संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता! इथं मात्र मामला खवय्यांचा आहे, चव जरा बिघडायला अवकाश सगळं टीस्-फिस्! फरसाण, पोहे जेव्हा तर्रीबाज रस्यामधे मटकी, वाटाण्यांच्या साथीने डुंबतात, ते दृश्य अवर्णनीय ! आह हा हा हा ! बरोबर कांदा, लिंबाची फोड, कोंथिंबिरीची गार्निर्शिंग अशी फिल्डिंग लागली असेल तर काय बहार! उत्कंठावर्धक क्रिकेटची मॅचही डावलून खाणारा फलंदाज डिशमधील, एक ऊजव्या हातातला चमचा स्ट्रायकर तर दुसरा डाव्या हातातला चमचा नॉन-स्ट्रायकर बनून त्या गर्द तांबड्या सिजन बॉलरुपी ऐवजावर तुटून पडतात. तिथे पाच इंची खोलगट डिशच्या पीचवर मग तुफान टोलेबाजी सुरु होते. एकेक रन जोडावा तसा एकेक तर्रीदार चविष्ट फरसाणयुक्त घास खात्यात जमा होत जातो. लालभडक कटाचं भांड घेऊन पोऱ्या बारावा खेळाडू म्हणून शेजारी फिरत असतो. या खेळात विकेट पडण्याचा प्रश्नच नसतो. तरीही पावाची जोडी दुरुनच अम्पायरिंगचा ध्यास धरते. पण हे धारिष्ट्य त्यांच्याच अंगलट येते आणि एकेक तुकडा होऊन मटकावले जाताना, बिचाऱ्या पावरूपी अंपायरांची विकेट पडण्याचा अनावस्था प्रसंग ओढवतो.
पण हो, खवय्या खेळाडूंचा अति आत्मविश्वास कधीतरी ढळण्याची शक्यता असते. तिखट्ट-जाळ तर्रीने डोक्याला घाम फुटून हिट-विकेट गेल्याची उदाहरणे आहेत. पण तरीही, नाक तोंड पुसत हेल्मेट काढून पॅव्हेलियनच्या दिशेने दुसरी बॅट मागवण्याच्या अविर्भावात आणखी रस्सा मागवला जातोच आणि एकदाच्या डिशमधील जिन्नसरूपी ओव्हर संपतात. शेवटचा मेडन चवदार घास मटकावताना मिसळ-मॅच संपते. खवय्या शतकपुर्ती झालेल्या खेळाडूप्रमाणे समाधानाचा ढेकर देत ‘मॅन आॅफ द मॅच’ किताब जिंकल्यासारखा बाहेर पडतो.
लेखक – श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply