कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात.
कोकणातील वेंगुर्ले येथे गोरगरिबांविषयी, समाजाविषयी आणि देशाविषयी आत्मियता असणारे बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष. सर्वगुणसंपन्न भाषाप्रभू, अतिशय हुशार, अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे उत्कृष्ट वक्तृत्वकला आणि चिकित्सक अभ्यासवृत्तीचे संसदपटू म्हणून ज्यांचा कोकणच नव्हे, तर उभ्या देशाला अभिमान वाटणारे नाथ पै म्हणजे कोकणातील सुसंस्कृत राजकारणी.
पु. ल. देशपांडे यांनी ज्याचे वर्णन करताना म्हटले होते. ते म्हणजे, ‘बुद्धिवंतांतील प्रतिभावंत आणि जनतेतील सर्वसामान्य’ देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अशा प्रतिभावंत आणि जनतेतील सर्वसामान्य’ देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना अशा प्रतिभावंतांची आठवण आजच्या पिढीला करून देणे ही काळाची गरज आहे. या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. किती काळ जगण्यापेक्षा कसं जगावं हे ज्या कर्तृत्वात मंडळीने आपल्याला शिकवले त्यापैकी बॅ. नाथ पै हे एक होते.
प्रत्येकाने प्रथम अंतर्मुख व्हावे. आत्मनिरीक्षण करावे. आपल्या गुणदोषांसह व मर्यादांनिशी स्वतःला जाणून घ्यावे व स्वरूपाचा स्वीकार करावा, मग आपल्या ठायी असणाऱ्या क्षमतांचे परिणत रूप कल्पनेेने जाणून घ्यावे व त्यांच्या संवर्धनाचा निश्चय करावा. एकदा का परिवर्तनाचा आलेख निश्चित झाला म्हणजे आत्मविकासाची वाटचाल होत राहील. या वाटेने जो जो चालत राहावे तो तो प्रत्येक पुढचा टप्पा मागे पडत जाईल. आपल्या गुणवत्तेची स्थानके मागे टाकत पुढे जात राहणे हाच आपला धर्म हेच आपले जीवन. ज्या ज्या मंडळींने स्वीकारले त्यात एक नाव अनेक वर्षे कोकण कधीही विसरू शकणार नाही ते बॅ. नाथ पै… त्यामुळे त्यांच्या स्मृती जिवंत करण्याचा हा थोडासा प्रयत्न.
25 सप्टेंबर 1922 वेंगुर्ल्यातील गावी त्यांचा जन्म झाला. असाधारण बुद्धिमत्ता, मंत्रमुग्ध करणारे त्यांचे वक्तृत्व आणि अथक परिश्रम करणारे हे सातवे आपत्य पंढरीनाथ सर्वसाधारण कुटुंबात बापू आणि अन्नपूर्णा (तापी बाई) या दाम्पत्यापोटी जन्माला आले.
वेंगुर्ल्याला अप्रतिम सृष्टीसौंदर्य आणि नैसर्गिक साधनाचे वरदान लाभलेले पण अतीव दारिद्य्राचा शापही मिळाला होता. बहुतेकांची गुजराण शेती किंवा मासेमारी. त्याकाळी फारच थोड्यांच्या मालकीच्या आबा, काजूच्या बागा असत.
नाथांचे वडील त्याकाळचे सुशिक्षित, मुंबईच्या विल्सन कॉलेजचे बी.ए. पदवीधर. काही काळ पोस्ट मास्तर. पण पुढे वेंगुर्ल्यातच अमेरिकन मिशन स्कूलमध्ये इंग्रजीचे शिक्षक झाले.
पण पुढे त्यांच्या जीवनाची संथ लय एक दिवस बिघडली. एकदा बापू एका गुंतागुंतीच्या खटल्यात कोर्टात खोटं बोलण्याऐवजी खरं बोलण्यामुळे कुटुंबाला हालाखीचे दिवस वाट्याला आले. बापूंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सगळंच कुटुंब निराधार झाले. पण नाथांच्या आईने आपल्या आठही मुलांचे पालनपोषण केले कधीही कोणाकडे आर्थिक मदत मागितली नाही. भीषण दारिद्य्राचा सामना कसा करायचा हे नाथ आपल्या आईकडून शिकले.
नाथांचे बालपण रम्य निसर्गात दारिद्य्रात पण आनंदाने व्यतीत झाले. हिरवाई मिरवणाऱ्या डोंगररांगांनी वेढलेल्या आंबे, काजू आणि नारळाच्या बागा. स्वच्छ समुद्रकिनारे आणि निळ्याशार लाटा अंगावर झेलत नाथ मोठे होत होते. दूर क्षितिजांपर्यंत पसरलेला विशाल सागर हा छोटा मुलगा तासन् तास पहात, क्षितिजापलीकडे असलेल्या अज्ञात प्रदेशाची स्वप्ने तो पहात लोककथा, कथाकादंबऱ्या, पुराणकथा इतकेच काय धार्मिक आणि इतिहासाची पुस्तके तो वाचून फडशा पाडत असे.
सृष्टिसौंदर्याच्या आड सगळेच कोंकण अठराविश्वे दारिद्य्र, अपमृत्यू आणि अत्यंत अपुऱ्या वैद्यकीय सुविधा अशा अनेक असह्य गोष्टींनी ग्रासले होते. नोकरीच्या संधी जवळ जवळ नाहीच. त्यामुळे पै कुटुंब हलाखीत जगत होते. काहीतरी केले पाहिजे हा विचार थोरला भाऊ अनंत (अण्णा) याने वेंगुर्ला सोडायचे ठरवले आणि बेळगावकडे कुटुंबासह जाण्याचे ठरविले. आयुष्याला नवी सुरुवात झाली. बेळगाव हे गजबजलेले बाजारपेठेचे शहर. पै कुटुंब तेथे स्थिरावले. किराणा मालाच्या दुकानात चार पैसे मिळायला लागले. कुटुंबाला चांगले दिवस आले.
नाथांचे वेंगुर्ल्यातले ते जुने परिचित जीवन भूतकाळात जमा झाले. त्यांनी बेळगावच्या स्थिथ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ‘नित्य नवा दीस जागृतीचा’ अनुभवत पुढचा प्रवास सुरू केला. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे या अपेक्षेने त्यांनी आपल्या जीवनाकडे पहायला सुरुवात केली. त्यांना नव्याच रोमहर्षक दुनियेचा शोध लागला. इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, इंग्लिश साहित्य याचं नाथांच्या आवडीच्या जागा झाल्या. ‘वाचनालय जणू एन धगधगती भट्टी बनली आणि पुस्तके तिच्या घडवित्या ज्वाळा’ नाथांच्या मनाला योग्य आकार मिळत होता. निबंध लेखन, वक्तृत्व, वादविवाद यात नाथ कायम पुढे असत.
मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर, पुढील शिक्षण बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये करायचे त्यांनी ठरविले. त्याच सुमारास बेळगावातील गोविंदराव याळगी व त्यांच्या पत्नी यांनी सत्याग्रह चलवळीचे आयोजन केले होते. ब्रिटिशविरोधी चळवळ जोरात सुरू होती. आपणही या चळवळीत सहभाग घ्यायचा ही उर्मीदेखील त्यांची प्रज्वलित होत होती.
पुण्यातील कॉलेजात वक्तृत्व स्पर्धेत आपली निवड झालीच पाहिजे हा हट्टच त्यांनी आपल्यापेक्षा 19 वर्षे सिनियर असलेल्या ग. प्र. प्रधान यांच्याकडे व्यक्त करून गोखले करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. बेळगावातून आलेल्या शिडशिडीत शरीरयष्टीचा उंच तरुण, डोळ्यात भरावे असे रूप नसलेला, रूंद भुवया, कुरळ्या केसांचा तीक्ष्ण, चमकदार डोळ्यांचा, परंतु व्यक्तिमत्त्वात काहिसे अजब वेगळेपण दिसणारा हा तरुण लोकांच्या नजरेत भरला.
तीक्ष्ण आणि अलौकिक स्मरणशक्ती लाभलेला हा तरुण साहित्य, नाट्य, कविता, कादंबऱ्या, वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी करू लागला. राजकारणात गेले नसते, तर नक्कीच एक उत्तम नाटककार, साहित्यिक झाले असते. राजकारण हे त्यांच्या वाट्याला योगायोगाने आले. कोकणात असताना त्यांनी कोकणातील अनेक कला जपल्या. त्यांचा अभ्यास केला होता. बेळगावात एकदा बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग संपला होता. नाथ नाटकाला आलेले पाहुणे प्रेक्षक जागीच थांबले. खरं तर त्यावेळी नाथ चळवळीचे कार्यकर्ते म्हणून नावारूपाला आले होते. आईला भेटण्यासाठी म्हणून ते आले होते. पण उपजत ते साहित्यिक-नाटकवेडे असल्यामुळे प्रयोग संपल्यावर लेखकाला, कलावंतांना भेटत. त्यांचे कौतूक करत असत. आयोजकांना जेव्हा कळले नाथ नाटकाचा प्रयोगाला बसले आहेत. त्यांनी बाळ कोल्हटकरांना सांगितले. त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले, ‘प्रयोग संपलाकी पडदा टाकू नका. नाथांना रंगमंचावर बोलवा. त्यांचा सन्मान करा व दोन शब्द बोलायला सांगा.’ नाटकाने लोकांच्या हृदयाला हात घातला होता. एरवी स्थिरचित्र असणाऱ्या नाथांनाही भावनावेग अनावर झाला होता.
रंगमंचावर बोलावताच ते गेले आणि म्हणाले, ‘कोल्हटकरांविषयी मी काही बोलावे, तो अधिकार माझा नाही. मी काही लेखक नाही. मी मराठी नाटकांचा केवळ एक प्रेक्षक आहे. आपली मराठी नाटके निव्वळ मनोरंजन करत नाहीत. ती प्रेक्षकांना विविध जाण देतात, शिकवतात आणि त्याचे लक्ष समकालीन संवेदनशील विषयांकडे वेधतात. कोकण काय किंवा हे बेळगाव काय, ही मराठी नाटकांची जन्मभूमी. अण्णासाहेब किर्लोस्करांनी बेळगावला मराठी नाटक नावारूपाला आणण्यासाठी केलेले प्रयत्न एकूणच समाजाच्या विकासात कला आणि संस्कृती यांचे महत्त्व नाकारता येणार नाही.’
कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात. ज्याप्रमाणे अकबराच्या दरबारातल्या प्रमुख दरबाऱ्यांची नावे फारशी कुणाला आठवत नाहीत. पण तानसेनचे नाव ऐकले नाही असा माणूस या देशात सापडणार नाही. विक्रमादित्याचा प्रधान विसरला गेलाय, पण कालिदास आपल्या हृदयात कायमचा बसलेला आहे.
नाथ पै कोकणचे, महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे एक अद्वितीय लेणे होते. भारतीय लोकशाहीचे संवर्धन आणि संगोपन आदर्श पद्धतीने व्हावे. हा त्यांचा ध्यास होता. संघर्ष हा त्यांचा स्थायीभाव होता. पण सघर्षातून समन्वय आणि अंतिमतः भारताचा सर्वांगीण विकास हेच त्याचे स्वप्न होते. आणि म्हणूनच विरोधक असले तरी संसदपटू म्हणून ते पंडित जवाहरलाल नेहरूंनाते आदर्श वाटत होते. दुर्दैवाने त्यांना अल्पायुष्य लाभले.
आज आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण ज्या ज्या मंडळींनी या देशासाठी दिलेले योगदान कधीच विसरता कामा नये. प्रा. मधु दंडवते म्हणत नाथ ज्यावेळी बोलत त्या त्यावेळी आमच्या मनातील अंतरीच्या तारा छेडल्या जात. त्यांच्या विचारांचा प्रवाह त्यांच्या बुद्धीतून प्रकटे. परंतु त्याच्या भावनांचा प्रवाह त्यांच्या हृदयातून आलेला असे. अशा या राजकारणाच्या धकाधकीतही कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्या सारखे मित्र जपून आपली संवेदनशीलता अबाधित राखणाऱ्या दुर्मिळ प्रतिभावंताला कोकण विसरत चालले आहे की काय? अशी शंका मनात येते. पण निराश होऊन चालणार नाही. ज्या नाथांनी कधीही हार मानली नाही.
ज्याप्रमाणे अभ्यासाशिवाय नुसती आरती लाभदायक ठरत नाही. हेजरी खरे असले तरी अभ्यास हीच विद्येची आरती मानली तर सरस्वती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्यांनी सिद्ध केले ते नाथ सर्वसामान्य लोकांना सांगते. सध्या मंदिरांची संख्या वाढते आहे, पण देव जागेवर नाही. गावोगावच्या महाराजांची मठ संख्या वाढत आहे व त्यातून अंधश्रद्धेच्या नव्या पाठशाळा चालविल्या जात आहेत. ही परिस्तिती निवळण्याचा मार्ग एक आहे. शुद्ध बुद्धीने वागावे, मुखवट्याशिवाय जगावे, अंधश्रद्धा नसावी, पण श्रद्धा असावी, देव पाठीशी असावा, देश नजरेसमोर दिसावा. मुखी सर्वकल्याणाचे गाणे गावे आणि ध्यानी पसायदान असावे.
–प्रा. प्रदीप ढवळ
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply