नवीन लेखन...

मी आणि ‘वपु’

मी दहावीत असल्यापासून लायब्ररी लावून वाचायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा ‘वपुं’चा ‘कर्मचारी’ हा कथासंग्रह हाताला लागला. एका बैठकीत वाचून काढला. वपुंची लेखनशैली आवडली. त्यानंतर त्यांची लायब्ररीमध्ये जेवढी पुस्तकं होती ती सर्व एकापाठोपाठ वाचून काढली.
काॅलेज जीवनात माझे मित्र देखील वपुंचे चाहते होते. त्यांच्याकडून मागून घेऊन मी ‘पार्टनर’ कादंबरी वाचली. एकदा वाचून समाधान झाले नाही, म्हणून पुन्हा पुन्हा वाचली. त्यातील आवडलेली, भावलेली वाक्य डायरीत लिहून ठेवली.
त्यावेळी वर्तमानपत्रात ‘वपु कथाकथन’च्या जाहिराती येत असत. त्यांच्या असंख्य चाहत्यांमुळे प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होतं असे. आम्ही मित्रांनी एकत्र येऊन भरत नाट्य मंदिरात होणाऱ्या त्यांच्या ‘कथाकथन’ ची तिकीटे काढली. साडेनऊचा कार्यक्रम दहा वाजले तरी सुरु झाला नाही. आम्ही सर्वजण गॅलरीत बसून वाट पहात बसलो होतो. तेवढ्यात वपु आले. त्यांनी माईकच्या ताबा घेतला आणि बोलायला सुरुवात केली…
वपुंनी थिएटर हाऊसफुल्ल केलेल्या रसिकांची, यायला उशीर झाल्याबद्दल आधी माफी मागितली. ते सांगत होते…मी आॅफिसमधून सुटल्यावर ताबडतोब टॅक्सी केली आणि पुण्याला निघालो. वाटेत रहदारी तुंबल्यामुळे यायला उशीर झाला. ड्रायव्हरने तेवढ्या गर्दीतूनही मला सुरक्षितपणे इथपर्यंत आणून सोडलं, यांचं त्याला स्वर्गात गेल्यावर नक्कीच ‘पुण्य’ मिळेल.
एकूण चार कथा त्यांनी सांगितल्या, ज्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. तो ‘श्रवणानंद’ मी कधीही विसरू शकत नाही. त्याकाळी वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट भरुन मिळत असतं. मी देखील सोनीची कोरी कॅसेट देऊन भरुन घेतली होती.
वपु मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते. त्यांनी नोकरी सांभाळून ८५ पुस्तकं व देशात- परदेशात कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम केले. त्यांच्या कथा, त्यातली पात्रं ही सर्व साधारण मध्यमवर्गीय होती. त्यामुळेच वाचकांना ती जवळची वाटली. या पत्रांच्या कथा, व्यथा, समस्या मनाला भिडणाऱ्या होत्या. माझ्या वेळची तरुणपिढी वपुंची ‘फॅन’ होती.
त्याच दरम्यान वपुंची ‘ही वाट एकटीची’ ही कादंबरी मला फार आवडली. माझे आदरणीय गुरू, मराठी चित्रपटांचे कॅमेरामन दत्ता गोर्ले यांना या कादंबरीवरुन चित्रपट काढायचा होता. त्यांचे हे ‘स्वप्न’ हे प्रत्यक्षात आलेच नाही…
काॅलेजनंतर व्यवसाय सुरु केला. पेपरमधील जाहिराती करताना नव्वदच्या सुमारास ‘पार्टनर’ नाटक रंगभूमीवर आले. मुंबईतील प्रयोगांनंतर पुण्यात टिळक स्मारक मंदिरात पहिला प्रयोग पहाण्याचा योग आला. क्षमा राज व प्रमोद पवार हे प्रमुख भूमिकेत होते. पुरूषोत्तम बेर्डेनं अप्रतिम नेपथ्य केले होते. मनोरंजनाच्या मोहन कुलकर्णीने नवीन डिझाईन करण्यासाठी मला कलाकारांचे फोटो काढायला सांगितले. पहिल्या प्रयोगाला स्वतः वपु हजर होते. मी कलाकारांचे व वपुंचेही फोटो काढले. डिझाईन करुन नंतरच्या प्रयोगाला गेलो. वपुंना त्यांचे फोटो भेट दिले. त्यांनी माझ्या फोटोग्राफीचं व डिझाईन्सचं कौतुक केलं. मी भरुन पावलो. माझ्या आवडत्या लेखकाकडून शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली होती…
अरविंद सामंत यांच्या ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातील नायिका मुग्धा चिटणीस ही वपुंची भाची होती. तो एकच चित्रपट करुन लग्नानंतर ती परदेशात गेली व काही वर्षांतच कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला बळी पडली.
व्यवसायाच्या व्यापातून अवांतर वाचायला वेळ मिळत नव्हता. दरम्यान ‘पार्टनर’ कादंबरीवरुन मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. पुण्यातील ‘प्रभात’ थिएटरमध्ये माझे मित्र कि. स. पवार यांचे सोबत हा चित्रपट पाहिला. कादंबरी वाचताना आपण आपल्या कल्पनेतून जी पात्र पाहतो, ती चित्रपटातील पात्रांशी जुळत नाहीत. म्हणूनच कित्येकदा कादंबरीच चित्रपटापेक्षा सरस ठरते, जसे घरगुती जेवणाची बरोबरी हाॅटेलमधील जेवण कधीही करु शकत नाही…
२००१ सालातील जून महिन्याची २६ तारीख होती, वपुंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि वपु करोडो मराठी वाचकांच्या ‘हृदयात घर’ करुन परलोकवासी झाले…
मराठी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये वपुंचं नाव नेहमीच आदराने घेतलं जाईल. ज्यांनी वपुंची एक तरी कथा वाचली आहे, ते त्यांना कदापिही विसरणार नाहीत…
आज त्यांचा जन्मदिवस! आज ते हयात असते तर एकोणनव्वद वर्षांचे झाले असते… कदाचित स्वर्गातील देवादिकांनी त्यांच्याकडून ‘कथाकथन’ ऐकण्यासाठी वपुंना लवकर बोलावून घेतलं असावं…
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-३-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..