पुस्तक परिचय : रुपाली मोनिष खैरनार (आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप)
पुस्तक-“दिवस आलापल्लीचे”‘
लेखिका- निलिमा क्षत्रिय
हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या बालवयातल्या मधुर आठवणी.
लेखिकेने चौथी ते सातवी या काळात जंगलातल्या छोट्याश्या गावात आपल्या परिवारासोबत व्यतीत केलेल्या रमणीय काळाचे विलोभनीय वर्णन या पुस्तकात सापडते. त्यांनी अनेकवर्षांनंतर आपल्या बालपणातला हा चार पाच वर्षांचा कालावधी त्यांना जसा आठवेल तसा, अगदी साध्या, सरळ शब्दात परंतु अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. तो काळ आता त्यांच्या स्मृतीत धूसर झाला असला तरी त्या आठवणी त्यांच्या मनात खूप खोलवर रुजल्या आहेत व तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, आनंदादायी व अविस्मरणीय काळ होता असं त्या सांगतात. याबद्दल त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिले आहे की ‘त्या काळाचे चित्र आता उभं करणं म्हणजे फुटलेल्या बांगडीची गोलाई पुन्हा साधण्याचा प्रयत्न केल्यासारखं आहे’.
त्यांच्या वडिलांची आलापल्ली या जंगलात वसलेल्या छोट्याश्या निसर्गरम्य गावी बदली झाल्यामुळे त्या आपली तीन भावंडं व आईवडिलांसोबत आलापल्लिला आल्या. तेथील घर पहिलेच्या घरापेक्षा खूप वेगळे व मोठे होते. इथे वडिलांच्या बढतीमुळे बदलीवर आले असल्याने त्यांना मोठा इंग्रज धाटणीचा बंगलाच राहण्यासाठी दिला गेला होता. बंगल्याच्या मागे-पुढे खेळायला भरपूर मोकळी जागा तर होतीच शिवाय घरातही प्रत्येकासाठी मोठमोठ्या स्वतंत्र खोल्या असल्यामुळे ती भावंड एकदम हरखून गेली होती.
अमरावतीच्या शहरी वातावरणातून आल्या असल्यातरी आलापल्लीच्या रम्य, नितळ, निरागस वातावरणाने त्यांना लगेच आपलंसं करून घेतलं. ते छोटंसं गाव दाट हिरवाईने नटलेलं, जंगलाच्या कुशीत शांत निजलेलं, आदिवासी लोकांच्या भाबडेपणाच्या रंगात रंगलेलं होतं. रस्त्यावर माणसांची तुरळक ये जा. फार रहदारी नाही, गाड्यांचे हॉर्न वैगेरे नसून दाट वनराई असल्याने सतत पक्षांचा किलबिलाट कानावर येत असे. काही मोजक्याच घरांमध्ये लाईट होते, अन्यथा , मनाला व मेंदूला आल्हाददायक असे शांत निवांत वातावरण. “मला आलापल्ली नेहमी एका सोशिक आदिवासी स्त्रीच्या रूपात दिसते, जिने दारिद्र्याची काळी किनार असलेले हिरव्यागार जंगलाचे रेशमी वस्त्र पांघरलेले आहे.” ह्या वाक्यातून आलापल्लीचं अंतरंग स्पष्टपणे दिसतं.
या पुस्तकात त्यांनी, आलापल्लीच्या बंगल्यात रहायला आल्यापासूनच्या आपल्या अनेक आठवणी रंगवल्या आहेत. गंमतीदार किस्से सांगितले आहे.
तेथील अंधश्रद्धा व अशिक्षितपणामुळे लोक जे काही वागत त्यातून अनेकदा मजेशीर तर कधीकधी जीवावर बेतणारा प्रसंग घडे. असेच आत्म्याची बाज याप्रकरणात त्यांनी तेथील लोकांच्या अंधश्रद्धेबद्दल एक किस्सा सांगितला आहे. माणूस मेल्यानंतर ते लोक काटेसावरीच्या झाडावर एक जिवंत कोंबडी उलटी लटकवत व त्याच्याखाली एकविशिष्ट वीण असलेली बाज ठेवीत. त्या बाजेत मृत व्यक्तीचा आत्मा किंवा भूत असतो अशी त्याची समजूत होती. परंतू तीच बाज एकाने त्यांच्या वडिलांना झोपायला आणून दिली असताना त्यांच्या घरात गडी म्हणून काम करणाऱ्यांनी लेखिकेच्या कुटुंबाला भुताच्या गोष्टी सांगून घाबरवून सोडले, परंतु त्यांच्या वडिलांनी त्या गोष्टीमध्ये काही तथ्य नसून केवळ ऐकीव कथा आहेत असं सांगून पुढे रोज ते त्याच बाजेवर झोपत असा छान किस्सा सांगितला आहे.
तेथील आदिवासिंची जीवनपद्धती लेखिका व त्यांच्या परिवारासाठी खूप नवखी होती. त्यांच्या आधीच्या जीवनशैलीपेक्षा खूप वेगळी, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील प्रत्येक दिवस एक नवा अनुभव घेऊन येई. काहीतरी नवं शिकवून जाई. हे घर खूप मोठ असल्यामुळे येथे काम करण्यासाठी दिवसभर घरगडी होते. तिथे पुरुष घरगड्याला ‘ऑर्डर्ली’ व स्त्री मदतनीसला ‘रेझा’ असे म्हणत. त्याप्रमाणे दुर्गैया व सखुबाई हे दिवसभर त्यांच्या घरी पडेल ती काम करत. या दोघांसोबती अनेक धम्माल प्रसंग त्यांच्या आठवणींच्या पेटाऱ्यातून सहज बाहेर आले आहेत.
रोजच्या दैनंदिनीत त्यांना त्याघरात काही थरारक अनुभव ही आले, त्यांचे हे घनदाट झाडीनी घेरलेले असल्यामुळे तिथे साप, विंचू, घुबड अगदी वरचेवर घरात येत. दुर्गैयासोबत कोंबड्या पकडणे, त्यांना डालून ठेवणे, कोंबडीला अंडी देतांना तिच्यावर नजर ठेवणे अशी मजेशीर काम करण्यात त्यांचा दिवस मस्त जाई. तसेच सखुबाई सोबत झाडी उपटणे, मक्याची शेती करणे.कोवळी कोवळी कणसं वाऱ्यावर डोलताना पाहणे, त्यांची कापणी केल्यावर, ते भाजून खाणे यात ती चारी भावंड मस्त रमून जात. गावातलं हे साधंसूधं जीवन त्या सर्वांना खूपच भावलं.
लेखिका व त्यांचा परिवार अल्लापल्लीला आले आणि थोड्याच दिवसात त्यांची शाळा सुरू झाली.गर्द झाडींनी वेढलेली छोटीशी बसकी कौलारू शाळा लेखिकेला खूप आवडली. शाळेच्या अवतीभवती पिंपळ, चिंच, कडुलिंब अशी मोठमोठी झाडं व त्यांच्याभोवती दगडी पार होते. पावसाळी दिवस असल्याने खूप आल्हाददायक वातावरण असे. शाळेतील सुरवातीचे दिवसांत त्यांचे वडील गावात नव्यानेच सुरू झालेल्या बँकेच्या ब्रँचची सुरुवात करण्याच्या कामात व्यस्त असल्याने ऍडमिशनसाठी स्वतः जाऊ न शकल्याने हेडमास्तरांचा त्यांच्यावर रोष होता. ते नेहमी लेखिका नीलिमा यांना टोमणे मारत, त्यांच्यावर खार खात त्यामुळे नीलिमा यांचे मन खट्टू होई त्यांना अपराध्यासारखे वाटे, यावर उपाय म्हणून एक मैत्रिणीच्या सांगण्यावरून त्यांनी उप्पलवार हेडमास्तरांकडे शिकवणी लावली. शाळेत अधिकतर आदिवासी मुले होती. त्यांच्यापेक्षा त्या सहाजिकच वेगळ्या व नीटनेटक्या दिसत. त्या अभ्यासातही हुशार होत्या परंतु त्यांच्यावरचा रागामुळे हेडमास्तर सर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत.परंतु त्यांची मुलगी लता, नीलिमा यांची खूप छान मैत्रीण झाली. ती लेखिकेवर विशेष माया करी, त्यामुळे तिला अभ्यासा व्यतिरिक्तही अनेक गोष्टी शिकवी. तोडकं मोडकं तेलगू बोलायला, तांदळाच्या पिठातून रेखीव रांगोळ्या काढायला, बुचाच्या फुलांच्या सुरेख वेण्या गुंफायला, शिवाय जांभळी शाई वापरून सुबक अक्षर काढायला तिने अत्यंत प्रेमाने शिकवले. तिच्याच मेहनती व पाठिंब्यामुळे नीलिमा यांनी वार्षिक परीक्षेत पहिला नंबर कमावला. सावत्र आईच्या जाचामुळे अमरावतीला जाऊन पुढे बी.ए चे शिक्षण न घेऊ शकलेली लता आपली शिकण्याची लालसा नीलिमा यांच्या माध्यमातून पूर्ण करू पाहत होती, ही गोष्ट लेखिकेच्या कायम लक्षात राहिली.
आपल्या लहानपणीच्या व शाळेच्या, मैत्रिणींच्या आठवणींबरोबरच लेखिकेने आपल्या वडिलांच्याबद्दलही काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांच्या वडिलांचे आईवडील ते लहान असतांनाच वारले होते, त्यामुळे वडील लहानवयापासून अनाथासारखे वाढले. शिक्षणाची जिद्द असल्यामुळे वार लावून शिकले, जेथे सोय झाली तेथे राहिले, शिकवण्या घेऊन पैसा कमावला. लहानपणी खाण्यापिण्याची आबाळ झाली असल्याने त्यांना वयाच्या पस्तिशीत डायबीटीसने घेरले. रात्री अंथरुणात पडल्या पडल्या जेव्हा ते मुलांना त्यांच्या अनाथपणाच्या गोष्टी सांगायचे तेव्हा ही सारी भावंड मुसमुसुन रडायचे. लेखिका आपल्या वडिलांच्या व्यक्तित्व वर्णन करताना सांगतात की ते नेहमी सर्व कामं अगदी सावकाश व संथ गतीने करायचे, ते शांत स्वभावाचे होते, त्यांना वाचनाची तसेच रेडिओ ऐकण्याची खूप आवड होती. ते नेहमी आपल्याच तंद्रीत असायचे. सकाळच्या वेळी त्यांचे सगळ्यांच्या आंघोळीसाठी बंब पेटवणे, आकाशवाणीचे पुणे केंद्राच्या बातम्या ऐकत ऐकत दाढी करणे, नंतर चहा नास्ता करू तयार होऊन ऑफिसला जाणे व संध्याकाळी ठरलेल्या वेळी घरी परतणे ही आखीव रेखीव दिनचर्या असे. नंतर नंतर अनेक कामांसाठी सोयिस्कर म्हणून त्यांनी राजदूत मोटारसायकल घेतली. ती मोटारसायकल शिकण्यापासून ते त्याच्यावरून पडणे, झडणे, व्यरांड्यात लावताना रॅम्प वर चढवण्यासाठी झालेली त्यांची व मुलांची तारांबळ,फरफट व गावातून मोटारसायकल वरून ये जा करत असताना घडलेले अनेक गमतीशीर किस्से वाचून खूप हसायला येते..
दिवस आलापल्लीचे या पुस्तकातील अत्यंत हृद आठवण म्हणजे लेखिकेने अगदी जवळून पाहिलेले बाबा आमटे, साधनाताई आमटे, प्रकाश आमटे व त्यांचा रानटी अवस्थेत जगणाऱ्या माडियांसाठी सुरू केलेले कार्य. नागपल्ली येथे सुरू असलेला त्यांचा लोकबिरादरी प्रकल्प. बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. त्या लहान असतांनाच त्यांना बाबा आमटेना प्रत्यक्ष आले त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांचे कार्य अगदी जवळून पाहता आले, हे किती मोठे भाग्य.
लेखिकेने त्यांच्या सुट्टीतल्या खेळांचे अतिशय रंजक वर्णन केले आहे.यात झाडबंदर, मारगोल, सळयीचा खेळ असे वेगळे न ऐकलेल्या खेळांचा उल्लेख येतो. तसेच तेंदूपत्ता तोंडायला जाणाऱ्या आलपल्लीतील आदिवासी लोकांच्या सोबत त्यांनीही जंगलात फिरण्याची अजब मज्जा अनुभवली आहे. आदिवासीमुले शाळेतील ईतर मुलांना सहलीला नेत. टेंभुर्णीची टेंभरे, बिब्याची फुले पाडणे, ज्येष्ठमधाची पाने, गुंजाच्या बिया, चारं ओरबाडून खाण्याची मज्जा औरच होती. दिवसभर जंगलात निरहेतुक फिरणे म्हणजे पर्वणीच असायची. उन्हाळ्यात परिक्षेच्यावेळी घरा समोरच्या अवाढव्य पसरलेल्या वडाच्या फांद्यांवर बसून अभ्यास करणे,सुट्टी लागल्याबरोबर त्याच झाडाचे खेळाचे अक्षरश: मैदान बनत असे हा मी अत्यंत विलक्षण अनुभव होता.
लेखिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या काही विशेष व्यक्तींचे सुंदर वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या अम्मा नावाच्या नर्सच्या आठवणी नकळतच आपल्याही मनात अम्माबद्दल मनात खूप आदर निर्माण करतात. साधीसुधी राहणीमान असलेली अम्मा दिवसरात्र केवळ लोकांची सेवा करण्यातच मग्न असायची. त्यांच्या रोगाचे योग्य निदान करून विनामूल्य औषधं देऊन बरं करण्यातच तिला समाधान मिळायचे.अशी निस्वार्थ सेवा देणारी अम्मा मनाला खूप भावते. त्याचप्रमाणे लेखिकेबरोबर शिकणाऱ्या काही मैत्रिणींच्या आठवणी आपल्याही मनाच्या एका कोपऱ्यात रुतून राहतात.
दिसायला सुंदर परंतु अत्यंत गरिबीत राहणारी त्यांची जिवलग मैत्रीण सुफीया व तिचा परिवार, अभ्यासात फार हुशार नसलेली पण मनाने खूप चांगली, भरतकामात पारंगत अशी परमित कौर तसेच मोठ्या हुद्यावर कामावर असलेल्या श्रीमंत फॉरेस्ट ऑफिसरची बिनधास्त, चुणचुणीत शाहीना, फॉरेसटचे हत्ती सांभाळणाऱ्या माहुताची मुलगी शोभा, घरात काळ्याभोर मायाळू डोळ्यांची, पांढरी शुभ्र गाय असलेली जानकी, रजनी या सगळ्या कुठेतरी आपल्याच मैत्रिणी वाटू लागतात. शाळेतली आडदांड नंदा तलांडी,अंगात येणारी mutthi, जब्बारचा मारुती, आंशी, अल्लापल्लीला थोडे दिवस राहायला आलेली मीना,क्लबहाऊस मध्ये खेळायला येणारे फॉरेस्ट ऑफिसर्स जेम्स, फ्रान्सिस, देसाई बाबू. तिथे साजरा होणारा शाळेचा वार्षिक समारोह, त्याची तयारी, सादरीकरणाच्या दिवशीच्या गंमतीजमती हे सर्व प्रकरणंही खूपच रंजक व वाचनीय झालेले आहेत.
लेखिकेने आलापल्लीतील निसर्गाचे अतीशय मनमोहक रूप दाखवले आहे. निसर्गाचे इतके नितळ, निरागस सौंदर्य त्यांना उपभोगता आले आणि ते ही बालपणातल्या अल्लड अजाण वयात याबाबतीत त्यांच्या नशिबाचा खरंच हेवा वाटतो. पाचवी नंतर त्या झेड.पी च्या शाळेत शिकल्या. ही शाळा त्यांच्या घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर होती. शाळेच्या आसपासचा मनोरम परिसर, जवळच असलेला ओढा, त्या ओढ्यावर पाणी भरणाऱ्या,कपडे धुणाऱ्या बायका, ओढ्यावर लोंबणाऱ्या झाडावर बसून दंगा मस्ती करत रानमेवा खाणारी खोडकर मुले म्हणजे दुसरी माकडंच जणू. ओढ्यात माहूत हत्तींना अंघोळ घालत असतांना मुले दुरून फळे मारून फेकत त्यावरून हत्तीदेखिल झाडाची फांदी हलूवून त्यावर बसलेल्या मुलांना भंडावून सोडत. हत्तीच्या अंघोळीची साग्रसंगीत पद्धत, ते आजारी झाले की त्यांच्या उपचारा दरम्यान इंजेक्शन देण्याची प्रक्रिया हे सगळं पाहायला जमा होणारी मुले हे सर्व वाचायला खूप रंजक वाटतं.
लेखिकेची आई गृहिणी जरी असली तरी त्या अतिशय खंबीर, स्वयंपूर्ण,परिस्थितीनुसार योग्य निर्णयक्षमता असलेल्या, गृहकृतदक्ष, हौशी, सुगरण असे व्यतिमत्व आहेत. आईचे अनेक गुण त्यांनी नमूद केले आहे. वडिलांची दर तीन वर्षांनी होणारी बदली, त्यासाठी सर्व वस्तूंनची जमवाजमव, चार चार मुलांनां घेऊन केलेला प्रवास, सामानाची बांधाबंध, चानाक्ष स्वभाव, शेतीची हौस, वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण वस्तूंची हौस, अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांची आई किती सुलक्षणी स्त्री आहेत हे लक्षात येते.
तेथील रहिवस्यांसोबत घडत असलेल्या गमतीजमती मध्ये ‘ळ’ या अक्षरावरुन खूप गमतीशीर संवाद घडत. तेथील लोक ‘ळ’ ऐवजी ‘ड’ चा उच्चार करत व त्यामुळे कधी कधी फजिती होत असे. होळीची देखील खूप छान आठवण त्यांनी सांगितली आहे. तसेच तेथील गरीब आदिवासी मुले,त्यांच्या घरची हालकीची परिस्थिती, दारिद्र्याने पिचलेल्या या लोकांची लहान बाळ भूक लागून रडू नयेत, त्यांच्या आईला कामावर जायला खाडा होऊ नये म्हणून त्यांना मोहाची दारू पाजून गुंगीतच ठेवत असत. त्याचप्रमाणे थंडीवारं बांधू नये, विचू व सापाचं विष चढू नये म्हणून लहान मुलांना तंबाखूची सवय लावली जायची. आदिवासी लोकांच्या गरीब परिस्थितीचे असे भेदक सत्य दाखवणारे प्रसंग देखील प्रभावीपणे नोंदवले आहेत.
लेखिका तिच्या बालपणी आदिवासी भागात राहिली असल्याने त्या वयाने लहान असून देखील तेथील लोकांची विशिष्ट जीवनशैली,त्यांच्या प्रथा, अंधश्रद्धा या सर्व गोष्टीदेखील छान टिपल्या आहेत. आदिवासी लोकांमध्ये संपूर्ण कुटुंबातील लोकांची एकत्र लागणारी लग्न म्हणजे संपूर्ण हयातीत केव्हातरी डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत अशी प्रथा नव्यानेच कळली. त्याचप्रमाणे तेथील लोकांच्या अंगात येणं, आपल्या मार्गातून कुणाचा तरी काटा काढायचा असेल तर जादूटोणा करण्याची प्रथा सर्रास अवलंबली जायची पण त्यात किती सत्य होते याबद्दल त्यांना संभ्रम वाटायचा व तरी देखील त्याच्या सत्य असत्येतेत न पडता ते त्या भाबड्या लोकांच्या गोष्टी मनापासून ऐकायच्या किंबहुना त्या वयात ते सांगतायेत ती गोष्ट अंधश्रद्धा वैगेरे आहेत हे ही ज्ञान त्यांना नव्हते.
‘दिवस आलापल्लीचे’ हे पुस्तक म्हणजे आपल्याच बालपणीच्या अंगणात आठवणींनाचा हात धरून हुंडल्यासारखं आहे.. यात त्यांचा अनुभव जरी आदिवासींच्या वेगळ्या भागातला असला तरी आठवणींचा धागा हा सर्वांच्या बालपणातला सारखाच दुआ असतो.
या पुस्तकात लेखिकेचा हात धरून तिच्या बालविश्वात मुक्त विहरण्याचा भरभरून आनंद मला लुटता आला. मात्र शेवटी आलापल्ली सोडतांना त्यांना आपल्या सर्वात जवळची मैत्रीण सुफिया, तिच्या मामाकडे गेली असल्याने तिला भेटता आले नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागून राहिली. त्यामुळे त्या अत्यंत अस्वस्थ व विमनस्क मनस्थितीत तेथून बाहेर पडल्या. ही गोष्ट जितकी त्यांना दुःख देऊन जाते तितकीच आपल्या मनालाही चटका लावून जाते.
हे पुस्तक वाचताना भान हरपल्यासारखे होते.. आणि पुस्तक संपताना खूप ओकबोकं वाटू लागत..अचानक एवढ्या मैत्रिणींच्या गराड्यातून व त्या निसर्गरम्य गावातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं.. लेखिकेचा हात सुटल्यासारखा वाटतो, इतकं ते अनुभव वाचतांना आपण एकरूप झालेलो असतो. वाचन संपतं परंतु त्या एकटेपणातही त्या मनोरम आठवणी ते प्रसंग मेंदूत घोळत राहतात.. मनात रेंगाळत राहतात.
— रुपाली मोनिष खैरनार.
या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार
अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर
मराठा मंदिर पुरस्कार, मुंबई
पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, ‘गिरीजा कीर’, पुणे.
महाराष्ट्र शासनाचा ‘ताराबाई शिंदे
Leave a Reply