आला. फक्त आठ दहा तासाचाच वेळ होता. मी ऑफिसच्या काही कामानिमित्त्याने गोव्यात गेलो होतो. परतताना व्हाया पुणे यायचे होते. गोव्यावरुन येनारी बस सकाळी पुण्यात पोहचत होती आणि पुण्यावरुन नागपूरची बस संध्याकाळी होती. तेंव्हा या मधल्या वेळातच मला पुण्यदर्शनाचे पुण्य मिळवायचे होते. मराठी माणूस कुठलाही असू दे म्हणजे अगदी सॅन डियागोपासून ते सिरोंचा पर्यंत मराठी माणसाचे कुणी ना कुणीतरी पुण्यात हमखास असतेच. तुम्ही पुण्यात जात आहात म्हटल्यावर त्यांचे काही ना काही तरी काम हे निघतेच. या नियमाला धरुनच मलाही काही कागदपत्रे पुण्यातल्या एका पत्त्यावर पोहचवायचे काम मिळाले. तसाही मला वेळ घालवायला काहीतरी कारण हवेच हाते. मी पत्ता घेतला, रीक्षेवाल्याला दाखवला, त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने बघत विचारले.
“येरवड्याला जायचे आहे?”
मी मानेनेच हो म्हटले. त्यानंतर सुरु झाला तो आमचा येरवडा दर्शनाचा कष्टप्रद प्रवास. दाही दिशा फिरने वगेरे म्हणतात ना अगदी तसा. साऱ्या बाजूनी येरवडा बघून झाला होता परंतु ती सोसायटी काही सापडत नव्हती. रिक्षेवाला एकच सांगत होता साहेब हा बघा येरवडा विचारा ती सोसायटी कुठे आहे ते. बघून बघून तो येरवडाच किती वेळ बघायचा हो, शेवटी रिक्षेवालाच मला म्हणाला
“साहेब ते पेपरच द्यायचे आहेत ना पोस्टात टाकून द्या, मी तुम्हाला जीपीओत नेउन सोडतो.”
असा येरवडा दर्शनाचा दीडशे रुपये चार्ज लावून त्याने मला जीपीओ समोर सो़डले, मी ती कागदपत्रे पोस्टाच्या डब्ब्यात टाकून सुटकेचा निश्वास सोडला. आश्चर्य म्हणजे दोन तास फिरुन आम्हाला न सापडलेली ती सोसायटी त्या पोस्टमनला बरोबर सापडली. कागद पत्र मिळाल्याचा रीतसर फोन सुद्धा आला. माझे पक्के मत बनले ‘काय ते पुण्यातले रिक्षेवाले यांना एक साधा पत्ता शोधता येत नाही.‘ नशीबाने मी आणि पुणे हे प्रकरण तिथेच संपनारे नव्हते. पुण्याशी संपर्क येतच गेला. जेंव्हा पुणे समजायला लागले तेंव्हा माझ्या लक्षात आले अरे तो रिक्षेवाला तर भयंकर हुशार होता, मूर्ख तर मी होतो. तो पत्ता वाचून पुण्यातल्या दहा वर्षाच्या पोराने सुद्धा मला मूर्ख ठरविले असते. तो पत्ताच तसा अफलातून होता
… सोसायटी, नळ स्टॉप, येरवडा पुणे.
बोला आता कोण मूर्ख आहे ते. अहो नळ स्टॉप हे जगविख्यात ठिकाण जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी आहे. जस ग्रँड कॅनियन एकच आहे, चीनची भिंत एकच आहे, ताजमहाल एकच आहे तसेच जगाच्या पाठीवर नळ स्टॉप सुद्धा एकच आहे. नळ स्टॉप या नावाचे किंवा या नावाशी साधर्म्य असनाऱ्या Tap point वगेरे सारख्या नावाचा सुद्धा जगात कुठल्याच भौगोलिक स्थळाशी संबंध येत नाही. पुण्याला उच्च असा सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा आहे म्हणून नाहीतर ताजमहालवरुन जसे आग्रा ओळखल्या जाते तसेच नळ स्टॉपवरुन पुण्याला ओळखल्या गेले असते. पुढे कुणी बकरा असा अज्ञानाने कापला जाउ नये म्हणून सांगतो हे एकमेवअद्वितिय ठिकाण पुण्यात येरवड्यात नाही तर ‘येरवंडण‘ या भागात आहे. तो पत्ता लिहून घेण्यात माझी चूक झाली होती. खर म्हणजे नळ स्टॉप येवढेच पुरे आहे पुढे काय आहे याची किंमत चेकवरील दशांश टिंबानंतर लिहिलेल्या आकड्यांसारखी आहे. काही अर्थ नाही.
लग्नानंतर पुण्यात मुक्कामालाच यावे लागले. मुंबईतल्या गर्दीत लोकलमधे जागोजागी लटकनारा हात हातात घेउन सात पावल चालनार नाही अशी बायकोने भीष्मप्रतिज्ञा वगेरे केली होती की काय माहीत नाही. लग्न जमले तेंव्हा मी मुंबईला होतो परंतु डोक्यावर अक्षता पडायच्या आतच मला पुण्यात नोकरी मिळाली. पुण्यात आल्यावर सुरु झाली ती घर शोधायच्या निमित्ताने शोधाशोधीची दिवाळी, दसरा, होळी. माणूस मुंबईच्या बाहेर पडला की पहिला प्रश्न पडतो एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर कसे जायचे. लोकल व्यतिरीक्त इतरही दळवळणाची साधन असतात हे विसरलच असत. लोकल नाही, सिटी बस हवे तिथे जात नाही. मुळात सिटी बस ही शहराच्या कानाकोपऱ्यात गेलीच पाहीजे असा काही कायदा नाही. परत रीक्षा स्टँड चा शब्दशः अर्थ घेतल्याने रीक्षेवाले फक्त एका ठिकाणावर उभे राहण्यात धन्यता मानतात. हा सारा त्रास भोगत असताना ते पुण्यातले पत्ते वैताग आणतात. ‘घर नं १४, भांडारकर रोड पुणे‘, तो भांडारकर रोड म्हणजे काय सदाशिव पेठेतली गल्ली आहे का, शनवारवाड्यातले दालन, तो भांडारकर रोड एफसी रोडपासून ते लॉ कॉलेज रोडपर्यंत चांगला दोन ते तीन किलोमीटर लांब रोड आहे. तेंव्हा बसमधून फिरनाऱ्या माणसाने नक्की कुठे उतरायचे. पुण्यात फिरनारे सारे दुचाकीवरुनच फिरतात अशा समजूतीतूनच पत्ते लिहिले असतात. कितीतरी वेळा मी डेक्कनला उतरुन कोथरुडपर्यंत पायपीट केली. एकदा भुसारी कॉलनीत एका आजोबांना पत्ता विचारला. त्यावेळेला भुसारी क़ॉलनी यथातथाच होती. नुकताच पाउस पडून गेल्यामुळे रस्ता वगेरे जवळ जवळ नाहीसा झाला होता. सर्वत्र चिखल होता. त्यात जपून पावले ठेवत आणि मनातल्या मनात ‘जपून चाल जपून चाल‘ असे गुणगुणत मी चाललो होतो. काकांनी बरोबर जागी आणून सोडले आणि निरोप घेताना विचारले
“तुमची ती डोंबिविली सुधारली की नाही की अजूनही तशीच आहे.” याला म्हणतात कॉन्फिडंस हे पुण्यात बसून आर्मस्ट्रॉंगला सांगतील चंद्रावर डाग नक्की कुठे आहे ते. असा आत्मविश्वास सापडणे नाही.
पत्ता सांगण्याचा आणखीन एक दिव्य अनुभव लग्न झाल्यानंतर आला होता. बायकोचे कुणी नातेवाइक कर्वे नगरला राहत होते. त्यांच्याकडे जायचे होते. एक मुलगी तिकडन पत्ता सांगत होती. वय वर्षे अठरा पण बाणा जीना यहा मरना यहा येही मुळा येही मुठा वगैरे टाइपचा.
“तुम्ही कुठे राहता?”
“युनिव्हर्सिटी रोडला ते नवीन इ स्क्वेअर झाले ना त्याच्यामागे“
“अच्छा! तुम्हाला मग शिवाजीनगर माहीत असेलच ना?”
“हो“
“तिकडे नाही जायचे, एफ सी रोडने डेक्कनला यायचे. डेक्कनवरुन सरळ कर्वे रोडने यायचे, पौड रोडचा पूल लागतो, तो पूल नाही चढायचा खालूनच यायचे. तो रोड सरळ कोथरुडला जातो तिकडे नाही जायचे, डावीकडे वळायचे. सरळ आल्यावर ब्रीज लागेल तिकडे नाही जायचे.”
असे बराच वेळ ती तुम्हाला हे दिसेल ते दिसेल पण तिकडे जायचे नाही असे सांगत होती. शेवटी मी तिला म्हटले
“मला कर्वे नगर कुठे आहे ते माहीत आहे फक्त तुमच्या सोसयटीचे नाव दे मी शोधून घेइन.”
लग्न झाले, संसार थाटायला लागलो काही दुकानांच्या चकरा वाढल्या … हो तुळसीबागेतल्या दुकानांच्या. तुळसीबाग म्हणजे संसारपयोगी वस्तूंचा खजिना आहे. तुमचा संसार कुठलाही असू द्या आफ्रिकन, इटालियन, अमेरीकन, कोल्हापुरी किंवा पंजाबी, तुमच्या संसाराला लागनारी प्रत्येक वस्तू तुळसीबागेत सापडते म्हणजे सापडते. तुळसीबागेत सापडत नाही अशी संसारपयोगी वस्तू दाखवनाऱ्याचा तुळसीबाग विक्रेता संघाकडून शंभर शंभरच्या दहा नोटा देउन सत्कार करण्यात येइल अशी योजना तुळसीबागवाले राबवतात की काय अशी शंका येते. तुळसीबागेची ही ख्याती बऱ्याचदा ऐकल्याने माझ्यासाठी वस्तू सापडने ही समस्या नव्हतीच परंतु समस्या होती ती भाषेची. तुम्ही म्हणाल तुम्ही मराठी आहात तरी भाषेची समस्या का? कारण मला पुण्याची भाषा येत नव्हती.
“अहो गंजी आहे का?” मी विचारले. मी तुळशीबागेत येउन गांजा विचारतोय असे मोठे डोळे मोठे करुन तो दुकानदार बघत होता. दोन तीन दुकानात तेच. एका दुकानात तर दुकानादाराने चक्क स्वतःच्या अर्ध टकलावरुन हात फिरवून हा हिंदीसारख मराठी बोलनारा माणूस आपल्याला गंजा तर म्हणत नाही ना अशी खात्री करुन घेतली.
“गंजी, छोटा गंज.” असे म्हटल्यावर त्याने दहा माणसाचा भात मांडायला लागतो त्या साइजचा गंज दाखविला.
“अहो इतका मोठा नाही हो, दूध वगैरे तापवायला लागतो ना त्या साइजचा हवा.”
“मग पातेल म्हणा न गंज काय म्हणता.” आता पातेल हा शब्द माहीत नव्हता असे नाही. पण त्या दुधाच्या गंजीला पातेल वगेरे म्हणायचे म्हणजे माझ्यासाठी रात्री उगाचाच केकाटनाऱ्या कुत्र्याला श्वानाचे अरण्यरुदन म्हणण्यासारखे होते. मला चांगलाच धक्का बसला. तशीच गंमत सराट्याची, उलथन काय. आम्ही तर तो सराटा उलथण्याव्यतिरीक्त दरवाजाची कडी अडकवण्यासाठी सुद्धा वापरतो. वरणाला पुण्यात आमटी म्हणतात आणि आमटीला विदर्भात वरण म्हणतात हे महाराष्ट्रातच काय महाराष्ट्राच्या बाहेरील दुकानादाराला सुद्धा पक्के ठाउक आहे तरीही वरण म्हणताच पुण्यातला दुकानदार चमकतोच. मनात म्हणत असेल बरा बकरा सापडलाय आज. उपवासाला उसळ द्या म्हटल तर पुण्या मुंबईतल्या हॉटेलातला वेटर आ वासून बघतो आणि उपवासाला खिचडी खाल्ली म्हटली तर नागपूरातले हसतात. बाकी विदर्भात कोथींबीरीला सांबार का म्हणतात हा खरच इतिहास संशोधनाचा विषय आहे. हिंदीत धनिया आणि तेलंगणात कोथींबिरे मग सांबार कुठुन आला हे आजवर न उलगडलेल कोड आहे. अशीच गंमत सांडशी, झाडणी, खराटा, फडा हे सारे शोधताना आली. बर झाल हल्लीच्या संसारपयोगी वस्तूंमधून ते पेंचीस, पेचकस, कुऱ्हाड, सब्बल बाद झाले नाहीतर सब्बल म्हणजे पहार हे समजवायला दुकानातच खड्डा खोदावा लागला असता.
नुसते शब्दच नाही तर वाक्यप्रचारांचीही अशीच गंमत. आम्ही दोन दिवस बाहेरगावी गेलो होतो. आल्यानंतर सकाळीच एक काकू ओरडत आल्या.
“अहो तुम्ही गावाला जात आहेत ते सांगायचे ना, तुमचे दुधाचे पॅकेट अंगावर पडले ना आमच्या.”
मी आणि बायको दोघेही गप्प. आता ही बाई कुठल्या मजल्यावर राहते. ते पॅकेट तिच्या अंगावर कसे पडले तेंव्हा ही नेमकी कुठे उभी होती. दूधवाल्याने पॅकेट कुठुन फेकले की ते बरोबर हीच्याच अंगावर पडले. कुठल्या अँगलने पॅकट फेकले तर ते दोन किंवा तीन मजले खाली जाउन पडेल. असे सारे प्रश्न मला पडले. न्यूटनचे सारे नियम वापरुन बघत होतो पण काही अंदाज येत नव्हता. मी भूमिती, भूगोल, भूगर्भशास्त्र आणि अजून काय काय एकत्रित करुन विचार करीत होतो पण उत्तर काही सापडत नव्हते. मुख्य म्हणजे आम्ही गावाला जातो हे सांगितल्याने काय फरक पडनार होता. गावाला जाताना सोसायटीत दवंडी पिटवून जायची असा काही नियम आहे का? नवीन लग्न, नवीन संसार दिसतो तेंव्हा अनुभवाची कमी आहे असा विचार करुन ती बोलली.
“आता झाले ते झाले पुढे लक्षात ठेवा.” मग मलाही धीर आला.
“नक्की सांगू काकू, त्या दूधवाल्या पोराला पण सांगू.”
“त्याला सांगितले तरी चालेल माझाच मुलगा आहे तो.”
आता मात्र चाट पडायची वेळ होती. तुमचाच मुलगा आहे तर त्याला सांगायचे ना व्यवस्थित पॅकेट टाकायला, आम्हाला टवंडी पिटायला कशाला सांगता असा विचार मी करीत होतो. मी हा प्रसंग माझ्या मित्राला सांगितला मग त्याने सांगितले की अरे त्यांना त्या पॅकेटचा भुर्दंड पडला असे म्हणत होत्या त्या. तेंव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी त्या दूधाच्या पॅकेटचे पैस देउ केले पण त्यांनी घेतले नाही. त्यानंतर पुण्यातच काय इतरत्र कुठेही गावाला जायचे असेल तर आम्ही पेपरवाल्याला, दूधवाल्याला आवर्जून सांगतो.
When you are in Rome be like Romans या तत्वानुसार आम्ही हळूहळू पु्ण्याशी जुळवुन घ्यायला शिकलो आणि पुणे आवडायला लागले. मुंबईत जसे लोकल जमायला लागली की मुंबई आवडायला लागते तसे पुण्याचे आहे एकदा दुचाकी घेतली की पुणे आवडायला लागते. शहर आवडणे किंवा न आवडणे हे तुम्ही शहरात कितपत मोकळे भटकू शकता यावर अवलंबून असते . एकदा भटकायला लागलो की आवडीच्या जागा सापडायला लागतात मग शहर आपलस होउन जात. मलाही जे एम रोड, चतुःश्रुंगी हा परीसर, वैशालीच नाही तर इतरही खाण्याची दुकान, अॅमरोसिया, सर्जा, वगेरेचे जेवण सारेच आवडायला लागले. काहीच नाही जमले तर शनिवार रविवार पुण्याबाहेर भटकायला जायचे. कधी सिंहगडावर जायचे, पिठली भाकरी खायची. रस्ते काय आणि ट्रफिक काय सर्वत्र सारखेच असते. माझ्यासाठी तसेही नवीन लग्नाचे दिवस होते त्यामुळे साऱ्या वेदना गोडच वाटायच्या. पण पुणे जास्त दिवस नशीबात नव्हते वर्ष सव्वा वर्षात पुणे सोडायची वेळ आली
आणि मी परत पुण्यातला पाहुणा बनलो.