नवीन लेखन...

म्हातारा न इतुका

मी लहानपणी इंग्रजी चित्रपट पाहिले ते जाड्या-रड्या व चार्ली चॅप्लीनचे! ते कृष्णधवल, मूकपट असायचे. दहावीनंतर मी इंग्रजी मॅटीनी पाहू लागलो. तेव्हा मला काऊबाॅईजचे चित्रपट फार आवडत असत. चार्ल्स ब्राॅन्सनचा ‘रेडसन’, क्लींट ईस्टवुडचा ‘दी गुड दी बॅड ॲ‍ण्ड दी अग्ली’, जाॅन वेनचा ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ असे अनेक चित्रपट पाहिले. त्यातील दगडी कोळशावर चालणारी रेल्वे व ग्रॅंड कॅनियन येथील उंच सुळके असणाऱ्या भव्य डोंगरदऱ्यांचं मला फार आकर्षण होतं.

या काऊबाॅईज कलाकारांमधील माझा आवडता हिरो, क्लींट ईस्टवुड! तोच सडपातळ बांध्याचा, ताडमाड उंचीचा, बारीक डोळ्यांचा व हसताना गालावर तीन खळ्या पडणारा क्लींट, ९२ वर्षांचा झालेला आहे!

१९८० च्या दशकात काऊबाॅईजवरील चित्रपट इतिहासजमा झाले होते. नंतर नवनवीन विषयांवरचे असंख्य चित्रपट येत राहिले. २००० मध्ये महाराष्ट्र टाईम्सच्या एका पुरवणीत ‘द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी’ या चित्रपटावरील लेख माझ्या वाचनात आला. मला ती चित्रपटकथा फार आवडली. तो चित्रपट, मी युट्युबवर शोधून पाहिला.

१९९२ साली राॅबर्ट जेम्स वाॅलर यानं लिहिलेली, त्याच नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीची ९.५ दशलक्षची विक्री होऊन, अल्पावधीतच ‘बेस्टसेलर’ ठरली. १९९४ साली क्लींट ईस्टवुडने त्यावर चित्रपट करायचे ठरविले. ५२ दिवसांच्या शेड्युलच्या, पेपरवर्कनुसार शुटींग सुरु झाले. सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने, दहा दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण झाले. २ जून १९९५ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाने १८२ दशलक्ष डाॅलर्सचा अभूतपूर्व व्यवसाय केला!!

काय होतं अशा या चित्रपटात? तर ही होती, एक परिपक्व गृहिणी व एका फोटोजर्नालिस्टची, तरल प्रेमकहाणी! चित्रपट सुरु होतो तेव्हा नायिकेची मुलं, आई स्वर्गवासी झाल्यावर घरी येतात. त्यांना तिच्या लाॅकरमधून एक मोठं पाकीट हाती लागतं. त्यात एक कॅमेरा, तीन बाऊंडची नोटबुक्स, काही फोटो व नॅशनल जिऑग्राॅफीचे अंक दिसतात. त्यात आईनं एक विनंती केलेली असते की, माझी राख, रोझवुड ब्रिजवरुन विखुरण्यात यावी.

यानंतर चित्रपट वीस वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. नायिका मेरील स्ट्रिप ही आयोवा फार्मवर राहते आहे. तिचा पती दोन्ही मुलांना घेऊन चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेला आहे. एवढ्यात एक फोटोजर्नालिस्ट, ऐतिहासिक झाकलेल्या रोझवुड पुलाचा पत्ता विचारत येतो. मेरीलला ते ठिकाण माहित असतं. ती त्याला तिथे घेऊन जाते. हा क्लींट, नॅशनल जिऑग्राॅफी मासिकाकडून त्या ऐतिहासिक पुलाची,‌ असाईनमेंट करायला आलेला असतो. त्या चार दिवसांत दोघांमध्ये मैत्रीचे धागे जुळतात. दोघेही आपली सुख-दुःख एकमेकांना शेअर करतात. सहवासाचे चार दिवस, फुलपाखरांसारखे भुर्रकन उडून जातात. क्लींट, मेरीलचा निरोप घेऊन निघतो. तो शरीराने जरी दूर गेलेला असला तरी, मेरीलच्या मनात दीर्घकाळ राहतो. क्लींटला तिच्या सहवासाने जीवनाचा आनंद नव्याने मिळतो. तर मेरीलच्या रुटीन जीवनातील या चार दिवसांच्या आठवणी, मोरपिसासारख्या अविस्मरणीय ठरतात.

काही वर्षानंतर मेरीलच्या पतीचे निधन होते. मेरील क्लींटचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत क्लींटने, नॅशनल जिऑग्राफीची नोकरी सोडलेली असते. तीन वर्षांनंतर तो देखील गेल्याचं तिला समजतं. जाण्यापूर्वी त्यानं हे पार्सल तिच्या पत्यावर पाठवलेलं असतं. त्यानं देखील त्याची राख, त्या रोझवुड कव्हर्ड पुलावरुन विखुरण्या संबंधी मृत्यूपत्रात लिहिलेलं असतं. तसं घडतंही.

मेरीलचा मुलगा व मुलगी हे सर्व वाचून निशब्द होतात. व आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करतात. इथं चित्रपट संपतो.

असा हा अतिशय भावनाप्रधान चित्रपट थेट हृदयात पोहोचतो. क्लींट ईस्टवुडची निर्मिती, भूमिका व दिग्दर्शन आपण कदापिही विसरु शकत नाही. त्याला मेरील स्ट्रीपने दिलेली साथ, तेवढीच प्रशंसनीय आहे. आज सत्तावीस वर्षांनीही हा चित्रपट ताजातवाना वाटतो. हे यश आहे, म्हातारा न इतुका, अवघे नव्वदीपार वयोमान. असलेल्या व ९२ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या, ‘द गुड, द बेटर ॲ‍ण्ड द बेस्ट’ अशा क्लींट ईस्टवुडचं!!

पाच ऑस्कर व पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या, क्लींट ईस्टवुडला शतायुषी होण्यासाठी, बुलेटप्रुफ शुभेच्छा!!!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२-६-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..