चंदूमामा आपल्या मुलाच्या टॉवरमधल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. नजर खाली रस्त्यावर होती. मन वीसएक वर्षापूर्वीच्या आठवणीत गुंतलं होतं. आज एक मे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा. चंदूमामाच्या गिरणीत कामगार दिन काय उत्साहाने साजरा व्हायचा. मिलच्या चाळीत उत्सवाचं वातावरण असायचं. पुढारी यायचे, प्रभातफेऱया निघायच्या, भाषणं व्हायची.
चंदूमामा बघत होता… रस्त्यावर शुकशुकाट होता. सभा समारंभाची तयारी कुठेच दिसत नव्हती. कामगार दिनाची तर कुठे चाहूलच नव्हती. बरोबरच होतं. कामगार दिन साजरा करायला गिरणी कामगार राहिलाच कुठे होता? गिरण्या बंद होऊन दशक लोटलेलं. मिलची चाळ पाडून तिथे टॉवर्स झालेले आणि या टॉवर्समधून मराठी माणूस हद्दपार होऊन मुंबईच्या बाहेर गेलेला. गिरणगावातल्या परळची अप्पर वरळी झाली होती. कामगार दिन तरी कोण साजरा करणार आणि महाराष्ट्र दिनाचा उत्साह तरी कोणाला?
तेवढ्यात बेल वाजली. प्रकाश आला होता. चंदूमामाचा मुलगा प्रकाश. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता. बायकोही त्याच कंपनीत. आयटी इंडस्ट्री की बीपीओ म्हणून काहितरी होतं. काय ते चंदूमामाला कधीच कळलं नाही, पण कळत एवढंच होतं की प्रकाश सायबाच्या कंपनीत जातो… सायबाच्या देशातल्या वेळेप्रमाणे काम करतो… चंदूमामाची बायको – चंद्राक्का प्रकाशला नेहमी विचारायची की पगार झाला का रे? पण प्रकाश कधीच पगाराचं पाकिट तिच्याकडे देत नव्हता.. कारण पाकिट होतंच कुठे? पगार थेट बँकेत जायचा. चंदूमामाला आठवलं, त्याच्या महिन्याच्या पगाराचं पाकिट घ्यायला दहा तारखेला तो किती उत्साहात असायचा. घरी येताना पोरांसाठी मिठाई, खेळणी असायचीच. तसा आता प्रकाशही मिठाई आणतो… आणि खेळणी खेळायला पोरं काय लहान आहेत? ती तर कॉम्प्युटरवर खेळत असतातच की.
प्रकाश आणि त्याची बायको कधी फोनचं, इलेक्ट्रीकचं बिल भरायला जाताना चंदूमामाला दिसलेच नव्हते. त्याच्या वेळी कधीकधी गिरणीत खाडा करुन बिलं भरायला जायला लागायचं. रेशनच्या लाईनीत उभं राहिलं तर दिवससुद्धा जायचा. प्रकाश कॉम्प्युटरवरुनच सगळी बिलं भरतो.
विचार करता करता चंदूमामाचं मन त्याच्या वेळची तुलना आत्ताशी करायला लागलं आणि त्याला हसू फुटलं… चंदूमामा गिरणी कामगार होता… त्याचा पोरगा नॉलेज वर्कर होता… म्हणजे शेवटी वर्करच… पॉश कपड्यातला… कंठलंगोट – म्हणजे मराठीत टाय – लावलेला.
चंदूमामा सकाळी साडेपाचला उठायचा. आवरून सातला कामावर हजर व्हायचा. गिरणीच्याच चाळीत रहात होता… त्यामुळे ट्रेनची भानगड नव्हती. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी. चंद्राक्का नोकरी करत नव्हती.. घर सांभाळायची. संध्याकाळी घरी आल्यावर दोघंही गप्पा मारायचे. फिरायला जायचे. प्रकाश दुपारी तीन वाजता निघायचा. परळहून बस-रेल्वे-बस असं करत करत नव्या मुंबईत कुठे नॉलेज सिटी का काहीतरी म्हणतात तिथं जायचा. पहाटे तीन-साडेतीनला परत यायचा. बायकोसहित सगळं घर झोपलेलं. सकाळी हा उठायच्या आधीच सगळं घर रिकामं. मुलं शाळेत, बायको सकाळच्या शिफ्टला… एकाच कंपनीत काम करत असूनही दिवसेंदिवस नवरा-बायको दोघांची भेटही व्हायची नाही. गप्पा काय मारताय?
चंदूमामा गिरणीत जाताना डबा न्यायचा. बायकोच्या हातचं जेवण. गिरणीतसुध्दा कधीकाळी भूक लागली तर वडा-पाव होताच. प्रकाशला घरच्या डब्याचं सुख कुठे? नॉलेज सिटीतल्या त्या कॅन्टीनमध्ये कधी सायबाचा वडापाव म्हणजे आपला बर्गर… कधी पिझ्झा… म्हणजे वरुन भाज्या पसरलेली आणि मग भाजलेली सायबाची भाकरी…आणि शेवटी थंडा ( मतलब ….? ) पिऊन दिवस काढायचा. चंदूमामाच्या गिरणीतही तसा थंडा मिळायचा पण स्पेशल पाव्हण्यांसाठी. चंदूमामाची बायको खरपूस तळलेली माशाची तुकडी द्यायची. प्रकाशच्या कंपनीत उकडलेला मासा मिळायचा म्हणे.
गिरणीत चंदूमामा साच्यावर काम करायचा. म्हणजे कापड विणतात त्या लूमवर. दिवसभर एकच काम.. तीच ऍक्शन, एकाच लयीत दिवसभर हात आणि शरीर हलवायचे….पण बाजूच्या कामगाराबरोबर गफ्पा चालू असायच्या. कधी एका साच्यावरुन दुसऱया साच्यावर जायचं. शरीराची हालचाल होती. गिरणीतल्या कामाने चंदूमामा स्ट्राँग बनला होता.
प्रकाश दिवसभर खुर्चीत बसायचा. समोर कॉम्प्युटर… नजर मॉनिटरच्या स्क्रीनवर…. डोळ्यांना ताण… हात किबोर्डवर… कानांवर हेडफोनचा कबजा… समोरुन आलेल्या फोनवर दिवसभर बडबड… तोंडाला बोलून बोलून कोरड पडलेली… दिवसभर एकाच पोझमध्ये राहिल्याने शरीर आखडलेलं. सांधेदुखी सुरु झालेली… डोळ्यांना जाड भिंगाचा चश्मा… सारखं ऐकून ऐकून कान बधीर झालेले…. बाप रे बाप… केवढे प्रॉब्लेम.. मग त्यामानाने चंदूमामा सुखीच की.
एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण?
हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश?
भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?
चंदूमामा आणि प्रकाश ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणं. पण आजच्या आयटी युगात, ऑनलाईन युगात, बीपीओ युगात, कॉलसेंटर युगात, ऑनलाईन किंवा कॉम्प्युटर हेल्थ हॅझार्डस किती आहेत याचा विचार सगळ्यांनी करायलाच हवा. नाहीतर आपली एक पिढीच्या पिढी कामातून जाईल आणि त्याला जबाबदार असू आपण… या पिढीचे पालक.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply