नवीन लेखन...

मिरवणूक

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपच्या लेखिका सौ. हेमा पाटील यांचा लेख


घटस्थापना.. अर्थात घरोघरी देव बसतात. नऊ दिवस घरोघरी देवीची उपासना केली जाते.सप्तशतीचे पाठ पठण केले जातात. देवीची विविध स्तोत्रे, आरत्या म्हंटल्या जातात.याचवेळी नऊ दिवस विविध मंडळाच्या दुर्गादेवी पण बसतात.

आता सार्वजनिक गणेशोत्सव हा टिळकांनी सुरू केला आहे हे इतिहासात शिकलो आहोत, अन् कर्णोपकर्णी पण आपल्याला माहीत आहे.पण आपल्या महाराष्ट्रात दुर्गादेवीची स्थापना सर्वात आधी कुणी केली हे मला पामराला माहीत नाही,कारण शाळेत असताना आधीच माझा इतिहास भूगोल खूप म्हणजे खूपच कच्चा होता.

तसे तर आम्ही शाळेत असताना म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी शहरांमध्ये देवीची स्थापना केली जायची.( माझ्या वयाचा हिशोब लगेच सुरू करु नका गं तायांनो.. हे सांगितले कारण आपला सर्वांचाच तो सहजसुलभ स्वभाव असतो.त्यात मी ही आलेच )

असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, बंगालसोबतच बरेच वर्षे दुर्गादेवी आपल्या महाराष्ट्रात ही बसते.आम्ही बालपणी आईसोबत देवीची ओटी भरायला जायचो, तेव्हा त्या पूर्ण भागात एकच देवी बसायची.आता गेले तर लक्षात आले की, या चाळीस वर्षांत आसपासच्या परिसरात अजून पंचवीस मंडळे उदयाला आलीत.अन याच मंडळांचे गणेशोत्सव पण असतात.गणपती गेले की बरीच मंडळे गणपतीसाठी बनवलेले स्टेज व पत्रा शेड काढतच नाहीत.आता पंधरा दिवसांत देवी येतील.मग कशाला उगाच त्रास घ्यायचा? त्या पंधरा दिवसात कार्यकर्ते मात्र चांगलीच रेस्ट घेतात, कारण दुर्गादेवी साठी त्यांना शक्तीची गरज असते ना…

काय विरोधाभास आहे पहा.. शक्तीदात्री साठीच आराम करुन शक्ती मिळवायची. आता गावोगावी पण चांगली पाचसहा मंडळे असतात. शहरातील मंडळे अन् गावातील मंडळे यात सूक्ष्म फरक असतो,जो जणकारालाच समजतो.

तसे तर राजकीय पार्टी स्पिरीट सगळीकडेच असते, शहर असो वा खेडे..पण गावात कसे असते माहिताय का.. खासदार,आमदार, मग त्यांचे पी.ए.,मग त्या नेत्यांचे डावे उजवे हात, मग त्यांचे कार्यकर्ते, अन् मग गावातील त्या त्या पार्टीचा महत्वाचा माणूस अन् मग त्यांचे स्थानिक कार्यकर्ते! अशी ही उतरती भाजणी असते.यात या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापल्यापरीने तरुणाईला कामांचे वाटप करुन द्यायचे अन् आपल्या पार्टीचा प्रचार अन् प्रसार कसा होईल ते पहायचे हा खरंतर मुख्य उद्देश असतो.पण ही तरुणाई त्यासोबतच आपले व इतरांचे मनोरंजन ही व्हावे या प्रामाणिक हेतूने प्रेरित होऊन दरवर्षी काहीतरी वेगळे करायचे ठरवते.अन् पार्टीला तरुणाईची गरज असल्याने नेत्यांची चढती भाजणी त्यांना निर्णय स्वातंत्र्य देते.

अशाच एका मंडळाच्या दुर्गादेवी उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा धावता आढावा कुणातरी सुशील नामक व्यक्तीने घेतला होता. तो नेमका माझ्याच हातात पडावा ही बहुधा दुर्गादेवीची इच्छा होती..तर पाहूया हा आढावा! यात माझे काही शाब्दिक योगदान नाही ब्बा! उगाच माझा याच्याशी काही संबंध जोडू नका.मी फक्त सुशीलने केलेले निरीक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतेय.

“अखिल भारतीय दुर्गा कालीमाता मंडळ” या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन सोहळ्यासाठी अगदी सुंदर नियोजन केले होते. डिजे तर असतोच.. पण त्यासोबतच नामांकित लेझीम पथक पण बोलावले होते.डिजेवर लेझीम साठी उपयुक्त गाणी वाजवायची आणि सुंदर पद्धतीने मिरवणूक काढायची.ते नागीण डान्स अगर सैराट यांना यंदा सोडचिठ्ठी द्यायची असे कार्यकर्त्यांच्या मिटींगमध्ये ठरले. नाही म्हणायला काही कच्चे बच्चे कार्यकर्ते चुळबुळत होते, पण कुणीच विरोधाचा सूर आळवला नाही.मिरवणूकीचा दिवस उजाडला.संध्याकाळी डिजे दाखल झाला, लेझीम पथकही येऊन धडकले… तोपर्यंत सगळे ठरल्याप्रमाणे चालले होते.दुर्गादेवीच्या मूर्तीला सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये बसवण्यात आले.काही कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूलाच जास्त रमले होते.पण गडबडीत तिकडे प्रमुख कार्यवाहकांचे दुर्लक्ष झाले खरे..पण ते पुढे खूप त्रासदायक ठरणार आहे याची तेव्हा कल्पना आली नाही.

मिरवणूक अगदी झोकात सुरु झाली.लेझीम पथकाने अगदी छान ताल धरला होता.नेहमीच्या ढिंगढांग कानठळ्या बसवणाऱ्या सिनेगीतांपेक्षा हे लेझीम पथक श्रवणीय व प्रेक्षणीय वाटत असल्याने सर्व महिलाही ही मिरवणूक पहाण्यासाठी बाहेर आल्या होत्या.आणि तेवढ्यात काय माशी शिंकली कुणालाच कळले नाही.अचानक डिजेवर सैराट सुरु झाले.झिंग झिंग झिंगाट सुरु झाले की लेझीम पथक बावरले.पण सावरुन घेत त्या तालावर ही मिळतेजुळते घेत त्यांनी आपले लेझीम खेळणे सुरु ठेवले.कारण चुकून झिंगाट लागले असेल , लक्षात आले की परत सुरू होईल त्यामुळे उगाच थांबवायला नको.बघ्यांच्याही लक्षात आले की,काहीतरी चुकतंय..पण ते ही लेझीमच्या तालात इतके रंगले होते की, संगीतापेक्षा लेझीम खेळणाऱ्यांच्या पदन्यासावर त्यांचे लक्ष वेधले गेले होते.तेवढ्यात दहाबाराजणांचे टोळके लेझीम खेळणाऱ्यांच्या मध्येच घुसले आणि झिंगाटवर नाचू लागले.लेझीम खेळणारांना समजेना आता काय करावे..पण त्यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत त्या टोळक्याकडे दुर्लक्ष केले.

पण हेच टोळके मगाशी ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला रमले होते हे बिचाऱ्या लेझीम पथकाला काय माहीत? आता तुम्ही जर विचारात पडला असाल की, ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला असे काय असते तर तुम्हाला मिरवणुकींबाबत फारशी माहितीच नाही.कार्यकर्ते अधूनमधून ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला येऊन चार्ज होऊन पुढे जात असतात.पण काही उत्साही कार्यकर्ते इतके फुल्ल चार्ज होतात की, त्यांची चाल तिरकी होते.बोलताना जीभ अडखळते.अन कुणाचेच काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नसतात.समजले? तर ते पुढे लेझीम पथकात शिरलेले टोळके असेच फुल्ल चार्ज झालेले होते.ते पाहून कुणीतरी प्रमुख कार्यवाहकांना बोलावून आणले,पण ते टोळके अजिबात बाहेर निघायला तयार नव्हते.अन तेवढ्यात आणखी दहाबाराजण ट्रॅक्टरच्या मागे जाऊन स्वतःला चार्जिंग करुन त्या टोळक्याच्या मदतीला धावून आले. मग काय..टोळक्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यवाहकांचेच हात धरुन या टोळक्याने त्यांच्यावर नाचण्याची जबरदस्ती सुरू केली.स्वत:ला वाचवत कसेतरी कार्यवाहक बाहेर पडले.डिजेला तरी गाणी बदलण्यास सांगावे म्हणून डिजेच्या गाडीकडे गेले तर तिथे आधीच उत्साही कार्यकर्ते डिजेचा ताबा आपल्याकडे घेऊन बसले होते…

इकडे देवीसमोर झिंगाट डान्स अगदी रंगात आला होता.लेझीम बाजूला पडले होते.आता छोटी मुलेही झिंगाटवर नाचायला आत शिरली होती.ते पाहून इतर कार्यकर्त्यांचे ही नाचण्यासाठी पाय वळवळू लागले.मग कडेकडेने तरंगणारे कार्यकर्ते एकेक करत आत शिरले.आता पुढचं गाणं लावलं गेलं..डोकं फिरलया बयेचं डोकं फिरलया..या गाण्यावर चेव येऊन अंगात संचारल्यासारखा असा जे भन्नाट डान्स त्या टोळक्याने सुरु केला की, लेझीम पथक जागच्या जागी थांबले व तोंडात बोटे घालून एकदा त्यांच्याकडे व एकदा लेझीम पथकाला आमंत्रित करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पाहू लागले.पण कार्यकर्त्यांच्या हातात आता काहीच उरले नव्हते.हताशपणे ते मिरवणुकीत चाललेल्या गोंधळाकडे पहात लेझीम पथकाची नजर चुकवत होते.उत्साही कार्यकर्त्यांनी आपला नऊ दिवसांत झालेल्या श्रमांचा परिहार करण्यात कसलीच कसर सोडायची नाही असा चंग बांधला होता. आता नागीन फेम मन्या किंचाळू लागला..ऐ..नागीन धून लगाव..नागीन लगाव ! श्रमपरिहाराचे पेय शरीरात शिरले की, मन्याच्या जिभेवर हिंदी भाषा राज्य करु लागते.हम भारतीय है..याचा अभिमान अगदीच उफाळून येतो.मन्याच्या दंग्यापुढे कुणाचेही कधीच काही चालत नाही.नागीन धून लागली..मन डोले..मेरा तन डोले कौन बजाये बासुरीयां…हे ऐकून रुमालाचे एक टोक पुढच्या दोन दातांमध्ये पकडून त्या रुमालाची पुंगी बनवत सुशा मन्याच्या समोर हात ओवाळू लागला. त्या पुंगीच्या तालावर अन् शरीरात भिनलेल्या पेयाच्या उर्मीवर मन्या हळूहळू डोलत डोलत वाकला व परत साक्षात जमिनीवर लोळण घेत जितेंद्रला नागासारखे नाचलेले पाहिलेले त्याच्या मधूनच लक्षात आल्याने तो अंगाला मधून मधून झटके देत कधी पाय झाडत तर कधी डोके अर्धवट उचलत जीभ बाहेर काढून नागासारखी वळवळत मधूनच आत घेत होता. ते पहात असताना एका सोबतच्या कार्यकर्त्याला वाटले,याला बहुतेक शाहरुख,अजय देवगण आणि अक्षयकुमारसारखी बोलो तो जुबां केसरीची आठवण झाली आहे म्हणून तो तत्परतेने पुढे झाला व अख्खी पुडी त्याच्या बाहेर काढलेल्या जीभेवर रिती केली.मग तर काय पेय अन् केसरीची जी कीक बसली म्हणता, मन्या असा रंगात आला की जमिनीवर जोरजोराने उलटापालटा होत हाताचा बनवलेला फणा असा जोरात आपटू लागला की, खराखुरा नागच जणू आपला फणा आपटतोय.ते पाहून आणखी चारपाच जणांच्याही अंगात नागीण संचारली आणि त्यांनीही मन्याच्या जवळ लोळण घेत आपले नृत्य कौशल्य दाखवायला सुरुवात केली.ते पाहून इतरांच्याही मनात आले की, आपणही नागीण डान्स करावा पण, ये अपने बस की बात नहीं | हे लक्षात आल्यावर त्यांनी जागच्या जागीच उभे राहून अंगाला वेडेवाकडे करत नाचायला सुरुवात केली.असा सगळा दरवर्षीसारखाच धुरळा उडल्यावर करमणूक हवी असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.कारण हा सगळा गोंधळ घडवून आणण्यासाठी त्यांनीच तर पडद्याआडून सुत्रे हलवली होती.त्यामुळे मनासारखे घडल्याने ते ही रंगात येऊन यात शिरले.लेझीम पथक बाजूला उभे राहून या नागीन डान्सकडे पहात होते.अन यंदा वेगळ्या पद्धतीने मिरवणूक काढली जाणार आहे म्हणून सुखावलेली दुर्गामाता आता या रंगात आलेल्या नागीणींवर महिषासुरमर्दिनी होऊन शरसंधान करु की त्यांची कीव करु या विचारात पडली…

— सौ. हेमा पाटील

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..