नसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात!
माझ्या यादीत कायम नसीर पहिला, मग ओम पुरी, नंतर परेश रावल आणि शेवटी अनुपम ! ही उतरती भांजणी म्हणजे लिस्ट ऑफ finest Indian artists that India has ever produced !
फाळणीच्या जखमा झेलत जुनागढचे पुश्तैनी घर विकून सहकुटुंब विस्थपित हा लघुचित्रकार- कलानंदात इतका मग्न की त्याबदल्यात डोळे गमावून बसलेला.
फाळणीच्या काळात दारावर बसणाऱ्या धडकांना एकच उत्तर -त्याच्या पोरीकडे आणि पत्नीकडे ! दरवेळी त्याची एक जीवापाड जपलेली कलाकृती त्यांच्या हवाली करायची. जाळपोळीपासून वाचणाऱ्या या एकमेव मार्गाचा हा हतबल पण निर्मम अवलंब ! अंध नसीर याच्या पार गेलेला ! घर खरेदी करण्यास आलेल्या किशोरीलाल या व्यक्तीला एकेक मिनिएचर दाखवत, समजावून सांगत असतो, प्रत्यक्षात तो खरा तर कोरा कॅनव्हास असतो.
पण दाराला कुलूप लावून जाताना तो एक आशा घेऊन बग्गीत बसतो- पोरबंदरच्या किनाऱ्याकडे ! ग्राहकाला बजावतो -” माझे एक शेवटचे लघुचित्र ठेवलंय टेबलवर- मी जिन्हा आणि पटेलांमधील वाटाघाटी संपल्यावर हे घर तुझ्याकडून परत विकत घेण्यासाठी. ते चित्र माझ्या खरेदीची “पेशगी”समज.”
परवा अशाच एका ठिकाणी जाण्याचा योग आला- १९८२-८३ च्या सुमारास एका समविचारी समूहाने पाषाण येथे पैसे जमा करून जागा विकत घेतली होती, एक सोसायटी तयार केली होती. सगळ्यांचे स्वप्न एकच – तेथे स्वतःचे हक्काचे घर, शक्य तो सेवानिवृत्तीनंतर बांधायचे.
पण काही माणसांच्या नशिबात जमीन, प्लॉट, स्वतःच्या मालकीचे घर असे काही नसतेच मुळी !
असंख्य कोर्टकचेऱ्या, मध्यस्थ, आणि विकत घेतलेले मनस्ताप यामधून त्यातल्या बऱ्याच जणांनी इहलोक सोडत स्वतःची सुटका करून घेतली. परवा त्यांच्या “कायदेशीर वारसांना” बिल्डरकडून भरपाई म्हणून, जमिनीची मालकी सोडल्यावर मिळणाऱ्या रकमेचे वाटप होते.
अवघे ४-५ मूळ मालक, जे आजपर्यंत रणात झुंजून तरलेले आणि बाकी सगळे वारस ! सगळाच जमाव किमान पंचावन्नच्या पुढे ! ३७-३८ वर्षांच्या झुंजीचे फळ स्वीकारायला आलेला!
१९८३ पासून ती जागा तशीच पडून आहे म्हणे – तिच्यावरील अदृश्य घरांची स्वप्ने घेऊन. आता विकसक तेथे टोलेजंग इमारती बांधेल आणि कोणातरी वेगळ्याच “नसीर” ला विकेल.
काही घरे बांधल्यानंतर विकली जातात, तर काही बांधण्याआधीच!
काही “नसीर” बांधकामांविना असेच विस्थापित होतात. त्यांची स्वप्नचित्रे दुसऱ्याच कोणीतरी खरेदी केलेली असतात.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply