लेखक – पद्मनाथ डुंबरे
हॉटेल मध्ये बायकोला घेवून जो मिसळ खायला जातो आणि टेबलवर बसल्यावर “दोन मिसळ” अशी ऑर्डर देतो, सॅंपलला रस्सा म्हणतो, आमच्याकडील लहान पोर सुध्दा सांगेल की हा खरा ‘मिसळखाऊ’ नाही म्हणून. मिसळ खायची असेल तर चार जिवाभावाचे मित्र आणि ‘आपले मिसळचे’ हॉटेल असेल तरच खरी गम्मत. मिसळ खायला जावून बसले की दहा-बारा मिनिटात ऑर्डर न देता मिसळच्या प्लेट समोर यायला हव्यात. ज्याला फक्त शेव आणि सॅंपल हवा ती प्लेट त्याच्या समोर, ज्याला मिसळवर कांदा पेरुनही थोडा वाटीत हवा असतो ती प्लेट त्याच्या समोर, एक्सट्रा तर्री हवी असलेल्याच्या समोर तर्रीची वाटी, कुणाच्या प्लेटमध्ये लिंबाची जास्तीची फोड असं सगळं न सांगता आले की ‘मिसळखाऊ’ कसा लहाण मुलासारखा प्रसन्न हसतो. दर्दी मिसळखाऊ कधी आरोग्याचा विचार करत नाही. त्याला मिसळच्या नुसत्या वासावरुन कळते की मिसळमध्ये मिठ जास्त आहे की कमी. तो मिसळला तोंड न लावताच चिमुटभर मिठ मिसळमध्ये टाकतो. तो चुकनही मिसळवर असलेल्या कोरड्या शेव-पापडीतील शेव तोंडात टाकत नाही. दोन्ही चमचे दोन हातात घेवून, अतिशय एकाग्रतेने आणि मनापासून तो सर्व मिसळ एकजीव करतो. थोडा सॅंपल अजुन घेतो. मग ईतरांची प्रगती पहातो आणि पावाचा एक तुकडा फक्त सॅंपलमध्ये बुडवून हलक्या हाताने तोंडात घालतो. मग दोन्ही हात चमच्यासहीत अंतराळी तरंगत ठेवून, डोळे मिटून पहिला घास सावकाश तोंडात घोळवतो. त्या दोन-चार सेकंदाच्या तुर्यावस्थेतच त्याला पुढील पंधरा मिनिट चालणाऱ्या ‘मिसळयज्ञात’ किती सॅंपल, एक्सट्रा फरसाण आणि पावांची आहूती पडणार आहे याचा अंदाज येतो. चारही मित्र जरी जिवाभावाचे असले तरी ‘मिसळ मनासारखी’ कालवून, पहिला घास खाताच काही सेकंदासाठी तुर्यावस्थेत जाईपर्यंत ते एकमेकांचे कुणी नसतात. या समाधीतुन ते मिसळभुमीवर (टेबलवर) ऊतरले की मग एकमेकांबरोबर ओळखीचे हसुन गप्पा आणि मिसळीला एकदमच हात घालतात. काही जण चपातीने भाजी खावी तशी पावाने मिसळ खातात. हा मिसळचा घोर अपमान आहे. मिसळ खाताना ऊजव्या हातात पावाचा लहाणसा तुकडा घेवून मिसळमध्ये बुडवावा, डाव्या हातातल्या चमच्याने मोठ्या कौतुकाने मिसळला आधार देत पावाच्या तुकड्यावर ढकलावे आणि मग तो पावाचा तुकडा पानाचा विडा खावा तसा खावा. किंवा चमचाभर मिसळ खाऊन मग पावाचा तुकडा तोडावा. अस्सल ‘मिसळखाऊ’ फार तर तिन वेळा डोळे आणि दोन वेळा नाक पुसेल रुमालाने. यापेक्षा जास्त नाही.
खऱ्या मिसळखाऊमध्ये काही गुण असणे फार आवश्यक असते. सगळ्यात पहिला म्हणजे कोडगेपणा. सॅंपल कितीही वेळा मिळत असला तरी ‘अस्सल मिसळखाऊ’ दोन पावानंतर “जरा फरसान टाका हो” अशी कोडगेपणाने मागणी करतोच करतो. नवख्या मिसळखाऊचे ते काम नव्हे. मग हॉटेल मालकही वैतागलेल्या चेहऱ्याने वाटीत वगैरे न देता सरळ मुठीत थोडे फरसान आणुन तुमच्या प्लेटमध्ये कुस्करुन टाकतो. आता हा हॉटेलमालकाचा वैताग पाहून नविन माणूस संकोचून जाईल. पण खरी गम्मत अशी असते की मिसळखाऊचा कोडगेपणा आणि मालकाचा वैताग यांचे विचित्र नाते असते. वासराने ढुशा दिल्याशिवाय गाय जसा पान्हा सोडत नाही, तसे गिऱ्हाईकाने कोडगेपणा केल्याशिवाय मालकही खुलत नाही. तो वैताग वगैरे त्या कौतुकाचाच भाग असतो. मनापासुन, चविने, पोटभर जेवणारा असला की खरी सुग्रण जशी खुष होते ना, तसेच आगावू फरसाण घेवून “मामा, सॅंपल द्या की जरा मोकळ्या हाताने” म्हणनारे गिऱ्हाईक असले की मालकही जाम खुष होतो. सुग्रण बाई आणि असा मालक या दोघांचा आनंद एकाच जातकुळीचा. “तर्री कमीच टाका किंवा नाही टाकली तरी चालेल, कांदा वेगळा द्या” असं म्हणून पाव निरखून निरखून खाणारा कुणी असला की मालक त्या ‘पांचट मिसळखाऊ’कडे ढुंकूनही पहात नाही.
‘अस्सल मिसळखाऊ’चा दुसरा गुण म्हणजे स्वच्छता. थांबा जरा. स्वच्छता म्हणजे अती स्वच्छता असलेल्या मिसळच्या हॉटेलकडे पक्का मिसळखाऊ सरळ पाठ फिरवतो. हॉटेल जरा असे तसेच हवे. जर हॉटेलमधले टेबल ‘सांडलेली तर्री’ पुसून पुसून किंचीत लाल झालेले असतील तर हमखास तिथे चवदार मिसळ मिळणार हे सांगायला कोणी भविष्यवाला नको. आणि हॉटेलच्या एंट्रीलाच जर भजीचा घाणा काढणारा बसला असेल तर ते हॉटेल ‘आंब्याच्या पानांचे तोरण’ बांधलेल्या घरापेक्षा सुंदर दिसते. अस्सल मिसळखाऊ फार स्वच्छतेच्या नादी लागत नाही. मिसळ खावून झाल्यावर टिशूपेपरला किंवा पेपर नॅपकीनला हात पुसणाऱ्याने खरी मिसळ खाल्लीच नाही. मिसळ खाऊन झाल्यावर हात धुवावेत आणि हवेतच चार पाच वेळा झटकून मांडीवर एकदा सुलटे मग ऊलटे दाबावे. खरा मिसळप्रेमी बायकोला न घाबरता सरळ खिशातला रुमाल काढून, त्याला डाग वगैरे पडतील याचा विचार न करता खसखसून हात पुसतो आणि काऊंटरवर “किती झाले?” विचारत तिथे ठेवलेल्या शेव-पापडी, फरसाणच्या थाळीतुन फरसाण घेवून, हातावर चुरडून त्याची फक्की मारतो. (कोडगेपणा) खरा मिसळखाऊ कधीच मिसळ खाल्ल्यानंतर ताक पित नाही. त्याला ‘ताक’ म्हणजे फॅड वाटते. मिसळ नंतर कडक आणि गोड चहाच हवा. तोही किती? तर फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ ईतकाच. तोही बशीत. दोन कप चहा चारजणांना पुरतो.
‘अट्टल मिसळखाऊ’चा महत्वाचा गुण म्हणजे ‘आपल्या’ मिसळीचा सार्थ अभिमान. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ हे ढोबळ अभिमान झाले. मिसळखाऊ कधी गावाच्या नावाने मिसळला ओळखतच नाही मुळी. तो ओळखतो ‘तात्याची मिसळ’ ‘भाऊची मिसळ’ ‘रामाची मिसळ’ वगैरे. आणि तिचाच अभिमान बाळगतो. अर्थात अभिमान, मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, वाद हा आलाच. मिसळखाऊंचे पण वाद होतात, खटके ऊडतात. पण ते इतरांशी नाही तर मिसळखाऊंबरोबरच. ‘भाऊची मिसळ’चा कट्टर भक्त जर ‘रामाची मिसळ’च्या अट्टल भोक्त्याला भेटला तर वाद अटळच. मग या वादावादीचा शेवट तर्रीच्या लाल ओघळातच मिटतो. दोघेही भक्त आलटून पालटून एकमेकांकडे मिसळ खायला जातात आणि “आमच्या इतकी भन्नाट नाही, पण तुमचीही मिसळ भारी आहे” असे एकमेकांना सांगून वाद मिटवतात.
अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही.
तर रामाविषयी पुन्हा कधीतरी, तोवर शोधा आपला मिसळवाला. काय……..
— पद्मनाथ डुंबरे
Leave a Reply