मिलते हैं फिर !
रात्री झोपताना स्वतःला हे आश्वासन देऊन झोपण्याची माझी सवय आहे. आणि सकाळी डोळे उघडले की चक्क स्वतःशी भेट होते. पण हे वाक्य दरवेळी इतकं सहजी सत्यात येत नाही.
१० एप्रिल २०१९ ला कराड सोडताना मी डॉ अनिल आचार्य सरांना म्हणालो होतो- ” मिलते हैं फिर ! ” पण ते वाक्य प्रत्यक्षात काल आलं. दरम्यान फोनाफोनी असायची,पण भेटणं काल झालं.
सरांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आणि कागदोपत्री काल त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस होता. साधारण तीन महिन्यांपूर्वी हा निर्णय घेताना त्यांनी मला आवर्जून कळविले होते आणि त्यामागची कारणमीमांसाही सांगितली होती.
कालच्या निरोप समारंभाचे निमंत्रण त्यांनी मला ३-४ दिवसांपूर्वी आवर्जून दिलेले !
मीही ठरविले जायचे,पण अचानक— ! शेवटी काल तासाभराची भेट ठरली आणि त्याबरहुकूम पार पडली.
सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांच्या कराड मुक्कामी पोहोचलो तेव्हा ते नुकतेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून घरी परतत होते. सोबत फुलांच्या गुच्छांचा भला थोरला ढीग आणि इतरही व्यक्तिगत भेटी ! सर कराडच्या महाविद्यालयातून बीई झाले मग पीजी आणि शेवटी पीएचडी तेथूनच. त्यामुळे या भेटी समर्पक आणि स्वस्थानी होत्या. मी फक्त साडे तीन वर्षे होतो तरी साऱ्यांचा स्नेह आणि निघताना माझ्या विद्यार्थ्यांच्या भेटवस्तूंनी माझे पारडे शिगोशीग भरले होते. आचार्य सरांनीही एक बॅग भेट म्हणून दिलेली. यांचे तर बऱ्यापैकी ऋणानुबंध- त्यामुळे निरोप लांबलचक आणि भरगच्च स्वाभाविक होता. ते स्वतः जरी साशंक असले तरी मला खात्री होती.
१५ ऑक्टोबर २०१५ ला मी रुजू होण्याच्या दिवशी विभागप्रमुख मोहीते सरांकडे बसलो असता, काही कामानिमित्त आचार्य सर तेथे आले होते आणि आमची ओळख झाली. पुढे साधारण साडे तीन वर्षे अनेकदा ती घट्ट झाली. सर टीपीओ असल्याने आमचे आणखी जमायचे. मीही सतत कराडला नसल्याने इतर मंडळींशी तसे संबंध वरवरचे ! पण सरांच्या घरी प्रसंगोपात्त २-३ दा जाणे झाले. घरच्यांशी परिचय झाला. प्लेसमेंट च्या कामामध्ये मी त्यांना थोडीशी मदत केली. एच आर मीट आणि काही व्याख्याने देणे अशा निमित्ताने एकत्र काम झाले.
नॅशनल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल विंटर अकॅडेमिया ला त्यांनी खूप मदत केली.
काल तासभर त्यांच्या घरी गप्पा,आदरातिथ्य झाले. पुढच्या मनसुब्यांविषयी बोलणे झाले. निघताना त्यांना वर्तकांची ” उपनिषदांवर भाष्य असलेली दोन पुस्तके” दिली.
निघताना आगंतुकपणे तोंडातून निघाले (पण यावेळी त्यांच्या)- ” या सर, पुन्हा निवांत!”
रात्री उशिरा घरी आलो,पण सकाळी सरांचा फोन आला आणि पुन्हा भेटलो.
जिनको मिलना हैं वो, मिलके रहेंगे !
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply