एक अंध मुलगा आरशासमोर उभा राहून. कंगव्याने भांग पाडतो. पावडर लावतो आणि आरशात स्वतःला इकडून तिकडून बघून परत आरश्यात पाहून हसतो हे सगळे जवळच असलेल्या एका व्यक्तीने पाहून म्हटले की तुला दिसत नाही पण तरीही तू हे सगळे का करतोस. आणि तुला तिथे काय दिसले? तो म्हणाला माझा हसरा चेहरा मला दिसतो. आणि मला आनंद होतो. खर किती चांगले विचार आहेत ना? अंध असूनही आपल्यातच खुष. आपल्या भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्यावर काय करायचे याचे फारच मोठ्या पातळीवर केलेला आदर्श अभिमानास्पद आहे. जमीनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी मातेची क्षमा मागून मगच उठणे. दोन्ही हात एकमेकांवर घासून पसरवून कराग्रे वसते लक्ष्मी… आणि मग प्रभात करदर्शन करून नमस्कार करुन कामाला सुरुवात करायची.
पूर्वी बायकांसाठी फणेरपेटी आणि त्यातूनच चेहरा पाहण्याची सोय व मुभा होती. आणि पुरुषांना एका सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जागी जाऊन भांग पाडणे असे होते. आणि तो आरसा दिवेलागण झाली की उलट बाजूला असायचा. या नंतरच्या काळात आरसा पाहायचा नाही अशी सक्त ताकीद होती. काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच. आरसा नसताना माणसाला आपले प्रतिबिंब प्रथम कुठे दिसले असेल आणि तोवर त्याला आपण कसे आहोत हे जाणून घ्यावे वाटले नसेल का? आरश्यावर धूळ असेल तर चेहरा चांगला दिसत नाही. त्यामुळे तो पुसला जातो. पण मनात वाईट विचार असतील तर ते कसे पुसणार? तो कुरुप दिसेल. इथे बिंब महत्वाचे की प्रतिबिंब याचा विचार करून बघा एकदा.
प्रभात करदर्शन यातून लक्ष्मी. सरस्वती. आणि गोविंद म्हणजे श्री विष्णु यांचे महत्त्व सांगितले आहे. आपला प्रपंच भागवण्यासाठी लक्ष्मी सरस्वती हे नक्कीच हवेत. पण या शिवाय त्या विष्णू प्रमाणे जगासाठी म्हणजेच परमार्थ. सामाजिक बांधिलकी हे आवश्यक आहे. याची शिकवण आपल्या संस्कृतीत आहे. मात्र आत्ताच्या काळात विष्णूंचा विसर पडलेला आहे. देणे कमी आणि घेणे तेही कोणत्याही मार्गाने जास्त. त्यामुळे जरी आरश्यात आपण सुंदर आहोत असे मानत राहतो.ही शुद्ध फसवणूक आहे. असा अनुभव आपल्याला येतो. एखादी व्यक्ती आपल्याला फसवते आहे खोटे बोलत आहे हे त्याच्या चेहर्यावरून समजते तो कितीही लपवत असला तरीही. मनाच्या आरश्यात जे असते ते चेहऱ्यावर दिसते म्हणून. त्या पेक्षा अंध मुलांचा हसरा चेहरा त्याला खरच सुंदर वाटत असेल. हेच खरे आहे.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply