चमकत होते अगणित तारे,
आकाशी लुकलुकणारे ।
लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,
फसवित होते आम्हांस सारे ।।१।।
कधी जाती चटकन मिटूनी,
केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी ।
खेळ तयांचा बघतां बघतां,
चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।
एक एक जमती नभांगी,
धरणीवरल्या मांडवी अंगीं ।
संख्या त्यांची वाढतां वाढतां,
दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।
हसतो कुणीतरी मिश्कील तारा,
डोळे मिटतो दुजा बिचारा ।
स्थिर राहूनी लपतां लपतां,
खेळांचा वाढवी पसारा ।।४।।
निशाराणीची मुले ही सारी,
खेळत राहती रात्री बिचारी ।
उषाराणीची चाहूल येतां,
निघूनी जाती आपल्या घरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply